Hybrid mutual funds: शेअर बाजारात गुंतवणूक करताना वाढणारा परतावा आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळणे कठीण असते. मात्र, हायब्रिड म्युच्युअल फंड (Hybrid Mutual Funds) ही एक अशी योजना आहे, जिथे इक्विटी (शेअर्स) आणि डेट (कर्जरोखे) यांचा समतोल साधून ही दुहेरी सोय उपलब्ध करून दिली जाते. यामुळे गुंतवणुकीच्या बाजारातलं चैतन्यही टिकून राहत आहे आणि बाजाराची पतही वधारते आहे. रिस्क घेणारे तरणेताठे लोक ते अगदी वयोवृद्ध अशा सगळ्यांनाच यात मोठा वाव आहे.

योजनेचं नेमकं स्वरूप काय?

हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे म्युचुअल फंडाची अशी एक योजना आहे, ज्या मध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त मालमत्ता प्रकारात (असेट्स) म्हणजे इक्विटी(शेअर्स) व डेट (कर्जरोखे/बाँड) मध्ये आपली रक्कम गुंतविली जाते. थोडक्यात हा फंड भांडवल वृद्धी व सुरक्षितता या दोन्हीचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत असतो. यामुळे गुंतवणुकदारांना शेअर बाजारातल्या वाढीचा (ग्रोथ) आणि डेट मार्केट मधील सुरक्षिततेचा फायदा मिळू शकतो.

गुंतवणुकदाराचं नुकसान कमी कसं होतं?

हायब्रिड फंड हे प्रामुख्यानं गुंतवणुकीतली जोखीम कमी करून चांगला परतावा देण्याच्या तत्त्वावर काम करतात. त्यासाठी फंड व्यवस्थापक (Fund Manager) गुंतवणूकदारांकडून जमा झालेला पैसा निर्धारित नियमांनुसार इक्विटी आणि डेट साधनांमध्ये विभागून गुंतवतो. काही फंड यामध्ये सोनं तसंच रिअल इस्टेटचाही समावेश करीत असतात. विशेष म्हणजे बाजारातील चढउतारानुसार असेट्समध्ये कमी अधिक बदल केला जातो. उदाहरणार्थ, शेअर बाजार जेव्हा तेजीत असतो, तेव्हा पोर्टफोलिओमधलं इक्विटीचं प्रमाण वाढलेलं असतं. अशा वेळी फंड मॅनेजर शेअर्सची विक्री करून येणारी रक्कम डेटमध्ये गुंतवत असतो. या उलट जेव्हा शेअर बाजारात मंदी येते, तेव्हा साहजिकच शेअर्सचे भाव कमी होत असतात. अशा वेळी फंड मॅनेजर डेटमधली रक्कम इक्विटी मध्ये गुंतवितात.

Hybrid Mutual Funds Investment Guide Marathi | What is Hybrid Mutual Fund in Marathi | हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय | म्युच्युअल फंड गुंतवणूक मराठी मार्गदर्शन
हायब्रिड म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे मुख्य प्रकार व फायदे (Image- Gemini)

यामुळे गुंतवणुकीची जोखीम नियंत्रण होत असते. कारण शेअर बाजारात मोठी घसरण झाली, तर डेटमधल्या (रोखे) गुंतवणूक पोर्टफोलिओला स्थिरता मिळते. त्याने गुंतवणुकदाराचे कमीतकमी नुकसान होऊ शकते.

डेट इक्विटीसोबत कशाकशात गुंतवणूक होते ?

