Adolf Hitler Geli Raubal Death Mystery update: १९३१ मधील ती रात्र आधुनिक इतिहासातील एका हुकूमशहाच्या उदयापूर्वीचे सर्वात मोठे आणि न सुटलेले कोडे मानली जाते. नाझी जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर सत्तेवर येण्याच्या अवघ्या दोन वर्षांपूर्वी, म्युनिक येथील प्रिंझरेगेंटेनप्लात्झ येथील आलिशान अपार्टमेंटमध्ये त्याची २३ वर्षीय भाची अँजेला ‘गेली’ रॉबाल हिचा संशयास्पद मृत्यू झाला. हिटलरच्या वैयक्तिक पिस्तुलातून झाडलेल्या गोळीनंतर घडलेल्या या घटनेचे सत्य ९५ वर्षांनंतर नव्या संशोधनातून समोर येत आहे.
हिटलरच्या प्रिंझरेगेंटेनप्लात्झ (Prinzregentenplatz) येथील आलिशान अपार्टमेंटमध्ये त्याची २३ वर्षीय भाची अँजेला ‘गेली’ रॉबाल (Geli Raubal) हिचा संशयास्पद मृत्यू १९३१ साली झाला. तिच्या छातीत हिटलरच्या वैयक्तिक ‘वॉल्थर ६.३५ मिमी’ (Walther pistol) पिस्तुलातून झाडलेली गोळी लागली होती. जवळपास ९५ वर्षे हा मृत्यू केवळ एक ‘कौटुंबिक कलहातून झालेली आत्महत्या’ अशी नाझी इतिहासकार आणि तत्कालीन पोलिसांच्या डायरीत नोंद झाली. मात्र, अलीकडच्या काळात जर्मन इतिहासकार हॅराल्ड सँडनर (Harald Sandner) यांच्या संशोधनाने या जुन्या प्रकरणाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पटलावर चर्चेत आणले आहे.
हिटलर आणि गेली: एक अस्वस्थ करणारे नातेसंबंध
गेली रॉबाल ही हिटलरची सावत्र बहीण अँजेला हिची कन्या होती. १९२९ मध्ये ती म्युनिकला वैद्यकीय शिक्षणासाठी आली, तेव्हा ती हिटलरच्या अपार्टमेंटमध्ये राहू लागली. विसाव्या शतकातील चरित्रकार इयान करशॉ (Ian Kershaw- Hitler: 1889–1936 Hubris) आणि अॅलन बुलक यांच्या मते, हिटलरचे गेलीवर असणारे प्रेम हे सामान्य कौटुंबिक स्नेहभावाच्या पलीकडचे होते. हिटलर तिच्यावर टोकाचे नियंत्रण ठेवत असे; तिच्या कपड्यांपासून, मित्रांपर्यंत आणि हालचालींपर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्याची नजर असे.

हिटलरचा पुतण्या विल्यम पॅट्रिक स्टुअर्ट- ह्युस्टन याने १९३९ मध्ये केलेल्या नोंदींनुसार, गेली आणि हिटलर यांच्यातील अनैसर्गिक जवळीक कुटुंबीयांमध्ये चर्चेचा विषय होती. इतिहासकार थॉमस वेबर (University of Aberdeen) यांच्या मते, हिटलर तिच्याबाबत एका गूढ आसक्तीने (obsession) पछाडलेला होता. मृत्यूच्या काही दिवस आधी दोघांमध्ये तीव्र वाद झाले होते, कारण गेलीला व्हिएन्नाला जाऊन स्वतःचे स्वतंत्र आयुष्य सुरू करायचे होते आणि हिटलरचा त्याला सक्त विरोध होता.
अधिकृत बचाव (Alibi) आणि पोलिसांचा संशयास्पद तपास
१९ सप्टेंबर १९३१ च्या सकाळी गेलीचा रक्ताने माखलेला मृतदेह तिच्या बंद खोलीत आढळला, तेव्हा म्युनिक पोलिसांनी कोणताही औपचारिक तपास न करता लगेचच या घटनेला ‘आत्महत्या’ घोषित केले. या तपासातील सर्वात मोठी त्रुटी पुढीलप्रमाणे:
- १. शवविच्छेदनाचा अभाव: संशयास्पदरित्या बंदुकीच्या गोळीने मृत्यू होऊनही मृतदेहाचे कायदेशीर शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले नाही.
- २. हिटलरचा बचाव (Alibi): हिटलरने असा दावा केला की, तो आदल्याच दिवशी (१८ सप्टेंबर) दुपारी म्युनिक सोडून न्यूरेमबर्गच्या (Nuremberg) दौऱ्यावर गेला होता. पोलिसांनी हा दावा ग्राह्य धरून त्याला कधीही चौकशीसाठी बोलावले नाही.
