Sabudana Bread Toast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी झटपट, पोटभरीचं आणि नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळं खायचं असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा. साबुदाणा म्हटलं की डोळ्यासमोर खिचडी, वडा किंवा थालीपीठ येतं. मात्र याच साबुदाण्याचा वापर करून तुम्ही कुरकुरीत साबुदाणा टोस्ट तयार करू शकता. ब्रेड आणि साबुदाण्याचं हे भन्नाट कॉम्बिनेशन नाश्त्याला एक वेगळीच चव देतं. विशेष म्हणजे हा पदार्थ तळण्याऐवजी तव्यावर कमी तेलातही तयार करता येतो.

साहित्य

  • १ कप साबुदाणा
  • ४ ब्रेड स्लाइस
  • १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा
  • १/२ कप दही
  • १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • २ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा चाट मसाला
  • २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • भाजण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून त्यामध्ये साधारण १/२ कप पाणी घाला. साबुदाणा ४ ते ५ तास भिजत ठेवा. भिजल्यानंतर अतिरिक्त पाणी असल्यास ते पूर्णपणे काढून टाका.

आता एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा घ्या. त्यामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून घाला. त्यात दही, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे, लाल तिखट, चाट मसाला, कोथिंबीर आणि मीठ घाला. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा.

आता ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर साबुदाण्याचं मिश्रण जाडसर थर देऊन पसरवा. मिश्रण ब्रेडवर चांगलं चिकटेल याची काळजी घ्या.

तवा गरम करून त्यावर थोडं तेल सोडा. साबुदाण्याचा थर असलेली बाजू आधी तव्यावर ठेवून मंद-मध्यम आचेवर भाजा. साधारण ३ ते ४ मिनिटांनी खालील बाजू सोनेरी आणि कुरकुरीत झाली की ब्रेड सावधपणे पलटवा.

दुसरी बाजूही हलकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. तयार झालेला साबुदाणा टोस्ट तव्यावरून काढून त्याचे त्रिकोणी तुकडे करा.

गरमागरम साबुदाणा टोस्ट हिरवी चटणी, दही किंवा गोड-तिखट चटणीसोबत सर्व्ह करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार असलेला हा नाश्ता सकाळच्या नेहमीच्या पदार्थांना नक्कीच वेगळा पर्याय ठरू शकतो.