Equity Mutual Fund Investment Tips: शेअर बाजारातील चढ-उतार आणि अभ्यासाचा अभाव यामुळे अनेक गुंतवणूकदार थेट शेअर्समध्ये पैसे गुंतवणे टाळतात. मात्र, दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इक्विटी म्युचुअल फंड हा एक अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय पर्याय ठरत आहे.
इक्विटी फंडातली गुंतवणूक काय फायद्याची?
मागील लेखात आपण म्युचुअल फंड बाबतची प्राथमिक माहिती घेतली होती. आता आपण फंडाचे इतरही प्रकार जाणून घेऊया. त्यातलाच म्युचुअल फंडाचा एक प्रमुख प्रकार म्हणजे, इक्विटी म्युचुअल फंड. इक्विटी म्युचुअल फंडात दीर्घकालीन उद्देशानं गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारास साधारणपणे १२ ते १४ टक्के इतका परतावा (रिटर्न ) मिळू शकतो. त्यादृष्टीने मुलांच्या शिक्षणाची तरतूद, मुलांच्या विवाह खर्चाची तरतूद तसंच आपल्या रिटायरमेंट काळासाठी तरतूद अशा सुमारे १० ते १५ वर्षांनी लागणाऱ्या पैशांची तरतूद करण्यासाठी इक्विटी म्युचुअल फंडातली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

आपल्याला केवळ फंडाची माहिती असणं उपयोगाचं नसतं, तर आपलं वय, आपली आर्थिक क्षमता आणि आपलं दीर्घकालीन नियोजन नजरेपुढे ठेऊन फंडाची निवड करणं आवश्यक असतं. इक्विटी म्युचुअल फंडासंदर्भातही ते महत्त्वाचं ठरतं. या फंडाचेसुद्धा विविध प्रकार आहेत.अशा प्रसंगी त्यांची यथायोग्य माहिती घेऊन आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीसाठी योग्य तो इक्विटी फंड निवडणं केव्हाही शहाणपणाचं ठरतं.

Equity Mutual Fund Investment Tips in Marathi | Equity Mutual Fund Types and Returns | इक्विटी म्युचुअल फंड गुंतवणूक मार्गदर्शक | म्युचुअल फंड परतावा आणि कर आकारणी
इक्विटी म्युचुअल फंडातून मिळवा चांगला परतावा (Image- Gemini)

इक्विटी म्युचुअल फंड म्हणजे, असा एक फंड जो आपल्या गुंतवणुकीतली बहुतांश रक्कम किंवा जवळजवळ संपूर्ण रक्कम कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवतो. त्यामुळे या फंडाची कामगिरी शेअर बाजारातल्या चढउतारावर अवलंबून असते. याचमुळे मिळणाऱ्या परताव्याची नेमकी खात्री देता येत नाही. असं असलं तरीही यातली दीर्घकालीन (५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी) गुंतवणूक बऱ्याचदा फायदेशीर झाल्याचं अनेकांच्या बाबतीत दिसून येतं. थोडक्यात, असं म्हणता येतं की अल्पमुदतीसाठी यात गुंतवणूक टाळलेली बरी. मात्र दीर्घकालीन उद्देशांसाठी विचार अवश्य व्हावा.

इक्विटी फंडाचे प्रकार किती ?

