Digital Footprint Meaning Types Cyber Security Safety Tips: आजच्या डिजिटल युगात आपण इंटरनेटवर जे काही करतो, त्याची कुठे ना कुठे नोंद होत असते. गुगलवर केलेले सर्च, सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो, ऑनलाइन खरेदी, एखाद्या संकेतस्थळाला दिलेली माहिती, मोबाईलमधील लोकेशन, ऑनलाइन पेमेंट किंवा पाठवलेला ई-मेल… या प्रत्येक कृतीतून आपल्या डिजिटल अस्तित्वाची एक खूण मागे राहते. या खुणांच्या एकत्रित स्वरूपाला डिजिटल फूटप्रिंट (Digital Footprint) असे म्हणतात.

आपण प्रत्यक्ष जगात वावरताना आपल्या पावलांचे ठसे मागे राहतात. त्याचप्रमाणे इंटरनेटवर वावरताना आपल्या कृतींचा डिजिटल ठसा उमटत असतो. विशेष म्हणजे, आपण जाणीवपूर्वक इंटरनेटवर पोस्ट केलेली माहिती आणि आपल्या नकळत जमा होणारी माहिती, या दोन्हींचा त्यात समावेश होतो. त्यामुळे डिजिटल फूटप्रिंट ही केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित संकल्पना नसून, ती व्यक्तीची गोपनीयता, आर्थिक सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा आणि सायबर सुरक्षेशी थेट जोडलेली बाब ठरली आहे.

डिजिटल फूटप्रिंटचे दोन प्रकार

डिजिटल फूटप्रिंटचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.

१. सक्रिय डिजिटल फूटप्रिंट (Active Digital Footprint):

इंटरनेटवर वापरकर्ता जाणीवपूर्वक जी माहिती पोस्ट करतो, त्यातून तयार होणाऱ्या डिजिटल ठशांना सक्रिय डिजिटल फूटप्रिंट म्हणतात. उदाहरणार्थ, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर फोटो, एखाद्या पोस्टवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया, लिंक्डइनवर असलेली आपली शैक्षणिक व व्यावसायिक माहिती, ऑनलाइन खरेदीसाठी नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक नोंदवणे, एखाद्या संकेतस्थळावर खाते तयार करणे किंवा ई-मेल पाठवणे. या कृतींमधून वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर उपलब्ध होते.

२. निष्क्रिय डिजिटल फूटप्रिंट (Passive Digital Footprint) :

वापरकर्त्याच्या नकळत इंटरनेटवरील विविध प्रणालींकडून जमा होणाऱ्या माहितीला निष्क्रिय डिजिटल फूटप्रिंट म्हणतात. उदाहरणार्थ, आपण कोणत्या संकेतस्थळाला भेट दिली, किती वेळ तेथे थांबलो, कोणत्या वस्तू शोधल्या, कोणत्या जाहिराती पाहिल्या, कोणत्या ठिकाणाहून इंटरनेट वापरले, मोबाईलमधील लोकेशन आणि आयपी अॅड्रेस यांची नोंद विविध सेवा पुरवठादारांकडे होऊ शकते. कुकीज (Cookies), ट्रॅकर्स आणि अॅप्सच्या माध्यमातून ही माहिती जमा केली जाते. अनेकदा आपण एखादे अॅप डाउनलोड करताना त्याला दिलेल्या परवानग्यांमुळेही आपल्याविषयीची माहिती जमा होत असते.

डिजिटल फूटप्रिंटचे फायदे काय?

डिजिटल फूटप्रिंट म्हणजे केवळ धोका किंवा गोपनीयतेवरील आक्रमण असे नाही. योग्य पद्धतीने त्याचा वापर केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.

