IAF Golden Arrows 17 Squadron 75 years: २७ मे १९९९. श्रीनगरमधील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये विंग कमांडर बी. एस. ‘टोनी’ धनोआ बसले होते. कारगिल युद्ध टिपेला पोहोचले असताना एक फोन आला, “टोनी, नचिकेता सुरक्षित आहे. पण आहुजा आता आपल्यात नाही.” या शब्दांनी धनोआ यांच्यासमोर युद्धातील एका सहकाऱ्याच्या मृत्यूची वेदनादायी आठवण उभी केली. ही आठवण आहे भारतीय हवाई दलाच्या (IAF) ‘गोल्डन अ‍ॅरोज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १७व्या स्क्वॉड्रनच्या संस्कृतीची, या स्क्वाड्रनने १ ऑक्टोबर २०२६ रोजी ७५ वर्षे पूर्ण केली.

फ्लाइट लेफ्टनंट के. नचिकेता यांचे मिग-२७ विमान बटालिक क्षेत्रात कारगिल युद्धादरम्यान बंद पडले होते. त्यांचा शोध घेऊन बचावासाठी येणाऱ्या हेलिकॉप्टरला मार्गदर्शन करता यावे, यासाठी स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांनी स्वतः मिग-२१ या लढाऊ विमानातून त्या परिसरात जाण्याचा निर्णय घेतला. शत्रूच्या स्टिंगर क्षेपणास्त्राने त्यांच्या विमानाला लक्ष्य केले. विमान कोसळले. आहुजा यांनी पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर उडी घेतली; मात्र ते पाकिस्तानी हद्दीत उतरले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह भारताच्या ताब्यात देण्यात आला…

त्यानंतर २७ वर्षे उलटली, तरी धनोआ दरवर्षी २७ मे रोजी आहुजा यांच्या पत्नी अलका यांना फोन करतात. युद्धभूमीवर निर्माण झालेल्या नात्याची ही केवळ आठवण नसते; तर ती भारतीय हवाई दलाच्या ‘गोल्डन अ‍ॅरोज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १७व्या स्क्वॉड्रनच्या संस्कृतीची जपणूक असते. १ ऑक्टोबर २०२६ रोजी या स्क्वॉड्रनला ७५ वर्षे झाली. गोव्याच्या मुक्तिसंग्रामापासून १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाकिस्तान दोन्ही युद्धे, कारगिल संघर्ष, बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरपर्यंतचा प्रवास म्हणजे भारतीय हवाई दलाच्या युद्धसज्जतेचा, तांत्रिक कौशल्याचा आणि सहकाऱ्यांसाठी प्राण पणाला लावण्याच्या वृत्तीचा इतिहासच जणू.

ग्रुप कॅप्टन संजय दंडपाणी यांच्या नेतृत्त्वाखालील भटिंडा हवाई तळावरील गोल्डन अॅरोजची तुकडी (Image- (Special arrangement))

युद्धाची चाहूल आणि स्क्वॉड्रनची निर्मिती

स्वतंत्र भारताच्या हवाई दलाला बळकटी देण्याची गरज १९५१ मध्ये प्रकर्षाने जाणवू लागली होती. काश्मीरच्या प्रश्नावरून पाकिस्तानबरोबर तणाव वाढत असताना भारतीय हवाई दलाकडे केवळ १० कार्यरत स्क्वॉड्रन होत्या. एका स्क्वॉड्रनमध्ये साधारणतः १८ ते २० लढाऊ विमाने असतात. अशा परिस्थितीत अवघ्या आठ आठवड्यांच्या कालावधीत १४, १५, १६ आणि १७ क्रमांकाच्या स्क्वॉड्रन उभारण्यात आल्या. इतिहासकार अचिंत गुप्ता यांनी या तुकड्यांचे वर्णन करताना भारताचे ‘इमर्जन्सी टीन्स’ असा शब्दप्रयोग केला आहे.

