Chinese Ancestor Worship Vatican Ban History: मानवी संस्कृतीच्या इतिहासात जन्माइतकच मृत्यूनंतरच्या जगाला आणि पूर्वजांच्या स्मृतींना विशेष महत्त्व देण्यात येते. भारताप्रमाणे चीनमध्येही हजारो वर्षांपासून पितरांची पूजा करण्याची अतिशय समृद्ध परंपरा आहे. मात्र, या परंपरेवरून १७ व्या शतकात व्हॅटिकन चर्च आणि चिनी सम्राटांमध्ये तब्बल अडीचशे वर्षांचा मोठा संघर्ष उभा राहिला होता.
मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राथमिक टप्प्यावर माणसाला ज्या गोष्टींचे आकलन झाले नाही, त्या गोष्टींना अद्भुताचे वलय प्राप्त झाले. जन्म-मृत्यू याही अशाच संकल्पना आहेत. जन्म एकदाच झाला तरी दरवर्षी तो साजरा केला जातो. तसेच मृत्यू झाला तरी त्या घटनेचे आणि आपल्याला जन्माला घालणाऱ्या पूर्वजांचे स्मरण दरवर्षी केले जाते. भारतीय संस्कृतीत त्याला ‘पितृपक्ष’ म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत पितृपक्ष ही संज्ञा वापरात असली, तरी पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे कर्तव्य जगभरातील सर्वच संस्कृतींमध्ये कमी-अधिक फरकाने केले जाते. किंबहुना या प्रथेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारताप्रमाणे चीनमध्येही पितरांना दरवर्षी विशिष्ट कालखंडात आदरांजली वाहण्याची परंपरा आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीनमधील पितरांची पूजा आणि त्याला झालेला विरोध याचा घेतलेला हा आढावा.
मृत्यूनंतरचे जग
यांगशाओ (Yangshao Culture) ही चीनमधील नवाश्मयुगीन संस्कृती आहे. याच कालखंडापासून पितरांशी संबंधित विधींचे ठोस पुरावे सापडण्यास सुरुवात होते. यांगशाओ या संस्कृतीचा कालखंड इ.स.पू. ५००० ते ३००० (आजपासून साधारण ५००० ते ७००० वर्षांपूर्वी) इतका मानला जातो. मृतांच्या दफनात सापडलेल्या वस्तूंमुळे त्या कालखंडात ‘मृत्यूनंतरचे जग’ ही संकल्पना अस्तित्वात असावी, असे मत अभ्यासक मांडतात.
मृत राजाला बळी दिल्यास संकट टळेल
चीनच्या इतिहासातील प्राचीन शांग राजवंशाच्या (इ.स.पू. १६००-१०४६) काळात राजघराण्यातील मृत पूर्वज स्वर्गात राहतात, अशी धारणा प्रचलित असल्याचे दिसते. शमन किंवा धार्मिक गुरूंच्या माध्यमातून पितरांशी संपर्क साधता येतो, असे मानले जात होते. आनयांग येथील यिनश्यू (Yinxu) या पुरातत्त्वीय स्थळावर पुराभिलेख असलेले कासवाचे कवच आणि प्राण्यांच्या खांद्यांची हाडे सापडली.

पांढरे डुक्कर आणि बैल
या पुराभिलेखांमध्ये (Oracle-bone inscriptions) राजघराण्यातील पितरांना अर्पण केलेल्या बळीचा उल्लेख आहे. धार्मिक विधी आणि पूर्वजांशी संबंधित अशा नोंदी हजारोंच्या संख्येने आहेत. त्या काळात मृत राजाला बळी दिल्यास विद्यमान राजावर येणारे संकट टळेल, अशी धारणा प्रचलित होती. बलिदानासाठी पांढरे डुक्कर आणि बैल वापरण्याचाही उल्लेख आहे. शांगच्या धार्मिक विश्वात ‘Di’ (帝) या देवतेचा संबंध राजघराण्यातील पितरांशी असल्याचे पुरावे यात सापडतात.
‘हुन’ (Hun/魂) आणि ‘पो’ (Po/魄)
पुढे झोऊ काळात (इ.स.पू. १०४६-२५६) पूर्वजांसाठी/ पितरांसाठी स्वतंत्र मंदिरे उभारली जाऊ लागली. अशी मंदिरे राजधानीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असत. प्राचीन चिनी समजुतीनुसार एका व्यक्तीचे ‘हून’ (Hun/魂) आणि ‘पो’ (Po/魄) असे दोन आत्मे असतात. मृत्यूनंतर ‘हून’ हा सूक्ष्म आत्मा स्वर्गात जातो, तर ‘पो’ हा भौतिक आत्मा मृतदेहात/ पृथ्वीवर वास करतो. झुओ झुआन (Zuo Zhuan), लीजी (Liji), हुआइनान्झी (Huainanzi) तसेच हानकालीन वैद्यकीय ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. ‘हून’ हे अधिक सूक्ष्म व yang स्वरूपाचा आहे, तर ‘पो’ हा शरीर, पृथ्वी आणि यीनशी (yin) निगडित मानला जात होता.
