भारतीय आणि ग्रीक या दोन रंगभूमी परंपरांचा विकास स्वतंत्रपणे झाला हा ज्ञात इतिहास आहे. इतिहासाच्या एका टप्प्यावर या दोन परंपरा परस्परांच्या संपर्कात आल्या. विशेषतः इ.स.पूर्व चौथ्या शतकात अलेक्झांडरच्या मोहिमांनंतर वायव्य भारतात ग्रीकांचा प्रवेश झाला आणि या सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक वाव मिळाला. भारतीय रंगभूमीवर ग्रीक रंगपरंपरेचा नेमका किती प्रभाव पडला, यावर अभ्यासकांमध्ये आजही मतभेद आहेत. मात्र, या दोन संस्कृतींमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण झाली होती, याबाबत कोणाला फारसा संशय नाही.
यवनिका हे कशाचं उदाहरण?
ग्रीक आणि भारतीयांच्या सांस्कृतिक संपर्काचं एक ठळक उदाहरण म्हणून रंगमंचावर लावण्यात येणाऱ्या पडद्याकडे पाहिलं जातं. संस्कृत रंगभूमीमध्ये पडद्यासाठी ‘यवनिका’ हा शब्द वापरला जातो आणि ‘यवनिका’ या शब्दाचा संबंध ‘यवन’ या शब्दाशी जोडला जातो. त्याकाळी प्राचीन भारतीय साहित्यात ग्रीक तसेच हेलेनिस्टिक जगाशी संबंधित लोकांसाठी ‘यवन’ ही संज्ञा वापरली जात असे. त्यामुळे रंगमंचावरील अभिनयाची जागा आणि रंगमंचामागचा भाग यांना वेगळं करणाऱ्या पडद्याची संकल्पना ग्रीक रंगपरंपरेच्या संपर्कातून भारतात आली असावी, असं अनेक इतिहासकारांनी सुचवलं आहे.
‘पिछवाई’ परंपरेचं मूळ कशात?
विशेष म्हणजे गुजराती वैष्णव हवेली परंपरेत देवतेच्या मागे ‘पिछवाई’ नावाचं चित्रित वस्त्र लावलं जातं. त्यावर वृंदावनाशी संबंधित दृश्यं रंगवलेली असतात. या परंपरेची मुळंही रंगभूमीच्या संकल्पनेत असण्याची शक्यता व्यक्त केली जाते; कारण देवतेकडे ‘रंगनाथ’ (म्हणजे रंगभूमीचा स्वामी) म्हणून पाहिलं जातं नि त्याच्या दैवी कृतींना ‘लीला’ म्हटलं जातं.
कशी झाली इंडो-ग्रीक सांस्कृतिक देवाणघेवाण?
बॅक्ट्रिया आणि गांधारसारख्या प्रदेशांत इंडो-ग्रीक राज्यांची निर्मिती झाल्यानंतर तसेच व्यापारी मार्गांचा विस्तार झाल्यानंतर अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या संधी खूप वाढल्या. याचं सर्वांत प्रसिद्ध उदाहरण गांधार कला हे आहे. गांधारच्या कलाशैलीत ग्रीक आणि भारतीय कलापरंपरांचा विलक्षण संगम दिसतो. शिल्पकलेत असा सांस्कृतिक संवाद घडू शकला, तर रंगभूमीसारख्या कलांमध्येही अशा प्रकारची परस्पर देवाणघेवाण झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सांस्कृतिक संपर्क आणि एखाद्या परंपरेची थेट नक्कल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
दोन भिन्न तात्त्विक उद्दिष्टं कोणती?
भारतीय रंगभूमीचा स्वतंत्र तात्त्विक आणि कलात्मक पाया होता. त्याचमुळे व्यापारउदिमाच्या निम्मित्ताने सांस्कृतिक पातळीवर परस्पर संपर्क असूनही प्रारंभापासूनच ग्रीक आणि भारतीय रंगभूमीची मूलभूत उद्दिष्टं आणि रचना वेगवेगळी राहिली आहे. नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात नेमकं काय घडावं, याबद्दलची भिन्न भूमिका हा या दोन्ही परंपरांमधील सर्वांत महत्त्वाचा फरक आहे. या संबंधाने ग्रीक रंगभूमीचं स्वरूप समजून घेण्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटलच्या ‘Poetics’ या ग्रंथाचा दाखला दिला जातो. या ग्रंथात ‘कॅथार्सिस’ (Catharsis) अर्थात भाव भावनांचं विरेचन ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. ग्रीक शोकांतिका पाहताना प्रेक्षकांच्या मनात करुणा आणि भय
यांसारख्या तीव्र भावना निर्माण होतात अन् नाट्यानुभवातून या भावनांचं शुद्धीकरण किंवा विरेचन होतं, अशी या संकल्पनेमागची साधारण मांडणी आहे. त्यामुळे ग्रीक रंगभूमीमध्ये शोकांतिकेला (Tragedy) अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. भारतीय रंगभूमीने मात्र यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारला होता.
