Digital Dementia Reels Scrolling: ‘फक्त दोन मिनिटे रील्स पाहतो…’ असे म्हणत मोबाईल हातात घेतला आणि पुढची २०-३० मिनिटे कधी निघून गेली हेच कळले नाही, हा अनुभव आता अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. सोशल मीडियाचा हा अतिवापर आपल्या मेंदूची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम करतो, याबद्दल न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
प्रत्येक सेकंद, नवे चित्र
प्रत्येक काही सेकंदांनी नवे चित्र, नवा आवाज, नवी माहिती आणि पुढे काय येईल याची उत्सुकता. मनोरंजनाचा हा अत्यंत सहज आणि वेगवान प्रकार आहे. मात्र सतत बदलणाऱ्या या उत्तेजनांचा आपले लक्ष अर्थात एकाग्रता, आत्मनियंत्रण, स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या पद्धतीशी काही संबंध आहे का, हा प्रश्न आता न्यूरोसायन्समध्येही अभ्यासला जात आहे.
डिजिटल डिमेन्शिया
Digital Dementia हा शब्द जर्मन न्यूरोसायकिअॅट्रिस्ट मॅनफ्रेड स्पिट्झर यांनी २०१२ मध्ये लोकप्रिय केला. तंत्रज्ञानावर, विशेषतः स्मार्टफोन आणि इंटरनेटवर, अतिनिर्भरतेमुळे संज्ञानात्मक क्षमतांवर परिणाम होऊ शकतो, असा त्यामागील मूलभूत विचार होता. २०२४ मध्ये Cureus मध्ये प्रसिद्ध झालेल्या Zeeshan Ali, Jayaprakash Janarthanan आणि Prasanna Mohan यांच्या शोधप्रबंधात डिजिटल तंत्रज्ञानाच्या अतिवापराचा लक्ष, स्मरणशक्ती, कार्यकारणभाव , कार्यात्मक कृती आणि जाणीवेचे नियंत्रण यांच्याशी असलेल्या संबंधांचा आढावा घेण्यात आला आहे.

हे वैद्यकीय निदान नाही
मात्र येथे एक महत्त्वाची वैज्ञानिक स्पष्टता आवश्यक आहे. Digital Dementia हे अल्झायमर किंवा इतर प्रकारच्या dementia प्रमाणे मान्यताप्राप्त वैद्यकीय निदान नाही. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीला ‘डिजिटल डिमेन्शिया’ झाला, असे म्हणणे योग्य नाही. हा शब्द डिजिटल तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे दिसू शकणाऱ्या काही संज्ञानात्मक बदलांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
रील्समध्ये मेंदूला नेमके काय मिळते?
Short-form videoचे वैशिष्ट्य म्हणजे वेग, नाविण्य आणि अनिश्चितता. एक व्हिडिओ संपण्यापूर्वीच पुढचा उपलब्ध असतो. कोणता व्हिडिओ मनोरंजक असेल, याची खात्री नसते. त्यामुळे ‘आता पुढे काय मिळणार?’ ही अपेक्षा सतत निर्माण होते. इथे डोपामाइन महत्त्वाचे आहे. डोपामाइन हे केवळ ‘आनंदाचे रसायन’ नाही. ते motivation, reward anticipation, learning आणि reinforcement यांसारख्या प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. शॉर्ट फॉर्म व्हिडिओ पाहताना रिवॉर्ड रिलेटेड ब्रेन सिस्टीम सक्रिय होते, असे न्यूरोइमेजिंग संशोधनातून लक्षात आले आहे. विशेषतः व्यक्तीला आवडणाऱ्या किंवा वैयक्तिक पसंतीनुसार सुचवलेल्या व्हिडिओंशी संबंधित रिवॉर्ड प्रोसेसिंग प्रणालीत सक्रियता आढळली आहे. म्हणून ‘रील्स पाहिल्यामुळे डोपामाइनची पातळी कायम वाढते’ असे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नाही. अधिक योग्य स्पष्टीकरण म्हणजे नवीन आणि संभाव्य बक्षिसाच्या अपेक्षेमुळे पुन्हा-पुन्हा तेच वर्तन करण्याची सवय बळकट होऊ शकते.
समस्या कुठे सुरू होते?
प्रत्येक काही सेकंदांनी बदलणाऱ्या कंटेंटमुळे लक्ष सतत एका उत्तेजनातून दुसऱ्याकडे वळते. याचा अर्थ असा नाही की रील्स पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अटेंशन स्पॅन कमी होते. परंतु अतिवापर आणि अटेंशन कंट्रोल यांच्यातील संबंधाचा अभ्यास सुरू आहे. २०२४ मध्ये Frontiers in Human Neuroscience मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका EEG अभ्यासात ४८ तरुणांचा अभ्यास करण्यात आला. शॉर्ट व्हिडिओ पाहण्याची अधिक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींमध्ये अटेंशन टास्क दरम्यान प्रीफ्रंटल एक्झिक्युटिव्ह कंट्रोलशी संबंधित EEG मापनांमध्ये कमीपणा आणि सेल्फ कंट्रोलशी नकारात्मक संबंध आढळला. मात्र हा अभ्यास कार्यकारणभाव सिद्ध करत नाही; म्हणजे शॉर्ट व्हिडिओमुळेच हे बदल झाले, असे त्यावरून निश्चित म्हणता येत नाही. याच दिशेने पुढील संशोधनाची गरज आहे. शॉर्ट फॉर्म व्हिडिओच्या परिणामांबाबत उपलब्ध अभ्यासांमध्ये नमुना आकार, वापराचे मोजमाप आणि संशोधन पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ‘रील्स मेंदू खराब करतात’ असा सरसकट निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
मग ‘कॉग्निटिव्ह ओव्हरलोड’ म्हणजे काय?
