दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं ही आपल्याकडे रुढ झालेली म्हण. पण दिसतं नसं नसतं म्हणूनही अनेकदा जग तगतं हेही एक वास्तव असतं. त्याचंच प्रातिनिधिक उदाहरण म्हणून ‘डेव्हिल्स कॉटन’ म्हणजेच उलटकांबळ या बहुआयामी, बहुगुणी वनस्पतीकडे पाहता येतं.
अद्भूत एक कहाणी
वनस्पतींची खरी ओळख केवळ त्यांच्या नावात नसते; ती त्यांच्या रचनेत, उपयोगात, पारंपरिक ज्ञानात आणि माणसाशी असलेल्या नात्यात दडलेली असते.आपल्या विषयाच्या केंद्रस्थानी असलेल्या या वनस्पतीच्या प्रत्येक भागात निसर्गाने विणलेली अशीच एक अद्भुत जैविक आणि सांस्कृतिक कहाणी दडलेली आहे.
सैतान आला कुठून?
भारतीय वनस्पतीविश्वात काही वनस्पती त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे, लोकपरंपरेतील उपयोगामुळे किंवा त्यांच्या नावामुळे आपलं लक्ष वेधून घेतात. उलटकांबळ ही अशीच एक विलक्षण वनस्पती आहे. Abroma augusta (L.) L.f. या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती भारतात विविध भागांत आढळते. इंग्रजीमध्ये तिला Devil’s Cotton असं म्हटलं जातं. नाव ऐकताच मनात कुतूहल निर्माण होतं. प्रश्न पडतो, कापसाशी या वनस्पतीचा काय संबंध? आणि त्यात ‘डेव्हिल’ म्हणजे सैतान आला कुठून?
कुळाची ओळख काय?
वैशिष्ट्यपूर्ण फळरचना आणि तितकाच लक्षवेधी लोकप्रचलित असलेला नावाचा इतिहास ही उलटकांबळची ओळख आहे. उलटकांबळ ही आधुनिक वर्गीकरणानुसार Malvaceae या कुळातील वनस्पती आहे. पूर्वीच्या काही वर्गीकरणांमध्ये Abroma वंशाचा समावेश Sterculiaceae या कुळात केला जात असे; मात्र आधुनिक APG वर्गीकरणानुसार Sterculiaceae मधील अनेक वंश व्यापक अर्थाने Malvaceae या कुळात समाविष्ट केले गेले आहेत. त्यामुळे जुन्या आणि नव्या संदर्भग्रंथांमध्ये तिच्या कुळाचं नाव वेगवेगळं दिसू शकतं.
आशियाई मातीशी इमान
Abroma augusta ही झुडूप किंवा लहान वृक्षाच्या स्वरूपात वाढणारी वनस्पती आहे. उष्ण आणि दमट हवामान तिला अनुकूल असतं. भारतापासून दक्षिण-पूर्व आशिया, दक्षिण चीन आणि पुढे काही बेटांपर्यंत तिचं अस्तित्व आढळतं. भारतात महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये तिची नोंद आढळते. महाराष्ट्रातील काही नोंदींमध्ये तर तिची लागवड केलेली वनस्पती म्हणूनही नोंद करण्यात आली आहे.
कुटिरोद्योगाला आधार तंतूंचा
उलटकांबळची पानं आकारानं मोठी हृदयाकृती असतात. पानांच्या खालच्या बाजूला तसेच खोड आणि फांद्यांवर नाजूक केसाळ लव आढळते. तिच्या खोडाची सालही वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यापासून मजबूत तंतू मिळतात. त्यामुळे उलटकांबळचं महत्त्व तंतू देणारी वनस्पती म्हणूनही आहे. दक्षिण-पूर्व आशियातील काही प्रदेशांमध्ये या तंतूंचा वापर दोर, सुतळी, जाळी, पिशव्या, टोपल्या आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी केला जातो.
झुलती फुलं आगळीवेगळी
उलटकांबळची खरी ओळख तिच्या फुलांमुळे आणि फळांमुळे होते. तिची फुलं खाली झुकलेली किंवा छानपैकी लोंबकळणारी असतात. फुलांचा रंग गडद लाल किंवा जांभळट-लालसर असतो. फुलांची ही वैशिष्ट्यपूर्ण रचना वनस्पतिशास्त्रीय दृष्टीनेही लक्षवेधी ठरते. फुलांचं निरीक्षण केल्यास ही वनस्पती इतर सामान्य झुडुपांपेक्षा किती वेगळी आहे, हे सहज लक्षात येतं.
कापसाचं बोंड जणू
फुलांनंतर तिच्यावर विशिष्ट प्रकारची फळं तयार होतात. ही फळं आकाराने कापसाच्या बोंडासारखी दिसतात. Devil’s Cotton या इंग्रजी नावाची व्युत्पत्ती याच वैशिष्ट्याशी जोडली जाते. PROSEAच्या नोंदीनुसार Abroma augusta ची फळं कापसाच्या फळांसारखी दिसतात; परंतु त्यामध्ये कापसासारखे तंतू नसल्यामुळे ‘Devil’s Cotton’ हे नाव रूढ झालं. म्हणजेच या नावाचा संबंध तिच्या कापसासारख्या दिसणाऱ्या फळाशी आहे; ही प्रत्यक्षात कापूस देणारी वनस्पती नाही.
