भलाथोरली सावली धरणारा औदुंबर वा उंबर वृक्ष ही श्रद्धेची खुण आहे, संस्कृतीचं जीवंत प्रतीक आहे, सोबतच रम्य नि हळव्या आठवणींचा तो सोबती आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिसंस्थेचा आधार आहे. त्याची जपणूक केवळ निसर्गाची जपणूक नाही, तर मानवी समृद्धीची जपणूक आहे.

औदुंबराशी जोडलेला श्रद्धाभाव काय?

‘औदुंबर मम अंगणी आला, भास तिथे दत्ताचा झाला’ हे भजन ऐकलं की गुरुदेव दत्तात्रेय आणि औदुंबर यांच्यातील अतुट, पवित्र आणि आध्यात्मिक नातं अनेकांच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. दत्तात्रेय आणि औदुंबर यांचे नातं प्रामुख्याने धार्मिक परंपरा आणि दत्तसंप्रदायातल्या श्रद्धांमधून दृढ झालं आहे. भगवान दत्तात्रेयांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप मानण्याची आपल्याकडे परंपरा आहे. ज्ञान, योग, तपस्या, वैराग्य आणि निसर्गातून शिकण्याची वृत्ती यांच्याशी दत्तात्रेयांचं व्यक्तिमत्त्व जोडलं गेलं आहे. म्हणूनही दत्तसंप्रदायाच्या परंपरेत औदुंबराला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. याच कारणाने अनेक दत्त क्षेत्रांमध्ये औदुंबर वृक्षाचं मनोभावे दर्शन घेणं, पूजा करणं आणि प्रदक्षिणा घालणं ही श्रद्धेची महत्त्वाची अंगं आहेत.

सांस्कृतिक मोल आलं कसं?

आपल्यापैकी अनेक जण हे जाणता की, श्री गुरुचरित्र आणि दत्तसंप्रदायातल्या विविध आख्यायिकांमुळे औदुंबराचं धार्मिक महत्त्व कालपरत्वे अधिक दृढ होत गेलं आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार औदुंबराच्या सान्निध्यात दत्तगुरुंचं अस्तित्व अनुभवता येतं. ही अर्थातच धार्मिक श्रद्धा आहे; तिचं मूल्यमापन वनस्पतिशास्त्रीय किंवा वैज्ञानिक निकषांवर करता येत नाही. मात्र, या श्रद्धेमुळे एखादा वृक्ष पिढ्यान्‌पिढ्या जतन केला जात असेल, तर त्याला सांस्कृतिक तसंच पर्यावरणीय महत्त्व प्राप्त होतं हेही विसरून चालणार नाही.

Audumbar tree significance
दत्तगुरू आणि औदुंबर वृक्ष (एआय जनरटेड फोटो)

२४ गुरु संकल्पनेचा संदेश काय?

भगवान दत्तात्रेयांच्या जीवनात निसर्गाला विशेष स्थान आहे. दत्तात्रेयांचे ‘२४ गुरु’ ही संकल्पना याच संदर्भात महत्त्वाची आहे. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, हरिण, मासा, पिंगला वेश्या, बालक, कुमारिका, सर्प, कोळी आणि इतर घटकांमधून शिकण्याची ही संकल्पना निसर्ग हा ज्ञानाचा स्रोत आहे, असाच व्यापक संदेश देत आली आहे. आधुनिक पर्यावरणशास्त्राच्या भाषेत सांगायचे झालं तर निरीक्षण, परस्परसंबंध आणि परिसंस्थेतल्या प्रत्येक घटकाचं महत्त्व समजून घेण्याची वृत्ती या संकल्पनेत दिसून आली आहे.