अन्न अर्पण करणे आवश्यक
हून आत्म्याला नियमितपणे अन्न अर्पण करणे आवश्यक मानले जात असे. कालांतराने ‘हून’ आत्मा मृत्यूनंतरच्या जगातील पौराणिक ‘यलो स्प्रिंग्स’ (Yellow Springs) येथे जातो, अशी समजूत दृढ झाली. मात्र, तोपर्यंत या आत्म्याने जिवंत लोकांना त्रास देऊ नये म्हणून मृत्यूनंतरचे विधी करणे महत्त्वाचे मानले जात होते. म्हणूनच सर्वप्रथम मृत व्यक्तीला पुढील जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंसह (अन्न, विविध वस्तू आणि त्यांच्या प्रतिकृती) दफन केले जाई. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षी मृत व्यक्तीचा आत्मा शांत राहावा म्हणून त्याच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या जात असत.
पूर्वज/ पितर आपल्यासोबतच
प्राचीन चीनमध्ये लग्नप्रसंगी किंवा इतर महत्त्वाच्या प्रसंगी पितरांना आमंत्रण देण्याची प्रथा होती. किंबहुना एखाद्या बिकट प्रसंगी पितरांचा सल्ला घेण्याचीही पद्धत होती. इतिहासकार आर. डॉसन म्हणतात की, “मृत्यूनंतरही पूर्वज/ पितर आपल्यासोबतच आहेत आणि आपण एकमेकांची काळजी घेतो,” अशीच सर्वसामान्य लोकांची साधी आणि सोपी भावना होती.

‘शोऊ’ आणि साहित्य
चीनमधील अमरत्वाच्या कल्पनेचा आणखी एक पैलू म्हणजे ‘शोऊ’ (Shou) अर्थात दीर्घायुष्य. ही कल्पना केवळ व्यक्ती जिवंत असतानाच्या आयुष्यापुरती मर्यादित नव्हती; मृत्यूनंतरही व्यक्तीचे नाव आणि स्मृती टिकून राहण्याशी तिचा संबंध होता. त्यामुळे मृत व्यक्तीसाठी देवघर किंवा स्मृतिस्थळ उभारून तेथे वस्तू अर्पण केल्या जात. याशिवाय साहित्य हे देखील मृत व्यक्तीची स्मृती जतन करण्याचे प्रभावी साधन होते. विशेषतः हान राजवंशाच्या काळापासून (इ.स.पू. २०६-इ.स. २२०) मृत कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी कविता आणि साहित्य लिहिले जाऊ लागले. अशा लेखनातून मृत व्यक्तीचे नाव आणि तिचे कर्तृत्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवले जाई.
देवघर आणि स्मारके
चीनमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला शोकाचे ठरावीक नियम पाळावे लागत असत. या नियमांना ‘शोकाकुल वस्त्रांचे पाच स्तर’ (‘वु फुआन-Wu Fu – 五服)म्हटले जात असे. वडिलांच्या निधनानंतर मुलगा सर्वात साधे, खरखरीत कपडे घालून जवळपास तीन वर्षांपर्यंत शोक पाळत असे, तर दूरच्या नातेवाइकांसाठी हा काळ कमी असे. मृत व्यक्तीची आठवण आणि कीर्ती जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या कबरीवर नाव व कार्याचा उल्लेख असणारा दगडी शिलालेख उभारला जात असे.
राजा-सम्राटांच्या पूर्वजांसाठी अतिशय भव्य मंदिरे बांधली जात. यात राजवंशाच्या संस्थापकाला विशेष मान असे. हान राजवंशाच्या ‘गाओझू’ या संस्थापकासाठी साम्राज्यात शेकडो पूर्वज-मंदिरे होती. इसवी सन पूर्व ४० पर्यंत या मंदिरांची संख्या ३४३ इतकी असल्याचा ऐतिहासिक संदर्भ सापडतो. या मंदिरांच्या देखभालीसाठी तब्बल ६७ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत होते आणि वर्षाला २५ हजारांपेक्षा जास्त वस्तू अर्पण केल्या जात होत्या. सर्वसामान्य कुटुंबांमध्ये प्रामुख्याने मागील तीन पिढ्यांतील मृत पुरुषांची -पितरांची पूजा केली जात असे, तर सम्राटांच्या बाबतीत मागील चार पिढ्यांचा सन्मान होत असे.
