Dr Babasaheb Ambedkar Hotel Shyam Nagpur: १९५६ मधल्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची आठवण झाली की नागपूरच्या दीक्षाभूमीचा उल्लेख सर्वप्रथम होतो. मात्र, त्या ऐतिहासिक दिवसाच्या आधी आणि नंतर घडलेल्या अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्ष देणारी आणखी एक वास्तू म्हणजे नागपूरच्या सीताबर्डीतलं हॉटेल श्याम.
१९५६ ची विजयादशमी. तारीख – १४ ऑक्टोबर १९५६. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत हिंदू धर्माचा त्याग करून, बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हा ऐतिहासिक दिवस आज ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो. धम्मक्रांतीची ही ऐतिहासिक घटना घडली ती महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये. बाबासाहेबांच्या मते, नागपूर ही भारतात बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या नागवंशीय लोकांची मुख्य वस्ती होती. त्यामुळे बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी बाबासाहेबांनी नागपूरची निवड केली होती.
नागपूर शहराच्या दक्षिणेकडे नागझरी रस्त्याला लागून असलेलं १४ एकरांचं मैदान हे दीक्षा सोहळ्यासाठी निश्चित केलं गेलं. नागपूरच्या संपन्न ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारं हे मैदान आज दीक्षाभूमी म्हणून ओळखलं जातं. धम्मक्रांतीमुळे नागपूर शहराला, तिथल्या वास्तूंना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं. त्यापैकीच बाबासाहेबांचा सहवास लाभलेलं एक महत्त्वाची वास्तू म्हणजे नागपूरच्या सीताबर्डी भागातलं हॉटेल श्याम. धम्मदीक्षा सोहळ्याच्या निमित्तानं ११ ऑक्टोबर १९५६ ते १६ ऑक्टोबर १९५६ या काळात बाबासाहेबांचं वास्तव्य याच हॉटेलमध्ये होतं.
हॉटेल श्याममध्ये वास्तव्य
चांगदेव खैरमोडे लिखित ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्रा’च्या बाराव्या खंडात धम्मक्रांतीच्या दिवसातलं विस्तृत स्वरूपाचं वर्णन सापडतं. त्यानुसार, या सोहळ्याच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी नागपूरच्या भारतीय बौद्धजन समितीनं घेतली होती. ११ ऑक्टोबर रोजी बाबासाहेब, पत्नी सविताबाई आंबेडकर (माईसाहेब) आणि वैयक्तिक कार्यवाह नानक चंद रत्तू यांच्यासह दिल्लीहून विमानानं नागपूरला आले. त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय जमला होता. विमानतळावरून बाबासाहेबांना थेट त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेण्यात आलं.
बाबासाहेबांच्या मुक्कामाची सोय त्यावेळी ‘हॉटेल श्याम’मध्ये करण्यात आली होती. बाबासाहेब, माईसाहेब आणि रत्तू यांच्यासाठी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर दोन खोल्या राखून ठेवल्याचं माईसाहेब आपल्या पुस्तकात नोंदवतात. बाबासाहेबांनी अतिशय विद्वान अशा चंद्रमणी महास्थवीर या ज्येष्ठ भिक्खूंच्या हस्ते दीक्षा घेण्याचं ठरवून त्यांना आमंत्रित केलं होतं. चंद्रमणी व त्यांच्यासमवेत आलेल्या इतर भिक्खूंची सोयही दुसऱ्या मजल्यावरच केल्याचं माईसाहेब नमूद करतात.
आरामापेक्षा भेटीगाठींवर भर
बाबासाहेबांची प्रकृती त्या काळात, विशेषतः १९५६ च्या उत्तरार्धात खंगत चालली असल्याचे दाखले खैरमोडे, धनंजय कीर या बाबासाहेबांच्या चरित्रकारांनी दिलेले आहेत. माईसाहेबांनीही आपल्या ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या पुस्तकात धर्मांतर प्रकरणाच्या सुरुवातीलाच बाबासाहेबांच्या खालावत चाललेल्या तब्येतीबद्दल लिहिलं आहे. दिल्ली-नागपूर प्रवासामुळे आलेला थकवा लक्षात घेता, १२ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी आराम केला असावा, असा अंदाज बांधला जात असला, तरी प्रत्यक्षात हा दिवस शांततेत गेला नाही.