  • वैयक्तिक ओळख आणि विश्वासार्हता : लिंक्डइनसारख्या व्यावसायिक साइट्सवरील शैक्षणिक माहिती, अनुभव, लेखन आणि कामाचा तपशील यामुळे नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीची डिजिटल प्रतिमा तिच्या व्यावसायिक विश्वासार्हतेसाठी उपयुक्त ठरते.
  • वैयक्तिक गरजांनुसार सेवा : आपण इंटरनेटवर शोधत असलेल्या गोष्टी, खरेदीची आवड आणि पाहत असलेला मजकूर यानुसार कंपन्या आपल्याला जाहिराती, उत्पादने आणि सेवा सुचवतात. त्यामुळे वेळेची बचत होते.
  • सुरक्षा आणि फसवणूक शोधणे : बँका आणि वित्तीय संस्था व्यवहारांची पद्धत, ठिकाण, उपकरण आणि व्यवहाराचा इतिहास तपासून संशयास्पद व्यवहार ओळखू शकतात. अचानक वेगळ्या ठिकाणाहून झालेला व्यवहार किंवा शंकास्पद व्यवहार आढळल्यास अतिरिक्त पडताळणी केली जाऊ शकते.
  • संशोधन आणि धोरणनिर्मिती : मोठ्या प्रमाणातील अनामिक डिजिटल माहितीच्या विश्लेषणातून सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण, ग्राहकांच्या गरजा आणि बाजारपेठेतील बदल यांचा अभ्यास करता येतो.
  • आठवणी आणि माहितीचे जतन : जुने ई-मेल, छायाचित्रे, डिजिटल कागदपत्रे आणि ऑनलाइन संवाद यांमुळे वैयक्तिक तसेच व्यावसायिक माहिती पुन्हा मिळवणे सोपे होते.

डिजिटल फूटप्रिंटचे धोके आणि तोटे

डिजिटल फूटप्रिंटचा सर्वांत मोठा धोका म्हणजे त्यातून तयार होणारी माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडण्याची शक्यता. सायबर गुन्हेगारांना एखाद्या व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची माहिती, कामाचे ठिकाण, प्रवासाच्या सवयी आणि आर्थिक व्यवहारांचा अंदाज मिळाला, तर त्याचा वापर फसवणुकीसाठी होऊ शकतो.

१. आयडेंटिटी थेफ्ट (Identity Theft): सोशल मीडियावरून मिळालेली माहिती आणि लीक झालेली वैयक्तिक कागदपत्रे वापरून बनावट खाती उघडणे, दुसऱ्याच्या नावाने व्यवहार करणे किंवा कर्जासाठी अर्ज करणे असे प्रकार घडू शकतात.

२. फिशिंग आणि लक्ष्य निश्चित करून केलेली फसवणूक (Phishing and Spear Phishing): एखाद्या व्यक्तीचे बँक किंवा नोकरी, कुटुंब किंवा खरेदीविषयक तपशील मिळाल्यानंतर गुन्हेगार अधिक विश्वासार्ह वाटणारे संदेश पाठवतात. उदाहरणार्थ, आपण वापरत असलेल्या बँकेचे नाव घेऊन केवायसी अपडेट करण्याचा बनावट संदेश पाठवला जातो. त्यातील लिंकवर क्लिक केल्यास आपली गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते.

३. सायबर स्टॉकिंग आणि ब्लॅकमेलिंग: सतत लोकेशन शेअर करणे, घरातील सदस्यांची माहिती पोस्ट करणे किंवा प्रवासाचे तपशील सार्वजनिक करणे यामुळे व्यक्तीच्या हालचालींचा मागोवा घेणे शक्य होते. खासगी फोटो किंवा संभाषणांचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंगही होऊ शकते.

४. आर्थिक फसवणूक: बनावट गुंतवणूक योजना, नोकरीची आमिषे, डिजिटल अरेस्ट, केवायसी अपडेट, बनावट कस्टमर केअर आणि यूपीआय फसवणुकीसाठी डिजिटल माहितीचा वापर होतो. विशेषतः यूपीआय पिन, ओटीपी किंवा कार्डची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

५. प्रतिष्ठेला धक्का: अनेक वर्षांपूर्वी केलेली पोस्ट, चुकीची टिप्पणी किंवा संदर्भापासून वेगळा केलेला फोटो पुन्हा प्रसारित होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो.

६. डेटा प्रोफाइलिंग आणि गोपनीयतेचा भंग: विविध संकेतस्थळांवरील माहिती एकत्र करून कंपन्या किंवा इतर संस्था व्यक्तीच्या आवडी, सवयी, खरेदीक्षमता आणि वर्तनाचा अंदाज बांधू शकतात. ही माहिती अनधिकृतपणे शेअर झाली किंवा डेटा लीक झाला, तर गैरवापराचा धोका वाढतो.

