Arthritis travel tips marathi: “मला हिमालयात जायचं आहे पण गुडघे साथ देतील का?” किंवा “विमानतळावर जास्त चालावं लागेल…” ही भीती अनेकांना प्रवासापासून दूर ठेवते. पण आर्थ्रायटिसचा त्रास असतानाही योग्य नियोजनाने तुम्ही तुमचे प्रवासाचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता.

“मला खूप दिवसांपासून हिमालयात जायचं आहे… पण माझे गुडघे साथ देतील का?”
“लग्नासाठी दुसऱ्या शहरात जायचं आहे, पण विमानतळावर एवढं चालावं लागेल…”
“सगळे फिरायला जातात, पण माझ्या गुडघ्यांमुळे मी घरातच राहते.” आर्थ्रायटिस असलेल्या व्यक्तींसाठी प्रवास ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नसते. तो कधी कुटुंबासोबतचा आनंद, एखादं लग्न, धार्मिक स्थळाला भेट, निसर्गभ्रमण किंवा अनेक वर्षांचं एखादं स्वप्न असू शकतं. पण वेदना, stiffness, थकवा आणि “जास्त चालल्यावर काय होईल?” ही भीती अनेकदा प्रवासापासून दूर ठेवते.

मग आर्थ्रायटिस झाल्यावर प्रवास सोडायचा का? गरजेचं नाही. कधी कधी प्रवासाची पद्धत बदलली तरी खूप मोठा फरक पडू शकतो. प्रवासात नेमकं काय कठीण असतं? प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं नाही. त्यात विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनवर चालणं, बराच वेळ बसणं, सामान हाताळणं, रांगेत उभं राहणं, वाहनातून चढ-उतरणं, नवीन ठिकाणी जास्त चालणं आणि झोपेच्या वेळेत बदल अशा अनेक गोष्टी असतात. आर्थ्रायटिस असलेल्या व्यक्तीसाठी यापैकी प्रत्येक गोष्ट स्वतंत्र शारीरिक त्रासाची असू शकते. म्हणून प्रवासाच्या आधी स्वतःला “मी हे करू शकत नाही” असं सांगण्याऐवजी “माझ्या शरीराला या प्रवासासाठी कशी तयारी करून देता येईल?” हा प्रश्न अधिक उपयोगी ठरतो.

Arthritis travel tips marathi guide | Joint pain management travel advice | आर्थ्रायटिस प्रवास टिप्स मराठी | सांधेदुखीवर प्रवासादरम्यान घ्यायची काळजी
आर्थ्रायटिसमध्ये प्रवास सुखकर करण्यासाठी विशेष काळजी घ्या
(Image- Gemini)

प्रवासाच्या आधी शरीराची क्षमता तपासा

एखाद्या व्यक्तीला रोज १० मिनिटं चालण्याची सवय असेल आणि अचानक सुट्टीत दिवसभर १५,००० ते २०,००० पावलं चालण्याचा कार्यक्रम आखला, तर शरीराला ते आव्हानात्मक ठरू शकतं. म्हणून प्रवासाच्या काही काळ आधी आपल्या सध्याच्या क्षमतेचा विचार करणं महत्त्वाचं आहे.
स्वतःला विचारा:

  • मी सलग किती वेळ चालू शकते?
  • बराच वेळ उभं राहिल्यावर काय होतं?
  • जिने चढताना किती त्रास होतो?
  • वाहनातून चढ-उतरणं सहज होतं का?
  • दिवसभराच्या हालचालीनंतर दुसऱ्या दिवशी माझी क्षमता कशी असते?
    ही माहिती प्रवासाचं नियोजन करण्यासाठी उपयोगी ठरते.
    दैनंदिन हालचालींमध्येच मोठी अडचण असेल, तर प्रवासाच्या आधी फिजिओथेरेपिस्टकडून strength, mobility, endurance आणि functional capacity यांचं मूल्यमापन करून घेणं उपयोगी ठरू शकतं.

“एकाच दिवसात सगळं पाहायचं” हा हट्ट टाळा. नवीन ठिकाणी गेल्यावर आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी पाहायच्या असतात. पण सकाळपासून रात्रीपर्यंत सतत चालणं, उभं राहणं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाणं यामुळे शरीरावर अचानक मोठा भार पडू शकतो. त्याऐवजी दिवसाचं नियोजन करता येतं. सकाळी एखादं महत्त्वाचं ठिकाण पाहायचं, त्यानंतर विश्रांती, दुपारी कमी शारीरिक ताणाचं काम आणि संध्याकाळी पुन्हा बाहेर जाणं. याला activity pacing म्हणता येईल एकाच दिवसात शरीराची संपूर्ण क्षमता वापरण्याऐवजी ती दिवसभर आणि संपूर्ण प्रवासात योग्य प्रकारे वितरित करणं.

