Pohe Tasty Nuggets: प्रत्येक रविवारी घरामध्ये पोहे, उपमा, इडली हा नाश्ता बनवला जातो. पण, सतत तेच तेच खाऊन घरातल्या मंडळींनाही कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही पोह्याचे नगेट्स नक्कीच ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे. या रविवारी नक्की ट्राय करा पोह्याचे नगेट्स. जाणून घ्या साहित्य आणि कृती…

पोह्याचे नगेट्स बनवण्यासाठी साहित्य:

१. २ वाटी पोहे
२. ४ चमचे मक्याचे पीठ
३. ४ चमचे तांदळाचे पीठ
४. ४ उकडलेले बटाटे
५. १ हिरवी शिमला मिरची चिरलेली
६. १ कांदा चिरलेला
७. १/२ वाटी मटार
८. १ चमचा जिरे पावडर
९. १/२ चमचा लाल मिरची पावडर
१०. १ चमचा आमचूर पावडर
११. १/२ चमचा गरम मसाला पावडर
१२. ५-६ चमचा ब्रेड क्रम्स
१३. १ वाटी कोथिंबीर
१४. चवीनुसार मीठ
१५. तेल आवश्यकतेनुसार

पोह्याचे नगेट्स बनवण्याची कृती:

हेही वाचा: दुधी भोपळ्याची भाजी म्हटल्यावर मुलं नाक मुरडतात? अशावेळी बनवा दुधीचा चमचमीत ठेपला; पटकन नोट करा साहित्य अन् कृती

१. सर्वात आधी पोहे स्वच्छ धुवून भिजवून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका आणि पोहे एका भांड्यात काढून घ्या.

२. त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे मॅश करून टाका. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित करा.

३. आता त्यात बारीक कापलेला कांदा, शिमला मिरची, मटार आणि कोथिंबीर टाका. आता पुन्हा सर्व गोष्टी एकत्रित करा.

४. त्यानंतर त्यात जिरे पावडर, आमचूर पावडर, लाल मिरची, गरम मसाला आणि मीठ टाका. तसेच त्यात तांदळाचे पीठदेखील टाका.

५. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याचे लहान-लहान गोळे तयार करा आणि गोल नगेट्स तयार करा.

६. आता एका वाटीत मक्याचे पीठ घेऊन त्यात थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर तयार केलेले नगेट्स त्यात घोळवून घेत नंतर ब्रेड क्रम्समध्ये ही घोळवून घ्या.

७. त्यानंतर एका पॅनमध्ये २ चमचे तेल टाकून ते गरम करून घ्या.

८. तेल गरम झाल्यानंतर नगेट्स तळा, सोनेरी रंग येईपर्यंत पोह्याचे नगेट्स तळून घ्या.

९. तयार गरमागरम पोह्याचे नगेट्स टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.