एक कचौडी, दो समोसा… इन मर्दों का क्या भरोसा, १ जिरा, २ अजवाईन… मर्द जात दो रिझाईन, मेरे सर में दर्द है… इसका कारण मर्द है या सारख्या उपहासात्मक घोषणा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अलीकडेच दिल्लीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढत्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ महिलांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात महिलांनी यमक जुळणाऱ्या उपहासात्मक घोषणांच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. एकूणच संपूर्ण देशभरात आणि विशेषतः दिल्लीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या आणि सामूहिक बलात्कारांच्या बातम्या रोजच ऐकायला मिळत आहेत. आता नवरात्रौत्सव सुरू झाला असून संपूर्ण भारतभर हा सण देवीचा जागर करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, देवीकडे ऐहिक सुखाची मागणी करताना देवी उपासनेची परंपरा नेमक काय सांगते याचा मात्र विसर पडतो.

मध्ययुगीन काळातील ‘कुलार्णव तंत्र’ (अध्याय ११, श्लोक ६४-६५) या गूढ तंत्र ग्रंथात म्हटले आहे की, “स्त्रियांचा (नारींचा) कधीही निषेध किंवा अपमान करू नये, त्यांच्यावर ओरडू नये किंवा त्यांच्याशी खोटे बोलू नये… स्त्रीने शंभर गुन्हे केले तरी तिला फुलानेही मारू नये.” हा ग्रंथ ‘योगिनी’ नावाच्या उग्र, मांसभक्षक आणि शक्तिशाली स्त्री-देवतांच्या उपासनेवर आधारित आहे. विशेष म्हणजे आजच्या दिल्लीचे संस्कृत नाव ‘योगिनीपूर’ (योगिनींचे शहर) असे होते. एकेकाळी राजाश्रय लाभलेला, मुक्तपणे विहार करणाऱ्या या देवतांना पूजणारा हा शक्तिशाली पंथ आणि त्याचा रहस्यमय अस्त, हा भारतीय इतिहासातील एक विस्मयकारक आणि दुर्लक्षित अध्याय आहे.

Women students march at DU's Faculty of Art on Monday. (Express Photo: Amit Mehra)
Women students march at DU’s Faculty of Art on Monday. (Express Photo: Amit Mehra)

रहस्यमय वर्तुळाकार मंदिरे आणि रौद्र देवतांचे स्थापत्य

आजही भारताच्या अनेक भागांमध्ये काही रहस्यमय वर्तुळाकार मंदिरं भग्नावस्थेत उभी आहेत. या मंदिरांचे स्थापत्य प्रचलित मंदिर स्थापत्यापेक्षा भिन्न आहे. या मंदिरांना आकाशाला भिडणारी उंच शिखरे किंवा भव्य घुमट नसतात. या वर्तुळाकार वास्तूच्या अगदी मध्यभागी शिवाचे अत्यंत रौद्र रूप असलेल्या ‘भैरवा’चे मुख्य स्थान असते आणि त्याच्या सभोवतालच्या वर्तुळाकार भिंतीत ६४ योगिनींच्या मूर्ती प्रस्थापित केलेल्या असतात.

मध्य प्रदेशातील मितावली येथील ‘चौसष्ट योगिनी मंदिर’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. भारताच्या जुन्या संसद भवनाची वास्तू याच मंदिरावरून प्रेरणा घेऊन तयार केली आहे. या योगिनी देवता मानवी रूपात नसून अत्यंत उग्र रूपात दर्शवल्या आहेत. काहींचे चेहरे सिंहीण, हत्ती, गाढव किंवा डुक्कर या पशुसमान आहेत, तर काहींच्या हातात प्राणघातक शस्त्रे आहेत. या देवतांना पारंपारिक नैवेद्याऐवजी मांस, रक्त, मद्य आणि शारीरिक स्राव अर्पण केले जात असत.

राजघराण्यांचा आश्रय आणि सत्तेसाठी चालणारी तंत्रसाधना

सध्याच्या काळात या उग्र प्रथा आजच्या हिंदू मानसिकतेला धक्कादायक वाटत असल्या तरी, मध्ययुगात हा भारतातील सर्वात प्रमुख आणि प्रबळ असा राजयाश्रित गुप्त पंथ होता. मध्य प्रदेशातील चंदेल (ज्यांनी खजुराहोची निर्मिती केली) आणि परमार (राजा भोज यांचा वंश), ओडिशातील सोमवंशी (ज्यांनी भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर बांधले) आणि कलचुरी यांसारख्या बलाढ्य राजघराण्यांनी या पंथाला मोठा आश्रय दिला होता. सुप्रसिद्ध इतिहासकार डेव्हिड गॉर्डन व्हाईट (David Gordon White) यांनी त्यांच्या ‘किस ऑफ द योगिनी’ (Kiss of the Yoginī) या संदर्भग्रंथात या परंपरेचे अत्यंत सखोल विश्लेषण केले आहे. ते लिहितात, “या वर्तुळाकार मंदिरांमध्ये योगिनींच्या गुप्त विधींचे आयोजन केले जात असे.

