मध्ययुगीन कालखंडात, म्हणजेच सुमारे एक हजार वर्षांपूर्वी भारतात दोन प्रकारच्या काव्यपरंपरा उदयाला आल्या. त्यातली एक होती, पूर्व भारतातली तांत्रिक ‘चर्यापद’ आणि दुसरी दक्षिण भारतातली‘आळवार-नायनार’ही मुख्यतः संतांचं भक्ति-काव्य असलेली परंपरा. ‘चर्यापद’ हे काव्य हे साधारण आठव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान ‘सिद्ध’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध तांत्रिक गुरुंकडून रचलं गेलं. याउलट, तमिळ भक्ति-कवी प्रामुख्यानं त्या आधीच्या सहाव्या ते नवव्या शतकातले आहेत. त्यांच्या भक्तिरचनांचं पुढे ‘नालायिर दिव्य प्रबंधम्’ आणि ‘तेवारम्’ यांसारख्या अधिकृत धार्मिक ग्रंथांमध्ये संकलन झालं. त्या तुलनेत चर्यापद हा तशा प्रकारचा संस्थात्मक भक्तिग्रंथ नाही, तर नंतर सापडलेल्या एका हस्तलिखितात जतन करून ठेवलेला गूढवादी गीतांचा एक विखुरलेला संग्रह आहे.

गूढवाद काय म्हणतो?

चंचल मनावर नियंत्रण ठेवण्यावर भर देणारी,लुईपादांची ही चर्यापद रचना पाहा:

“हे शरीर एका उत्तुंग वृक्षासारखे आहे, ज्याला पाच फांद्या फुटल्या आहेत.
चंचल मनात अंधार प्रवेश करतो.
महासुखाचे परिमाण दृढ कर, असे लुई सांगतो…
सद्गुरुंना शरण जाऊन हे रहस्य जाण.
शून्याच्या पंखांना आलिंगन दे.”

विरह-व्याकुळता काय दर्शवते?

गूढवादी काव्याच्या जोडीला तमिळ आळवार काव्याचं एक उदाहरण पाहा, जिथे कवयित्री आंडाळ भगवान विष्णूंविषयीची आपली उत्कट विरह-व्याकुळता व्यक्त करते:

“या नश्वर मानवांसाठी
माझे हे शरीर अर्पण करण्याची नुसती चर्चा जरी झाली,
तरी मी जिवंत राहू शकणार नाही.
यज्ञाच्या हविर्भागाला एखाद्या रानटी कोल्ह्याने
दबा धरून यावे आणि वास घ्यावा,
त्या अमंगळ हिंसेसारखेच हे असेल.”

काव्यरचनेचा भेद कशात?

लुईपादांचं चर्यापद हे काव्य आणि आळवार या दोन्हींमधला सर्वांत लक्षणीय भेद कशात, तर तो भाषेच्या रचनेमध्ये दिसून येतो. तमिळ भक्ति-काव्यात प्रस्थापित व्याकरण, काव्यसंकेत आणि वृत्तांनी समृद्ध अशा प्रौढ द्रविड साहित्यिक भाषेचा वापर केला गेला आहे. इथे आळवार आणि नायनार कवींचा सूर भावनिक नि भक्तीचा असला,तरी त्यांचं लेखन एका सुस्थापित अशा साहित्यिक चौकटीत राहूनच झालेलं आहे. याचाच एक अर्थ, आधीच्या ‘संगम’ काळातच तमिळ साहित्याने अतिशय अभिजात रूप धारण केलं होतं. अलीकडच्या काळात त्यावर सरकारी शिक्कामोर्तब झालं इतकंच.

चर्यापद हे कशाचं प्रतीक?

या उलट,चर्यापदाची भाषा ही भाषिकदृष्ट्या संक्रमणकालीन अवस्थेतली आहे. ती अपभ्रंश भाषा आणि पूर्वेकडील सुरुवातीच्या इंडो-आर्यन भाषांमधला स्थित्यंतराचा काळ दर्शवणारी आहे. तिचं व्याकरण साधं आणि तुलनेनं कमी मानकीकृत आहे. त्यातली अनेक रूपं प्राचीन बंगाली किंवा आसामी भाषेसारखी दिसतात, पण ती तोवर पूर्णपणे स्थिरावलेली नव्हती. भाषिक अंगानं पाहायचं झाल्यास, चर्यापद हे नव्या प्रादेशिक भाषांच्या उदयाचं प्रतीक आहे; तर तमिळ भक्ति-काव्य हे आधीच प्रस्थापित झालेल्या एका समृद्ध साहित्यिक परंपरेचं सातत्य दर्शवते.

अभिव्यक्तीमध्ये विरोधाभास का?

या लोकभाषेतल्या काव्यामधला दुसरा मोठा विरोधाभास प्रगट अभिव्यक्ती आणि गूढतेमध्ये आहे. तमिळ भक्ति-कवी हे शिव किंवा विष्णू यांच्याविषयीच्या आपल्या उत्कट भक्तीबद्दल उघडपणे आणि पोटतिडकीनं व्यक्त होतात. त्यांच्या रचनांमध्ये मंदिरं, धार्मिक विधी, पवित्र तीर्थक्षेत्रं आणि व्यक्तिगत उपास्य दैवतांप्रती असलेलं भावनिक समर्पण यांचं वर्णन आढळतं. त्यांची काव्य भाषा सर्वसामान्यांना सहज समजावी आणि आवडीने ऐकली जावी अशीच लोकभाषेच्या जवळ जाणारी असतात.

चर्यापदाचे कवी का दुर्बोध?

