Chronic Pain Family Support: वेदना ही केवळ शारीरिक नसून त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही होतो. अशा वेळी कुटुंबाची भूमिका रुग्णाला पूर्णपणे निष्क्रिय करण्याची नसून, त्याला सुरक्षितपणे स्वावलंबी करण्याची असायला हवी.

वेदना रुग्णाची असते; पण तिच्याशी सामना करताना कुटुंबही उपचाराचा भाग होऊ शकतं.
“दुखतंय म्हणून तू हे काम करू नकोस.”
“जास्त चालू नकोस, पुन्हा दुखेल.”
“तुला इतकं काय होतंय? रिपोर्ट तर नॉर्मल आहे!”
“औषधं वेळेवर घेतलीस ना?”
वेदनेचा सामना करणाऱ्या व्यक्तीच्या घरात अशी वाक्यं सहज ऐकायला मिळतात. यात काळजी असते, प्रेम असतं; पण कधी कधी अतिरिक्त काळजी नकळत रुग्णाच्या भीतीत आणि निष्क्रियतेत भर घालू शकते.

वेदना ही केवळ शरीरात घडणारी गोष्ट नाही. ती व्यक्तीच्या झोपेवर, कामावर, मनःस्थितीवर, सामाजिक जीवनावर आणि दैनंदिन भूमिकांवर परिणाम करू शकते. त्यामुळे वेदनेच्या उपचारात रुग्णासोबत त्याच्या कुटुंबालाही योग्य माहिती आणि योग्य भूमिका समजणे महत्त्वाचे ठरते.

Chronic Pain Family Support in patient care | Pain Management Role of Family Marathi guide | वेदनेच्या उपचारात कुटुंबाचे सहकार्य आणि भूमिका | क्रॉनिक पेन व्यवस्थापन आरोग्य सल्ला
क्रॉनिक पेन व्यवस्थापनात कुटुंबाचे योग्य सहकार्य महत्त्वाचे (Image- Gemini)

‘दुखतंय’ म्हणजे नेहमी ‘थांबायचं’ असतं का?

कुटुंबीयांची सर्वात स्वाभाविक प्रतिक्रिया असते, रुग्णाला विश्रांती द्या. अचानक झालेल्या दुखापतीत किंवा काही विशिष्ट परिस्थितींमध्ये विश्रांती आवश्यक असू शकते. परंतु दीर्घकाळ चालणाऱ्या अनेक वेदनांमध्ये सतत हालचाल टाळणे, प्रत्येक कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे आणि “दुखेल म्हणून करू नकोस” अशी सततची सूचना रुग्णाच्या शारीरिक क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर परिणाम करू शकते. उदाहरणार्थ, गुडघेदुखी असलेल्या व्यक्तीला घरातील प्रत्येक कामापासून दूर ठेवले, तर काही काळ कमी दुखतंय, असं त्या व्यक्तीला वाटू शकतं. पण हळूहळू स्नायूंची क्षमता, सहनशक्ती आणि हालचालीवरील विश्वास कमी होऊ शकतो. म्हणूनच कुटुंबाची भूमिका सगळं करून देणे एवढीच नसून, योग्य तेवढं स्वतः करण्यासाठी प्रोत्साहन देणे अशी असायला हवी.

“जास्त चालू नकोस”, “वाकू नकोस”, “जिना वापरू नकोस”, “हात वर करू नकोस”ही वाक्यं काळजीतून येतात. पण रुग्णाला प्रत्येक हालचाल धोकादायक वाटू लागली, तर भीती वाढू शकते. उपचाराचा उद्देश प्रत्येक हालचाल टाळणे नसून, सुरक्षित आणि हळूहळू वाढणारी क्षमता विकसित करणे हा असतो. फिजिओथेरेपिस्ट रुग्णाला कोणती हालचाल सध्या योग्य आहे, ती किती प्रमाणात करायची आणि क्षमता कशी वाढवायची हे समजावून सांगू शकतो. कुटुंबाने त्या प्रक्रियेला पाठिंबा दिला, तर उपचाराचा परिणाम दैनंदिन जीवनात टिकवून ठेवणे अधिक सोपे होते.