डिजिटल फूटप्रिंट सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?

डिजिटल फूटप्रिंट पूर्णपणे पुसून टाकणे शक्य नसते. शिवाय, इंटरनेट वापरणे थांबवणे हा त्यावरील व्यवहार्य उपाय नाही. मात्र, आपली किती माहिती, कोणाला आणि कोणत्या कारणासाठी उपलब्ध आहे, यावर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी पुढील उपाय महत्त्वाचे आहेत.

१. स्वतःचे डिजिटल फूटप्रिंट तपासा :

  • गुगलवर आपले पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी शोधा.
  • फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्डइन आणि इतर सोशल मीडिया खात्यांवरील आपली जुनी माहिती तपासा.
  • कोणते फोटो, पोस्ट, टिप्पण्या आणि वैयक्तिक तपशील सार्वजनिकरीत्या दिसत आहेत, हे पाहा.
  • आपल्याला नको असलेली माहिती संबंधित व्यासपीठावरून काढून टाका किंवा तिची दृश्यमानता मर्यादित करा.

२. सोशल मीडियाचे प्रायव्हसी सेटिंग बदला :

  • फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील पोस्ट केवळ मित्रांना दिसतील असे सेटिंग करा.
  • आपल्याला कोण टॅग करू शकते आणि कोणाला आपली पोस्ट शेअर करता येते, हे नियंत्रित करा.
  • अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
  • घराचा पत्ता, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, प्रवासाचे नियोजन किंवा मुलांच्या शाळेची माहिती सार्वजनिक करू नका.
  • आपण सुट्टीसाठी बाहेर गेल्याची माहिती प्रवास सुरू असतानाच सार्वजनिक करू नका.

३. प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड वापरा :

एकच पासवर्ड सर्व खात्यांसाठी वापरणे धोकादायक आहे. एका संकेतस्थळाचा डेटा लीक झाल्यास त्याच पासवर्डचा वापर करून इतर खातीही उघडता येऊ शकतात.

  • किमान १२ ते १६ अक्षरांचा मजबूत पासवर्ड तयार करा.
  • अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हे यांचा वापर करा.
  • प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड ठेवा.
  • पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी विश्वासार्ह पासवर्ड मॅनेजर वापरा.
  • शक्य असल्यास मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) किंवा टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा. यामुळे पासवर्ड समजला तरी अतिरिक्त पडताळणीशिवाय खात्यात प्रवेश करणे कठीण होते.

४. अॅप्सना दिलेल्या परवानग्या तपासा :

आपण डाउनलोड केलेली अनेक अॅप्स गरज नसतानाही कॉन्टॅक्ट्स, कॅमेरा, मायक्रोफोन, फोटो आणि लोकेशनची परवानगी मागतात.

  • मोबाईलच्या Settings मध्ये जाऊन Privacy किंवा Permission Manager उघडा.
  • कोणत्या अॅपला कोणत्या माहितीची परवानगी दिली आहे, ते तपासा.
  • गरज नसलेल्या अॅप्सची लोकेशन, मायक्रोफोन आणि कॉन्टॅक्ट्सची परवानगी बंद करा.
  • अनावश्यक अॅप्स काढून टाका.
  • अॅप्स केवळ अधिकृत Play Store किंवा App Store मधूनच डाउनलोड करा.
    ५. कुकीज आणि ट्रॅकिंगवर नियंत्रण ठेवा

संकेतस्थळांवरील कुकीजमुळे वापरकर्त्याच्या ऑनलाइन हालचालींची नोंद ठेवली जाऊ शकते.

