Diwali Ubtan Benefits: भारतीय परंपरेत दिवाळी हा केवळ दिव्यांचा उत्सव नसतो, तर तो स्मरणरंजनाही खजिना असतो. दिवाळीशी जोडलेल्या प्रत्येकाच्या काहीएक आठवण असतात. प्रत्येकाच्या आठवणीला स्वतःचा असा खास सुगंध असतो. अर्थातच पहाटे उठल्यापासून उटण्याच्या रुपानं हा गंध आपली कायम साथसोबत करत असतो. शरीर आणि मन अंतर्बाह्य उजळल्याची अनुभूती देणाऱ्या उटण्याशी स्वच्छता, पावित्र्य, शुचिर्भूतता आणि विशिष्ट दरवळ जोडलेला असतो. प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक रीती,प्रथा अशा अनेक गोष्टींचा मिलाफ दिसतो. त्यात हलकासा सडा घालून काढलेली अंगणातली रांगोळी, पणत्यांची आरास, आकाशकंदील, फराळाचा खमंग वास, फटाक्यांची आतशबाजी आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे केलं जाणारं अभ्यंगस्नान या गोष्टी आपसूकच डोळ्यांसमोर येतात.

उटण्याला विशेष स्थान का?

दिवाळीच्या या अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष स्थान आहे. हळद, चंदन, वाळा, नागरमोथा आणि कापूरकाचरी अशा विविध वनस्पतींचा वापर करून तयार केलेलं सुगंधी उटणं हा या परंपरेचा अविभाज्य घटक आहे. उटण्याचा सुगंध दिवाळीचा आनंद द्विगुणित करतोच, पण त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी आजूबाजूच्या परिसरातल्या वनस्पतींचे उपयुक्त गुणधर्म ओळखून त्यांचा दैनंदिन जीवनात केलेला उपयोगही समजून घेता येतो.

हेतू केवळ सौंदर्यप्रसाधनापुरता?

नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अंगाला तेल, सुगंधी उटणं लावून स्नान करणं ही परंपरा महाराष्ट्रासह भारतातल्या अनेक भागांत आजही प्रेमानं जपली जाते. पूर्वी घरच्या घरी तयार केलं जाणारं उटणं वापरण्याची पद्धत होती. आता बाजारात तयार स्वरूपात उटणं सहज उपलब्ध होतं. मात्र, या उटण्यामागे केवळ सौंदर्यप्रसाधनांची संकल्पना नसून भारतीय वनस्पती ज्ञान, सुगंधी द्रव्यांचा वापर आणि निसर्गाशी जोडलेली जीवनपद्धती यांचा मोठा इतिहास दडलेला आहे.

उटणेपण देणारे घटक कोणते?

वस्तुतः उटणं म्हणजे विविध वनस्पतींची मुळं, कंद, पानं, फुलं, बिया आणि फळांच्या साली वाळवून त्यांची पूड करून तयार केलेलं शरीर-मनाला तजेला देणारं मिश्रण. प्रदेशांनुसार आणि घरातल्या परंपरेनुसार उटण्याचे घटक बदलतात. त्यामुळे उटण्याची एकच ठरावीक कृती नाही. काही पारंपरिक मिश्रणांमध्ये हळद, चंदन, नागरमोथा, वाळा आणि कापूरकाचरी यांचा वापर केला जातो, तर काही ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या, संत्र्याची वाळवलेली साल, मंजिष्ठा आणि अनंतमूळ यांचाही समावेश असतो.

हळदीचं महत्त्व काय?

हळद ही भारतीय स्वयंपाकघरात तसेच पारंपरिक सौंदर्यप्रसाधनांमध्ये आढळणारी महत्त्वाची वनस्पती आहे. Curcuma longa या वनस्पतीच्या जमिनीखाली उगवणाऱ्या कंदापासून हळद मिळते. हळदीतला कर्क्युमिन (Curcumin) हा तिच्या पिवळ्या रंगासाठी आणि जैविक गुणधर्मांसाठी ओळखला जाणारा प्रमुख रासायनिक घटक आहे. पारंपरिक उटण्यात हळदीचा वापर त्वचेच्या स्वच्छतेसाठी आणि सौंदर्यसंवर्धनासाठी केला जातो.

चंदनाचा टिकाऊ सुगंध का महत्त्वाचा?

चंदन (Santalum album) हे भारतीय संस्कृतीत सुगंधासाठी विशेष प्रसिद्ध आहे. चंदनाच्या सुगंधी लाकडापासून तयार केलेली पूड उटण्यात वापरली जाते. चंदनाचा मंद आणि टिकून राहणारा सुगंध उटण्याला वेगळं वैशिष्ट्य प्रदान करतो.

कोणती कंदमुळं मोलाची?

हळद आणि चंदनासोबतच उटण्यात मिसळली जाणारी नागरमोथा (Cyperus rotundus) ही गवतवर्गीय वनस्पती आहे. तिची भूमिगत कंद सुगंधी असतात. पारंपरिक सुगंधी द्रव्यं आणि औषधी मिश्रणांमध्ये नागरमोथ्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वाळा (Chrysopogon zizanioides) या वनस्पतीच्या मुळांना मनाला थंडावा देणारा वैशिष्ट्यपूर्ण असा सुगंध असतो. या मुळांपासून सुगंधी तेल तयार केलं जातं. उन्हाळ्यात पिण्याचं पाणी थंड करण्यासाठी वाळ्याच्या प्राधान्याने वापर केला जातो. उटण्यात वापरली जाणारी कापूरकाचरी (Hedychium spicatum) ही सुद्धा एक सुगंधी कंद असलेली वनस्पती आहे. उटण्यात या वनस्पतीचा वापर तिच्या नैसर्गिक आणि आल्हाददायक सुगंधामुळे उपलब्धतेनुसार केला जातो.

