Animal Diplomacy history: वॉशिंग्टन डीसीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष षी जिनपिंग यांच्यातील बैठकीनंतर अमेरिका-चीन व्यापारी संघर्षाला दोन महिन्यांची तात्पुरती स्थगिती मिळाली आहे, तर दुसरे फलित म्हणजे महाकाय ‘पांडा’! व्हाईट हाऊसच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीत, “चीनकडून भाडेतत्त्वावर अटलांटा प्राणीसंग्रहालयात दाखल होणाऱ्या दोन महाकाय पांडांचे अमेरिका सहर्ष स्वागत करत आहे” असे म्हटले आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय संबंधांमधील हजारो वर्षांची परंपरा असलेली ‘ॲनिमल डिप्लोमसी’ (पशू-मुत्सद्देगिरी) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

ॲनिमल डिप्लोमसी हजारो वर्षांची परंपरा

जागतिक घडामोडींच्या जाणकारांना या घटनेने थेट १९७२ मधील ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून दिली. त्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला भेट दिली होती आणि सद्भावनेचे प्रतीक म्हणून चीनचे प्रीमियर चाऊ एन-लाय यांनी अमेरिकेला दोन पांडा भेट दिले होते. मुळात पांडा हे दीर्घकाळापासून चीनच्या मुत्सद्देगिरीचे महत्त्वाचे अस्त्र राहिले आहेत. त्यामुळे आज पुन्हा ‘ॲनिमल डिप्लोमसी’ अर्थात ‘पशू-मुत्सद्देगिरी’ हा विषय चर्चेत आला आहे.

आजच्या आधुनिक जगात नाविन्यपूर्ण वाटणारी ही संकल्पना प्रत्यक्षात हजारो वर्षांची परंपरा अंगाखांद्यावर घेऊन उभी आहे. जगभरातील मुत्सद्देगिरीत प्राण्यांचा झालेला अनोखा वापर, त्यामागील गूढ प्रतीकात्मकता आणि काळाच्या ओघात वन्यजीव संवर्धनाने या प्रथेला दिलेले नवे वळण हा प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे.

पशू-मुत्सद्देगिरीचा इतिहास

सोप्या शब्दांत सांगायचे तर, आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी अथवा दृढ करण्यासाठी सामान्य किंवा दुर्मिळ वन्यजीवांचा उसनवारी किंवा भेट प्रतीके म्हणून केलेला धोरणात्मक वापर म्हणजे ‘पशू-मुत्सद्देगिरी’. याची पाळेमुळे थेट इजिप्तच्या प्राचीन काळात रुजलेली आहेत. तेथील फॅरो राजे भूमध्य समुद्रातील समकालीन सत्ताधीशांना आफ्रिकन वन्यप्राणी नजराणा म्हणून धाडत असत. रोमन साम्राज्यानेही आपल्या सीमा आणि सत्ता किती अथांग पसरली आहे, हे जगाला दाखवून देण्यासाठी परदेशी व दुर्मीळ श्वापदांचे प्रदर्शन मांडण्याची प्रथा सुरू ठेवली होती. प्राचीन इतिहासातील एका नोंदीनुसार, इजिप्तची सुप्रसिद्ध राणी क्लिओपात्रा हिने एका राजाला ‘कॅमेलोपार्ड’ (उंट आणि बिबट्याचा संकर वाटणारा प्राणी) भेट दिला होता; हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून आजचा ‘जिराफ’ होता!

इ.स. ८०२ मध्ये अब्बासी खिलाफतीचा खलिफा हारून अल-रशीद याने रोमन सम्राट शार्लमेन याला ‘अबुल-अब्बास’ नावाचा एक हत्ती सप्रेम भेट दिला होता. तसेच सतराव्या शतकातील आणखी एक रंजक दस्तऐवज सांगतो की, रशियाच्या झारने स्वीडनच्या राजाला एक पांढरेशुभ्र ‘ध्रुवीय अस्वल’ (पोलार बेअर) धाडले होते. हा केवळ एक नजराणा नव्हता, तर एका बलाढ्य सम्राटाने दुसऱ्या राजावर स्वतःचा दरारा आणि ऐश्वर्य ठसविण्यासाठी केलेली अत्यंत खर्चीक व धाडसी राजकीय खेळी होती.