हॅराल्ड सँडनर यांचे नवे पुरावे: ६२ विसंगती आणि वेळेचा खेळ
इतिहासकार हॅराल्ड सँडनर यांनी तब्बल ३५ वर्षे या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचे, स्थानिक नोंदींचे आणि पोलीस फाईल्सचे पुनरावलोकन केले. त्यांच्या ‘The Death of Angela ‘Geli’ Raubal: Suicide or Foul Play’ या आगामी संशोधनपर ग्रंथात त्यांनी म्युनिक पोलिसांच्या २८ सप्टेंबर १९३१ च्या अधिकृत अहवालातील तब्बल ६२ खोट्या नोंदी, चुका आणि राजकीय दबावाखाली केलेले फेरफार उघड केले आहेत.
सँडनर यांच्या दाव्यानुसार…
- मृत्यूची खरी तारीख: म्युनिकच्या सार्वजनिक दस्तऐवजांमध्ये आणि स्थानिक मृत्यू नोंदवहीत (Death Register) दोन नोंदी अशा आढळल्या आहेत, ज्या दर्शवतात की गेलीचा मृतदेह १८ सप्टेंबरच्या सकाळीच पोलिसांच्या निदर्शनास आला होता.
- हिटलर म्युनिकमध्येच होता: तिचा मृत्यू १८ सप्टेंबरचा असेल, तर त्या वेळी हिटलर न्यूरेमबर्गला गेलेला नव्हता तर प्रत्यक्ष म्युनिकमध्येच हजर होता. याचाच अर्थ त्याचा ‘अलबी’ बनावट होता.
- सँडनर यांचा असा युक्तिवाद आहे की, त्यावेळी नाझी पक्ष सत्तेच्या उंबरठ्यावर होता आणि अशा वेळी तरुण भाचीच्या हत्येचा किंवा अनैतिक संबंधांतून झालेल्या मृत्यूचा आरोप हिटलरची राजकीय कारकीर्द कायमची संपवू शकला असता. म्हणूनच पक्षाशी निष्ठावंत असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ही फाईल पद्धतशीरपणे बंद करण्यात आली.
इतिहासकारांमधील वाद: हत्या की कागदोपत्री त्रुटी?
या नव्या पुराव्यांमुळे ऐतिहासिक वर्तुळात दोन स्पष्ट प्रवाह निर्माण झाले आहेत:
१. वेबर यांची सावध भूमिका: प्राध्यापक थॉमस वेबर यांनी सँडनर यांनी शोधलेल्या कागदपत्रांना अस्सल मानले आहे. तीन स्वतंत्र सरकारी नोंदी १८ सप्टेंबरचा उल्लेख करत असल्याने ही निव्वळ ‘कारकुनी चूक’ असणे कठीण वाटते. मात्र, वेबर यांच्या मते हिटलर घटनास्थळी हजर असणे म्हणजे त्यानेच गोळी झाडली असा अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे आणि चुकीचे ठरेल; नाझींनी हिटलरच्या उपस्थितीची बदनामी टाळण्यासाठीही हा बनाव रचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२. गोएर्टेमाकर यांचा संशयवाद: हिटलरवरील प्रसिद्ध इतिहासकार हाइके गोएर्टेमाकर (Heike Görtemaker) यांच्या मते, घरमालक अर्न्स्ट राइशर्ट यांनी पोलिसांना १९ सप्टेंबरच्या सकाळी १०:१५ वाजता फोन केला होता. त्या काळातील जर्मन नोंदींमध्ये तारखांचे घोटाळे नेहमीचेच होते. शिवाय, १९३१ मध्ये हिटलरकडे सत्ता नव्हती आणि म्युनिकचे तत्कालीन पोलीस अधिकारी नाझींचे कट्टर विरोधक होते; त्यामुळे त्यांनी हिटलरला वाचवण्याचा प्रयत्न का करावा, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
गेली रॉबालच्या मृत्यूनंतर हिटलर खोल नैराश्यात गेला होता, त्याने तिच्या खोलीला एका स्मारकाचे रूप दिले होते आणि तो शाकाहारी झाला होता, असेही म्हटले जाते. इतिहासाचा क्रूर विरोधाभास असा की, ज्या खोलीत गेलीने रक्ताच्या थारोळ्यात प्राण सोडले, त्यानंतर बरोबर १४ वर्षांनी ३० एप्रिल १९४५ रोजी हिटलरनेही बर्लिनमधील भूमिगत बंकरमध्ये स्वतःवर गोळी झाडून जगाचा निरोप घेतला. ९५ वर्षांनंतरही सँडनर यांच्या संशोधनाने निर्माण केलेले प्रश्न हे सिद्ध करतात की, नाझी हुकूमशहाच्या वैयक्तिक आयुष्यातील क्रौर्य आणि सत्तेचा मुखवटा आजही इतिहासाच्या कसोटीवर तपासला जात आहे.
