Nag Panchami special Hunda Recipe : उद्या ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपंचमी हा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला येतो. उद्या काही ठिकाणी बाजारातून मातीचा नाग आणून किंवा नागाच्या छायाचित्राची पूजा करतात. या दिवशी भावासाठी उपवाससुद्धा केला जातो; तर नागपंचमी निमित्त नैवेद्य म्हणून ज्वारीच्या लाह्या बाहेरून किंवा घरीसुद्धा बनवल्या जातात. काही ठिकाणी हळदीच्या पानातील पातोळ्या बनवल्या जातात, तर आज आपण नागपंचमीला (Nag Panchami 2024) नैवेद्य म्हणून कोल्हापूरची एक खास रेसिपी पाहणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे ‘गव्हाचा उंडा…’, तर हा पदार्थ बनवण्यासाठी साहित्य काय असेल, त्याची कृती काय असेल जाणून घेऊ या…

साहित्य :

१. पाव किलो गहू

२. एक वाटी तांदूळ

३. शेंगदाणे

४. एक वाटी किसलेले खोबरे

५. पाव वाटी पांढरे तीळ

६. भाजलेली चण्याची डाळ

७. अर्धा किलो गूळ

हेही वाचा…Oats : सकाळच्या, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक ‘ओट्सचा लाडू’ खा; चव अन् पोषण दोन्ही मिळेल; रेसिपी लिहून घ्या लगेच

कृती :

१. सगळ्यात पहिल्यांदा साहित्यात नमूद करण्यात आलेला एकेक पदार्थ मिक्सरच्या भांड्यात जाडसर बारीक करून घ्या.

२. मिक्सरच्या भांड्यात जाडसर बारीक करून घेतलेले पदार्थ एकजीव करून घ्या.

३. नंतर एका भांड्यात दोन ग्लास पाणी घ्या व हे मिश्रण अर्धा तास भिजत ठेवा.

४. त्यानंतर अर्धा किलो गूळ गरम पाण्यात विरघळवून घ्या आणि यामध्ये पाण्यात अर्धा तास ठेवलेलं मिश्रण ओतून घ्या आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्या.

५. गॅस चालू करा. नंतर एक मोठा किंवा मध्यम आकाराचा टोप गॅसवर ठेवा आणि त्यात दीड वाटी तेल ओता.

६. तेल गरम झाल्यानंतर एकजीव करून घेतलेलं गुळाचं मिश्रण त्यात घाला. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर गॅस ठेऊन टोपावर झाकण ठेवा.

७. नंतर पेटता ईकार (कोळसा) झाकणावर ठेवावा.

८. दहा मिनिटांनंतर लोखंडी तवा गॅसवर ठेवा. नंतर त्यावर मिश्रणाचा टोप ठेवावा आणि १५ ते २० मिनिटं मिश्रण शिजू द्यावे.

९. अशाप्रकारे तुमचा नागपंचमी स्पेशल हुंडा तयार. तुम्ही हा हुंडा खाताना त्यात दूध घालू शकता.

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते. काही जण घरी, तर काही जण मंदिरात जाऊन नागाची पूजा करतात. या दिवशी घराबाहेर रांगोळी काढली जाते. नागदेवतेला हळद, गूळ, तांदूळ, कच्चे दूध, फुले, पाणी अर्पण करून पूजा केली जाते. नागदेवतेला नैवैद्य ठेवला जातो. तर यंदा तुम्हीसुद्धा नागपंचमीला (Nag Panchami 2024) कोल्हापुरी स्टाईलमध्ये गव्हाचा उंडा बनवा आणि नागदेवताला नैवैद्य म्हणून अर्पण करा.