मुत्सद्देगिरीचे रूप पालटले

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मात्र या मुत्सद्देगिरीचे रूप पालटले. यात जनतेचे कुतूहल आणि माध्यमांचे आकर्षण यांची सुरेख सांगड घालण्यात आली. चीनची ‘पांडा डिप्लोमसी’ हे याचे सर्वोत्तम उदाहरण ठरले. ऑस्ट्रेलियानेही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांचा राजकारणात कौशल्याने वापर केला. दुसऱ्या महायुद्धाच्या रणधुमाळीत ब्रिटनशी एकजूट दर्शवण्यासाठी, ऑस्ट्रेलियाने १९४३ साली पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यासाठी ‘विन्स्टन’ नावाचा ‘प्लॅटिपस’ भेट म्हणून जहाजावर चढवला होता. दुर्दैवाने या प्रवासादरम्यानच त्या मुक्या जिवाचा अंत झाला.

मुत्सद्देगिरीत पक्षीही मागे नाहीत

या मुत्सद्देगिरीत पक्षीही मागे राहिले नाहीत. युरोप आणि विशेषतः अरब जगतातील राजे-रजवाड्यांनी परस्परांशी सख्य जोडण्यासाठी अतिशय मौल्यवान शिकारी ‘ससाणे’ (फाल्कन्स) भेट देण्याची राजेशाही परंपरा पूर्वापार जपली आहे.

भारताची पशू-मुत्सद्देगिरीशी पडलेली गाठ

भारताच्या भूमीशी जोडलेली पशू-मुत्सद्देगिरीची सर्वांत जुनी नोंद १४१४ च्या सुमारास आढळते. तत्कालीन बंगालमध्ये मलिंदीचे (आजचा केनिया) राजदूत आणि मिंग वंशाच्या योंगले सम्राटाचे प्रतिनिधी असलेले चिनी नौदल प्रमुख ॲडमिरल झेंग हे यांची भेट झाली. ‘स्मिथसोनियन मॅगझिन’च्या २०१७ मधील एका लेखात म्हटले आहे की, पूर्व आफ्रिकेतून जिराफ घेऊन आलेल्या या मलिंदीच्या प्रतिनिधींनी तो जिराफ ॲडमिरलकडे सुपूर्द केला, जेणेकरून तो सम्राट योंगले यांच्या दरबारात नजराणा म्हणून सादर करता येईल.

यानंतर सुमारे एका शतकाने घडलेली आणखी एक घटना इतिहासात अमर झाली. गुजरातचे सुलतान मुझफ्फर (दुसरे) यांनी पोर्तुगालचा राजा मॅन्युएल (पहिला) याला एक ‘गेंडा’ भेट दिला. खवळलेला समुद्र पार करून हा एकशिंगी महाकाय प्राणी जेव्हा युरोपच्या किनाऱ्यावर उतरला, तेव्हा संपूर्ण युरोपात प्रचंड खळबळ उडाली! विख्यात जर्मन चित्रकार अल्ब्रेक्ट ड्युरर याने स्वतः कधीही गेंडा पाहिला नसताना, केवळ ऐकीव वर्णने आणि सहकाऱ्यांनी काढलेल्या प्राथमिक चित्रांच्या आधारे, १५१५ मध्ये कॅनव्हासवर ‘द ऱ्हाइनोसॉरस’ (The Rhinoceros) हे अजरामर चित्र साकारले.