उंबरवर्गीय कुळाचा अद्भुत वारस

वाटसरुंना सावली आणि अन्न देणाऱ्या, जैवविविधता आणि लोकपरंपरा यांचे एक छोटंसं विश्व् निर्माण करणाऱ्या या औदुंबर वृक्षाचं शास्त्रीय नाव Ficus racemosa L. असं आहे. हा Moraceae म्हणजेच उंबरवर्गीय कुळातला वृक्ष आहे. इंग्रजीमध्ये त्याला Cluster Fig Tree किंवा Goolar असं म्हटलं जातं. औदुंबराची सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, त्याची वैशिष्ट्यपूर्ण फळं. इतर अनेक फळझाडांप्रमाणे ही फळं फांद्यांच्या टोकाला न येता औदुंबराच्या खोडावर किंवा जाड फांद्यांवर अक्षरशः गुच्छांनी येतात. बाहेरून फळासारखं दिसणारं हे एकप्रकारे संरचनात्मकदृष्ट्या ‘syconium’ आहे. त्याच्या आतल्या भागात असंख्य सूक्ष्म फुलं असतात. अशी ही अनोखी रचना असलेल्या औदुंबराचा अभ्यास केला असता वनस्पतीशास्त्रातली एक अपूर्व रचना आणि निसर्गातला परस्परसंबंध समोर येतो.

औदुंबराचं अस्तित्व विस्तारतं कसं?

औदुंबर हा मध्यम ते मोठ्या आकाराचा वृक्ष आहे. त्याची पानं साधी, अंडाकृती किंवा लंबगोल आकाराची असतात. खोडावर आणि जाड फांद्यांवर गुच्छांनी लागणारी फळं सुरुवातीला हिरवी असतात आणि परिपक्व होताना लालसर ते जांभळट रंग धारण करतात. ही फळं विविध पक्षी, वटवाघुळं आणि इतर प्राण्यांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनतात. फळं खाल्ल्यानंतर त्यांच्या माध्यमातून बिया वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात आणि अशा प्रकारे औदुंबराच्या नैसर्गिक पुनरुत्पादनात प्राण्यांचीही भूमिका मोलाची ठरते.

Audumbar tree significance
औदुंबर (फोटो: विकिपीडिया)

परस्पर संबंधांची कशी आहे गुंतागुंत?

औदुंबराच्या जीवनचक्रातली आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे, त्याच्या परागीभवनाशी सूक्ष्म कीटकांचा असलेला संबंध. औदुंबराच्या ‘syconium’च्या आतील भागातल्या फुलांचं परागीभवन विशिष्ट अशा सूक्ष्म fig wasps म्हणजेच अंजीरवर्गीय परागीभवन करणाऱ्या गांधील माशांशी संबंधित असतं. या सूक्ष्म कीटकांच्या माध्यमातून परागीभवनाची प्रक्रिया घडते आणि बदल्यात त्यांना प्रजननासाठी योग्य वातावरण मिळतं. निसर्गातलं परस्परावलंबित्वाचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. एका बाजूला आपल्याला पवित्र वाटणारा हा वृक्ष आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या जीवनचक्रात भूमिका बजावणारे असंख्य अतिशय सूक्ष्म कीटक. निसर्गातली ही परस्परसंबंधांची गुंतागुंत खरोखरच आश्चर्यकारक आहे.

लोकजीवनात स्थान काय?

औषधविज्ञानात औदुंबराच्या औषधी गुणधर्मांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झालं आहे. पूर्वजांनी अनुभवातून जपलेलं औदुंबराचं औषधी ज्ञान आज आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर तपासलं जात आहे. मूळ, खोड, साल, पानं, फळं आणि चीक अशा प्रत्येक भागाचा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जाणारा उपयोग हीच या वृक्षाची खासियत आहे. औदुंबराच्या औषधी गुणांकडे पाहिलं की आपल्या पारंपरिक वनस्पती ज्ञानाची व्याप्ती किती मोठी होती, याची जाणीव होते. औदुंबराच्या फळांपासून सालीपर्यंत प्रत्येक भाग निसर्गाने आपल्याला दिलेली एक मोठी देणगी आहे. परंपरेतून आलेल्या या ज्ञानाची आधुनिक संशोधनाशी सांगड घातली, तर औदुंबराच्या अनेक गुणांचा नव्याने शोध घेता येऊ शकतो. म्हणूनच औदुंबराचं महत्त्व केवळ धार्मिक किंवा पर्यावरणीय नाही, तर त्याच्या औषधी गुणांमुळेही हा वृक्ष आपल्या लोकजीवनात विशेष स्थान मिळवून आहे.

औषधशास्त्रासाठी का आहे मोलाचा?

