अनेकांसाठी चहा ही दिवसाची सुरुवात आहे. दिवसाच्या शेवटाचाही तो काहींचा सोबती आहे. चहा हे अड्ड्यावरच्या मैत्रीचं निमित्त आहे. निवांतपणातला तो सोबती आहे. पाहुण्यांच्या आदरातिथ्याला उपयोगी ठरणारा अपरिहार्य घटक आहे. कित्येकांसाठी चहा एक बेलगाम तल्लफ आहे. तो वाटाघाटीतला साक्षीदार आहे. आता तर तो राष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदूही आहे. इतकंच कशाला, ‘ टिकली नाही तर स्त्रीच्या कपाळाला शोभा नाही, चहा घेत नाही तो पत्रकार नाही’, असं गमती-गमतीत म्हणण्या इतपत वसाहतवादी ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून कधीकाळी इंट्रोड्युस केलेला चहा इथल्या संस्कृतीत, इथल्या समाजजीवनात आता पक्का मुरला आहे.

चहाचे प्रकार किती?

कॅमेलिया सायनेन्सिसच्या (Camellia sinensis) पानांपासून चहा बनविला जातो. चहाच्या पानांवर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेनुसार त्याचे प्रामुख्याने ग्रीन टी ,ब्लॅक टी आणि ऊलोंग टी असे प्रकार उपलब्ध आहेत. उत्पादन आणि प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या वाळविण्याचा आणि किण्वन प्रक्रियेच्या ( कल्चर) वेगवेगळ्या पद्धतींमुळे चहाच्या प्रकारात फरक पडत जातो.

कसा तयार होतो ग्रीन आणि ब्लॅक टी?

ग्रीन टीसाठी चहाची कोवळी पानं वापरली जातात; ही पानं वाळवल्यानंतर किंवा कढईत भाजल्यानंतर त्यांचं वर्गीकरण करुन किण्वन न करताच विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. चहाच्या पानांमधल्या नैसर्गिक प्रथिनांच्या हालचालींमुळे त्यांचं किण्वन होऊ नये, यासाठी ती पानं कढईत भाजणं आवश्यक असतं. तर ब्लॅक टी बनवण्यासाठी चहाची पानं धुरावर किंवा आगीवर भाजण्यापूर्वी अथवा वाफवण्यापूर्वी काही तास किण्वनासाठी ठेवली जातात. ऊलोंग टी हा चहाच्या पानाच्या अंशतः ऑक्सिडीकरणामुळे तयार होतो;ही म्हटली तर ग्रीन टी आणि ब्लॅक टी मधली मध्यवर्ती प्रक्रिया आहे.

कर्करोगाला प्रतिबंध करतो?

ब्लॅक टी बनविताना सुरुवातीला चहाची पानं हवेच्या संपर्कात ठेवली जातात ;ज्यामुळे पानाचं ऑक्सिडीकरण होतं. या प्रक्रियेमुळे पानांचा रंग गडद तपकिरी होतो आणि याच दरम्यान त्याचा स्वाद अधिक तीव्र होत जातो. त्यानंतर ही पानं तशीच ठेवली जातात किंवा ती गरम करुन,वाळवून आणखी बारीक केली जातात. ग्रीन टीमध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे कर्करोगाला प्रतिबंध होऊ शकतो, असं एव्हाना दिसून आलं आहे. याबद्दलचं बरंच संशोधनही आज घटकेला उपलब्ध आहे.अलीकडेच ब्लॅक टीच्या आरोग्याला पूरक अशा गुणधर्मांच्या संदर्भाने देखील संशोधन केलं गेलं आहे.

जिवाणूंची भूमिका काय ?

