El Nino Impact on India Monsoon 2026: El Niño २०२६ च्या अखेरीस तीव्र होण्याची आणि २०२७ पर्यंत टिकण्याची शक्यता WMO व NOAA ने वर्तवली आहे. प्रशांत महासागरातील या तापमानातील उलथापालथीमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा आणि धरणांमधील पाणीसाठा आटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

पाऊस ते महागाईपर्यंतची साखळी

“पाऊस कमी पडला तर काय होईल?” हा प्रश्न तसा खूपच साधा वाटतो. पण भारतासारख्या देशात त्याचे उत्तर फक्त छत्री आणि शेतीपुरते मर्यादित नाही. पाऊस कमी म्हणजे धरणात कमी पाणी, जमिनीत कमी ओलावा, विहिरींमध्ये भूजल पुनर्भरणा कमी, पिकांसाठी पाणी कमी उपलब्ध, काही भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई, कदाचित दुष्काळदेखील आणि या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अन्नधान्याची महागाई अशी त्याची साखळी असते.

एल निनो १०० टक्के!

El Niño सध्या सक्रिय आहे आणि २०२६च्या अखेरीस तो अतिशय बळावण्याची शक्यता आहे. NOAAच्या ताज्या आकलनानुसार ऑक्टोबर– डिसेंबर २०२६मध्ये El Niñoची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे. WMOनेही तो फेब्रुवारी २०२७पर्यंत टिकण्याची शक्यता १०० टक्के असल्याचे म्हटले आहे. पण या साऱ्याचा अर्थ ‘आता भारतात पाऊसच पडणार नाही’, असा अजिबात नाही. उलट, El Niño हा मोठ्या हवामान प्रणालीचे संतुलन बदलणारा घटक आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

El Niño म्हणजे नेमके काय बदलते?

  • El Niño म्हणजे विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा लक्षणीय वाढणे आणि त्यासोबत वातावरणातील अभिसरणात होणारे बदल.
  • समुद्राचे तापमान वाढले की, त्यावरचे वातावरण बदलते. कुठे हवा वर जाते, कुठे खाली उतरते, वारे कुठून कुठे वाहतात आणि ढगांची निर्मिती कुठे होते या सर्व बाबींवर त्याचा परिणाम होतो. या बदलांना Walker circulation सारख्या मोठ्या वातावरणीय प्रक्रियांशी जोडले जाते.
  • भारतासाठी त्यातील एक महत्त्वाचा परिणाम असा की, काही परिस्थितींमध्ये भारतीय उपखंडावर हवेचे खाली उतरणे वाढू शकते. त्यामुळे मान्सूनची पर्जन्यनिर्मिती कमकुवत होण्याची शक्यता वाढते.
El Nino Impact on India Monsoon 2026 map and ocean temperature chart | Water Crisis Drought Risk Maharashtra dry dam reservoir | एल निनो प्रभाव आणि भारतातील दुष्काळ परिस्थिती | महाराष्ट्रातील पाणीटंचाई आणि कोरडी धरणे
एल निनो आणि महाराष्ट्रातील संभाव्य पाणीटंचाई संकट (Image- Gemini)

एल निनोच्या १६ पैकी ७ वर्षांत दुष्काळ

इतिहास चाळला असता, El Niño आणि भारतीय मान्सून यांच्यात संबंध दिसतो. मात्र हा संबंध एकरेषीय नाही. भारताच्या हवामानावर Indian Ocean Dipole (IOD), Madden–Julian Oscillation, समुद्राचे तापमान, वातावरणीय प्रवाह आणि इतर अनेक घटक परिणाम करतात. केंद्र सरकारने या संदर्भात संसेदत दिलेल्या उत्तरातही हे स्पष्ट करण्यात आले आहे की, El Niño असलेल्या सर्व वर्षांत भारतात दुष्काळ पडलेला नाही. १९५०नंतरच्या १६ El Niño वर्षांपैकी सात वर्षांत मान्सूनची पर्जन्यमानाची स्थिती कमी राहिली.

म्हणजेच El Niño= दुष्काळ असे थेट समीकरण नाही. पण पर्जन्यमान कमी होते, हे मात्र निश्चितच.

खरी चिंता २०२७च्या पावसाची आहे का?

हीच या वर्षातील सर्वात महत्त्वाची बाब असणार आहे. २०२६चा नैऋत्य मान्सून आता माघारीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्याचा El Niño आणि पुढील काही महिन्यांतील त्याची तीव्रता यांचा परिणाम केवळ “या वर्षी किती पाऊस झाला?” या प्रश्नाने मोजता येणार नाही. भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, El Niño २०२७च्या मान्सूनच्या आधीपर्यंत कोणत्या अवस्थेत असेल?