बाबासाहेब हॉटेल श्याममध्ये आल्याची बातमी समजताच कार्यकर्त्यांची रीघ लागली आणि बाबासाहेब दिवसभर सहकाऱ्यांशी एकसारखे विचारविनिमय करून मार्गदर्शन करत होते, अशी नोंद माईसाहेबांनी केली आहे. एवढंच नाही, तर १२ ऑक्टोबरच्या संध्याकाळी नागपूरच्या दै. ‘तरुण भारत’चे प्रमुख संपादक, ज्येष्ठ पत्रकार ग. त्र्यं. माडखोलकर (भाऊसाहेब) यांनीही श्री. शेंडे यांच्यासह हॉटेल श्याममध्ये जाऊन बाबासाहेबांची भेट घेतली होती. या भेटीत बाबासाहेब त्यांना फारच थकलेले आणि खंगलेले दिसल्याचा स्पष्ट उल्लेख माडखोलकरांनी आपल्या ‘व्यक्तिरेखा’ या पुस्तकात केला आहे. भाऊसाहेबांनी याच पुस्तकात दीक्षाविधी सोहळ्यानंतर पुन्हा बाबासाहेबांची भेट घेतल्याचं सांगितलं आहे. या दोघांचीही ही शेवटची भेट ठरली.
भाऊसाहेबांनी हॉटेल श्याममध्ये बाबासाहेबांशी दोनदा धर्मांतर प्रश्नाबाबत चर्चा केल्याचं माडखोलकर यांच्या स्नुषा सौ. उमा माडखोलकर यांनी ‘भाऊरावांच्या सहवासात माझी दोन तपे’ या लेखात नमूद केलं आहे. हा लेख ‘ग. त्र्यं. माडखोलकर व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या ग्रंथात छापला गेला आहे. बाबासाहेबांनी परराष्ट्रात रुजलेल्या धर्मांऐवजी हिंदुस्थानच्या मातीत रुजलेला धर्म घ्यावा अथवा नवीन धर्म स्थापन करावा, असं मत भाऊसाहेबांनी बाबासाहेबांसमोर मांडलं होतं. भाऊसाहेबांचे लेखनिक फडणीस यांनाही माडखोलकरांसोबत हॉटेल श्याममध्ये डॉ. आंबेडकरांना भेटण्याची संधी मिळाली होती, असा उल्लेख याच ग्रंथातल्या चाफेकर यांच्या ‘नागपूर आणि ग. त्र्यं. माडखोलकर’ या लेखात आहे.
पत्रकार परिषद, बैठकांनी तापलं वातावरण
दीक्षाविधीच्या एक दिवस आधीपासूनच हॉटेल श्याममधलं वातावरण तापू लागलं. १३ तारखेच्या सकाळी हॉटेलमध्ये न्याहारी उरकून बाबासाहेब सर्वांसोबत जातीनं दीक्षाभूमीवरची सर्व व्यवस्था बघून हॉटेलवर परतले. १३ ऑक्टोबरच्या संध्याकाळी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद भरली. कीर यांनी आपल्या चरित्रात या परिषदेचं संक्षिप्तपणे वर्णन केलेलं आहे. तिथं जमलेल्या वार्ताहरांनी बाबासाहेबांना धर्मांतराबद्दल खोचक, तिरकस पद्धतीनं प्रश्न विचारले. पत्रकारांचा जातीय आकस नेमकेपणानं ओळखलेल्या बाबासाहेबांनी त्यांना त्याच वेळी सडेतोड उत्तरं देऊन आपली धर्मांतराबद्दलची भूमिका अधिक स्पष्ट केली.
‘बौद्ध धर्म का स्वीकारता’ या प्रश्नावर संतापलेल्या बाबासाहेबांनी, “हा प्रश्न आधी स्वतःला व पूर्वजांना विचारा; आम्ही केवळ मनुष्यपण मिळवण्यासाठी लढतोय,” असं सडेतोडपणे सुनावलं. तसेच, गांधीजींना दिलेल्या वचनाची आठवण करून देत, भारतीय संस्कृती व परंपरेला कोणताही धक्का न लावता देशाचे हित जपणारा बौद्ध धर्मच आपण स्वीकारत असल्याचं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.
याच पत्रकार परिषदेत बाबासाहेबांनी आपण भविष्यात ‘रिपब्लिकन’ नावाचा राजकीय पक्ष काढणार असल्याचं जाहीर केलं. त्याचबरोबर, मुंबईला दिलेला द्विभाषिक राज्याचा दर्जा संपुष्टात आणण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीला आपण मनापासून पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेतल्या बाबासाहेबांच्या आक्रमक, सडेतोड भूमिकेची झळ त्याच रात्रीच्या चर्चेतही जाणवली. १३ ऑक्टोबरच्या रात्री बाबासाहेबांनी आपले काही सहकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक भरवली. १९५७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर बाबासाहेबांनी धर्मांतर करावं, असा यातल्या अनेकांचा कल होता. त्यामागच्या राजकीय हेतूची पुरेपूर जाणीव असणाऱ्या बाबासाहेबांच्या कानावर ही कुजबुज आली होतीच. त्यांनी रात्रीच्या त्या बैठकीत आपण कोणत्याही परिस्थितीत धर्मांतर करणारच असल्याचं निक्षून सांगितलं. त्याचबरोबर टाळाटाळ करणाऱ्यांना याचे परिणामही भोगावे लागतील, अशी तंबीही त्यांनी दिली. बाबासाहेबांचं हे रूप पाहून त्यांना विरोध करण्याचं कुणाचंही धैर्य झालं नाही.