भारतीय नाट्यपरंपरेचं अंतिम उद्दिष्ट काय?
‘नाट्यशास्त्रात’ भारतीय नाट्यपरंपरेचं अंतिम उद्दिष्ट ‘रस’ या संकल्पनेतून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘रस’ या शब्दाचा शब्दशः अर्थ चव, आस्वाद किंवा सार असा होतो. नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकाने पात्रांच्या भावनांमध्ये पूर्णपणे वाहून न जाता उत्तम प्रकारे तयार केलेल्या भोजनातल्या विविध चवींचा जसा आपण आस्वाद घेतो, तसाच नाट्यप्रयोगात सादर विविध भावांचा आस्वाद घ्यावा, अशी यामागची भूमिका आहे. आदर्श प्रेक्षक शांत आणि काहीसा अलिप्त राहून या भावानुभवाचा आस्वाद घेतो. त्यामुळे भारतीय नाट्यपरंपरेचं उद्दिष्ट केवळ भावनांचा उद्रेक किंवा त्यांचे विरेचन करणं नसून सौंदर्यात्मक आनंद आणि त्यातून अंतर्दृष्टी प्राप्त करणं हे आहे.
ग्रीक रंगभूमीवर ट्रॅजेडी, संस्कृत नाटकात सुखांत का?
‘कॅथार्सिस’ आणि ‘रस’ यांतला हा मूलभूत फरक दोन्ही नाट्यपरंपरांच्या कथानकातही दिसून येतो. ग्रीक रंगभूमीमध्ये शोकांतिकेला मध्यवर्ती स्थान आहे. इडिपस (Oedipus) किंवा अगॅमेम्नॉन (Agamemnon) यांसारख्या ग्रीक नायकांना अनेकदा अटळ विनाशाला सामोरं जावं लागतं. नायकाचा पराभव, पतन किंवा मृत्यू हाच कथानकाचा उत्कर्षबिंदू ठरू शकतो. याउलट अभिजात संस्कृत नाटकांमध्ये शोकांत शेवट सामान्यतः टाळला जातो. ‘नाट्यशास्त्रा’नुसार नाटकाच्या अखेरीस सुसंवाद आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होणं अपेक्षित असतं. पात्रांना कितीही संकट आणि दुःख सहन करावं लागलं, तरी अखेरीस धर्म, सामाजिक समतोल आणि आशा यांची पुनर्स्थापना करण्याकडे संस्कृत नाटकांचा कल दिसतो. त्यामुळे ग्रीक रंगभूमी संघर्ष आणि शोकांतिकेतून प्रेक्षकाला अस्वस्थ करते, त्यातून भावनिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करते; तर भारतीय रंगभूमी भावनांचा कलात्मक आस्वाद देते आणि त्यातून अंतर्दृष्टी देण्याचा प्रयत्न करते.
नाटकांच्या रचनेत फरक काय?
भारतीय आणि ग्रीक नाट्य परंपरांमधला एक महत्त्वाचा फरक नाटकाच्या रचनेत दिसतो. ग्रीक नाटकांच्या संदर्भात काळ, स्थळ आणि कृतीची एकता या प्रसिद्ध ‘तीन एकत्वांची’ (Three Unities) चर्चा केली जाते. कथानक तुलनेनं कमी कालावधीत घडतं, मर्यादित स्थळाभोवती फिरतं आणि बहुतांशी एका प्रमुख कथासूत्रावर केंद्रित असतं. या तुलनेत संस्कृत नाटकाची रचना मात्र अधिक लवचीक असते. एखाद्या नाटकाचं कथानक अनेक वर्षांचा कालखंड व्यापू शकतं. कथा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, राजवाड्यातून जंगलात आणि पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतही प्रवास करू शकते. एकाच नाटकात अनेक कथासूत्रं एकमेकांत गुंफली जाऊ शकतात.
कथा सांगण्याची पद्धती काय?
दोन्ही रंग परंपरांमधल्या कथा सांगण्याच्या पद्धतीतही एक महत्त्वाचा फरक आहे. ग्रीक नाटकात निवेदकाच्या रुपातला ‘कोरस’ (Chorus) महत्त्वाची भूमिका बजावतो. कलाकारांचा हा समूह रंगमंचावर घडणाऱ्या घटनांवर भाष्य करतो, पात्रांना सल्ला देतो आणि काही वेळा समाजाचं किंवा जनमताचं प्रतिनिधित्वही करतो. तर संस्कृत नाटकात ‘सूत्रधार’ हा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा सूत्रधार नाटकाची ओळख करून देतो. प्रेक्षकांशी संवाद साधतो. अनेक संस्कृत नाटकांमध्ये ‘विदूषक’ हे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पात्र असतं. विदूषक सामान्यतः नायकाचा विनोदी सहकारी असतो. विनोद निर्माण करण्याबरोबरच तो अनेकदा व्यावहारिक किंवा मार्मिक भाष्यही करतो.
संस्कृत रंगभूमीचं वैशिष्ट्य काय?
