मानवी आहारात फळांना प्राचीन काळापासून महत्त्वाचं स्थान आहे. शेतीचा शोध लागण्यापूर्वी मानव शिकारी-संचयी जीवनशैली (Hunting -Gathering) जगत होता. प्राण्यांची शिकार करुन तसंच निसर्गात उपलब्ध असलेली फळं, कंदमुळं, बिया आणि इतर वनस्पतीजन्य पदार्थ गोळा करून त्यांचा अन्न म्हणून वापर करत होता. सुमारे १० हजार ते १२ हजार वर्षांपूर्वी नव-पाषाणयुगात शेतीची सुरुवात झाली आणि माणसाने उपयुक्त वनस्पतींची निवड करून त्यांची लागवड करण्यास सुरुवात केली. यातूनच विविध फळपिकांचा विकास झाला. पुढे जाऊन फळं ही केवळ भूक भागवणारे अन्नपदार्थ नव्हे, तर मानवी संस्कृती, पारंपरिक खाद्यपद्धती, व्यापार आणि अर्थव्यवस्थेचाही महत्त्वाचा भाग बनत गेले.

आहारात फळं का मोलाची?

मानवी आहारात फळांना विशेष महत्त्व आहे, याचं कारण फळांमध्ये पाणी, नैसर्गिक साखर, आहारातले तंतू, जीवनसत्त्वं, खनिजं आणि विविध जैवसक्रिय वनस्पतीजन्य संयुगं आढळतात. संतुलित आहारात फळांचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.फळांमधले तंतू पचनसंस्थेच्या सामान्य कार्यासाठी उपयुक्त ठरतात,तर जीवनसत्त्वं आणि खनिजं शरीरातल्या विविध जैविक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

अंजिराचं कूळ कोणतं?

माणसाला उपयुक्त पोषणमूल्य पुरवणारं अंजीर हे असंच एक महत्त्वाचं फळ आहे. ताजं मऊ, रसाळ आणि गोड अंजीर तर आवडीनं खाल्लं जातंच. पण सुकवलेलं अंजीरही अनेक देशांत लोकप्रिय आहे. अंजिराचं शास्त्रीय नाव Ficus carica L. असून त्याचा समावेश मोरेसी (Moraceae) या कुळात होतो.याच कुळात वड, पिंपळ, उंबर आणि नांद्रुक यांसारख्या वनस्पतींचाही समावेश होतो.

वनस्पतिशास्त्रीय वैशिष्ट्यं काय?

अंजीर ही वनस्पती प्रामुख्यानं पश्चिम आशिया आणि पूर्व भूमध्य प्रदेशात आढळते. आज जगातील अनेक उष्ण आणि सम शीतोष्ण प्रदेशांत अंजिराची लागवड केली जाते.अंजिराचं झाड मध्यम आकाराचं असून साधारणपणे काही मीटर उंच वाढतं. झाडाची पानं मोठी, रुंद आणि हाताच्या पंजाप्रमाणे खंडित असतात. पानांचा पृष्ठभाग काहीसा खरखरीत असतो. झाडाच्या खोडाला किंवा फांद्यांना इजा झाल्यास त्यातून पांढऱ्या रंगाचा चीक बाहेर पडतो.

पुष्पबंध अनोखा का?

अंजिराची वनस्पतिशास्त्रातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, त्याच्या फुलांची रचना. आपण ज्याला अंजिराचं फळ समजतो, ते वनस्पतिशास्त्रीयदृष्ट्या साधं फळ नाही, तर ती सायकॉनियम (Syconium) प्रकारातली पुष्पबंधीय (Inflorescence) रचना आहे. या रचनेमध्ये असंख्य लहान फुलं एका पोकळ, मांसल भागाच्या आतील पृष्ठभागावर असतात. त्यामुळे बाहेरून पाहताना आपल्याला फुलांचा मागमूसही दिसत नाही. फळासारख्या दिसणाऱ्या या रचनेच्या टोकाला एक लहान छिद्र असतं. काही अंजीर प्रजातींमध्ये या छिद्रातून विशिष्ट प्रकारची गांधीलमाशी आत प्रवेश करून परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण करते.अंजीर आणि गांधीलमाशी यांच्यातील संबंध हा वनस्पती आणि कीटक यांच्यातील सहजीवनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

अंजिराचे अवशेष कोणत्या काळातले?