औषधी गुणांचा गुच्छ
उलटकांबळला पारंपरिक औषधी ज्ञानातही महत्त्वाचं स्थान आहे. तिच्या मुळांचा आणि इतर भागांचा उल्लेख विविध पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये आढळतो. उलटकांबळच्या औषधी गुणधर्मांवर आधुनिक काळात भरपूर संशोधन झालं आहे. आचार्य आणि सहकाऱ्यांनी २०२४ मध्ये प्रकाशित केलेल्या पुनरावलोकनात्मक संशोधनात (Review) Abroma augusta च्या पारंपरिक औषधी उपयोगांबरोबरच तिच्यातील phytochemical, म्हणजे जैवसक्रिय रासायनिक घटक, आणि pharmacological, म्हणजे औषधीय जैविक क्रियांचा आढावा घेतला आहे. या review मध्ये मधुमेह, मासिक पाळीतील अनियमितता, श्वसनाशी संबंधित तक्रारी, स्नायू-सांध्यांशी संबंधित विकार, मूत्रविकाराच्या समस्या आणि काही लैंगिक आरोग्याशी संबंधित तक्रारींमध्ये या वनस्पतीच्या पारंपरिक उपयोगांचा उल्लेख करण्यात आला आहे.
दाहशामक आणि मधुमेहनाशकही?
विविध प्रयोगशाळांमधल्या प्रायोगिक अभ्यासांमध्ये उलटकांबळच्या अर्कामध्ये असलेल्या दाहविरोधी, वेदनाशामक, antioxidant आणि antidiabetic अशा संभाव्य जैविक क्रियांचाही अभ्यास झाल्याचं या पुनरावलोकनात नमूद करण्यात आलं आहे. मात्र यापैकी अनेक निष्कर्ष अद्याप प्रायोगिक पातळीवर आहेत. या वनस्पतीमध्ये आढळणारी सक्रिय जैवसंयुगे आणि त्यांच्या कार्यामागील जैविक यंत्रणा अद्याप मोठ्या प्रमाणावर संशोधनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणत्याही वनस्पतीजन्य औषधांचा स्वतःहून वापर करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
बहुविद्याशाखीय दुवा
उलटकांबळ ही जैवविविधतेच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने अभ्यास करण्यासारखी वनस्पती आहे. तिची विशिष्ट फुलं आणि फळांची रचना, बियांची निर्मिती, तंतूंची उपयुक्तता आणि मानवी समूहांना असलेलं तिच्या संदर्भातलं पारंपरिक ज्ञान पाहता महत्त्व केवळ एका औषधी वनस्पतीपुरतं मर्यादित राहत नाही. वनस्पतीशास्त्र, लोकज्ञान, पारंपरिक उपयोग आणि आधुनिक जैववैज्ञानिक संशोधन यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा ठरतो.
समृद्ध वनस्पतीविश्वाचं लोभस रुप
आज आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक वनस्पतींची ओळख आपल्याला त्यांच्या फुलांपुरती किंवा फळांपुरतीच असते. परंतु प्रत्येक वनस्पतीमागे एक स्वतंत्र जैविक कथा असते. तिची पानं, खोड, मुळं, फुलं,फळं, बिया, परागीभवनाशी संबंधित प्रक्रिया आणि मानवाशी पूर्वापार असलेले संबंध या सर्वांचा एकत्रित अभ्यास केला, तर आपलं वनस्पतीविश्व किती समृद्ध आहे हे लक्षात येतं. कांबळ किंवा उलटकांबळ ही वनस्पती हे त्याचंच एक सुंदर नि लोभस रुप म्हणता येतं.
संदर्भः
- Acharya Balkrishna, Mishra Shailja, Dhyani Ashish, Saini Priyanka, Arya Vedpriya & Sharma Nidhi. (2024). A Comprehensive Review of Abroma Augusta (Devil’s Cotton): Phytochemical Constituents, Ethnomedicinal Applications, and Pharmacological Properties. Current Indian Science, 2. DOI: 10.2174/012210299X265912231130060959.
- Sankara Rao, K., Raja K. Swamy, Deepak Kumar, Arun Singh R. & K. Gopalakrishna Bhat. (2019). Abroma augusta (L.) L.f. Flora of Peninsular India. Center for Ecological Sciences, Indian Institute of Science.
- India Flora Online. Abroma augusta (L.) L.f. Center for Ecological Sciences, Indian Institute of Science.
- PROSEA – Plant Resources of South-East Asia. Abroma augusta (L.) L.f., Fibre Plants.
- Ashwarya et al. (2024). “A Review on Ulat Kambal (Abroma augusta Linn.).” Journal of Ayurveda and Integrated Medical Sciences, 9(5).
