Snack Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली की नेहमी भजी, वडा किंवा बटाट्याचे पदार्थ केले जातात. पण यावेळी नेहमीच्या पदार्थांना थोडा ब्रेक देऊन काहीतरी वेगळं करून पाहा. मूगडाळ आणि चीजपासून तयार होणारे कुरकुरीत रोल्स हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

बाहेरून कुरकुरीत आणि आतून चीजमुळे मऊ व चविष्ट लागणारे हे रोल्स घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडतील. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी फार जास्त साहित्याचीही गरज नाही.

साहित्य

  • १ कप मूगडाळ
  • १ कप किसलेलं चीज
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • कोथिंबीर
  • ब्रेडक्रम्ब्स
  • तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम मूगडाळ स्वच्छ धुऊन साधारण २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी पूर्णपणे काढून डाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, जिरे, गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

आता हाताला थोडं तेल लावून मिश्रणाचा छोटा गोळा घ्या आणि त्याला रोलचा आकार द्या. मध्ये किसलेलं चीज ठेवून रोल व्यवस्थित बंद करा. तयार रोल्स ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवून घ्या.

कढईत तेल गरम करून हे रोल्स मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळलेले रोल्स टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.

गरमागरम मूगडाळ-चीज रोल्स टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. चहासोबतचा हा कुरकुरीत स्नॅक तुमच्या संध्याकाळची चव नक्कीच वाढवेल.