परिसंस्थेत वावरणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अन्नस्रोत असलेला औदुंबर हा केवळ फळं देणारा वृक्ष नाहीच. त्याच्या मुळापासून पानांपर्यंत, खोडाच्या सालीपासून फळांपर्यंत आणि फळांपासून चिकापर्यंत त्याच्या प्रत्येक भागाचा पारंपरिक औषधांमध्ये उपयोग केला जातो. औदुंबराच्या सालीत, पानांत आणि इतर भागात आढळणारे विविध जैवसक्रिय घटक त्याला औषधीदृष्ट्या मोलाचा वृक्ष बनवतात . २०२३ मध्ये हिमांशू शर्मा आणि सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासात मूळ, खोडाची साल, पानं, फळं आणि चिकाचं पारंपरिक औषधी महत्त्व सांगितलं आहे.

प्रत्येक घटक कसा आहे गुणकारी?

या संशोधनपत्रिकेतल्या माहितीनुसार पारंपरिक औषधपद्धतींमध्ये औदुंबराच्या मुळांचा उपयोग प्रामुख्यानं पचनाशी संबंधित तक्रारी, अतिसार, आमांश तसंच दाह व सूज कमी करण्यासाठी केला जातो. खोडाची साल अतिसार,आमांश, जखमा, त्वचेच्या काही विकारांमध्ये आणि दाह कमी करण्यासाठी वापरली जाते. सालामध्ये आढळणारे tannins, flavonoids आणि इतर phenolic संयुगं यामुळे antioxidant आणि antimicrobial गुणधर्मांचा संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. पानांचा उपयोग पचनविकार, अतिसार आणि दाहाशी संबंधित तक्रारींमध्ये पारंपरिक पद्धतीने केला जातो; औदुंबराची फळं खाण्यायोग्य असल्याने त्यांचा पारंपरिक आहारात वापर केला जातो. फळांमध्ये विविध पोषक द्रव्यं तसेच जैवसक्रिय घटक आढळतात. औदुंबराचा चीक (latex) जखमांवर बाह्योपचारासाठी आणि काही त्वचाविकारांमध्ये पारंपरिकरीत्या वापरला जातो; त्याच्या antimicrobial व wound-healing संभाव्यतेचाही अभ्यास करण्यात आला आहे.

…तरीही का घ्यावी खबरदारी?

२००९ मध्ये पद्मा पारख यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधन पत्रिकेत औदुंबर हा वृक्ष मधुमेह, यकृतविकार, वेदनाशामक म्हणून ही उपयुक्त आहे असंही सांगितलं आहे. त्यामुळे हा केवळ धार्मिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष नाही, तर त्याच्या विविध अवयवांमध्ये आढळणाऱ्या जैवसक्रिय घटकांमुळे औषधी वनस्पती म्हणूनही महत्त्वाचा आहे. परंतु हे सिद्ध आणि प्रमाणित आधुनिक वैद्यकीय उपचार आहेत, असं सांगण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे अजूनतरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ राहणारी किंवा तीव्र गुडघेदुखी,सूज, दुखापत, ताप किंवा चालताना अडचण असल्यास स्वतःहून औषध म्हणून सेवन करण्यापूर्वी अनुभवी आयुर्वेदिक किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

दत्तात्रय-औदुंबर नात्याचा अर्थ काय?

धार्मिक-सांस्कृतिक मोल असलेल्या औदुंबराच्या पर्यावरणीय भूमिकेकडे पाहिलं तर त्याचं महत्त्व कैकपटींनी वाढतं. मोठा वृक्ष असल्यामुळे त्याच्या सावलीत अनेक लहान वनस्पती, कीटक आणि सूक्ष्मजीवांना अधिवास मिळतो. त्यामुळे औदुंबर अथवा उंबर हा केवळ एक स्वतंत्र वृक्ष नव्हे तर स्थानिक परिसंस्थेतल्या अन्नसाखळीचा एक महत्त्वाचा घटक आहे. औदुंबराची पूजा म्हणजे श्रद्धा; औदुंबराचं संवर्धन म्हणजे संस्कृती; आणि औदुंबरामागचं निसर्गशास्त्र समजून घेणं म्हणजे ज्ञान. या तिन्हींच्या संगमातूनच दत्तात्रेय आणि औदुंबराच्या नात्याचा खरा अर्थ आपल्यापुढ्यात उलगडत जातो.