  • ब्राउझरच्या Privacy Settings मध्ये जाऊन थर्ड पार्टी कुकीज मर्यादित करा.
  • नियमितपणे ब्राउझिंग हिस्ट्री आणि कुकीज तपासा.
  • अनावश्यक ट्रॅकिंगला परवानगी देऊ नका.
  • इन्कॉग्निटो किंवा प्रायव्हेट ब्राउझिंग मोड वापरल्याने आपल्या उपकरणावर स्थानिक ब्राउझिंग हिस्ट्री जतन होणे मर्यादित होते; मात्र त्यामुळे इंटरनेट सेवा पुरवठादार, संकेतस्थळे किंवा नेटवर्क प्रशासकांपासून आपली ओळख पूर्णपणे लपवली जात नाही.

६. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्या :

  • कोणालाही ओटीपी, एटीएम पिन, सीव्हीव्ही किंवा यूपीआय पिन सांगू नका.
  • पैसे मिळवण्यासाठी यूपीआय पिन टाकण्याची गरज नसते.
  • अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करू नका.
  • बँकेचे अधिकृत संकेतस्थळ स्वतः टाइप करून उघडा.
  • सार्वजनिक वाय-फाय वापरून बँकिंग व्यवहार टाळा.
  • बँकेकडून येणारे एसएमएस आणि ई-मेल अलर्ट सुरू ठेवा.
  • स्क्रीन शेअरिंग किंवा रिमोट अॅक्सेस अॅप अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून डाउनलोड करू नका.
    रिझर्व्ह बँकेनेही डिजिटल व्यवहारांसाठी ओटीपी, पिन, पासवर्ड आणि इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे.

७. मोबाईल आणि संगणक अद्ययावत ठेवा :

  • ऑपरेटिंग सिस्टिम आणि अॅप्सचे अपडेट वेळेवर करा.
  • अधिकृत सुरक्षा अपडेट्स दुर्लक्षित करू नका.
  • उपकरणावर स्क्रीन लॉक, फिंगरप्रिंट किंवा फेस ऑथेंटिकेशन वापरा.
  • महत्त्वाच्या फाइल्सचा सुरक्षित बॅकअप ठेवा.
  • अनोळखी ई-मेलमधील अटॅचमेंट डाउनलोड करू नका.

८. डीपफेक आणि बनावट आवाजांपासून सावध राहा :

आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज आणि व्हिडीओ हुबेहूब तयार करता येतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, नातेवाईक किंवा मित्रांच्या नावाने पैसे मागणारे बनावट फोन आणि व्हिडीओ कॉल येऊ शकतात.

  • पैशांची तातडीने मागणी झाल्यास दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधून खात्री करा.
  • व्हिडीओ कॉलवर दिसणारी व्यक्ती ओळखीची आहे म्हणून लगेच विश्वास ठेवू नका.
  • कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी स्वतंत्र पडताळणी करा.
  • संशयास्पद लिंक किंवा अॅपच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती देऊ नका.

सायबर फसवणूक झाल्यास काय करावे? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक

सर्व खबरदारी घेऊनही सायबर फसवणूक होऊ शकते. अशा वेळी घाबरून न जाता तातडीने कृती करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः आर्थिक फसवणुकीत पहिल्या काही मिनिटांना महत्त्व असते.
फसवणूक झाल्यास तातडीने करावयाच्या कृती

  1. बँकेला तातडीने कळवा बँकेच्या अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क साधून खाते, कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग तात्पुरते ब्लॉक करण्याची विनंती करा. व्यवहाराची तक्रार नोंदवा.
  2. १९३० या हेल्पलाइनवर फोन करा आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधा. हा क्रमांक २४ तास कार्यरत आहे.
    राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन : 1930
  3. सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार करा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल येथे जाऊन तक्रार नोंदवा. १९३० वर तक्रार केल्यानंतर मिळालेल्या संदर्भ क्रमांकाच्या आधारे पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण करा. हेल्पलाइनवर तक्रार केल्यानंतर पोर्टलवर तक्रार पूर्ण करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली जाते.
  4. पुरावे जतन करा फसवणुकीचे स्क्रीनशॉट, एसएमएस, व्हॉट्सॲप संदेश, ई-मेल, फोन क्रमांक, वेबसाइट लिंक, बँक व्यवहाराचा यूटीआर क्रमांक आणि व्यवहाराची वेळ जतन करा. संदेश किंवा संभाषण तातडीने डिलीट करू नका.
  5. पासवर्ड आणि खाते सुरक्षित करा ई-मेल, सोशल मीडिया, बँकिंग आणि इतर महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड सुरक्षित उपकरणावरून बदला. अनधिकृत लॉगिन सत्रे बंद करा आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा.
  6. पोलीस ठाण्यात तक्रार करा आवश्यकतेनुसार जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. तक्रारीचा क्रमांक आणि पावती जतन करा.
    संदर्भ : भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C), गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल.