डेव्हिड गॉर्डन व्हाइट लिहितात, राजाच्या उपस्थितीत रक्तबळी आणि गुप्त पंथातील स्त्री-पुरुष उपासकांमधील लैंगिक विधी पार पडत असत.” राजशेखर यांच्या ‘कर्पूरमंजरी’ या मध्ययुगीन नाटकातही भैरवानंद नावाचा तांत्रिक राजा आणि राणीसाठी स्मशानात करत असलेल्या भयंकर विधींचे स्पष्ट वर्णन आढळते. इतिहासकार नीलिमा चितगोपेकर यांनी त्यांच्या ‘योगिनीज इन मध्य प्रदेश: अॅन एपिग्राफिक स्टडी’ या संशोधनात नोंदवले आहे की, परमार राजा नरवर्मन याने ‘चर्चिका’ या योगिनी देवतेची आराधना करून आकाशात उडण्याचे सामर्थ्य प्राप्त केल्याचा दावा बीजामंडल शिलालेखात केला आहे. तसेच, कलचुरी राजा गोपाळ याने एक कोटी वेळा मंत्रजप करून देवतेकडून अतुलनीय सामर्थ्य आणि युद्धात विजय मिळवल्याचे संदर्भ मिळतात. योगिनी या महामारी आणि रोगराई रोखण्यासाठीही पूजल्या जात असत.

तंत्रसाधनेतील स्त्रीचे स्थान: मिथक आणि सामाजिक वास्तव

या पंथात स्त्रियांना विलक्षण स्वातंत्र्य होते; त्या स्वेच्छेने कुठेही जाऊ शकत होत्या, विजयाचे किंवा पराजयाचे दान देण्याची ताकद त्यांच्यात होती. ‘कथासरित्सागर’ या मध्ययुगीन कथासंग्रहात एका राणीची कथा आहे, जिची मानवी मांस खाण्याची तयारी नसली तरी आकाशात उडण्याची अलौकिक शक्ती मिळवण्याची तिची तीव्र इच्छा असते. संस्कृतचे अभ्यासक शमन हॅटले (Shaman Hatley) यांनी ‘कौलज्ञाननिर्णय’ ग्रंथाचा संदर्भ देत नमूद केले आहे की, कुलार्णव तंत्रानुसार स्त्रियांचा सन्मान केवळ त्या ‘स्त्रिया’ आहेत म्हणून नव्हे, तर ‘योगिनींना स्त्रिया आवडतात’ म्हणून केला जात असे. कोणतीही स्त्री किंवा अगदी कबुतर, गाय, मांजर यांच्यासारखे मादी प्राणीही योगिनी असू शकतात, अशी धारणा होती. या विधींमध्ये जातीभेदाला सक्त मनाई होती. दक्षिण भारतातील काही योगिनींच्या मूर्तींच्या हातात सूप आणि झाडू दिसतो, जे या पंथातील अनेक स्त्रिया तळागाळातील आणि तथाकथित खालच्या जातींतून आल्याचे किंवा त्यांना राजघराण्यांनी या विधींसाठी सक्तीने आणल्याचे दर्शवते. असे असले तरी, या पंथाचे मुख्य गुरु बहुतांश वेळा पुरुषच होते आणि स्त्रियांचा सहभाग केवळ साधनेपुरता मर्यादित राहिला.

योगिनी पंथाचा अस्त आणि पितृसत्ताक व्यवस्थेचा आघात

जसजसा काळ पुढे गेला, तसतसा राज्यांचा आणि समाजाचा कल सात्त्विक, शाकाहारी आणि पुरुषप्रधान देवतांकडे वाढू लागला. योगिनींच्या मांसाहारी आणि मद्याच्या नैवेद्याची जागा हळूहळू फळे आणि दुधाने घेतली. सुलतानशाहीच्या लष्करी आक्रमणांमुळे या पंथाला राजाश्रय मिळणे कायमचे बंद झाले, त्यामुळे आजच्या दिल्लीत (योगिनीपूर) या पंथाचा मागमूसही उरलेला नाही. आज ओडिशामधील हिरापूरसारख्या ठिकाणी स्थानिक लोक मंदिराच्या विध्वंसासाठी ‘मुघलांना’ जबाबदार धरतात, परंतु अनेक योगिनी मंदिरांमधील शिलालेख परकीय आक्रमकांपेक्षा ज्यांना हे रक्तबळी आणि उग्र विधी मान्य नव्हते, अशा स्थानिक सनातनी लोकांनीच नष्ट केल्याची दाट शक्यता आहे.

wikipedia.

इतिहास अभ्यासकांच्या मते, प्राचीन काळातील या स्वतंत्र आणि शक्तिशाली स्त्रियांना एका अत्यंत हिंसक पितृसत्ताक व्यवस्थेचा सामना करावा लागला. शतकानुशतके जाणीवपूर्वक चालवलेल्या नैतिकतेच्या मोहिमेमुळे या उग्र आणि मुक्त योगिनींचे मूळ अस्तित्व इतिहासाच्या पानांवरून पुसले गेले. बंगालमध्ये दुर्गा पूजेत दिला जाणारा मांसाचा नैवेद्य हा कदाचित याच प्राचीन योगिनी परंपरेचा शेवटचा उरलेला अंश असू शकतो.