Perfect Chakli Tips : दिवाळी अगदी काही दिवासांवर आली आहे. घरोघरी दिवाळीच्या फराळाची जोरदार तयारी सुरु आहे. चकली, करंजी,चिवडा, लाडू….यांचा खमंग सुगंध अनेकांच्या घरात दरवळत असेल. दिवाळीच्या सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चकली. कुरकुरीत चकली खायला सर्वांनाच आवडते पण ती तयार करणे अजिबात सोपे काम नाही. कित्येक गृहिणीं दरवर्षी चकली करताना वैतागतात कारण अनेकदा चकली करताना ती तुटते, तेलात विरघळते किंवा तेलकट होते किंवा इतकी कडक होती की तोडताना दात दुखतात. पण चिंता करू नका चकली करताना तुमच्या नेमक्या काय चुका होतात आणि त्या कशा सुधारू शकता हे जाणून घेऊ.
कुरकुरीत आणि चविष्ट चकलीसाठी भाजणीचे अचूक प्रमाण (Exact Proportions of Bhajani for Crispy and Tasty Chakli)
- १/२ किलो तांदूळ
- १ टीस्पून हळद
- १ टीस्पून हिंग
- १ टेबलस्पून मीठ
- १ टीस्पून ओवा
- २ टीस्पून पांढरे तीळ
- २ टेबलस्पून साजूक तूप
१. धान्य वाळवण्याची योग्य पद्धत (Proper Method of Drying Grains)
धान्य स्वच्छ धुवून घ्या. पण धुतलेल्या धान्यातील पाण्याचा अंश काढून टाकण्यासाठी काही वेळ चाळणीतच ठेवा. त्यानंतर ते फॅनखाली सुती कापडावर पसरवून वाळवून घ्या. उन्हात उन्हात वाळवू नका.
२. धान्य भाजताना घ्यायची काळजी (Precautions While Roasting Grains)
धान्य भाजताना खमंग, खरपूस होईपर्यंत भाजू नका. भाजताना जितका रंग बदलतो तितका त्यातील कस कमी होतो, चिकटपणा कमी होतो ज्यामुळे कितीही पीठ मळले तरी चकली वळताना ती तुटते किंवा ती तेलात विरघळते. धान्य जास्त भाजले गेल्यास चकली विरघळते हे कायम लक्षात ठेवा. धान्य हलकंस भाजा. धान्य गरम व्हायला सुरुवात झाली की ते काढा.
धान्य भाजल्यानंतर ताटात काढल्यावर मध्ये खड्डा करून ठेवा कारण धान्य भाजताना एकावर एक धान्य टाकले की वाफ तयार होतील आणि त्यामुळे धान्यात ओलावा निर्माण होतो. हेच टाळण्यासाठी मध्ये खड्डा करा जेणेकरून त्यात अडकलेली वाफ निघून जाते.
तुम्ही चकलीचे प्रिमिक्स तयार करत असाल तर शेवटच्या धान्याबरोबर धने, जिरे, सुक्या लाल मिरच्या भाजून घ्या. चकलीचे धान्य दळायला टाकताना त्यात हिंग, मीठ आणि हळदही घाला जेणेकरून तुमचे चकलीचे प्रिमिक्स तयार होईल.
चकलीचे भाजणीचे पीठ तयार झाले की त्यात ओवा आणि पांढरे तीळ घालू शकता.
३. मोहनाचे अचूक प्रमाण (Precures for Exact Amount of Mohana / Shortening)
१ किलो भाजणीसाठी तेल किंवा तुपाचे कडकडीत मोहन किती घालावे, हे ठरवणे अत्यंत महत्त्वाचे असते. मोहन जास्त झाले तर चकली तेलात विरघळते, आणि कमी झाले तर चकली कडक होते. मोहनमध्ये तेल न घालता तूप, डालडा (वनस्पती तेल) किंवा लोणी घाला ज्यामुळे चकली छान पोकळ होते, हलकी होते. चकली कडकडीत होत नाही.