पुरातन काळापासून मानवी आहारात अंजिराचा समावेश झालेला आढळतो. अंजिराच्या इतिहासाच्या दृष्टीने जॉर्डन खोऱ्यातील गिलगाल या पुरातत्त्वीय स्थळाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी सुमारे ११,४०० ते ११,२०० वर्षांपूर्वीच्या काळातले कार्बनीभूत अंजिराचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांचा अभ्यास किसलेव, हार्टमन आणि बार-योसेफ यांनी केला. २००६ मध्ये Science या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या संशोधनानुसार, हे अंजीर फलनाशिवाय विकसित होणाऱ्या फळांशी संबंधित असावेत. या निष्कर्षामुळे अंजिराच्या कृषी संस्कृतीतल्या इतिहासाविषयी महत्त्वाची चर्चा सुरू झाली. या अभ्यासाचं महत्त्व असं की, अंजिराच्या लागवडीची प्रक्रिया पारंपरिक शेतीच्या व्यापक प्रसारापूर्वी सुरू झाली असण्याची शक्यता संशोधकांनी मांडली आहे.

ग्रीक-रोमन संस्कृतीतलं स्थान कोणतं?

प्राचीन इजिप्तच्या संस्कृतीतही फळांचा वापर आहार मोठ्या प्रमाणात होत असे, तसंच धार्मिक विधित फळांना महत्त्वाचं स्थान मिळत असे. इजिप्तमधली चित्रकला, थडग्यांतील दृश्यं आणि पुरातत्त्वीय अवशेष यांमधून त्या काळातली कृषिपद्धती आणि अन्नसंस्कृतीची माहिती मिळते. भूमध्य प्रदेशातील ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये अंजीर एक लोकप्रिय फळं होतं, हे त्यातून पुढे येतं. रोमन लोक ताज्या आणि सुक्या अंजिराचा वापर करत होते. सुकवलेली फळं दीर्घकाळ टिकत असल्यामुळे त्यांची साठवणूक करुन प्रवासादरम्यानचं अन्न म्हणून उपयोग केला जात असे. प्राचीन ग्रीक समाजातही दैनंदिन आहारात अंजिराचा समावेश असे.

आदम-इव्ह कथेत अंजिराचं पान?

प्राचीन धार्मिक साहित्यातही अंजिराचा उल्लेख आढळतो. बायबलमध्ये आदाम आणि इव्ह यांच्या कथेत अंजिराच्या पानांचा संदर्भ येतो. या उल्लेखामुळे प्राचीन पश्चिम आशियातील सांस्कृतिक जीवनात या वनस्पतीची ओळख किती खोलवर रुजलेली होती, याची जाणीव होते.

अंजीर फळाचा विस्तार कसा झाला?

व्यापारी मार्ग, मानवी स्थलांतर आणि कृषिपद्धतींच्या देवाणघेवाणीमुळे अनेक फळपिकं एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात पोहोचली. अंजिराच्या प्रसारातही या प्रक्रियांचा वाटा असावा. त्यामुळे पश्चिम आशिया आणि भूमध्य प्रदेशातून अंजीर वनस्पती विविध प्रदेशांत विस्तारली.

भारतात अंजिराचा प्रवेश कधी?

