Health tips marathi ayurvedic lifestyle: आपल्या प्रकृतीचा, स्वास्थ्याचा आणि निरोगी जीवनाचा विचार बहुतांश लोक पन्नाशी किंवा साठीनंतर करतात. मात्र, तोपर्यंत काही प्रमाणात उशीर झालेला असतो. सुजाण लोकांनी वेळेत काही सोपे नियम आणि आहारातील बदल अमलात आणल्यास औषधांशिवाय १०० वर्षांचे निरोगी आयुष्य जगणे शक्य आहे. त्यासाठी महत्त्वाच्या आयुर्वेदिक टिप्स जाणून घेऊया.
आपल्या प्रकृतीचा स्वास्थ्याचा, निरोगी जीवन मिळविण्याकरिता करावयाच्या यम-नियमांचा विचार फार उशिरा म्हणजे पन्नाशी-साठीनंतर सुरू होतो. त्याकरिता सुजाण लोकांनी अगोदरपासून पुढील विचार दिशा वाचून आपणास लागू पडतील अशा गोष्टी अमलात आणल्या तर ‘नाबाद शंभर’ आकांक्षा करावयास हरकत नाही. त्यासाठी आरोग्याची महत्त्वाची अंगं आपण गेल्या भागामध्ये समजून घेतली. आता प्रत्यक्ष कृतीबद्दल म्हणजे काय करावे आणि काय टाळावे म्हणजे नाबाद शंभरी गाठता येईल.
रात्री उशिरा जेवण टाळा
तात्त्विक चर्चा बरीच झाली, मग दीर्घायुष्य आणि शतायुषी जीवनाकरिता ठोस उपाय काय? या उपायांचा तपशील सांगण्याअगोदर काही कुपथ्य टाळावयास हवे. त्याला जास्त महत्त्व आहे. शौचाला कधीही चिकट होता कामा नये. त्याकरिता साखर, तेलकट, तुपकट, मिठाई, आंबवलेले पदार्थ, चहा, कोल्ड्रिंक्स, कृत्रिम औषधे टाळावयास हवी. मांस, मटण, अंडी, धूम्रपान, मद्य यांचा मोह सोडून द्यावा. प्राणवायूचे कार्य नीट चालावे म्हणून कफकर आहार, विहार, रात्री उशिरा जेवण व दुपारची झोप कटाक्षाने टाळावे.

एखाद दिवस लंघन करा
केळे, दही, मिसळ पदार्थ, मिठाचे फाजील प्रमाण वर्ज्य करावे. समान वायूचे कार्य बिघडू नये म्हणून जेवणावर जेवण जेवू नये. भूक नसताना वेळ झाली आहे म्हणून पोट भरणे हे साठीनंतर तरी टाळावे. त्यामुळे समान वायू, समान अग्नी, यकृत यांचे कार्य चांगले राहते. आतड्यांना आपले तुंबलेले काम करावयास थोडी संधी द्याावी. समान वायूचे कार्य सुधारले की, रक्तपुरवठा नीट होतो. कारण रक्ताची कमतरता भासत नाही. अपानाचे कार्य सुधारण्याकरिता एखादे लंघन, सायंकाळी लवकर जेवणे, चहा पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक आहे. अपान वायूचे कार्य सुधारले की, रात्री लघवीला उठावे लागत नाही. प्रोस्टेट ग्रंथी वाढत नाही. म्हातारपणात पंचवीस टक्के लोकांना पौरुष ग्रंथीची वाढ हा विकार फार त्रास देतो.
फ्रिजमधील पदार्थ टाळा
मलमूत्रांचे वेग अडवू नयेत. अपान वायूचा प्रकोप व्हायला संधी देऊ नये. फुप्फुसाचे, दमणुकीचे, थकण्याचे, हृदयाचे विकार टोकाला जाऊ नयेत म्हणून, मिताहार, कमी बोलणे, पूर्ण विश्रांती, प्रदूषण किंवा गर्दीच्या ठिकाणी न जाणे, फ्रिजमधील पदार्थ टाळणे हे नियम पाळावेत. ओजक्षय होऊ नये म्हणून थोडे हलके-फुलके जीवन, मनाला खोलवर लावून न घेणे, बिनधास्त राहणे आवश्यक आहे. घरगुती लहान-मोठ्या कटकटींपासून लांब राहायचा प्रयत्न करावा. ज्यांना लाभेल त्यांनी संत एकनाथ महाराजांसारखे जीवन जगावे, अनुभवावे.