China Panda Animal Diplomacy USA | Animal Diplomacy history and political impact | ॲनिमल डिप्लोमसी इतिहास आणि चीन पांडा राजकारण | पशू मुत्सद्देगिरी भारत आणि जागतिक इतिहास
भारताने अॅनिमल डिप्लोमसीसाठी हत्तींचा वापर केला (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

मुघल बादशहा जहांगीर (१५६९-१६२७) यालाही जगातील दुर्मिळ प्रजातींविषयी विलक्षण आकर्षण होते, याविषयीचे स्पष्ट उल्लेख ‘जहांगीरनामा’मध्ये आढळतात. इतिहासकार अपर्णा कपाडिया यांच्या २०२१ मधील एका निबंधानुसार, जहांगीरने पोर्तुगिजांशी व्यवहार करण्यासाठी आणि त्यांच्याकडून जे जे दुर्मिळ व अद्भूत प्राणी-पक्षी मिळतील ते खरेदी करण्यासाठी गोव्यात खास एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. याच प्रयत्नांतून जहांगीरच्या पदरी एक ‘उत्तर अमेरिकन टर्की’ पक्षी आला. या पक्षाचे वर्णन बादशहाने “लांडोरीपेक्षा अंगाने मोठा आणि मोरापेक्षा लक्षणीयरीत्या लहान” असे केले आहे.

स्वातंत्र्योत्तर भारतात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही या मुत्सद्देगिरीचा वापर केला. जपानमधील लहान मुलांनी हत्ती पाहण्याची इच्छा व्यक्त करणारी असंख्य पत्रे पाठवल्यानंतर, पंडित नेहरूंनी जपानला ‘इंदिरा’ नावाचे एक हत्तीचे पिल्लू भेट दिले. त्यानंतरच्या काळात भारत सरकारने अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीन, तुर्की आणि इराणसारख्या अनेक देशांना सदिच्छा म्हणून हत्ती पाठवले.

अशाच प्रकारे भारतालाही प्राण्यांच्या रूपाने राजकीय नजराणे मिळाले. १९९६ मध्ये झिम्बाब्वेकडून भारताला ‘शंकर’ आणि ‘विम्बाई’ ही आफ्रिकन हत्तींची जोडी मिळाली, या जोडीला दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले होते. दुर्दैवाने २००१ मध्ये विम्बाईचा मृत्यू झाला. त्यानंतर शंकरने घालवलेले दीर्घ एकाकी आयुष्य माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरले. शेवटी ऑक्टोबर २०२५ मध्ये या नर हत्तीने जगाचा निरोप घेतला.

अलिकडच्या काळातील एक देदिप्यमान उदाहरण म्हणजे २०२२ मधील भारत-नामिबिया सहकार्यातून आकारास आलेला ‘प्रोजेक्ट चित्ता’. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवाना येथूनही चित्त्यांच्या आणखी तुकड्या भारतात आणल्या गेल्या. भारतातून १९५० च्या दशकात आशियाई चित्ता नामशेष झाला असला, तरी ऐतिहासिक काळात राजे-रजवाड्यांच्या दरबारात चित्त्यांना मानाचे स्थान होते आणि राजकीय भेटींमध्ये त्यांची देवाणघेवाण सर्रास होत असे.

ऑगस्ट २०२६ मध्ये भारताने जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) युरोपीय मुख्यालयासाठी पाच देखणे ‘मोर’ भेट दिले. या अनोख्या उपक्रमाचे वर्णन संयुक्त राष्ट्रांच्या वृत्तविभागाने “पांडा डिप्लोमसीला मिळालेले एक नवे वळण” असे केले होते.

