Arthritis Housework Tips: “गुडघे दुखतात, आता घरातली कामं कशी करायची?” आर्थ्रायटिस असलेल्या अनेक व्यक्तींसाठी हा प्रश्न रोजचा आहे. विशेषतः घरकामाची बहुतांश जबाबदारी असलेल्या व्यक्तींसाठी स्वयंपाक, साफसफाई किंवा भांडी-कपडे करणे ही कामं टाळणं नेहमीच शक्य नसतं. त्यामुळे वेदना वाढतील या भीतीने काम पूर्णपणे सोडण्याऐवजी शरीराची क्षमता आणि कामाची पद्धत समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.
वेदना सुरू झाल्यावर दोन टोकाच्या प्रतिक्रिया दिसतात. एकतर कामं तशीच सुरू ठेवून शरीरावर ताण देत राहणे किंवा वेदना वाढतील या भीतीने जवळजवळ सगळी कामं बंद करणे. प्रत्यक्षात या दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत, यातला सुवर्णमध्य साधणं आवश्यक आहे. आर्थ्रायटिसमध्ये प्रश्न “काम करायचं की नाही?” हा नसावा, “काम शरीराच्या क्षमतेनुसार कसं करता येईल?” हा असावा.
घरकाम म्हणजेही शरीराचा व्यायामच
घरकाम करताना शरीर सतत हालचालीत असतं. बराच वेळ उभं राहणं, वारंवार वाकणं, वजन उचलणं, जिने चढणं, पुढे-मागे चालणं, हातांनी वस्तू हलवणं या सगळ्या हालचालींमध्ये सांधे आणि स्नायू काम करत असतात. म्हणूनच एखाद्या व्यक्तीची शारीरिक क्षमता कमी झालेली असेल, तर सकाळपासून सलग अनेक कामं केल्यावर वेदना किंवा थकवा वाढू शकतो. याचा अर्थ घरकाम हानिकारक आहे असा नाही. उलट, दैनंदिन कामं ही व्यक्तीला सक्रिय ठेवणाऱ्या हालचालींचाच एक भाग आहेत. मात्र ती करताना शरीराची सध्याची क्षमता, कामाचा कालावधी आणि विश्रांती यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

आर्थ्रायटिसमध्ये activity pacing ही संकल्पना व्यवहारात खूप उपयोगी ठरते. म्हणजे काम पूर्णपणे बंद करण्याऐवजी ते आपल्या क्षमतेनुसार विभागून करणं. उदाहरणार्थ, सकाळी स्वयंपाक, त्यानंतर लगेच साफसफाई आणि कपडे धुणं असं सलग करण्याऐवजी कामांमध्ये विश्रांती किंवा कमी शारीरिक ताणाचं काम ठेवता येऊ शकतं. सगळं एकाच वेळी करण्यापेक्षा कामाचं नियोजन करा.
प्रत्यक्षात काय करता येईल?
- एका दिवसात सगळी जड कामं एकत्र न ठेवणे.
- बराच वेळ उभं राहावं लागणारं काम आणि कमी ताणाचं काम आलटून-पालटून करणे.
- काम सुरू करण्यापूर्वी दिवसातील महत्त्वाची कामं ठरवणे.
- थकवा खूप वाढेपर्यंत थांबण्याऐवजी आधीच छोटा विराम घेणे.
- एखादं काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण निष्क्रिय होण्याची वेळ येत असेल, तर कामाचं प्रमाण पुन्हा तपासणे. उद्देश “कमी काम” हा नाही; उद्देश “शरीराची क्षमता संपेपर्यंत काम न करता ती योग्य प्रकारे वापरणे” हा आहे.
स्वयंपाकघरात छोटे बदल
स्वयंपाक करताना दीर्घकाळ उभं राहणं गुडघे किंवा कंबर दुखणाऱ्या व्यक्तीसाठी त्रासदायक ठरू शकतं. ज्या कामांसाठी सुरक्षितपणे बसता येतं, उदा. भाजी चिरणे, निवडणे किंवा काही तयारीची कामं ती बसून करता येतील. वारंवार वापरायच्या वस्तू अतिशय खाली किंवा खूप उंच ठेवण्याऐवजी सहज पोहोचतील अशा ठिकाणी ठेवल्यास अनावश्यक वाकणं किंवा ताण कमी करता येतो.
प्रॅक्टिकल नियम:
काम करताना वारंवार एकच हालचाल किंवा एकच स्थिती ठेवण्यापेक्षा शक्य तितक्या वेळा शरीराची स्थिती बदलत राहणे उपयोगी ठरू शकते.
साफसफाई करताना शरीराला कामाच्या साधनांशी जुळवून घ्या
फरशी पुसणे, कपडे धुणे किंवा खाली ठेवलेल्या वस्तू उचलणे यामध्ये वारंवार वाकावं लागतं.
अशा वेळी काम करण्याची पद्धत आणि उपलब्ध साधनं विचारात घेणं महत्त्वाचं आहे. शक्य असल्यास लांब दांडीची स्वच्छतेची साधनं वापरणे, वस्तू वारंवार खाली ठेवण्याची गरज कमी करणे किंवा मोठं काम छोट्या भागांत विभागणे उपयोगी ठरू शकतं.