आपण हे तर जाणतोच की, आपल्या आहारातले स्निग्ध पदार्थ,तंतुमय पदार्थ यांचा आपल्या पोटातील सूक्ष्मजीवांच्या रचनेवर प्रभावी परिणाम होत असतो. पॉलिफिनॉल्ससारखे ( polyphenols) घटक या कामी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यात पॉलिफिनॉल्स आणि त्यांच्यापासून तयार होणारी जिवाणूंची चयापचय उत्पादनं पोटातल्या सूक्ष्मजीवांच्या रचनेवर परिणाम करत असतात. ही प्रक्रिया या दोहोंतला परस्पर पूरक संबंध दर्शवित असते. या प्रक्रियेत जिवाणू प्रोबियॉटिक्सच्या वाढीसाठी पूरक ठरतात.हे जिवाणू मानवी पोटासाठी खूप फायदेशीर मानले जातात. पॉलिफिनॉल्स हे क्लॉस्ट्रिडिअम डिफिसिल (Clostridium difficile) ,क्लॉस्ट्रिडिअम परफ्रिनजन्स (Clostridium perfringens),प्रिव्हॉटेला (Prevotella) ,इसचेरीचिया कोलाय ( Escherichia coli) , हॅलिकोबॅक्टर पायलोरी ( Helicobacter pyroli) यांसारख्या हानिकारक जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करतात.

पोटाचं आरोग्य कसं सुधारतं?

म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती पॉलिफिनॉलयुक्त आहार घेते, तेव्हा लॅक्टोबॅसिलस (Lactobacillus),बायफिडो बॅक्टेरिअम (Bifidobacterium),अकरमानसिया (Akkermansia) ,फेकॅली बॅक्टेरिअम ( Faecalibacterium) आणि प्रिव्हॉटेला यांचं शरीरातलं प्रमाण वाढतं आणि हानिकारक जिवाणूंचं प्रमाण कमी होतं. यामुळे मुख्यतः आपल्या पोटाचं आरोग्य सुधारतं.

चहामधली कुठली संयुगं आरोग्यकारी?

फ्लॅव्होनॉल्स ही अन्नामध्ये आढळणारी वनस्पतीजन्य संयुगं आहेत, ज्यांना फ्लॅव्होनॉइड्स असं म्हटलं जातं. ही फ्लॅव्होनॉइड्स संयुगं चहामध्ये देखील असतात.अर्थात, त्यांचं प्रमाण कॅटेचिन्सच्या तुलनेनं बरंच कमी असतं. यातलं क्वारसेटिन नावाचं फ्लॅव्होनॉल विविध उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतं. असिडोफिल्डसारख्या प्रो- बायोटिक्सची चिकटून राहण्याची क्षमता सुधारल्यामुळे साटोकाइनचं प्रमाण वाढविणं ,म्युसिन स्राव वाढविणं आणि आतड्याचा घट्टपणा सुधारणं यांसारख्या गोष्टींमुळे पचनक्रिया आणखी मजबूत होऊ शकते.

ग्रीन टीमध्ये रोगप्रतिकार क्षमता?

मानवी विष्ठेतील जिवाणूंच्या विशिष्ट कल्चर -किण्वन अभ्यासात असं आढळून आलं आहे की, चहातली कॅटेचिन्स उपयुक्त जिवाणूंच्या समुहाच्या वाढीसाठी मदत करतात. एपिकॅटेचिन गॅलेट नावाचा घटक चांगल्या लहान स्निग्धांशाचं उत्पादन लक्षणीयरीत्या वाढवू शकतो.तर कॅटेचिन्स पेशींच्या भिंतींची जाडी वाढवू शकतं. शिवाय ग्रीन टीच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढू शकते.धुम्रपानामुळे बिघडलेल्या रोगप्रतिकारक शक्तीला ग्रीन टीच्या नियमित सेवनामुळे सुधारणा होऊ शकते.

ग्रीन टीमुळे कोणाला आरोग्य लाभ?

चहामध्ये पोलिसकेराइड्स (Polysaccharides) हे जैवसक्रिय संयुग घटक असतात. पोलिसकेराइड्स आतड्यातल्या आरोग्यासाठी उपयुक्त अशा सूक्ष्मजीवांवर प्रभावीपणे काम करतं. मुख्यत्वे प्रो-बायोटिक म्हणून काम करताना हीच संयुगं फायदेशीर जिवाणूंचं प्रमाण वाढवतात आणि अर्थातच हानिकारक जिवाणूंचं प्रमाण कमी करतात. ग्रीन टीच्या सेवनामुळे हायपर लिपिडेमिया असणाऱ्यांच्या आरोग्यावर उत्तम परिणाम दिसून येतात.