डिजिटल फूटप्रिंट पुसता येतात का?

डिजिटल फूटप्रिंटबाबत एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे सोशल मीडियावरील पोस्ट किंवा फोटो डिलीट केला की त्याचा डिजिटल ठसा पूर्णपणे नष्ट होतो. प्रत्यक्षात तसे नसते. एखादा फोटो डिलीट केला तरी त्याचे स्क्रीनशॉट, डाउनलोड केलेल्या प्रती किंवा इतरांनी शेअर केलेल्या आवृत्त्या इंटरनेटवर राहू शकतात. त्याचप्रमाणे, एखाद्या संकेतस्थळावरून खाते बंद केले तरी त्या कंपनीकडे कायदेशीर किंवा व्यावसायिक कारणांसाठी काही माहिती ठरावीक काळ जतन केलेली असू शकते.

त्यामुळे डिजिटल फूटप्रिंट व्यवस्थापनात दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, इंटरनेटवर माहिती पोस्ट करण्यापूर्वी तिचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार करणे. दुसरी म्हणजे, आधीपासून उपलब्ध असलेल्या माहितीचे नियमित परीक्षण करून अनावश्यक माहिती काढून टाकणे आणि वैयक्तिक माहितीच्या वापरावर नियंत्रण ठेवणे.

डिजिटल जगात वावरताना सावधगिरी हाच सर्वोत्तम बचाव

डिजिटल फूटप्रिंट ही आधुनिक जीवनातील अपरिहार्य वस्तुस्थिती आहे. त्यापासून पूर्णपणे दूर राहणे शक्य नाही आणि तसे करण्याची गरजही नाही. मात्र, इंटरनेटवर आपण पोस्ट करत असलेली प्रत्येक माहिती ही भविष्यात आपल्याविषयीची ओळख तयार करू शकते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. डिजिटल जगात गोपनीयता ही केवळ तंत्रज्ञान कंपन्यांची किंवा सरकारची जबाबदारी नाही; ती प्रत्येक वापरकर्त्याचीही जबाबदारी आहे. एखादी पोस्ट शेअर करण्यापूर्वी विचार करणे, अॅपला परवानगी देण्यापूर्वी तिची गरज तपासणे, पासवर्ड सुरक्षित ठेवणे आणि आर्थिक व्यवहारात सतर्क राहणे या छोट्या सवयी मोठे धोके टाळू शकतात. कारण डिजिटल जगात आपली माहिती हीच आपली ओळख असते आणि तिचे संरक्षण करणे म्हणजे आपल्या डिजिटल अस्तित्वाचे संरक्षण करणे होय.

संदर्भसूची

Canadian Centre for Cyber Security – Digital Footprint

Digital Footprint – NCERT3. CERT-In (Indian Computer Emergency Response Team) – Social Media Best Practices

Social Media Best Practices – CERT-In4. CERT-In – Cyber Security Advisories

Cyber Security Advisory 20265. Reserve Bank of India – Safeguards for Digital Banking

RBI – Digital Banking Safety6. Reserve Bank of India – Financial Awareness Messages (FAME)

Financial Awareness Messages – RBI7. Indian Cyber Crime Coordination Centre (I4C), Ministry of Home Affairs – National Cyber Crime Reporting Portal

National Cyber Crime Reporting Portal8. National Cyber Crime Reporting Portal – Citizen Manual and Financial Cyber Fraud Reporting

Financial Cyber Fraud Reporting Guidelines9. United Nations Office on Drugs and Crime (UNODC) – Cybercrime Module 4: Digital Evidence

Digital Evidence – UNODC10. Internet Society – Digital Footprints: An Internet Society Reference Framework

Digital Footprints – Internet Society