  • अग्रेसिव्ह हायब्रिड फंड : यात ६५ ते ८० टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये आणि उर्वरित डेटमध्ये केली जाते. जे गुंतवणूकदार जास्त जोखीम घेऊ शकतात आणि दीर्घकालीन गुंतवणूक करून चांगला परतावा घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य असू शकतो. तुलनेनं या फंडाची जोखीम (रिस्क) जास्त असते हे खरं, पण मिळणारा परतावासुद्धा जास्त असू शकतो.
  • कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड : यात ७५ ते ९०टक्के गुंतवणूक डेट साधनांमध्ये आणि फक्त १० ते २५ टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये असते. यामुळे या फंडाची जोखीम (रिस्क) कमी असते. सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या आणि नियमित उत्पन्नाची अपेक्षा ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा योग्य पर्याय असू शकतो.
  • बॅलन्स्ड हायब्रिड फंड : यात इक्विटी आणि डेट या दोन्हीमध्ये साधारण ४० ते ६० टक्के या प्रमाणात समतोल साधला जातो. या फंडाची जोखीम (रिस्क) अग्रेसिव्ह हायब्रिड फंडापेक्षा कमी तर कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंडापेक्षा जास्त असते. त्यामुळे मिळणारा परतावा सुद्धा त्यानुसार असतो.
  • डायनॅमिक ॲसेट अॅलोकेशन / बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड (Dynamic Asset Allocation): या फंडात इक्विटी आणि डेटचं प्रमाण निश्चित नसतं. बाजारातल्या चढउतारांनुसार फंड मॅनेजर कॉम्प्युटर मॉडेल्स वापरून हे प्रमाण ० ते १०० टक्क्यांपर्यंत कधीही बदलू शकतो. असं असले तरी हे प्रमाण ३० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान असल्याचं प्रामुख्यानं दिसून येतं.
  • मल्टी ॲसेट अॅलोकेशन फंड : या फंडात डेट इक्विटीशिवाय सोनं / चांदी यासारख्या असेटमध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाते. म्हणजेच, किमान तीन मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक केली जाते. उदाहरणार्थः इक्विटी, डेट आणि सोनं.

फर्स्ट टाइमर्सनी काय करावं?

याचं एक कारण अगदी स्पष्ट आहे. ते म्हणजे, यातील इक्विटीमुळे चांगल्या परताव्याची संधी मिळते, तर डेटमुळे गुंतवणुकीतली सुरक्षितता वाढते. याशिवाय इक्विटीच्या (म्युच्युअल फंड) तुलनेत हे फंड बाजारातील चढ- उतारांदरम्यान कमी अस्थिर असतात. आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे, गुंतवणूकदाराला स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवण्याची आणि त्यांचा रोज मागोवा घेण्याची गरज पडत नाही. ऑटोमॅटिक डायव्हर्सिफिकेशन हा या फंडाचा महत्त्वाचा पैलू असल्याने सर्व व्यवस्थापन एकाच फंडातून होते. प्रथमच म्युचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे, कारण सुरुवातीसच वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक करण्याऐवजी एकाच फंडात गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशन करता येतं. तसंच उतार वयात गुंतवणूक सुरक्षित तसेच बऱ्यापैकी परतावा देणारी हवी असते,त्या दृष्टीने हायब्रिड फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो.

परताव्याशी काहीएक शाश्वती असली तरीही, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हायब्रिड फंड हे पूर्णपणे ‘जोखीममुक्त’ नसतात. त्यातल्या इक्विटी भागावर बाजारातल्या चढ-उतारांचा परिणाम होतच असतो. त्यामुळे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार यातली गुंतवणूक दीर्घकालीन उद्देशानं करणं योग्य असतं. त्यातही गुंतवणूक ही किमान ३ वर्षांहून अधिक कालावधीसाठी असणं योग्य ठरू शकतं.

फंडातल्या इक्विटीमधली एखाद्याची गुंतवणूक ६५ टक्क्यांहून अधिक असेल, तर कर आकारणीसुद्धा इक्विटी प्रमाणे होत असते. अन्यथा ही कर आकारणी तुमच्या इन्कमटॅक्स स्लॅब नुसारच होते. थोडक्यात काय, तर हायब्रिड फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणाऱ्या परताव्यामुळे समाधान आणि थरार असं दोन्हीही अनुभवास येऊ शकतं.