भाषेच्या वापराबाबतही ग्रीक आणि भारतीय रंग परंपरांमध्ये महत्त्वाचा फरक दिसतो. ग्रीक नाटक सामान्यतः एका साहित्यिक भाषेत सादर केलं जात असे. संस्कृत रंगभूमी मात्र जाणीवपूर्वक बहुभाषिक होती. राजे, ऋषी, देवता आणि उच्च सामाजिक स्थान असलेली काही पात्रं संस्कृतमध्ये संवाद साधत; तर स्त्रिया, सेवक, व्यापारी आणि सामान्य लोक विविध प्रकारच्या प्राकृत भाषांचा वापर करत. हा भाषिक फरक केवळ भाषेचा प्रश्न नव्हता, तर त्यातून प्राचीन भारतीय समाजातील सामाजिक स्तर, पात्रांची पार्श्वभूमी आणि त्यांचे परस्परसंबंधही व्यक्त होत असत.
दोन परंपरांचा संगम कुठे होतो?
सादरीकरणशैलीत, कथानकात, कथानकाच्या आशयात फरक असूनही ग्रीक आणि भारतीय रंगभूमीत काही उल्लेखनीय साम्यस्थळंही होती. दोन्ही परंपरांनी काव्य, संगीत, हावभाव, वेशभूषा आणि शैलीबद्ध हालचालींना महत्त्व दिलं होतं. खरंतर आधुनिक अर्थानं वास्तवाचं हुबेहूब अनुकरण करणं हे दोन्ही रंगपरंपरांचं एकमेव उद्दिष्ट नव्हतं. कलाकार विशिष्ट भाव व्यक्त करण्यासाठी ठरावीक हावभाव, देहबोली आणि प्रतीकात्मक कृतींचा वापर करत. त्यामुळे रंगभूमी केवळ मनोरंजनाचं साधन राहिली नाही; ती शिक्षण, नैतिक मूल्ये, धर्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक चिंतन व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम ठरली.
‘हो-नाही’च्या पलीकडचे वास्तव काय?
ग्रीक रंभभूमीचा प्रभाव भारतीयांवर की भारतीय रंगभूमीचा ग्रीकांवर? या प्रश्नाचं उत्तर सरळ ‘हो’ किंवा ‘नाही’ असं देता येत नाही. ग्रीक आणि भारतीय जगामध्ये राजकीय, व्यापारी आणि सांस्कृतिक संपर्क निर्माण झाला होता, ही इतिहाससिद्ध घटना आहे. त्यामुळे काही रंगमंचीय तंत्रं आणि संकल्पनांची देवाणघेवाण झाली असण्याची दाट शक्यता आहे. ‘यवनिका’सारख्या संज्ञेकडे या सांस्कृतिक संपर्काचा संभाव्य पुरावा म्हणून पाहिलं गेलं आहे. मात्र, या संपर्काच्या आधारे भारतीय रंगभूमी ही ग्रीक रंगभूमीतून निर्माण झाली किंवा तिची नक्कल होती, असा निष्कर्ष काढणंही योग्य ठरणार नाही.
‘हा’ प्रश्न का निकाली निघतो?
संस्कृत नाटकाची रस संकल्पना, सूत्रधार-विदूषकाची रचना, बहुभाषिक संवादपद्धती आणि कथानकाची लवचीकता यांमधून तिची स्वतंत्र परंपरा स्पष्टपणे आहे. त्यामुळे या ग्रीक आणि भारतीय परंपरांचा इतिहास केवळ ‘कोणी कोणावर प्रभाव टाकला?’ या एका संकुचित दृष्टिकोनातून पाहाणं योग्य ठरणार नाही. वास्तव हे आहे की, दोन स्वतंत्र आणि विकसित रंगपरंपरांचा परस्पर संपर्क आला, त्यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण झाली आणि त्याच वेळी त्यांचं स्वतंत्र तात्त्विक स्वरूपही टिकून राहिलं. हे व्यापक संदर्भ लक्षात घेतले तर कोणी कोणावर प्रभाव टाकला हा प्रश्नच निकाली निघतो.
विषयाशी संबंधित प्रश्न;
१. ग्रीक आणि भारतीय रंगभूमीचा विकास स्वतंत्रपणे झाला असला, तरी इतिहासात या दोन्ही परंपरांचा परस्पर संपर्क आला. या सांस्कृतिक देवाणघेवाणीची सर्वांत ठळक उदाहरणं कोणती?
२. ग्रीक शोकांतिका आणि संस्कृत नाटकांच्या शेवटांतील फरक प्राचीन ग्रीस आणि भारताच्या व्यापक तात्त्विक दृष्टिकोनातील भिन्नता कशा प्रकारे दर्शवतो?
३. ‘नाट्यशास्त्रा’तील ‘रस’ ही संकल्पना काय आहे? ती ॲरिस्टॉटलच्या ‘कॅथार्सिस’ या संकल्पनेपेक्षा कशी वेगळी आहे?
४. ग्रीक आणि संस्कृत नाटकांच्या रचना आणि कथनपद्धतींमधील फरक योग्य उदाहरणांसह स्पष्ट करा.