४. पिठाचा पोत आणि मळण्याची योग्य पद्धत (Texture of Dough and Proper Kneading Technique)
उकड काढून किंवा गरम पाणी वापरून गोळा मळताना पाणी कमी घाला आणि जेव्हा साच्यात घालायचे आहे तेव्हा गरम पाण्याचा हात घेऊन मळून घ्या. त्यामुळे चकलीचे पीठ एकजीव होते आणि चकली पाडताना तुकडे पडत नाहीत
पीठ मळताना नेहमी कोमट किंवा हलके गरम पाणी वापरावे, ज्यामुळे पिठातील चिकटपणा वाढून पीठ एकजीव होते.
पीठ फार घट्ट मळले तर चकली पाडताना तुकडे पडतात आणि सोऱ्यातून चकली पडायला त्रास होतो; पीठ जास्त सैल झाले तर चकलीला काटे येत नाहीत आणि ती तेलकट होते. चकलीचे पीठ मऊ किंवा पातळ करायचे नाही कारण त्यामुळे चकलीला काटे येत नाहीत. चकली काटेरी हवी असतील तर हाताने जितके पीठ रगडून एकसमान कराल तितके त्याला काटे चांगले येतात. चकलीचे पीठ खूप पाण्यात मळले गेले तर पीठ ओलसर राहते. ओलसर पीठाची चकली तळली तर ती तेलकट होते आणि डब्यात ठेवल्यानंतरही तेल खाली साचते. चकली तेलकट होऊ नये म्हणून तुम्ही जास्त पाणी वापरू नका आणि पातळ पीठ मळू नका. पाण्याचा अंश कमी करा.
५. सोऱ्याची सोपी ट्रिक (Simple Trick for the Chakli Press / Sorya)
- सोऱ्याला आतून थोडे तेल लावल्यास पीठ न चिकटता चकली एकसंध आणि टोकदार काट्यांची पडते.
६. तेलाचे अचूक तापमान(Exact Temperature of Oil) :
चकली तळताना तेल योग्य प्रमाणात गरम असणे आवश्यक आहे. तेल थंड असेल तर चकली तेल पिते, आणि जास्त कडकडीत तापले असेल तर चकली वरून लगेच काळी/लाल होते पण आतून कच्ची राहून मऊ पडते.
७. तळण्याची आच (Frying Flame):
चकली नेहमी मध्यम आचेवर तळावी. चकली तळताना तेल मंद आचेवर ठेवू नका. कोमट तेलात चकली सोडू नका. मोठी-छोटी आच करू नका. एकसमान आचेवर ठेवा. कडकडीत तेलात चकली करपेल त्यामुळे इतकी मोठी आच ठेवू नका. तेल व्यवस्थित असेल ना तर चकली तेलात टाकली की चुरचुरते. चकली चांगली फुलते आणि आत पोकळ होते. चकली तेलात सोडल्यानंतर किमान १ मिनिट तिला झारीने हलवू नये; चकली थोडी सेट झाल्यावरच अलगद उलटावी.
८. बुडबुडे थांबणे – तळल्याची खूण (Stopping of Bubbles – Sign of Frying):
तेलातील फेसाळलेले बुडबुडे कमी झाले आणि चकली तेलाच्या तळाशी स्थिर झाली की चकली आतपर्यंत उत्तम तळली गेली आहे हे ओळखावे.
९. जाळीवर काढणे (Placing on a Wire Rack / Mesh):
तळलेली चकली थेट ताटात किंवा डब्यात न ठेवता आधी पुरणाच्या चाळणीवर किंवा जाळीवर ठेवावी, जेणेकरून त्यातील वाफ निघून जाईल आणि चकली मऊ पडणार नाही.
१०. हवाबंद डब्यात साठवणूक (Storage in Airtight Container):
चकली पूर्ण थंड झाल्यावरच कोरड्या हवाबंद डब्यात भरावी; गरम चकली डब्यात भरल्यास वाफेने मऊ पडते.
ही माहिती ‘Madhuraas Recipe Food‘ या युट्यूब चॅनलवर शेअर केली आहे.