सतत नोटिफिकेशन्स, मेसेजेस, सोशल मीडिया आणि वेगाने बदलणारा कंटेंट यामुळे मेंदूला एकाच वेळी अनेक माहिती-स्रोत हाताळावे लागतात. याला कॉग्निटिव्ह लोड किंवा माहितीचा मानसिक ताण असे म्हणता येईल. विशेषतः अभ्यास, लेखन किंवा एखाद्या गुंतागुंतीच्या कामासाठी आवश्यक असलेले सततचे लक्ष आणि वर्किंग मेमरी सततच्या व्यत्ययांमुळे बाधित होऊ शकतात. समस्या फक्त रील्समध्ये नाही. काम करताना वारंवार व्हॉट्स अप पाहणे, नोटिफिकेशन्स तपासणे, ई-मेल ओपन करणे आणि पुन्हा कामाकडे वळणे हीदेखील अटेंशन स्वीचिंगचीच उदाहरणे आहेत.
झोपेचा दुवा अधिक महत्त्वाचा
डिजिटल वापराचा परिणाम समजून घेताना झोपेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्यामुळे झोपण्याची वेळ पुढे ढकलली जाऊ शकते आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. २०२४ च्या नॅशनल स्लीप फाऊंडेशन कन्सेन्सस स्टेटमेंटमध्ये स्क्रीन वापर आणि झोप यावरील उपलब्ध पुराव्यांचा आढावा घेण्यात आला.
झोप विस्कळीत असेल तर…
झोप अपुरी किंवा विस्कळित असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता आणि भावनिक नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘फोनमुळे स्मरणशक्ती कमी झाली’ असे म्हणण्यापेक्षा फोनमुळे झोप बिघडली आणि त्याचा परिणाम संज्ञानात्मक कार्यक्षमतेवर झाला का, हा प्रश्न अधिक वैज्ञानिक आहे.
मुलांच्या बाबतीत अधिक काळजी का?
बालपण आणि किशोरावस्थेत मेंदूचा विकास आणि न्यूरोप्लास्टिसिटी मोठ्या प्रमाणावर सुरू असते. या काळात अभ्यास, खेळ, शारीरिक हालचाल, वाचन, प्रत्यक्ष संभाषण आणि पुरेशी झोप यांना पर्याय नाही. २०२४ मधील बालवाडीतील मुलांवरील सिस्टमॅटिक रिव्ह्यूमध्ये स्क्रीनचा अतिवापर आणि झोपेतील बिघाड यांच्यातील संबंध तसेच काही बिहेविअरल आणि कॉग्निटिव्ह समस्यांशी असलेले संबंध आढळले.
याचा अर्थ स्क्रीन पूर्णपणे बंद करणे असा नाही. डिजिटल साधने शिक्षण, संवाद आणि माहिती मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. प्रश्न आहे तो वापराचा प्रकार, वेळ आणि संदर्भ यांचा.
‘डिजिटल उपवास’ नव्हे, तर डिजिटल शिस्त
रील्स पाहणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र त्यासाठी ठरावीक वेळ ठेवणे उपयोगी ठरू शकते. अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करणे, अभ्यास किंवा कामाच्या वेळी फोन नजरेआड ठेवणे, जेवताना फोन बाजूला ठेवणे आणि झोपण्यापूर्वी स्क्रीनपासून अंतर ठेवणे या छोट्या सवयी महत्त्वाच्या आहेत. त्याहून महत्त्वाचे म्हणजे मोकळा वेळ असताना फोन पाहत राहण्याची सवय मोडणे. प्रवासात, लिफ्टमध्ये, रांगेत किंवा दोन कामांमधील काही मिनिटांत लगेच स्क्रोल करण्याऐवजी कधी कधी मेंदूला कोणतेही नवीन उत्तेजन न देणेही आवश्यक आहे.
डिजिटल तंत्रज्ञान आपला शत्रू नाही आणि रील्स म्हणजे मेंदूचा नाशही नाही. मात्र सततच्या उत्तेजनेची सवय आपले लक्ष कोणत्या दिशेने आणि किती काळ टिकवते, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. डिजिटल युगात खरी गरज ‘नो स्क्रीन’ची नाही; तर ‘स्क्रीनवर माझे नियंत्रण आहे की स्क्रीन माझ्या वर नियंत्रण ठेवते?’ याची जाणीव होण्याची आहे.
संदर्भ सूची
- Ali Z, Janarthanan J, Mohan P. Understanding Digital Dementia and Cognitive Impact in the Current Era of the Internet: A Review. Cureus. 2024;16(9):e70029. DOI: 10.7759/cureus.70029.
- Yan T, Su C, Xue W, Hu Y, Zhou H. Mobile phone short video use negatively impacts attention functions: an EEG study. Frontiers in Human Neuroscience. 2024;18. DOI: 10.3389/fnhum.2024.1383913.
- The impact of screen use on sleep health across the lifespan: A National Sleep Foundation consensus statement. Sleep Health. 2024;10(4):373–384. DOI: 10.1016/j.sleh.2024.05.001.
- Merín L et al. Evaluation of the association between excessive screen use, sleep patterns and behavioral and cognitive aspects in preschool population: A systematic review. European Child & Adolescent Psychiatry. 2024;33:4097–4114.
