Bhagat Singh Assembly Bomb Case: ८ एप्रिल १९२९ चा तो दिवस भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि नाट्यमय मानला जातो. दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत ‘पब्लिक सेफ्टी बिल’ आणि ‘ट्रेड डिस्प्युट्स बिल’वर रणकंदन माजले असतानाच भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब फेकून ब्रिटिशांचा पाया हादरवला. पण या घटनेदरम्यान सभागृहाचे अध्यक्ष असणारे विठ्ठलभाई पटेल आणि भगतसिंग यांच्यातील अनोखा ऐतिहासिक संबंध फार कमी लोकांना माहीत आहे.

दोन नेते आणि दोन बॉम्ब एका विलक्षण वळणावर एकत्र

भगतसिंगांनी बॉम्ब फेकला त्यावेळेस केंद्रीय विधानसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीत एक भारतीय व्यक्ती बसली होती. या व्यक्तीचे नाव होते विठ्ठलभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू आणि केंद्रीय विधानसभेचे पहिले भारतीय अध्यक्ष. विशेष म्हणजे, भगतसिंग आणि विठ्ठलभाई या दोघांचाही जन्म २७ सप्टेंबर रोजी झाला होता. विठ्ठलभाईंचा जन्म १८७३ मध्ये, तर भगतसिंगांचा १९०७ साली झाला. काही ऐतिहासिक नोंदींमध्ये भगतसिंगांची जन्मतारीख २८ सप्टेंबर अशीही दिली जाते. दोघांच्या वयात तीन दशकांहून अधिक अंतर होते. स्वातंत्र्यलढ्याचे त्यांचे मार्गही पूर्णपणे वेगळे होते. मात्र १९२९ मधील त्या एका घटनेने दोघांना इतिहासाच्या एका विलक्षण वळणावर एकत्र आणले.

कोण होते विठ्ठलभाई पटेल?

विठ्ठलभाई पटेल हे पटेल कुटुंबातील पाच भावांपैकी दुसरे. त्यांचे धाकटे बंधू वल्लभभाई पटेल नंतर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक ठरले. वल्लभभाईंप्रमाणे विठ्ठलभाईंनीही इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आणि भारतात परतल्यानंतर मुंबईत वकिली केली. १९२४ साली मुंबई शहरातून ते केंद्रीय विधानसभेवर निवडून गेले. ब्रिटिश भारतातील ही संस्था आजच्या संसदेची पूर्वसुरी होती. २२ ऑगस्ट १९२५ रोजी विठ्ठलभाई केंद्रीय विधानसभेचे पहिले भारतीय अध्यक्ष झाले. ब्रिटिश राजवटीत एखाद्या भारतीय व्यक्तीने या पदावर बसणे हीच महत्त्वाची घटना होती. मात्र विठ्ठलभाईंनी हे पद केवळ औपचारिक स्वरूपात सांभाळले नाही. विधानसभेचे स्वातंत्र्य आणि अध्यक्षांचे अधिकार याबाबत त्यांनी काही महत्त्वाच्या परंपरा निर्माण केल्या.

संसदेची सुरक्षा सरकारच्या नव्हे, अध्यक्षांच्या नियंत्रणात

त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा विधानसभेच्या सुरक्षेचा होता. सभागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी अध्यक्षांच्या अधिकारक्षेत्रात असावी, या तत्त्वातून ‘वॉर्ड अँड वॉच’ (Ward and Watch) व्यवस्था विकसित झाली. ही बाब ८ एप्रिल १९२९ च्या घटनेनंतर विशेष महत्त्वाची ठरली. कारण भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात बॉम्ब फेकल्यानंतर ब्रिटिश सरकारला विधानसभेच्या सुरक्षेवर अधिक थेट नियंत्रण मिळवायचे होते. मात्र विठ्ठलभाईंनी त्याला कडाडून विरोध केला. विधिमंडळाची सुरक्षा ही कार्यकारी सरकारच्या नियंत्रणात गेल्यास सभागृहाच्या स्वायत्ततेवर परिणाम होऊ शकतो, अशी त्यांच्या भूमिकेमागची धारणा होती. अखेरीस विधानसभेच्या सुरक्षेवरील अध्यक्षांचे नियंत्रण कायम राहिले. स्वातंत्र्यानंतरही या व्यवस्थेचा वारसा दीर्घकाळ टिकला.

 Bhagat Singh

भगतसिंग आणि दत्त यांनी विधानसभेत बॉम्ब का फेकला?

भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते. ब्रिटिशांनी केलेल्या माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांमुळे भारतीयांना कायदेमंडळात काही प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले होते. मात्र प्रत्यक्ष सत्ता ब्रिटिश सरकारच्याच हातात होती. याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकार ‘पब्लिक सेफ्टी बिल’ आणि ‘ट्रेड डिस्प्युट्स बिल’ पुढे नेत होते. या विधेयकांना भारतीय सदस्यांकडून तीव्र विरोध होता.

८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त अभ्यागतांच्या गॅलरीत पोहोचले. त्यांनी मोठी जीवितहानी होणार नाही अशा भागाकडे दोन बॉम्ब फेकले. भगतसिंगांनी हवेत पिस्तुलातून दोन गोळ्याही झाडल्या. बॉम्बस्फोटानंतर धूर आणि गोंधळ पसरला. पण भगतसिंग आणि दत्त पळून गेले नाहीत. त्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ आणि ‘ब्रिटिश साम्राज्यवादाचा नाश होवो’ अशा घोषणा दिल्या आणि पत्रके फेकली. त्यानंतर दोघांनी शांतपणे अटक करून घेतली.