प्रवासात प्रत्येक पाऊल चालतच जायची गरज नाही. “मी आर्थ्रायटिसची रुग्ण आहे, म्हणून मला काहीच चालता येत नाही” किंवा उलट “मी शक्य तितकं चालणारच” हे दोन्ही विचार टाळता येतील. लांब अंतरासाठी उपलब्ध वाहतूक वापरणं, गरजेनुसार लिफ्ट किंवा एस्केलेटरचा वापर करणं, मध्ये बसण्यासाठी जागा निवडणं किंवा प्रवासाचा मार्ग आधी समजून घेणं यामुळे शारीरिक ऊर्जा जपता येते. ऊर्जा जपणं म्हणजे आळस नाही.
तीच ऊर्जा पुढे तुम्हाला ज्या गोष्टीसाठी प्रवास करायचा आहे, त्या अनुभवण्यासाठी उपयोगी पडू शकते.

सामानाची जबाबदारीही महत्त्वाची

जड सूटकेस उचलणं, वारंवार सामान हलवणं किंवा वरच्या लगेज कम्पार्टमेंट मध्ये वस्तू ठेवणं काही व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकतं.
म्हणून

  • शक्य तितकं सामान हलकं ठेवा.
  • जड वस्तूंसाठी मदत घ्या.
  • सामान ओढण्यासाठी चाक असलेली बॅग वापरा.
  • जड वस्तू एकाच हातात घेऊन लांब अंतर चालणं टाळा

प्रवासात “मला सगळं स्वतःच करायचं” हा स्वाभिमान कधी कधी शरीरावर अनावश्यक भार टाकू शकतो.
मदत घेणं म्हणजे स्वावलंबन गमावणं नाही. प्रवासासाठी आरामदायी पादत्राणं निवडा. नवीन ठिकाणी फिरण्यासाठी चप्पल किंवा बूट यात प्रयोग करू नका. आधीपासून आरामदायी आणि परिचित पादत्राणं वापरणं अधिक व्यवहार्य ठरू शकतं. कारण प्रवासाच्या वेळी पायांना होणारा त्रास, चालण्याची पद्धत आणि थकवा यांचा संपूर्ण शरीराच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो. प्रवासापूर्वी उपचारात एक महत्त्वाचा प्रश्न विचारा जर तुम्ही आर्थ्रायटिससाठी उपचार घेत असाल, तर फक्त…

“माझा pain score किती कमी झाला?” हा प्रश्न न विचारता, “मला माझ्या प्रवासासाठी कोणती शारीरिक क्षमता विकसित करायची आहे?” असा प्रश्नही विचारा. उदाहरणार्थ, तुमचं लक्ष्य असेल “मला संग्रहालयात दोन तास फिरता यावं.” तर उपचारात चालण्याची क्षमता, endurance, strength आणि आवश्यक functional tasks यांचा विचार करता येईल.

जर लक्ष्य असेल… “मला विमानतळावर सामानासह सहज हालचाल करता यावी.” तर त्यानुसार वेगळ्या क्षमतांवर लक्ष देता येईल. म्हणजेच उपचार तुमच्या आयुष्याशी जोडला जातो. आणि जर प्रवासानंतर वेदना वाढल्या तर? प्रवासानंतर थोडा थकवा किंवा लक्षणांमध्ये तात्पुरता बदल जाणवला, तर लगेच “माझ्या शरीराला प्रवास झेपत नाही” असा निष्कर्ष काढण्याची गरज नाही. काय झालं हे समजून घ्या. कदाचित एका दिवसात खूप चालणं झालं असेल. कदाचित विश्रांती कमी झाली असेल. कदाचित झोप किंवा दिनक्रम बदलला असेल.
पुढच्या वेळी प्रवासाचं नियोजन त्यानुसार बदलता येईल. प्रवासाचा अनुभव हा शरीराला समजून घेण्याचाही एक मार्ग असू शकतो. शेवटी, आर्थ्रायटिस तुमच्या स्वप्नांची मर्यादा ठरवू नये

प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न वेगळं असतं

कुणाला परदेशात जायचं असतं, कुणाला तीर्थयात्रा करायची असते, कुणाला मुलांसोबत फिरायचं असतं, तर कुणाला फक्त अनेक वर्षांनी पुन्हा गावाला जायचं असतं. आर्थ्रायटिसमुळे कदाचित त्या स्वप्नासाठी जास्त नियोजन करावं लागेल. कदाचित प्रवासाचा वेग कमी करावा लागेल. कदाचित काही ठिकाणी मदत घ्यावी लागेल. पण याचा अर्थ प्रवास करायचाच नाही असा नाही. शरीराची क्षमता वाढवणं, प्रवासाचं योग्य नियोजन करणं आणि गरजेनुसार मदत स्वीकारणं या तीन गोष्टी आर्थ्रायटिससोबतही अर्थपूर्ण आणि आनंदी प्रवास घडवून आणू शकतात.