१ ऑक्टोबर १९५१ रोजी अंबाला येथे १७व्या स्क्वॉड्रनची स्थापना झाली. सुरुवातीला फ्लाइट लेफ्टनंट डी. एल. स्प्रिंगेट यांच्या नेतृत्वाखाली ही तुकडी कार्यरत झाली. त्यांच्याकडे टॅक्टिकल रिकॉनिसन्स अर्थात सामरिक टेहळणीची जबाबदारी होती. त्यासाठी दोन आसनी हार्वर्ड आयआयबी प्रकारची १२ विमाने देण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी ही विमाने नंतर शस्त्रसज्ज करण्यात आली. १९४७ च्या काश्मीर युद्धातही त्यांचा वापर झाला होता. मात्र, आधुनिक लढाऊ विमानांची कमतरता असल्याने १७व्या स्क्वॉड्रनला पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी काही वर्षे लागली.

IAF Golden Arrows 17 Squadron Rafale Jet Ambala Air Base | Kargil War hero Squadron Leader Ajay Ahuja martyr | भारतीय हवाई दल १७वी स्क्वॉड्रन गोल्डन अ‍ॅरोज राफेल विमान | कारगिल शहीद अजय आहुजा आणि माजी हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ

सप्टेंबर १९५५ मध्ये ब्रिटिश बनावटीची व्हॅम्पायर विमाने मिळाल्यानंतर या स्क्वाड्रनचा जेट युगातील प्रवास सुरू झाला. १९५७ मध्ये व्हॅम्पायरची जागा हॉकर हंटर या अधिक प्रगत लढाऊ विमानाने घेतली. त्यानंतर मिग-२१ या लढाऊ विमानांचा काळ आला आणि १० सप्टेंबर २०२० रोजी या स्क्वॉड्रनचा भारतीय हवाई दलातील पहिली राफेल स्क्वॉड्रन म्हणून पुनर्जन्म झाला. या प्रवासात विमानांची क्षमता बदलली, युद्धतंत्र विकसित झाले आणि शत्रूच्या आव्हानांचे स्वरूपही बदलले. मात्र, प्रत्येक क्षणी सज्ज राहण्याची वृत्ती आजही कायम आहे.

‘आराम करण्यासाठी नव्हे, युद्धासाठी सज्ज!’

१७व्या स्क्वॉड्रनमध्ये दोन वेळा सेवा बजावलेले माजी एअर कमोडोर ए. एल. देवसकर यांनी १९७४ मध्ये या तुकडीत प्रवेश केला. त्यांच्या मते, मिग-२१ हे लढाऊ विमान चालवणे हे हंटरच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक होते. स्क्वॉड्रनच्या कार्यपद्धतीत सज्जतेला सर्वोच्च प्राधान्य होते. ऑपरेशनल प्लॅटफॉर्मवर दोन विमाने शस्त्रसज्ज अवस्थेत ठेवली जात आणि अवघ्या दोन मिनिटांत उड्डाणासाठी तयार केली जात असे. देवसकर सांगतात, “वैमानिकासाठी विश्रांती अशी गोष्ट नसते. तुम्ही एकतर युद्ध लढत असता किंवा युद्धासाठी तयारी तरी करत असता.”

ही सज्जता केवळ विमानांच्या देखभालीपुरती मर्यादित नव्हती. वैमानिकांचे प्रशिक्षण, निर्णयक्षमता, संकटातील प्रतिसाद आणि सहकाऱ्यांवरील विश्वास यांनाही तितकेच महत्त्व होते. १७व्या स्क्वॉड्रनने दोन हवाई दलप्रमुख दिले. एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे यांचे १९८५ मध्ये पदावर असतानाच निधन झाले, तर कारगिल युद्धाच्या काळात या स्क्वॉड्रनचे नेतृत्व करणारे धनोआ नंतर हवाई दलप्रमुख झाले.