उकळलेले कोमट पाणी प्यावे
कुपथ्याव्यतिरिक्त दीर्घायुष्या-करिता काय खाल्ले, काय प्याले तर आयुष्याला धोका राहणार याचा विचार करावयास हवा. या विचारांत प्रथम पदार्थ जल आहे. शक्यतो उकळलेले कोमट पाणी प्यावे. त्याने समाधान होत नसेल तर गार पाणी प्यावे. सर्वात हितकर पाणी म्हणजे उकळलेल्या पाण्यात सुंठ टाकून घेणे. त्यामुळे आमांश, उदरवात, अपचन हे रोग वाढत नाहीत. सकाळी गाईचे वा शेळीचे दूध काळजीपूर्वक गाळून प्यावे. सोबत दोन खजूर बिया किंवा एक खारीक वा पंधरा-वीस मनुका खाव्यात.
गहू म्हातारपणी टाळावा
दुपारच्या जेवणात ज्वारी किंवा तांदळाची भाकरी, संपूर्ण मुगाची लसूण-आलेयुक्त उसळ, पुदिना-आले-लसूणयुक्त चटणी, माफक प्रमाणात भात व ताजे ताक, फळभाज्यांत दुध्या, कार्ले, पडवळ तसेच चाकवत, पालक, मेथी, मुळा या पालेभाज्या आलटून पालटून खाव्यात. गहू म्हातारपणी टाळावा. जडान्न म्हणून मेवामिठाई, हरभरा वर्ज्य करावा. सायंकाळचे जेवण शक्यतो टाळावे. नाही तर राजगिरा लाह्या, भाताच्या लाह्या, तांदुळाचे कमी तेल असलेले धिरडे, तांदूळ भाजून त्याची जिरेयुक्त पेज असा रात्रीचा लघू आहार हवा. फळामध्ये पपई, अननस, संत्रे, वेलची केळे, जुन्या बाराची मोसंबी, माफक प्रमाणात गोड डाळिंब यांना प्राधान्य द्याावे.
मधुमेहींना आवळा व मेथ्या आवश्यक
विहारामध्ये किमान फिरणे, दीर्घश्वसन, रात्री लवकर झोपणे, झोपण्यापूर्वी तळपाय, कानशिले, डोके यांना तुपाचे मसाज या गोष्टी कटाक्षाने कराव्या. औषध नव्हे पण औषधी गुण देणारा आवळा, सुरण, सुंठ, कोहळा, सातू, सोयाबीन, मध, एरंडेल, मेथ्या, ओली हळद, धने, जिरे, तुळशीची पाने, मिरी असे पदार्थ भिन्न भिन्न तक्रारींना धरून आपल्या वापरात हवेत. आवळा सर्वांनाच उपयुक्त आहे. मधुमेहींना आवळा व मेथ्या आवश्यक आहेत. कफाच्या विकारात मध, तुळस, मिरी, पुदिना, हळद, आले कोणत्या तरी स्वरूपात पोटात जावी.
रक्तवर्धक, प्राणवह स्रोतसाकरिता ओली हळद हवी. कृश व्यक्तीकरिता सोयाबीन व कोहळा मित्र आहेत. मधुमेहींनी सातूची संगत सोडू नये. गुदविकारात सुरण व मिरी वापरावी. समस्त वातविकार, सांधेदुखी, मलावरोध याकरिता एरंडेल तेल, सुंठ यांना जवळ करावे. एरंडेलावर परतलेली सुंठ किंवा एरंडेलाची चपाती अर्धांगवात, संधिवात, सायटिका, कटिशूळ या विकारांचा इतिहास असणाऱ्यांनी खावी. लघवी व आर्तवाच्या उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी धने, जिरे, कोहळा कोणत्या तरी स्वरूपात खावा. पोटाच्या, आमाशयाच्या तक्रारींकरिता आल्याचा रस जरूर वापरावा. हृद्रोगांकरिता लसूण वरदान आहे.
मगजमारी कोणालाच चुकलेली नाही, पण ही मेंदूची मगजमारी आतपर्यंत न पोचवणे हे कौशल्य ज्याला जमेल त्याला मृत्यूला नक्कीच लांब ठेवता येईल. त्याकरिता गाढव, बैल, डुक्कर, गाय, म्हैस या पशूंच्या बिनधास्त जीवनाकडे पाहावयास शिकावे. कोणी बोलले तर शर्ट झटकावा, धूळ झटकल्यासारखे करावे. वार झाला असे वाटू देऊ नये. ‘मौनं सर्वार्थ साधनम्।’ आपण पडलो तर फरशीला खड्डा पडला पाहिजे, आपणाला काहीच वाटू नये अशी धारणा ठेवावी.
मनाला औषध नाही, मनाला बरे करेल असा डॉक्टर आजपर्यंत जन्माला आला नाही, हे सत्य असले तरी त्याच्या पलीकडे षड्रिपूंना ताब्यात ठेवणारे रामनाम आहे. मनात भ्या, क्रोध, मोह, मद, मत्सर, द्वेष हे आले तर त्यांना लगाम घालण्याकरिता मेडिटेशन करावे. मन साफ होते, ताळ्यावर येते.
(४ सप्टेंबर २०१५ रोजी लोकप्रभामध्ये प्रकाशित झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत)