२०२७ च्या सुरुवातीपर्यंत एन निनोचा परिणाम नक्की राहणार

सध्या WMO आणि NOAA दोन्ही संस्थांना El Niño २०२६च्या अखेरीपर्यंत आणि २०२७च्या सुरुवातीपर्यंत टिकण्याची शक्यता जास्त वाटत आहे. मात्र सप्टेंबर २०२६मध्ये असलेली स्थिती थेट जून २०२७च्या मान्सूनपर्यंत तशीच राहील, असे ठामपणे कुणालाच सांगता येणे कठीण आहे. ENSOच्या दीर्घकालीन अंदाजात ऋतुबदलाच्या काळात अनिश्चितता वाढते; हवामानशास्त्रात याला स्प्रिंग प्रेडिक्टेबिलिटी बॅरीअर spring predictability barrier असेही म्हटले जाते.

पण मग “२०२७मध्ये भारतात दुष्काळ असणार का?” या प्रश्नाचे उत्तर आताच देता येणार नाही. पण जोखीम वाढली आहे, हे मात्र निश्चितच.

पावसापेक्षा मोठा प्रश्न : पाणी कुठे आणि किती आहे?

El Niñoचा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी थेट संबंध येतो, तो उपलब्ध पाण्याच्या संदर्भात. एखाद्या शहरात वर्षभरात सरासरीइतकाच पाऊस झाला. तरीही पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. कारण एकूण पावसाचे प्रमाण आणि पाण्याची उपलब्धता याचे गणित सारखेच नसते. दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर अनेक आठवडे कोरडे गेले, तर पावसाची एकूण आकडेवारी फार वाईट नसली; तरी जमिनीत पाणी मुरण्याची, धरणे भरण्याची आणि भूजल पुनर्भरणाची स्थिती केविलवाणी असू शकते.

१८ टक्के लोकसंख्या, ४ टक्के जलस्रोत

भारतामध्ये सुमारे ७० टक्के पाऊस केवळ तीन महिन्यांत पडतो. देशाच्या लोकसंख्येचा वाटा जगात सुमारे १८ टक्के असताना जलस्रोतांचा वाटा मात्र केवळ ४ टक्के आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सुमारे ६० कोटी लोक जलताणाचा सामना करतात आणि ८०–९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते.

परिणामांची साखळी

म्हणून कमी पाऊस पडल्याचा परिणाम फक्त ‘पाऊस कमी’ एवढ्यावरच थांबत नाही. तर त्याचा मातीतील ओलावा कमी, भूजल पुनर्भरण कमी, म्हणून विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणी कमी, सिंचनखर्चात वाढ, त्यामुळे उत्पादनाच्या किमतींत आणि पर्यायाने अखेरीस अन्नधान्यांच्या किमतीत वाढ अशी ही साखळीच तयार होते. या साखळीतील शेवटचे टोके हे सामान्य माणसे घर असते.

धरणे भरली नाहीत तर… ?

शहरात राहणाऱ्या व्यक्तीला पावसाचे महत्त्व अनेकदा तेव्हाच जाणवते जेव्हा नळाला पाणी कमी येते. धरणातील पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी वापरले जाते. पावसाळ्यात पुरेसा पाणीसाठा झाला नाही, तर पुढील उन्हाळ्यात उपलब्ध पाण्याचा कालावधी आणि प्रमाण कमी होते. त्यात भूजलाची भर घालणेही मर्यादित असते. भारतात भूजल हे सिंचनाचा प्रमुख स्रोत आहे; वर्ल्ड बँकेने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, ग्रामीण आणि शहरी घरगुती पाणीपुरवठ्यातही भूजलाची भूमिका भारतासारख्या देशाच्या बाबतीत खूप मोठी आहे. म्हणजेच धरणातील पाणी कमी झाले आणि भूजलही आधीच ताणाखाली असेल, तर ‘पाणी नाही’ असी स्थिती असेल. पण ही समस्या एका दिवसात निर्माण होत नाही. तर ती अनेक महिन्यांच्या पाणीचक्रातून तयार होते.

शेतात पाऊस कमी, म्हणजे बाजारात महागाई

El Niñoचा पुढचा परिणाम बाजारात दिसू शकतो. मान्सून कमी किंवा त्याचे वितरण असमान झाले तर पेरणीची वेळ बदलू शकते, पिकांच्या वाढीच्या निर्णायक टप्प्यावर ओलावा कमी पडू शकतो आणि अंतिमतः उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्राचे उदाहरण महत्त्वाचे आहे. २०२६मध्ये राज्यातील पावसाची कमतरता सर्व भागांत सारखी राहिलेली नाही. काही भागांत मोठी कमतरता असताना, काही भागांत अधिक पाऊस झाला. त्यामुळे राज्याची किंवा देशाची एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी स्थानिक पाणीसंकटाची पूर्ण कहाणी सांगत नाही. अलीकडील विश्लेषणात मराठवाडा आणि विदर्भातील पर्जन्यतूट आणि पिकांवरील परिणाम विशेषत्वाने अधोरेखित झाले आहेत. याचा अर्थ बाजारातही परिणाम एकसारखा होणार नाही. एखाद्या पिकाचे उत्पादन कमी झाले तर त्याची किंमत वाढू शकते; दुसऱ्या प्रदेशात चांगले उत्पादन झाले तर तो परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

…आणि उष्णता?