‘रिपोर्ट नॉर्मल आहे’ म्हणजे वेदना खोटी नाही

काही रुग्णांना तपासण्यांमध्ये मोठी समस्या दिसत नाही, तरी त्यांना वेदना असतात. अशा वेळी कुटुंबाकडून “काहीच नाहीये तुला” किंवा “सगळं मनात आहे” असं ऐकायला मिळणं रुग्णासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकतं. वेदना ही व्यक्तीची वास्तविक अनुभूती आहे. तिची तीव्रता आणि परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात. त्यामुळे रिपोर्ट आणि रुग्णाचा अनुभव, दोन्ही ऐकणे आवश्यक आहे. “तुला दुखतंय, मला समजतं” हे साधं वाक्यसुद्धा रुग्णाला मोठा आधार देऊ शकतं. कुटुंब ‘उपचारक’ नसून ‘सहप्रवासी’ असावं. कुटुंबीयांनी प्रत्येक वेळी डॉक्टर किंवा फिजिओथेरेपिस्टची भूमिका घेण्याची गरज नाही. “हा व्यायाम कर”, “तो करू नकोस”, “ही औषधं बंद कर”, “आमच्या ओळखीच्या व्यक्तीला हे करून बरं झालं” अशा सल्ल्यांपेक्षा उपचार करणाऱ्या व्यावसायिकांनी दिलेली माहिती समजून घेऊन त्यानुसार रुग्णाला साथ देणे अधिक उपयुक्त ठरते.

कधी कधी रुग्णाला उपचारातील सातत्य राखण्यासाठी फक्त आठवण करून देण्याची गरज असते. कधी घरातील वातावरणात काही बदल करावे लागतात. कधी त्याला थोडं प्रोत्साहन हवं असतं. म्हणजेच कुटुंबाची भूमिका नियंत्रणाची नाही, सहकार्याची असते. वेदना फक्त रुग्णाला नाही, संपूर्ण कुटुंबाला प्रभावित करू शकते. दीर्घकाळ वेदना असलेल्या व्यक्तीची भूमिका घरात बदलू शकते. जी व्यक्ती पूर्वी घरातील कामं करत होती, मुलांची किंवा नातवंडांची काळजी घेत होती, नोकरी करत होती किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होती, ती अचानक अनेक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून होऊ शकते. याचा परिणाम कुटुंबीयांवरही होतो.

  • म्हणूनच उपचारात केवळ “वेदना किती कमी झाली?” हा प्रश्न पुरेसा नसतो
  • “रुग्ण पुन्हा कोणत्या गोष्टी करू इच्छितो?”
  • “त्याला घरात कोणती भूमिका पुन्हा निभावता यावी असं वाटतं?”
  • “त्याच्या दैनंदिन आयुष्यात कोणता बदल त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे?”
  • हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.

कुटुंबाला काय करता येईल?

  • कुटुंबीय काही साध्या गोष्टी करू शकतात
  • रुग्णाच्या वेदनेवर शंका न घेता त्याचं ऐकणं.
  • प्रत्येक हालचालीपासून त्याला घाबरवण्याऐवजी उपचारात सांगितलेल्या सुरक्षित हालचालींसाठी प्रोत्साहन देणं.
  • उपचार, औषधं किंवा फिजिओथेरेपीबाबत स्वतःहून बदल न करता संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करणं.
  • रुग्णाला प्रत्येक कामापासून दूर न ठेवता, त्याच्या क्षमतेनुसार स्वावलंबी राहण्यास मदत करणं.
  • उपचारातील छोट्या प्रगतीची दखल घेणं.
  • “आज किती दुखतंय?” एवढंच न विचारता, “आज तुला काय करता आलं?” असंही विचारणं.

Pain Awareness Month च्या “Understand, Educate, Partner” या विचारात Partner म्हणजे केवळ डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील भागीदारी नाही. रुग्णाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनाही या प्रवासात योग्य भूमिका मिळू शकते. कुटुंबाने रुग्णाच्या प्रत्येक हालचालीवर पहारा ठेवण्यापेक्षा त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला, भीती वाढवण्याऐवजी योग्य माहिती दिली आणि अवलंबित्व वाढवण्याऐवजी स्वावलंबनाला प्रोत्साहन दिलं, तर घरचं वातावरणच उपचाराचा सकारात्मक भाग होवू शकतं. कारण वेदना एका व्यक्तीला जाणवत असली, तरी त्या व्यक्तीचं आयुष्य कुटुंबाशी जोडलेलं असतं. आणि म्हणूनच वेदनेच्या उपचारात एक महत्त्वाचा प्रश्न असा असू शकतो. “रुग्णासाठी आपण काय करू शकतो?” यापेक्षा “रुग्णाला पुन्हा स्वतःचं आयुष्य जगता यावं यासाठी आपण कसा सहयोग देऊ शकतो” हे महत्त्वाचं ठरतं.