इक्विटी फंडाचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत,

  • १) लार्ज कॅप फंडः या मध्ये सेबीच्या नियमाअंतर्गत बाजार भांडवलानुसार (मार्केट कॅपिटलायझेशन) पहिल्या १०० कंपन्याचा समावेश असतो. अशा १०० कंपन्यापैकी काही कंपन्याच्या शेअर्समध्ये बहुतांश गुंतवणूक केली जाते. यात फंड हाऊसनुसार कंपन्या वेगळ्या असू शकतात, मात्र त्या या १०० पैकीच असतात. या गुंतवणुकीत जोखीम कमी असते आणि मिळणारा परतावा स्थिर स्वरूपाचा असतो.
  • २) मिड कॅप व स्मॉल कॅप फंडः या फंड योजनेमध्ये मध्यम आणि लहान आकाराच्या,भांडवल कमी असणाऱ्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. अशा गुंतवणुकीत जोखीम जास्त असते आणि परतावाही जास्त मिळू शकतो, पण मिळेलच याची शाश्वती नसते.
  • ३) मल्टी वा फ्लेग्जी कॅप फंडः या मध्ये लार्ज कॅप, मीड कॅप व स्मॉल कॅप सर्व प्रकारच्या कंपन्याच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली जाते. गरजेनुसार मार्केटची स्थिती विचारात घेऊन यात बदल केला जातो.
  • ४) सेक्टर फंडः यालाच थेमॅटिक फंड असंही म्हणतात. यात एका विशिष्ट सेक्टरमधल्या कंपन्यामध्ये (उदा: बँकिंग,आयटी,फार्मा) गुंतवणूक केली जाते.सबंधित सेक्टरच्या कामगिरीनुसार कमी-अधिक प्रमाणात परतावा मिळू शकतो.
  • ५) ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेव्हिंज स्कीम)ः हा एक डायव्हर्सिफाइड इक्विटी म्युचुअल फंड आहे. यातली गुंतवणूक प्राप्तीकर कलम ८०- सी अंतर्गत कर सवलतीस पात्र असते. मात्र नवीन कर प्रणालीनुसार ही सवलत मिळत नसल्याने या फंडाचं महत्त्व आता कमी झाले आहे. सोबतच यात गुंतवणूक करायची, तर ३ वर्षांचा लॉक-इन पिरियड असतो, हेही ध्यानात ठेवणं आवश्यक असतं.

इक्विटी फंडावरची कर आकारणी मुख्यतः शेअर्स मधल्या गुंतवणुकीप्रमाणेच होते. जर होणारा भांडवली लाभ १२ महिन्यापेक्षा कमी कालवधीत विक्रीतून झालेला असेल, तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन(एसटीसीजी) म्हणतात, अशा एसटीजीवर २० टक्के दराने कर आकारणी केली जाते. याउलट जर होणारा भांडवली लाभ( कॅपीटल गेन) एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळानंतर केलेल्या विक्रीतून झाला असेल,तर त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन (एलटीसीजी)असे म्हणतात. यातल्या पहिल्या सव्वा लाखांवर (रुपये १.२५ लाख) कर आकारणी होत नाही. मात्र त्या पुढच्या रकमेवर १२.५० टक्के दराने कर आकारणी केली जाते.

फंड निवडताना कोणती काळजी घ्यावी?

पहिली गोष्ट म्हणजे, सबंधित फंडाची मागील ३ ते ५ वर्षांची कामगिरी कशी आहे, तसंच सुरुवातीपासून ते आजपर्यंतची कामगिरी कशी आहे हे काळजीपूर्वक जाणून घ्यावं. सोबतच ही कामगिरी बेंचमार्कच्या तुलनेत कशी आहे हे पाहावं. बेंचमार्क आणि फंडाची कामगिरी यांच्यात फारशी तफावत नसेल, तर असा फंड नक्कीच विचारात घ्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे, फंड मॅनेजर कोण आहे, त्याची आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक आहे का, हे तपासून घ्यावं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एक्स्पेन्स रेशो कसा आहे, हे बघून कमी एक्स्पेन्स रेशो असणारा फंड निवडावा. जेणेकरून आपल्याला मिळणाऱ्या परताव्याची व्याप्ती समाधानकारक राहील.

इक्विटी फंडातली गुंतवणूक थेट शेअर बाजाराशी निगडीत असल्याने नक्की किती परतावा मिळेल, हे कोणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. मात्र सर्वसाधारणपणे ५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक करावयाची असेल तर सरासरी १२ ते १४ टक्के इतका परतावा मिळू शकतो. पण तो इतका मिळेलच असंही नसतं. पण एवढं मात्र खरं की, भारतीय शेअर बाजाराने मागील ५ ते ७ वर्षांसाठीच्या कालावधीस सुमारे १२ ते १५ टक्के इतका परतावा दिल्याचं दिसून आलं आहे. एका अर्थाने, उत्तम परताव्याचेच हे संकेत आहेत.