हॉटेलमध्येही झाला दीक्षाविधी
१४ ऑक्टोबर रोजी बाबासाहेब सकाळी लवकर उठले. सदरा, कोट, धोतर अशा पांढऱ्याशुभ्र पेहरावात बाबासाहेब सकाळी साडेआठच्या सुमारास हॉटेल श्याममधून मोटारीने दीक्षाभूमीकडे निघाले. युगानुयुगांची अन्यायकारक बंधनं तोडणारा आणि शोषितांना समता, एकता, मुक्तीची नवी वाट दाखवणारा हा धर्मांतराचा सोहळा विधिवत पार पडला. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन घडवलेल्या या धम्मक्रांतीचे लाखो अनुयायी साक्षीदार होते. आपल्या दीक्षाविधीनंतर बाबासाहेबांनी जमलेल्या अनुयायांनाही सामुदायिक दीक्षा दिली. साधारण ९ ते १० असा तासभर हा कार्यक्रम चालला.
दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्या माहितीपूर्ण आणि स्फूर्तिदायी भाषणातून या ऐतिहासिक घटनेचं महत्त्व साऱ्यांना पटवून दिलं. सुमारे दोन तास हे भाषण सुरू होतं. लाखोंच्या संख्येनं जमलेला तो नवदीक्षित जनसमुदाय आपल्या या नव्या बोधिसत्त्वाचा प्रत्येक शब्द मनात साठवत होता. दोन दिवसांच्या कार्यक्रमामुळे बाबासाहेब अतिशय थकले होते. ते हॉटेलवर येऊन आराम करत होते. त्या दिवशीच एक अशी गोष्ट घडली, जी त्या हॉटेलचं महत्त्व कैक पटींनी वाढवणारी ठरली. ही गोष्ट माईसाहेबांनी आपल्या पुस्तकात सांगितली आहे.
अतिश्रमामुळे दमलेले बाबासाहेब हॉटेलच्या खोलीत आराम करत असताना बळवंत वराळे हे बाबासाहेबांचे एक स्नेही आपल्या एका जुन्या सहकाऱ्याला तिथं घेऊन आले. तो सहकारी बाबासाहेबांच्या पायावर डोके ठेवून ‘तुमच्या हातून दीक्षा घेता आली नाही’ म्हणून रडू लागला. बाबासाहेबांनी लगेच खोलीतच सतरंजी अंथरून, बुद्धाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती-मेणबत्ती लावून त्याच्याकडून त्रिशरण-पंचशील व २२ प्रतिज्ञा वदवून घेत, त्याला दीक्षा दिली. थकलेल्या अवस्थेतही बाबासाहेबांनी दाखवलेल्या या अपूर्व प्रेमामुळे तो गृहस्थ कृतार्थ झाला.
हॉटेलमधल्या सभेत दिली राजकीय दिशा
१५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी हॉटेल श्याममध्ये मध्य प्रदेश दलित फेडरेशन शाखेच्या वतीने बाबासाहेबांच्या सन्मानार्थ चहापार्टीचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी बाबासाहेबांनी हिंदीत अतिशय महत्त्वाचं भाषण केलं. खैरमोडे यांनी या भाषणाचा मराठी अनुवाद दिला आहे. त्या भाषणात बाबासाहेबांनी आपल्याला राजकारणापेक्षा धर्म अधिक प्यारा असून, त्यासाठीच शक्ती वेचणार असल्याचं सुरुवातीलाच जाहीर केलं. ते पुढे म्हणतात,
“हक्क मिळवण्यासाठी मी काँग्रेसशी संघर्ष केला आणि मुंबई असेंब्लीत आदर्श विरोधी पक्ष उभारला. पण, सध्याच्या संयुक्त मतदारसंघातून निवडून आलेले लोक मौन बाळगतात आणि त्यामुळे राखीव जागा निरुपयोगी ठरल्या आहेत. राखीव जागा तात्पुरत्या असून, त्यापेक्षा आपल्या समाजाचं ऐक्य टिकवून ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या चळवळीमुळे संघटना व स्वाभिमान वाढला असला तरी एक तटबंदी निर्माण झाली आहे. आपण अल्पसंख्याक असल्यानं इतरांना दूर ठेवून चालणार नाही. इतर समाजांतल्या आपलं दुःख जाणणाऱ्या लोकांना सोबत घेऊन अशा नवीन सर्वसमावेशक राजकीय पक्षाची उभारणी करणं ही काळाची गरज आहे, ज्यामध्ये सर्वांसाठी दार उघडं राहील.”