आज तुर्की, इजिप्त, मोरोक्को आणि भूमध्य समुद्राच्या आसपासच्या अनेक देशांत अंजिराची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यातही तुर्की हा देश अंजीर उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. भारतीय उपखंडात अंजीर नेमकं कोणत्या काळात प्रवेशलं यावर संशोधन सुरु आहे. काही संशोधकांच्या मते, सिंधू संस्कृतीच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात व्यापारमार्ग आणि विविध मानवी समूहांच्या स्थलांतरातून अंजीर भारतात आलं असावं. मात्र याविषयी ठामपणे मत व्यक्त करण्यासाठी पुरेसे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध नाहीत.

अंजिराचं सेवन का महत्त्वाचं?

अंजीर हे चवीला गोड आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेलं फळ आहे. यामध्ये तंतुमय पदार्थ (फायबर), कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी खनिजं तसंच विविध अँटि ऑक्सिडंट्स आढळतात. अंजिराच्या सेवनामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास आणि पोट साफ होण्यास मदत होऊ शकते.

अंजीर आरोग्यदायी का?

अंजिरामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून अंजिराचं सेवन हाडांचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त मानलं जाते. त्यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदाची आहेत. अंजिरामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स शरीरातल्या पेशींचं ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

अंजिराचे फायदे काय?

अंजिरामध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे त्याच्या सेवनातून शरीराला ऊर्जा मिळते. त्यातल्या तंतूंमुळे पोट भरल्याची भावना अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते. मात्र, सुक्या अंजिरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्याने साखर आणि उष्मांक अधिक प्रमाणात असतात.त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी अंजिराचं सेवन योग्य प्रमाणात करणं आवश्यक आहे. अंजिरामधील विविध पोषक तत्त्व त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात. म्हणून अंजिराला संतुलित आहारातलं एक पौष्टिक घटक म्हणून पाहणं अधिक योग्य ठरतं.

आयुर्वेदिक महत्त्व काय?

अंजिरामध्ये पॉलिफेनॉलसारखी प्रतिऑक्सिडीकारक संयुगंही आढळतात. ही संयुगं शरीरातल्या ऑक्सिडेटिव्ह ताणाशी संबंधित प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.अंजिराच्या पानांमध्येही विविध जैवसक्रिय संयुगं आढळतात. आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये पानांचा वापर काही स्वरुपाच्या त्वचारोगांवर आणि इतर तक्रारींवर केल्याचा उल्लेख आहेत. मात्र असे उपचार वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावेत, हे उत्तम.

खाद्यसंस्कृतीत मोल काय?

भारतीय खाद्यसंस्कृतीत या अंजीरनामक ताज्या आणि सुक्या फळाचा वापर प्रामुख्याने मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. अंजिराची बर्फी, अंजीर रोल आणि सुकामेव्याच्या मिश्रणात त्याचा वापर केला जातो. बाजारात मिळणाऱ्या सुकलेल्या अंजिरालाही विशेष मागणी असते.

अंजीर उत्पादनात पुण्याची आघाडी?

आज भारतात अंजिराची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रासह काही इतर राज्यांत केली जाते. महाराष्ट्रातला पुणे जिल्हा अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन पश्चिम आशियाशी संबंधित असलेल्या या फळानं आधुनिक काळात महाराष्ट्राच्या फळ शेतीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात अंजिराचा विचार केला, तर पुणे जिल्ह्यातील काही भागांत अंजीर हे महत्त्वाचं फळपीक आहे. ताज्या फळांबरोबरच सुकवलेली फळं आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांनाही बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

आंतरज्ञानशाखीय दुवा

थोडक्यात, अंजिराच्या इतिहास डोकावून पाहिलं की माणसाने अंजिराशी आपलं नातं कसं विकसित केलं आहे, हे समजून येतं. सोबतीला अंजिराचा अभ्यास हा वनस्पतिशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र आणि मानवी खाद्यसंस्कृती या तिन्ही क्षेत्रांतलं आपलं ज्ञान विस्तारण्यास मोलाची मदत करतो. एका अर्थाने, विविध ज्ञानशाखांना जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवाही ठरतो