उटण्याचे आरोग्याला फायदे काय?

मंजिष्ठेच्या (Rubia cordifolia) मुळांमध्ये नैसर्गिक लालसर रंगद्रव्यं असतात. आयुर्वेदात त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी तिचा पारंपरिक वापर केला जातो. तिच्यामध्ये दाहशामक, जिवाणूविरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. अनंतमूळ (Hemidesmus indicus) याच्या मुळांना विशिष्ट सुगंध असतो. पारंपरिक औषधी आणि सुगंधी मिश्रणांमध्ये त्यांचा वापर केला जातो. गुलाबाच्या (Rosa spp.) वाळवलेल्या पाकळ्या आणि संत्र्याच्या सालीची पूड यांचाही काही उटण्यांमध्ये समावेश केला जातो. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर सुगंधासाठी आणि त्वचेला तजेला देण्यासाठी केला जातो. तर संत्र्याच्या सालीमध्ये असणाऱ्या सुगंधी तेलामुळे मिश्रणाला वैशिष्ट्यपूर्ण सुगंध प्राप्त होतो. त्याचबरोबर संत्र्याच्या सालीमध्ये जीवनसत्त्व क, फ्लॅव्होनॉइड्स असतात. हे घटक त्वचेचे ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करण्यास आणि कोलेजन निर्मितीला मदत करतात.

उटण्यात पीठांचा समावेश का?

उटण्यामध्ये केवळ सुगंधी वनस्पतींचाच वापर केला जातो असं नाही. हरभऱ्याचं पीठ (Cicer arietinum) हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ वा बेसन त्वचेवरचा तेलकटपणा आणि मळ काढून टाकण्यासाठी वापरलं जातं. काही ठिकाणी मसूर डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि विविध धान्यांची पूडही वापरली जाते. त्यामुळे उटणं हे केवळ सुगंधी मिश्रण न राहता शरीराच्या स्वच्छतेसाठी वापरलं जाणारं एक नैसर्गिक साधन बनतं.

आयुर्वेदिक ग्रंथ काय म्हणतात?

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये शरीराची स्वच्छता, सुगंधी द्रव्यं, स्नानासाठी वापरली जाणारी चूर्णं आणि त्वचेला लावल्या जाणाऱ्या विविध लेपांचा उल्लेख आढळतो. आयुर्वेदात ऋतुमानानुसार शरीराला लावण्यासाठी वेगवेगळे लेप तयार करण्याच्या पद्धतीही वर्णन केल्या आहेत. ‘अष्टांगहृदय’ या आयुर्वेदिक ग्रंथात ऋतुचर्येच्या संदर्भात ऋतुमानानुसार शरीराची निगा राखण्याच्या विविध पद्धतींचं वर्णन आढळतं. या सर्व पद्धतीत वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अभ्यंगस्नानासाठी वापरलं जाणारं उटणं हा अशाच पारंपरिक वनस्पतीजन्य चूर्णांचा एक प्रकार आहे.

उटण्याचा शास्त्रीय अभ्यास काय सांगतो?

२०१६ मध्ये राजर्शी बिस्वास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी Journal of Ethnopharmacology या संशोधनपत्रिकेत उटण्याचा अभ्यास प्रसिद्ध केला. या संशोधनात हळद, हरभऱ्याचं पीठ आणि चंदन यांचा वेगवेगळ्या प्रमाणात वापर करून उटण्याची चार मिश्रणं तयार करण्यात आली. त्यांचे रासायनिक आणि जैविक गुणधर्म तपासण्यात आले. या प्रयोगांमध्ये अँटि ऑक्सिडंट क्रियाशीलता आणि टायरोसिनेज एन्झाइमवरील परिणामांचा अभ्यासही करण्यात आला.

राजकीय संदेशाचंही साधन?

म्हणजेच, उटणं हे केवळ अभ्यंगस्नानाप्रसंगी उपयोगात येणारं पारंपरिक साधन नाही, तर त्याच्या वापरामागे ठोस असा शास्त्रीय आधारही आहे. अलीकडच्या काळात उटण्याचं मोल बाजारपेठेला तर उमगलं आहेच. परंतु राजकारणी मंडळीसुद्धा उटण्याच्या पाकिटावर स्वतःची छबी झळकवून आपल्या मतदारांना सुगंधी संदेश देऊ लागले आहेत. एका अर्थाने, उटण्याची महती सगळ्यांनाच उमगली आहे.

संदर्भ

  1. Biswas, R., Mukherjee, P. K., Kar, A., Bahadur, S., Harwansh, R. K., Biswas, S., Al-Dhabi, N. A. & Duraipandiyan, V. (2016). Evaluation of Ubtan – A traditional Indian skin care formulation. Journal of Ethnopharmacology192, 283–291. DOI: 10.1016/j.jep.2016.07.034.
  2. Kapoor, V. P. (2005). Herbal cosmetics in ancient India. Indian Journal of Plastic Surgery, 38(2), 134-137.