मूक राजदूतांमधील, गूढ प्रतीकात्मकता

राजनयिक संबंधांमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण ही जुनीच रीत आहे. परंतु, जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूऐवजी एका सजीव प्राण्याला राजकीय आणि सांस्कृतिक प्रतिनिधी केले जाते, तेव्हा त्या भेटीचे गांभीर्य कैक पटींनी वाढते. महाकाय पांडा असो, वा गोंडस कोआला, हे प्राणी त्यांच्या देशाची जिवंत ओळख असतात. एखादा देश जेव्हा असे प्राणी दुसऱ्या देशाला देतो, तेव्हा तो औपचारिक मुत्सद्देगिरीच्या चौकटी ओलांडून थेट तिथल्या सामान्य जनतेच्या मनाला साद घालत असतो; हीच देशाची ‘सॉफ्टपॉवर’ असते.

प्राणी कूटनीतीचे सामर्थ्य

प्राणी कूटनीतीचे सर्वात मोठे सामर्थ्य नेमके याच ठिकाणी दडलेले आहे. ‘डिप्लो’ (Diplo) या संस्थेच्या मते, पशू-मुत्सद्देगिरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील किचकट आणि गुंतागुंतीच्या समीकरणांना अत्यंत भावनिक आणि सहज समजणाऱ्या कथेत रूपांतरित करते. परराष्ट्र धोरणाला एक ‘गोंडस आणि प्रत्यक्ष स्पर्श करता येईल असा चेहरा’ बहाल करण्याचे काम हे प्राणी करतात आणि हाच चेहरा कधीकधी अशा बंद दारांची कुलपे उघडतो, जिथे पारंपरिक राजकारण सपशेल अपयशी ठरते.

तब्बल दहा लाखांहून अधिक लोकांची गर्दी

या मुक्या राजदूतांचा जनमानसावर आणि अर्थकारणावर पडणारा प्रभाव थक्क करणारा असतो. याचे उदाहरण द्यायचे तर, १९७२ मध्ये चीनकडून ‘लिंग-लिंग’ आणि ‘सिंग-सिंग’ हे दोन पांडा वॉशिंग्टनच्या राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात दाखल झाले, तेव्हा अवघ्या पहिल्याच वर्षात तब्बल दहा लाखांहून अधिक लोकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती!

राजनैतिक संबंधांचे बॅरोमीटर

राजकीय आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास, असा दुर्मीळ जीव दुसऱ्या देशाच्या हवाली करणे म्हणजे, “आम्ही तुमच्यावर एक जबाबदार यजमान म्हणून पूर्ण विश्वास टाकत आहोत,” असा मूक संदेश देणे होय. विशेषतः संकटग्रस्त किंवा दुर्मीळ प्रजातींच्या बाबतीत, त्या जीवाला अनोळखी वातावरणात सुरक्षित ठेवण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची मोठी नैतिक जबाबदारी यजमान देशाच्या खांद्यावर येते. थोडक्यात सांगायचे तर, त्या पाहुण्या प्राण्याचे आरोग्य आणि सुख-समाधान हेच दोन देशांमधील राजनैतिक संबंधांचे ‘तपासणी यंत्र’ (बॅरोमीटर) म्हणून राहते.

वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व आणि वादविवाद

१९७२ च्या ऐतिहासिक घडामोडींआधी, अगदी १९४० च्या दशकापासूनच चीनने मुत्सद्देगिरीतील पांडांचे अफाट सामर्थ्य ओळखले होते आणि कालांतराने त्याचे एका पद्धतशीर संरचनेत रूपांतर केले. जगभरातील इतर देशांनीही या पावलावर पाऊल ठेवले. परंतु याच काळात, दुर्मीळ वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर काढून परदेशी प्राणिसंग्रहालयांच्या पिंजऱ्यात डांबणे आणि त्याआडून होणारी बेकायदेशीर तस्करी यांवर वन्यजीव रक्षकांनी तीव्र चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली.

