Puranpoli Easy Recipe in Marathi: रंग, पिचकारी, पुरणपोळी आणि कटाची आमटी याशिवाय होळी हा सण साजरा होऊच शकत नाही; नाही का? मात्र सध्या बरेचजण विकतची पुरणपोळी आणणे पसंत करतात. किंवा ती घरी ऑर्डर करून मागवली जाते. याचे कारण म्हणजे पुरणपोळी हा पदार्थ करण्यास तसा अवघड असून, वेळ खाणारा आहे. तसेच पुरण तयार करण्यासाठीही अनेकांना अडचणी येतात.

मात्र यंदाच्या होळी सणानिमित्त तुम्हाला घरीच पुरणपोळी करून पाहायची असेल, किंवा सोप्या पद्धतीने पुरण तयार करायचे असेल तर, पुरणपोळी तयार करण्यासाठीचे प्रमाण तसेच पुरण बनवण्याची सोपी पद्धत दाखवली आहे ती पाहा.

साहित्य

  • कप चणा डाळ
  • १ कप साखर
  • १/४ टीस्पून हळद
  • १ टीस्पून वेलची पूड
  • १/२ टीस्पून जायफळ पूड
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तांदूळ पिठी (पोळीला लावण्यासाठी)
  • २ कप कणिक
  • १/४ टीस्पून मीठ
  • २ टेबलस्पून तेल (कणिक मळताना लावण्यासाठी)
  • आवश्यकतेनुसार साजूक तूप (वरून पोळीला लावण्यासाठी)

    कटाची आमटी साहित्य
  • शिजलेल्या डाळीचा कट/ डाळीतील पाणी
  • १ टेबलंस्पून लाल तिखट
  • १ टेबलस्पून गोडा मसाला
  • २ टेबलस्पून खिसलेले खोबरे
  • १ टीस्पून जीरे
  • २-३ टेबलस्पून तेल
  • १ टीस्पून मोहरी
  • १/२ टीस्पून हळद
  • १/४ टीस्पून हिंग
  • चवीनुसार मीठ
  • १ टेबलस्पून चिंच
  • १-२ टीस्पून गूळ (आवाडीप्रमाणे घेणे)
  • ६-७ कढीपत्ता पाने

कृती

पुरणपोळी करण्यासाठी प्रथम चणा डाळ घेऊन ती २-३ वेळा स्वच्छ धून घेणे. नंतर गरम पाण्यात ही डाळ वेळ जसा असेल त्या प्रमाणे २-३ तास भिजत घालावी. याने डाळ लवकर शिजते. आता गॅस वर पातेले ठेवून २ ग्लास पाणी उकळून घेणे. आता त्यात भिजलेली चणा डाळ घालावी. रंग येण्यासाठी हळद घालावी.

डाळ छान मऊ होई पर्यंत शिजवून घेणे. मधून मधून डाळ हलवत राहणे. गरज असेल तर गरम पाणी घालावे. साधारण १/२ -१ तास डाळ शिजवण्यास लागते. पण डाळ कुकर मध्ये शिजवली तर लवकर शिजते. (पातेल्यामध्ये शिजवल्यास वेळ लागतो. पण आमटीचा कट छान येतो.) आपल्या आवडीनुसार आणि वेळेनुसार कुकर मध्ये किंवा पातेले मध्ये डाळ शिजवावी.

डाळ मऊ शिजली कि गॅस बंद करावा. चाळणीत ती डाळ निथळून घेणे. जे पाणी डाळीतील असते त्याची कटा ची आमटी करावी. आता शिजलेली डाळ पुन्हा त्याच पातेले मध्ये घेऊन स्मशार ने डाळ थोडी स्मॅश करावी. आता त्यात ज्या मापाने डाळ घेतली आहे त्यानेच साखर त्या मध्ये घालावी. व सगळे छान मिक्स करून घेणे. व ते पातेले गॅस वर मध्यम आचेवर ठेवणे.

गॅस एकदम बारीक करावा. साखर डाळ हलवत राहणे. आता त्या मध्ये वेलची पूड, जायफळ घालावे.आता हळू हळू साखर विरघळू लागते. पाणी सुटू लागते.5 मिनिट बारीक गॅस वर परतत राहणे लगेचच डाळ घट्ट होण्यास लागते.खाली पातेले आणि वर पुरण जाळी ठेवून पुरण वाटून घेणे. अशा प्रकारे पोळीचे पुरण तयार झाले.

आता कणिक मळून घेणे. त्यासाठी परातीत कणिक घेऊन त्यात चवीला मीठ, तेल घालावे. थोडे थोडे पाणी घालून पोळीला जशी कणिक भिजवतो त्या पेक्षा सैल कणिक तेल लावून सैलसर मळून घेणे. १/२ तास झाकून ठेवावी.कणिक भिजली कि त्याचे पेढ्या पेक्षा थोडे मोठे गोळे करून घेणे. तसेच पुरणाचे ही सारखेच गोळे करून घेणे.

आता पोळी करण्यासाठी कणकेचा एक गोळा तांदूळ पीठ मध्ये घोळून त्याचे हाताने पारी करून घेणे. त्या मध्ये पुरणाचा तेवढाच गोळा घालून बंद करावा. व तो गोळा पुन्हा पिठा मध्ये घोळून हाताने थोडा एकसारखा दाबून घेणे. त्यातील पुरण सगळीकडे जाईल. त्याची आता हलक्या हाताने पोळी लाटून घेणे.

आता गॅस वर तवा ठेवून तो गरम झाला की पोळी अलगद तव्यावर घालावी व दोनीही बाजूने तूप सोडून खमंग भाजून घेणे.व एका प्लेट मध्ये ठेवावेत. अशाप्रकारे सगळे पुरण पोळी करून घेणे.मस्त मऊ लुसलुशीत पुरण पोळी दूध, तूप, आमटी सोबत सर्व्ह करावी. खूप छान टेस्टी साखरेची पुरणपोळी चवीला लागते.

कटाची आमटी करण्यासाठी… शिजलेल्या डाळीचे काढून ठेवलेले पाणी एका पातेले मध्ये घेणे. आता त्या मध्ये आवाडीनुसार लाल तिखट, गोडा मसाला आणि चिंच गूळ, चवीनुसार मीठ घालून घेणे. त्या नंतर खोबरे, जीरे भाजून घेऊन ते मिक्सर मध्ये बारीक करून घेणे. हे वाटलेले खोबरे त्या कटात घालणे व गॅस वर उकळण्यास ठेवणे.

आता छोटया कढई मध्ये तेल घालवे व तेल गरम झाले कि त्यात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता यांची खमंग फोडणी करून ती वरून पातेलेतील कट वर घालावी. मस्त ७-८ मिनिट आमटी उकळून घेणे. खूप छान अशी कटाची आमटी तयार झाली. आवडत असल्यास वरून कोथिंबीर घालावी. मस्त गरम गरम पुरणपोळी, भात सोबत सर्व्ह करावी.

(नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.)