दुधाचा चहा का टाळावा?

एकूणच संशोधन असं सांगतं की, शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टी अत्यंत गुणकारी आहे. अट एकच, चहा पिताना सोबत काहीही खाणं टाळावं. एरवी, नेहमीच्या चहाचं सेवन करताना मात्र त्यातल्या कॅलरीज बद्दल सजग असावं.खरं पाहता, चहामुळे शरीरातलं लोह शिवशण्याची क्षमता कमी होते. समाजमाध्यमांवर कितीही प्रमाणात चहाचं कौतुक केलं जात असलं तरी अनेक भारतीयांच्या शरीरात नाश्त्यासोबत प्यायल्या जाणाऱ्या चहामुळे लोह योग्यरित्या शरीरात शोषले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

चहाच्या तल्लफीचा अर्थ काय?

एकीकडे, अनेकांना वारंवार चहाची तल्लफ येते. गरम चहामुळे मानसिक ताण कमी झाल्यासारखं वाटतं, मात्र एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे, आपल्या आहारात लोह कमी झालं असेल तर चहावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच वारंवार चहा, गरम चहा या सवयीचा अर्थ शरीरातलं काही तरी बिघडलंय, असा असतो. अनेक स्त्रियांमध्ये संप्रेरकांच्या असंतुलनासाठी दुधाचा चहा प्रामुख्यानं कारणीभूत ठरतो. दुधाच्या चहामुळे भूक कमी होऊ शकते.

सकाळचा पहिला चहा किती आरोग्यदायी?

आजवर केवळ चहामधल्या आरोग्यकारक नि अनारोग्यकारक घटकांवर संशोधन झालेलं नाही, तर चहा पिण्याच्या वेळेवरही अनेक संशोधनं झालेली आहेत. त्या प्रत्येक संशोधनामध्ये सकाळी पहिलं द्रव्य म्हणून प्यायला जाणारा दुधाचा चहा किंवा कोरा चहा आरोग्यास मारक ठरू शकतो, असं दिसून आलं आहे. विशेषतः साखरयुक्त चहा शरीरास मारक ठरतो. ज्यांना मधुमेह आहे किंवा रक्तदाब आहे, त्यांनी चहाचं प्रमाण कमीत कमी ठेवणं आवश्यक आहे.

चहाच्या उपयुक्ततेत साखरेचा खोडा?

आता प्रश्न येतो- मसाला चहाचा! चहामध्ये वेलची किंवा आलं किंवा लेमन ग्रास यासारखे पदार्थ उकळून एकत्र केल्यास चहातलं अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण नक्की वाढतं, यात शंका नाही. मात्र त्यात एकत्र केली जाणारी साखर चहातल्या पॉलिफिनॉल्सच्या परिणामांवर आघात करते. अर्थात, मसाला चहा अनेक लोकांमध्ये पाचक म्हणून देखील काम करतो, मात्र त्यात एकत्र केलं जाणारं दुधाचं प्रमाण कमी असायला हवं.

प्रोटीनयुक्त चहा किती फायद्याचा?

अलीकडे प्रोटीन चहाचं वेड पसरतंय. प्रोटीनयुक्त म्हणून बाजारात प्रसिद्ध असणाऱ्या या चहाबद्दल सांगायचं झालं तर हा चहादेखील दुग्धजन्य चहा इतकाच लोह शोषून घेण्यासाठी मारक आहे. त्यामुळे या मार्केटिंग ट्रेंडला बळी न पडणं आपल्या हाती आहे. थोडक्यात काय, तर चहा कोणता आहे, हे महत्त्वाचं आहेच,पण त्याचे गुणधर्म काय आहेत, हे त्याहून महत्त्वाचं आहे.