सॅलड सदाबहार : पंचमी सॅलड

कोणताही कलाकार आपल्या कलाकृती बनवताना काही प्रेरणा डोळ्यासमोर ठेवत असतो.

(संग्रहित छायाचित्र)

शेफ नीलेश लिमये

कोणताही कलाकार आपल्या कलाकृती बनवताना काही प्रेरणा डोळ्यासमोर ठेवत असतो. माझी प्रेरणा आहे, आपल्या संस्कृतीतील पारंपरिक खाद्यपदार्थ. कालच ऋषिपंचमी झाली. या दिवशी बनवली जाणारी ती पारंपरिक भाजी खाल्ल्यावर जाणवले, आपल्या संस्कृतीत किती सुंदर पाककृती आहेत. याच भाजीपासून प्रेरणा घेत मी आजचे सॅलड बनवलेले आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे फोडणीला सॅलड ड्रेसिंगचे रूप दिलेले आहे.

साहित्य :

* १०० ग्राम लाल भोपळा, १०० ग्राम गवार, १०० ग्राम कणसाचे दाणे, १०० ग्राम पडवळ, १ अळूचे पान.

* ड्रेसिंगसाठी – १ चमचा साजूक तूप, १ चमचा जिरे, २ हिरव्या मिरच्या, मीठ, २ चमचे चिंचेची चटणी.

कृती :

ल्ल अळूचे पान सोडून सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. यानंतर त्या उकळत्या पाण्यात घालून मग त्यावर लगेचच थंड पाणी ओतावे. थोडक्यात ब्लांच करून घ्याव्यात. अळूच्या पानाची गुंडाळी करून ते उभे चिरून घ्यावे.

* एका भांडय़ात तूप गरम करा. त्यात चिरलेले अळू परतून घ्या. ते बाजूला काढून ठेवा. आता याच भांडय़ात तूप, जिरे, मिरचीची फोडणी करा. त्यात चिंचेची चटणी घाला. चवीनुसार मीठ घाला.

* सर्व ब्लांच केलेल्या भाज्या सॅलड बाऊलमध्ये किंवा मी ज्याप्रमाणे शॉट ग्लासेसमध्ये भरल्या आहेत त्याप्रमाणे भरा. त्यावर ड्रेसिंग घाला. थंड करून हे सॅलड सव्‍‌र्ह करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Panchami salad recipe