पितरांची पूजा आणि युरोपीय मिशनऱ्यांचा वाद
चीनमध्ये पूर्वजांच्या-पितरांच्या सन्मानाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. परंतु, १७ व्या शतकात चीनमध्ये आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. सुरुवातीच्या काळात कॅथोलिक चर्च आणि इतर ख्रिश्चन संस्थांनी चिनी पूर्वज-पितर पूजेला एक धार्मिक विधी न मानता, लोकांची एक सामाजिक परंपरा म्हणून स्थान दिले होते. मात्र, इ.स. १६९२ मध्ये व्हॅटिकनने आपले धोरण बदलले आणि या विधींवर बंदी घालण्याच्या दिशेने पावले उचलली. परंतु, चिनी अधिकाऱ्यांनी व्हॅटिकनचा हा हस्तक्षेप अजिबात स्वीकारला नाही. त्यामुळे पूर्वज- पितर पूजेची परंपरा पूर्वीसारखीच पुढे सुरू राहिली.
डॉमिनिकन, फ्रान्सिस्कन आणि विशेषतः पॅरिस फॉरेन मिशन्स सोसायटीशी (Paris Foreign Missions Society) संबंधित काही मिशनऱ्यांनी पूर्वज- पितर पूजेचे स्वरूप मूर्तिपूजक धार्मिक असून ते कॅथोलिक श्रद्धेशी विसंगत असल्याचे सांगितले. या वादानंतर पोप क्लेमेंट ११ व्या यांनी १७०४ मध्ये चिनी ख्रिश्चनांच्या अशा विधींविरोधात निर्णय दिला. विशेष म्हणजे, एखाद्या चिनी व्यक्तीने हा विधी धार्मिक नसून केवळ सामाजिक किंवा राजकीय स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले, तरीही त्याला काही विशिष्ट पूर्वज- पितरांच्या विधींमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली. नंतर १७१५ च्या एक्स इल्ला दिये (Ex illa die) या पोपच्या अधिकृत पत्राद्वारे (Papal Bull) ही बंदी अधिक कडक करण्यात आली.
चीन-युरोप संबंधांवर झालेला परिणाम
हा वाद केवळ चर्चपुरता किंवा धर्मापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो साम्राज्य आणि संस्कृतीच्या अधिकाराचा मोठा संघर्ष ठरला. चिनी सम्राट ‘कांग्शी’ यांच्या दृष्टीने अडचण अशी होती की, बाहेरून आलेल्या युरोपीय धर्मगुरूंनी चिनी परंपरा आणि संस्कृतीचा अर्थ काय, हे स्वतः चिनी लोकांनाच शिकवण्यास सुरुवात केली होती. हा आपल्या संस्कृतीत आणि अधिकारात थेट हस्तक्षेप आहे असे मानून, त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कामांवर कडक निर्बंध लादले. कांग्शी सम्राटानंतर आलेले ‘योंगझेंग’ आणि ‘क्यियानलाँग’ यांच्या काळात हे निर्बंध आणखी कडक झाले आणि मिशनऱ्यांसाठी परिस्थिती अत्यंत कठीण झाली. अनेक इतिहासकार या ‘Chinese Rites Controversy’ कडे केवळ धर्मशास्त्रीय भांडण म्हणून न पाहता, दोन संस्कृतींमधील गैरसमज (cross-cultural misunderstanding) धार्मिक अधिकार, भाषांतर आणि सांस्कृतिक सार्वभौमत्व यांच्या संघर्षाचा भाग म्हणून पाहतात.
शेवटी अडीचशे वर्षांच्या वादानंतर, १९३९ साली प्लेन कॉम्पेर्तुम एस्त (Plane compertum est) या अधिकृत निर्देशाद्वारे व्हॅटिकनने मान्य केले की, काळाच्या ओघात आशियाई प्रथांचा अर्थ बदलला असून त्या आता पूर्वजांविषयी- पितरांविषयी आदर, देशाविषयी निष्ठा किंवा सामाजिक शिष्टाचार अशा नागरी/ सामाजिक स्वरूपाच्या आहेत. व्हॅटिकनच्या अधिकृत ॲक्टा अपोस्तोलिके सेदिसमध्ये (Acta Apostolicae Sedis) याची नोंद करण्यात आली. अशा प्रकारे जवळपास अडीचशे वर्षांनंतर चर्चची भूमिका पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर आली. एखाद्या विधीचा अर्थ त्याच्या प्राचीन उगमावरून ठरवायचा की, वर्तमान सामाजिक संदर्भावरून? आणि शेवटी व्हॅटिकनने वर्तमान सामाजिक संदर्भाला मान्यता दिली.
संदर्भ:
- Paul Rule, “The Chinese Rites Controversy: Confucian and Christian Views on the Afterlife,” Studies in Church History, Vol. 45, pp. 280–300.
- Li Liu, “Who were the ancestors? The origins of Chinese ancestral cult and racial myths,” Antiquity.
- Dawson, Raymond. The Chinese Experience. New York: Charles Scribner’s Sons, 1978, pp. 153–154.