‘बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी आवाज मोठा असावा लागतो’

भगतसिंग आणि दत्त यांच्या कृतीमागचा उद्देश त्यांनी विधानसभेत फेकलेल्या पत्रकातून स्पष्ट केला होता. त्यामध्ये एक वाक्य विशेष गाजले, “बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी आवाज मोठा असावा लागतो.” या वाक्यामागे फ्रेंच अराजकतावादी ऑगस्ट व्हायाँच्या (Auguste Vaillant) कृतीचा संदर्भ होता. व्हायाँने ९ डिसेंबर १८९३ रोजी फ्रान्सच्या चेंबर ऑफ डेप्युटीजमध्ये बॉम्ब फेकला होता. भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याच प्रतीकात्मक पद्धतीचा आधार घेतला. त्यांचा उद्देश मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवणे नसून ब्रिटिश सरकारचे आणि जनतेचे लक्ष वेधून घेणे असल्याचा दावा ‘एचएसआरए’ने केला.

‘व्यक्तींना मारता येते, विचारांना नाही’

विधानसभेत फेकलेल्या पत्रकात ‘एचएसआरए’ने ब्रिटिश सरकारचा जोरदार समाचार घेतला होता. ब्रिटिशांनी भारतीयांना कायदेमंडळात नावालाच स्थान दिले असून, खरी सत्ता मात्र स्वतःच्या अधिकाऱ्यांच्याच हातात ठेवली आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. त्याच पत्रकात एक महत्त्वाचा विचार मांडला गेला, जो पुढे भगतसिंग यांच्या विचारांचा मुख्य गाभा ठरला; “माणसाला संपवणे सोपे असते, पण विचारांना मारता येत नाही. कितीतरी मोठी साम्राज्ये काळाच्या ओघात नष्ट झाली, पण विचार मात्र नेहमी अमर राहिले.”

 Bhagat Singh

बॉम्बस्फोटानंतर भगतसिंगांचे काय झाले?

विधानसभा बॉम्बस्फोट प्रकरणात भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्यावर खटला चालवून १२ जून १९२९ रोजी दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, भगतसिंगांवर याहूनही गंभीर खटला प्रलंबित होता. १९२८ मधील ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सँडर्स हत्येशी संबंधित ‘लाहोर कट’ प्रकरणात भगतसिंग मुख्य आरोपी होते. या खटल्यात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अखेर २३ मार्च १९३१ रोजी लाहोर मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना फाशी देण्यात आली. ते शहीद झाले तेव्हा भगतसिंग यांचे वय अवघे २३ वर्षे होते.

नेहरूंनी भगतसिंगांविषयी काय लिहिले?

भगतसिंगांच्या फाशीच्या बातमीने संपूर्ण देश हळहळला. जागोजागी कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शोकसभा घेऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या ऐतिहासिक बलिदानावर लिहिताना जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, देशात एका बाजूला अगतिकतेचे दुःख असले, तरी दुसऱ्या बाजूला भगतसिंगांच्या त्यागाबद्दल प्रचंड अभिमान आहे. पुढे जाऊन जेव्हा कधी ब्रिटिश सरकार भारताशी तडजोडीची किंवा शांततेची चर्चा करायला येईल, तेव्हा भारत आणि ब्रिटनच्या मध्ये भगतसिंगांच्या बलिदानाची अमर आठवण नेहमी उभी राहील!

वल्लभभाई पटेलांनीही भगतसिंगांना केले होते अभिवादन

विठ्ठलभाईंचे धाकटे बंधू सरदार वल्लभभाई पटेल यांनीही भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देशभक्ती आणि त्यागाबद्दल आदर व्यक्त केला. एप्रिल १९३१ मध्ये कराची येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात बोलताना पटेल म्हणाले होते की, “भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांची देशभक्ती, शौर्य आणि त्यागाची भावना यांच्यासमोर मी मस्तक झुकवतो.”

एका बॉम्बस्फोटामुळे ब्रिटिश सरकार आणि विठ्ठलभाई आमनेसामने

८ एप्रिल १९२९ च्या घटनेनंतर एका बाजूला ब्रिटिश सरकार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्यावर खटला चालवत होते; तर दुसऱ्या बाजूला याच घटनेमुळे अध्यक्षांच्या खुर्चीत बसलेले विठ्ठलभाई पटेल आणि ब्रिटिश प्रशासनात नवा संघर्ष पेटला. विधानसभेत बॉम्ब पोहोचलाच कसा, असा सवाल करत ब्रिटिश सरकारने सभागृहाच्या सुरक्षेचा ताबा स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विठ्ठलभाई पटेल यांनी अध्यक्षांच्या अधिकारांवर गदा येऊ दिली नाही आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे ८ एप्रिल १९२९ हा दिवस केवळ एका क्रांतिकारक घटनेपुरता मर्यादित राहत नाही. त्या दिवशी एका बाजूला ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवणारे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त होते; तर दुसऱ्या बाजूला त्याच सभागृहाचे अध्यक्ष म्हणून संसदेची स्वायत्तता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी अडून उभे राहिलेले विठ्ठलभाई पटेल होते.

मार्ग वेगळे होते, पिढ्या वेगळ्या होत्या आणि संघर्ष करण्याची साधनेही वेगळी होती. पण ब्रिटिश राजवटीच्या एका सभागृहात त्या दिवशी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील या दोन वेगळ्या प्रवाहांचा इतिहास एकाच ठिकाणी येऊन मिळाला होता.