या मंथनातून आणि संवर्धन चळवळीतून १९७३ मध्ये ‘सायटिस’ (CITES – संकटग्रस्त वन्यजीव आणि वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक परिषद) हा ऐतिहासिक जागतिक करार अस्तित्वात आला, जो १ जुलै १९७५ पासून लागू झाला. हा करार ३८ हजारांहून अधिक प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीवर आणि व्यापारावर कडक नजर ठेवतो. परिणामी, राजकीय हेतूने होणाऱ्या प्राण्यांच्या देवाणघेवाणीवरही संवर्धन, सुरक्षितता आणि प्राण्यांशी केली जाणारी दयाळू वागणूक यांच्या कठोर अटी लादल्या गेल्या; ज्यामुळे वन्यजीवांचे शोषण आणि नामशेष होण्याचा धोका टळला.

या नियमांमुळे पशू-मुत्सद्देगिरीचे स्वरूपही आमूलाग्र बदलले. प्राण्यांना ‘कायमस्वरूपी भेट’ देण्याची जुनी पद्धत मागे पडली आणि त्याजागी ‘वैज्ञानिक अभ्यासासाठी तात्पुरती उसनवारी’ (Scientific Loans) ही संकल्पना पुढे आली.

पांडा डिप्लोमसी’ आघाडीवर

या नव्या युगातही चीनची ‘पांडा डिप्लोमसी’ आघाडीवर आहे. आता पांडा इतर देशांतील प्राणीसंग्रहालयांना सुमारे दहा वर्षांच्या करारावर भाड्याने दिले जातात, मात्र त्यांची खरी मालकी चीनकडेच राहते! यासाठी आकारले जाणारे वार्षिक ‘संवर्धन शुल्क’ (Conservation Fee) एका जोडीसाठी तब्बल ५ लाख ते १० लाख डॉलर्सच्या घरात असते. त्यातही जर त्या पांडांना परदेशी भूमीवर पिल्ले झाली, तर त्यासाठी चीनला अतिरिक्त रक्कम मोजावी लागते. यातून जमा होणारा निधी चिनी पांडांच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करण्यासाठी आणि आधुनिक संवर्धन केंद्रे उभारण्यासाठी वापरत असल्याचा दावा करतो.

ओरंगउटान डिप्लोमसी

पर्यावरणवाद्यांच्या वाढत्या प्रभावाचे आणखी एक ताजे उदाहरण २०२४ मध्ये पाहायला मिळाले, जेव्हा मलेशियाने ‘ओरंगउटान डिप्लोमसी’ सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. आपण निसर्गाला हानी न पोहोचवता ‘शाश्वत पामतेलाचे उत्पादन’ करतो आणि जंगलांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत, हे जगाला दाखवण्यासाठी मलेशिया आपल्या व्यापारी भागीदार देशांना हे देखणे वानर भेट देणार होता. परंतु या घोषणेनंतर पर्यावरणप्रेमींनी मलेशियावर चौफेर टीका केली. पामतेलाच्या बागा वाढवण्यासाठी चाललेली बेसुमार जंगलतोड हीच मुळात ओरंगउटानच्या विनाशास कारणीभूत ठरत असताना, त्यांनाच भेट म्हणून देणे हा निव्वळ दांभिकपणा असल्याचा आरोप झाला. या जनक्षोभानंतर मलेशियाला माघार घ्यावी लागली. त्यांनी आपली मूळ योजना बदलून ‘प्रायोजकत्व प्रारूप’ (Sponsorship Model) स्वीकारले; ज्याअंतर्गत परदेशी सरकारे आणि कंपन्यांना ओरंगउटान स्वतःच्या देशात नेण्याऐवजी, मलेशियातील त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील संवर्धनासाठी थेट आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले.

अशा प्रकारे, कधी काळी सम्राटांचा राजकीय अहंकार सुखावणारे हे मुके राजदूत, आज शतकानुशतके उलटून गेल्यानंतरही महासत्तांच्या राजकारणाला आकार देत आहेत; फक्त आता त्यांच्या मागे वन्यजीव संवर्धनाचे आणि नैतिकतेचे नवे कवच उभे राहिले आहे.