El Niñoची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे तापमान. WMOच्या सप्टेंबर २०२६च्या आकलनानुसार El Niñoमुळे जागतिक तापमान आणि पर्जन्यामध्ये मोठे बदल होण्याचा धोका आहे. मात्र कोणत्या देशात नेमका किती परिणाम होईल हे El Niñoच्या तीव्रतेवरच ठरत नाही; इतर महासागरीय आणि वातावरणीय घटकही त्यात महत्त्वाचे असतात. भारतासाठी याचा साधा सरळसोपा अर्थ पाऊस कमी आणि तापमान जास्त अशी परिस्थिती काही भागांत एकत्र आली तर पाण्याची मागणीच मोठ्या प्रमाणावर वाढेल. घरात अधिक पाणी लागते. शेतीला अधिक सिंचनाची गरज भासते. जनावरांना अधिक पाणी लागते. शहरांत पाण्याचा वापर वाढतो. म्हणजेच पाण्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असताना मागणी वाढू शकते.

El Niño आणि IOD

Indian Ocean Dipole म्हणजे हिंदी महासागराच्या पश्चिम आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरकांशी संबंधित महासागरीय- वातावरणाशी संबंधित समीकरण होय. Positive IOD काही परिस्थितींमध्ये El Niñoचा भारतीय मान्सूनवरील नकारात्मक परिणाम कमी करू शकतो. २०२६मध्येही वैज्ञानिकांचे लक्ष या परस्परसंबंधाकडे आहे. NRSCच्या आकलनानुसार सध्याच्या El Niñoसोबत IODची अवस्था भारतीय मान्सूनवरील परिणाम बदलू शकते. WMOनेही स्पष्ट केले आहे की अतिशय मजबूत El Niñoचा अर्थ प्रत्येक देशात तितकाच तीव्र परिणाम असा होत नाही. स्थानिक आणि प्रादेशिक हवामान घटक त्याचे परिणाम बदलू शकतात. म्हणूनच भारतीय परिप्रेक्क्षामध्ये IOD समीकरण महत्त्वाचे ठरते.

त्यामुळे सामान्य माणसाने हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, शेवटी प्रश्न पावसाचा नाही, पाणी साठवण्याचा आणि त्याचा नियोजनबद्ध वापर करण्याचा आहे!

साठवलेले पाणी किती दिवस पुरवू शकतो?

El Niño समुद्रात सुरू होतो. त्याची पहिली चिन्हे प्रशांत महासागरात दिसतात. पण त्याची खरी परीक्षा भारतातील धरणात आणि विहिरीत किती पाणी उरले आहे यावरून होते. म्हणून पुढील काही महिन्यांकडे पाहताना “पाऊस पडेल का?” या एका प्रश्नापेक्षा “पाऊस कमी पडला, तर आपण साठवलेले पाणी किती दिवस पुरवू शकतो?” हा असणार आहे. कारण भारतात जलसुरक्षेचा प्रश्न केवळ आकाशाकडे पाहून सुटत नाही. पाऊस कधी पडतो, कुठे पडतो, किती पाणी जमिनीत मुरते, किती साठवले जाते आणि किती वेगाने वापरले जाते हे महत्त्वाचे ठरते.

संदर्भसूची

  • World Meteorological Organization (WMO) — El Niño set to become very strong, raising risks of extreme weather into 2027, 3 September 2026.
  • NOAA Climate Prediction Center — ENSO Diagnostic Discussion / Outlook, September 2026.
  • India Meteorological Department (IMD) — El Niño ISMR: Southwest monsoon rainfall during El Niño years.
  • Ministry of Earth Sciences / PIB, Government of India — Preparedness for El Niño Conditions, 5 August 2026.
  • Ministry of Earth Sciences / PIB, Government of India — Impact of El Niño on Indian Monsoon, 30 July 2026.
  • NRSC/ISRO — ENSO and IOD interaction and Indian Summer Monsoon Rainfall.
    MAUSAM, India Meteorological Department — Regional teleconnections of ENSO, IOD events, and rainfall trends in Central India, Vol. 77, No. 2, 2026.
  • Nature Communications — Zhao et al., Greenhouse warming exacerbates El Niño-induced Indian monsoon droughts, 30 July 2026.
  • World Bank — Water: Driving Jobs and Prosperity, India water security, 19 March 2026.
  • World Bank — Improving Groundwater Management in India, groundwater dependence and irrigation.
  • WMO / climate science literature — ENSO impacts vary by region and are modified by other climate drivers including IOD.
  • INCOIS / Ministry of Earth Sciences — ENSO prediction and probabilistic forecasting information reported by the Government of India.