राजकारण हा दमाचा व धीराचा खेळ असून, त्वरित फळाची अपेक्षा धरणं चूक आहे. इंग्लंडमधल्या मजूर पक्षानं प्रदीर्घ संयमानंतर यश मिळवलं. तुम्ही सर्वांनी इतर समाजासोबत काम करायला शिकलं पाहिजे आणि आपापसांतली फूट टाळली पाहिजे. केवळ राखीव जागांवर अवलंबून न राहता, लोकांच्या सुखदुःखांत मिसळून इतरांचाही विश्वास संपादन करा, जेणेकरून ते तुम्हाला पाठिंबा देतील. याच विचारांवर तुमचं पुढील राजकीय जीवन चालवा, असा उपदेश यावेळी डॉ. आंबेडकरांनी केला.
१५ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजता बाबासाहेबांनी ‘नवयुग’ साप्ताहिकाच्या प्रतिनिधीला मुलखात दिल्याचं खैरमोडे सांगतात. इथं स्थळाचा नेमका उल्लेख नसला तरी बाबासाहेबांच्या प्रकृतीचा विचार करता, इतक्या रात्री त्यांनी ही मुलाखत हॉटेलमध्येच केली असण्याची शक्यता अधिक वाटते. १६ ऑक्टोबरच्या सकाळी बाबासाहेबांनी चांद्यातल्या दीक्षाविधीच्या निमित्तानं सकाळीच हॉटेल सोडलं. चांद्यातला दीक्षाविधी संपवून बाबासाहेब १८ ऑक्टोबर रोजी नागपुरातून विमानानं दिल्लीला निघून गेले. चांदा-नागपूर-दिल्ली या परतीच्या प्रवासात बाबासाहेब पुन्हा हॉटेलमध्ये आल्याचा उल्लेख कुठेही सापडत नाही.
स्मारकाचा प्रश्न अजूनही प्रलंबित
बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या, अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या हॉटेल श्यामचं रूपांतर स्मारकात केलं जावं, यासाठी कित्येक दशकांपासून सरकारकडे पाठपुरावा केला जातोय. एकूण साडेसात हजार चौरस फुटांचं बांधकाम असलेल्या या जागेत राष्ट्रीय स्मारक व्हावं, यासाठी आंबेडकरी अनुयायी प्रयत्नशील आहेत. ‘लोकसत्ता’च्या एप्रिल २०२६ मधील बातमीनुसार, नागपूर सुधार प्रन्यास अर्थात ‘नासुप्र’कडून ७७.८८ कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे पाठवून जमीन अधिग्रहणासाठी निधीची मागणी केली होती.
नागपूरमधल्या ‘रिपब्लिक मूव्हमेंट’ या संघटनेचे अध्यक्ष नरेश वाहणे यांनी त्यावेळी ‘लोकसत्ता’शी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या आश्वासनाचा उल्लेख केला होता. सध्या या जागेवर सुरू असलेलं मद्याचं दुकान हटवून स्मारक निर्माण करण्यात येईल, अशी घोषणा गडकरींनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिलपूर्वी या जागेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणारा आदेश जाहीर व्हावा, अशी अपेक्षा वाहणे यांनी व्यक्त केली होती.
‘लोकसत्ता’ने दिलेल्या बातमीनुसार, ही जागा सध्या खासगी भाडेपट्ट्याच्या चक्रात अडकलेली आहे. त्यामुळे सध्या जरी समाजकल्याण विभागाकडून जागेच्या संपादनासाठी निधी निश्चित केला गेला असला तरी जागेच्या संपादनाबाबत नेमकी कोणती कार्यवाही प्रलंबित आहे, याबद्दल फारशी स्पष्टता दिसून येत नाही. या उदासीन कारभारामुळे स्मारकाचं भिजत घोंगडं अजूनही कायम आहे.
हॉटेल श्यामची ओळख ही फक्त एका सामान्य हॉटेलपुरती मर्यादित न राहता, या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व जपलं जाईल, या दृष्टीनं शासनाकडून ठोस पावलं उचलली जाणं गरजेचं आहे. एका मोठ्या समाजघटकाला जातीयवादी कोंडवाड्यातून कायमचं बाहेर काढणारा महामानव इथल्या चार भिंतींमध्ये राहून गेला आहे, याची जाणीव आणि अभिमान सदैव अबाधित राहील, अशा दर्जाचंच स्मारक इथं निर्माण होणं आंबेडकरी अनुयायांना अपेक्षित आहे.
