How To Make West Bengal’s Famous Jhalmuri At Home : पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक राजकीय चर्चा रंगल्या; पण एका खास पदार्थाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तो पदार्थ म्हणजे ‘झालमुरी’. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चटपटीत बंगाली पदार्थाचा आस्वाद घेतला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तेव्हापासून ही ‘मोदींची आवडती झालमुरी’ सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत असलेली ही चटपटीत आणि झणझणीत झालमुरी आता तुम्ही घरच्या घरी कशी बनवू शकता, याची खास रेसिपी जाणून घेऊ..

निवडणुकीच्या मैदानात गाजलेली ‘झालमुरी’ बनवायची कशी?

पंतप्रधान मोदींच्या बंगाल दौऱ्यात एका साध्या, पण चविष्ट पदार्थाची मोठी चर्चा झाली. तो पदार्थ म्हणजे बंगालची ओळख असलेली ‘झालमुरी’. चवीला तिखट, आंबट आणि चटपटीत असलेली ही झालमुरी तुम्हीही काही मिनिटांत तयार करू शकता, ज्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊ…

साहित्य:

मुरमुरे: २-३ वाट्या (कुरकुरीत असावेत)
१ बारीक चिरलेला कांदा,
१ बारीक चिरलेला टोमॅटो,
१ उकडलेला बटाटा,
१-२ हिरव्या मिरच्या (तिखटानुसार)
२ चमचे भाजलेले शेंगदाणे,
अर्धी वाटी बारीक शेव किंवा फरसाण.
१ चमचा कच्चे मोहरीचे तेल (यामुळेच अस्सल बंगाली चव येते).
चवीनुसार काळे मीठ,
लाल तिखट (चवीनुसार)
१/२ चमचा चाट मसाला
अर्धा चमचा भाजलेली जिरे पूड.
१ चमचा लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती:

१. मसाल्यांचे मिश्रण: एका मोठ्या बाऊलमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि शेंगदाणे एकत्र करा.
आता त्यात काळे मीठ, तिखट, चाट मसाला आणि जिरे पूड मिसळा. त्यानंतर मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण एकजीव करा. (टीप: चव अधिक वाढवण्यासाठी त्यात लोणच्याचा मसाला नक्की वापरा).

शेवटी बाऊलमध्ये कुरकुरीत मुरमुरे आणि शेव घालून पटकन मिक्स करा. वरून कोथिंबीर भुरभुरा आणि लगेच खायला द्या, जेणेकरून मुरमुरे मऊ पडणार नाहीत.

महत्त्वाची टीप: झालमुरीचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर ती बनवल्यावर लगेच पेपर कोनमधून खा, जशी कोलकात्याच्या रस्त्यांवर मिळते.