हे काम टाळणं नाही; कामाचं ergonomics सुधारण्याचा प्रयत्न आहे.
वेदना आली म्हणजे लगेच हालचाल बंद करायची, हा गैरसमज खूप सामान्य आहे. वेदना ही शरीराची महत्त्वाची सूचना आहे. परंतु प्रत्येक वेदना म्हणजे शरीराला नुकसान होत आहे, असा सरळ अर्थ काढता येत नाही. आर्थ्रायटिस असलेल्या व्यक्तीला हालचालींचं योग्य प्रमाण, कामाचा भार आणि त्यानंतरची प्रतिक्रिया समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर एखाद्या विशिष्ट कामामुळे वारंवार तीव्र त्रास वाढत असेल, सूज किंवा इतर चिंताजनक लक्षणं दिसत असतील, किंवा रोजच्या कामांवर मोठा परिणाम होत असेल, तर फिजिओथेरेपिस्ट किंवा संबंधित आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दुखतंय म्हणून काहीच करू नका आणि दुखत असूनही काहीही करत राहा हे दोन्ही सल्ले प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य नसतात.
घरच्यांनी काय करावं?
कुटुंबीय अनेकदा प्रेमापोटी म्हणतात, “तुम्ही काही करू नका, आम्ही करतो.” काही वेळा मदत आवश्यक असते. पण व्यक्तीला प्रत्येक कामापासून दूर ठेवणं तिचं स्वावलंबन कमी करू शकतं. त्याऐवजी घरातील कामांची विभागणी करता येते. जास्त शारीरिक क्षमता लागणारी कामं इतरांनी करावीत, तर व्यक्तीला तिच्या क्षमतेनुसार करता येणारी कामं स्वतः करू द्यावीत. यामुळे फक्त शरीर सक्रिय राहत नाही, तर स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण असल्याची भावना देखील टिकून राहते.
- रोजच्या जीवनासाठी काही सोपे नियम
- आर्थ्रायटिस असलेल्या व्यक्तीने घरकाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवू शकतात:
- १. आधी नियोजन, मग काम: आज कोणती कामं आवश्यक आहेत आणि कोणती पुढे ढकलता येतील हे ठरवा.
- २. कामांची विभागणी करा: एकाच वेळी अनेक शारीरिकदृष्ट्या डिमांडिंग कामं करू नका.
- ३. स्थिती बदलत राहा: दीर्घकाळ उभं राहणं, बसणं किंवा वाकणं टाळून शक्य तितकी हालचाल आणि पोझिशन बदलत राहा.
- ४. मदत मागणं म्हणजे अपयश नाही: जड वस्तू उचलण्यासारखी कामं इतरांकडून करून घेणं म्हणजे स्वावलंबन गमावणं नाही.
- ५. प्रगती फक्त वेदनेत मोजू नका: आज कालपेक्षा थोडं जास्त चालता आलं? जास्त वेळ स्वयंपाक करता आला? कामानंतर थकवा कमी झाला? हीसुद्धा प्रगती आहे.
- खरा उद्देश, काम नव्हे, स्वावलंबन
- आर्थ्रायटिसच्या उपचारात आपण अनेकदा वेदना, सूज, स्टिफनेस किंवा रिपोर्ट याबद्दल बोलतो. पण रुग्णाच्या दृष्टीने प्रश्न कदाचित वेगळा असतो.
- “मला माझं घरचं काम स्वतः करता यावं.”
- “मला स्वयंपाक करता यावा.”
- “मला नातवंडांसाठी काही करता यावं.”
- “मला माझं दैनंदिन आयुष्य दुसऱ्यावर अवलंबून न राहता जगता यावं.”
- हीदेखील उपचाराची महत्त्वाची उद्दिष्टं आहेत.
१२ ऑक्टोबर ला असणाऱ्या World Arthritis Day च्या अचिव्ह युवर ड्रिम्स या संदेशाकडे पाहताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येकाचं स्वप्न मोठं किंवा दूरचं असावं असं नाही. स्वतःची रोजची कामं आत्मविश्वासाने करता येणं हेही एक महत्त्वाचं स्वप्न असू शकतं. शेवटी… आर्थ्रायटिस झाल्यावर घरकाम पूर्णपणे सोडणं आवश्यक नाही आणि पूर्वीसारखंच सगळं करण्याचा हट्टही आवश्यक नाही. कधी कामाचं प्रमाण बदलायचं, कधी पद्धत बदलायची, कधी विश्रांती वाढवायची आणि कधी शरीराची क्षमता वाढवण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन घ्यायचं. आर्थ्रायटिसमध्ये प्रश्न “मी हे काम करू शकते का?” एवढाच नसतो; योग्य प्रश्न असतो. “माझं शरीर सक्षम ठेवून मला माझं आयुष्य कसं जगता येईल?” कारण उपचाराचं अंतिम ध्येय फक्त वेदना कमी करणं नाही; तर व्यक्तीला तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा करता याव्यात, हे आहे.