मात्र, चर्यापदाचं स्वरूप आळवार काव्यापेक्षा खूप वेगळं आहे. चर्यापदाचे कवी जाणीवपूर्वक ‘संध्या-भाषा’ म्हणजेच संदिग्ध, गूढ भाषेचा वापर करतात. त्यांनी योजलेल्या दैनंदिन जीवनातल्या प्रतिमांमागे तांत्रिक शिकवण लपलेली असते. येथे ‘नाव वा होडी’ म्हणजे आध्यात्मिक साधना असू शकते, ‘स्त्री’ म्हणजे प्रज्ञा किंवा ज्ञान, तर ‘नऊ दरवाजांचं घर’ म्हणजे मानवी शरीर. ही सांकेतिक शैली तांत्रिक परंपरांच्या गुप्त स्वरूपाचं दर्शन घडवते; कारण हे ज्ञान केवळ दीक्षा घेतलेल्या शिष्यांपुरतंच मर्यादित ठेवलं जात असे. थोडक्यात सांगायचं तर, तमिळ भक्ति-कवी हे संवादी आणि लोकसन्मुख आहेत, तर चर्यापदाचे कवी गूढ, सांकेतिक आणि दुर्बोध आहेत.

सामाजिक विश्व आणि प्रतिमासृष्टी परस्परविरोधी का?

या दोन्ही काव्यप्रकारांत प्रतिबिंबित होणारं सामाजिक विश्वही परस्परविरोधी आहे. तमिळ भक्ति-काव्यात मंदिरांमधील उपासनेचा गौरव प्रामुख्यानं आढळतो. हे कवी संपूर्ण तमिळनाडूतल्या विशिष्ट मंदिरांची आणि तिथल्या आराध्य दैवतांची मुक्तकंठाने स्तुती करतात.त्यांच्या पदांमुळे श्रीरंगम, चिदंबरम, मदुराई आणि तिरुपती यांसारखी पवित्र तीर्थक्षेत्रं एका धार्मिक धाग्यात गुंफली जातात. पुढे जाऊन काळाच्या ओघात याच रचना मंदिर परंपरेतील नित्य पूजेचा भाग बनत जातात. या तुलनेत चर्यापदात मात्र मंदिरांचे संदर्भ क्वचितच सापडतात. येथील प्रतिमासृष्टी ग्रामीण जीवनातून घेतलेली आढळते. उदाहरणार्थ; कोळी, शिकारी, शेतकरी, नावाड्यांच्या होड्या, नद्या, कारागीर आणि भटकणारे संन्यासी. ही भाषा मुख्यतः मठ, जंगलं आणि ग्रामीण भागांत संचार करणाऱ्या तांत्रिक साधकांच्या उपेक्षित जगाचं दर्शन घडवते.

काव्यांचा धार्मिक दृष्टिकोन कसा?

प्रतिमासृष्टीत कमालीची भिन्नता असलेल्या या दोन्ही काव्यपरंपरांचा धार्मिक सूरही भिन्न आहे. आळवार आणि नायनार हे ईश्वराप्रती भक्ती, संपूर्ण शरणागती आणि भावनिक जवळीक यावर भर देतात. त्यांची काव्ये उत्कट प्रेम, ईश्वरी विरह आणि तल्लीन करणाऱ्या स्तुतींनी ओतप्रोत भरलेली आहेत. त्यांचं दैवत मंदिरातल्या मूर्तींच्या रूपात सगुण, साकार आणि सन्निध आहे. चर्यापदात मात्र प्रकट भक्तीभावापेक्षा ‘आत्मसाक्षात्कार’ किंवा ‘आंतरिक अनुभूती’ केंद्रस्थानी आहे. ही भाषा शरीर, मन आणि चेतनेच्या परिवर्तनाविषयी काही सांगते आहे. त्यात स्त्री-पुरुष,अन्न किंवा घरगुती प्रसंगांचे रुपक असलं, तरी त्याचा खरा अर्थ अनेकदा योगप्रक्रिया किंवा गूढ आत्मज्ञानाशी संबंधित आहे.

लोकभाषांचा धार्मिक विकासाशी काय संबंध?

या दोन परंपरांमधील हाच फरक भारतातल्या प्रादेशिक भाषांच्या धार्मिक विकासाचे दोन स्वतंत्र मार्गही स्पष्ट करतो. त्यातल्या एक मार्गाने पुढे जाऊन दक्षिणेतली एक परिपक्व प्रादेशिक भाषा मंदिरांभोवती केंद्रित झालेल्या सार्वजनिक भ‍क्ती मार्गाची सशक्त माध्यम बनली. तर पूर्वेकडे,एका स्थित्यंतरातल्या लोकभाषेने तांत्रिक संप्रदायांपुरत्या मर्यादित राहिलेल्या गूढवादी काव्याचा मार्ग धरला. अर्थात, या दोन्ही लोकभाषांत रचना आणि अभिव्यक्तीच्या अंगाने परस्परभिन्नता असला तरीही, हे दोन्ही प्रवाह अंतिमतः हेच अधोरेखित करतात, की पूर्व-मध्ययुगीन काळापर्यंत भारताची धार्मिक कल्पकता जसा एक समज पसरला आहे, तशी केवळ संस्कृतपुरती मर्यादित न राहता, लोकभाषांमधून प्रवाही आणि प्रगल्भ झाली होती.आणि याचं कर्तेपण संस्कृतपलीकडे जाऊन अभिव्यक्त होण्याचं सामर्थ्य राखून असलेल्या एका मोठ्या जनसमूहाकडे होतं.