कारगिलमध्ये अजय आहुजा यांचे बलिदान

१९९९ च्या कारगिल युद्धाने ‘गोल्डन अ‍ॅरोज’च्या इतिहासाला निर्णायक वळण दिले. त्या वेळी स्क्वॉड्रनचे नेतृत्व धनोआ यांच्याकडे होते. अजय आहुजा आणि धनोआ यांची यापूर्वी १०१ आणि २९ क्रमांकाच्या स्क्वॉड्रनमध्ये एकत्र सेवा झाली होती. दोघेही अत्यंत कुशल उड्डाण प्रशिक्षकांच्या श्रेणीत मोडत होते. कारगिलमध्ये भारतीय विमानांसमोर मोठे आव्हान होते. श्रीनगरहून १८ हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवरून उड्डाण करणाऱ्या वैमानिकांना पाकिस्तानी सैन्याच्या खांद्यावरून डागता येणाऱ्या स्टिंगर क्षेपणास्त्रांचा धोका होता. क्षेपणास्त्राचा मारा झाल्यास विमानाचे इंजिन बंद पडू शकत होते. आणि त्याच वेळेस त्या उंचीवरून पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर उडी मारणेही जीवघेणे ठरू शकत होते.

IAF Golden Arrows 17 Squadron Rafale Jet Ambala Air Base | Kargil War hero Squadron Leader Ajay Ahuja martyr | भारतीय हवाई दल १७वी स्क्वॉड्रन गोल्डन अ‍ॅरोज राफेल विमान | कारगिल शहीद अजय आहुजा आणि माजी हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ
मिग-२१ च्या लँडिंग दरम्यानचा क्षण. वेग कमी करण्यासाठी पॅराशुटचा वापर (Express photo)

एका टेहळणी मोहिमेदरम्यान कॅनबेरा विमानावर क्षेपणास्त्राचा मारा झाल्यानंतर ‘गोल्डन अ‍ॅरोज’च्या वैमानिकांनी या धोक्याचा स्वतंत्र आढावा घेतला. विमानाला फटका बसल्यास शक्य तितका वेळ विमानासह खाली यायचे, दरी दिसल्यास तिच्या दिशेने जायचे आणि शक्य तितक्या कमी उंचीवर आल्यानंतरच बाहेर उडी मारायची, असा निर्णय त्यांनी घेतला. २७ मे रोजी नचिकेता यांचे मिग-२७ विमान निकामी झाले. त्यांचे फॉर्मेशन लीडर फ्लाइट लेफ्टनंट के. मंडोत यांनी नचिकेता बेपत्ता झाल्याचे कळवले. त्याच वेळी इंधन कमी होत असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले होते. आहुजा यांनी तत्काळ मदतीची तयारी दर्शवली. त्यांच्या मागे फ्लाइट लेफ्टनंट पी. जी. रेड्डी दुसऱ्या लढाऊ विमानातून येत होते.

आहुजा अपघातग्रस्त विमानाचा ठावठिकाणा शोधत असताना क्षेपणास्त्रांचा मारा सुरू झाल्याचा इशारा त्यांना मिळाला. त्यांनी शोध सुरूच ठेवला. काही वेळाने रेड्डी यांना इंधन कमी असल्याने माघारी फिरावे लागले. आहुजा मात्र त्या परिसरात एकटेच राहिले. त्याच वेळी त्यांच्या विमानाला स्टिंगर क्षेपणास्त्राचा फटका बसला. “विमानाला फटका बसला आहे,” असा संदेश आहुजा यांनी दिला. त्यांचे इंजिन बंद पडले होते. भारतीय लष्कराच्या ‘डेव्हिल्स आय’ या चौकीवरून त्यांचे विमान कोसळताना आणि त्यानंतर शत्रूच्या सैनिकांनी त्यांना घेरल्याचे दिसले.

२८ मे रोजी त्यांचा मृतदेह भारताला परत मिळाला. शवविच्छेदनात छळ करण्यात आल्याच्या खुणा आणि गोळ्यांच्या दोन जखमा आढळल्याचे धनोआ यांनी सांगितले. युद्धकैद्यांशी संबंधित जिनिव्हा कराराचा संदर्भ देत त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला होता. दुसरीकडे, राजनैतिक दबावानंतर नचिकेता यांची सुटका झाली आणि ५ जून रोजी ते भारतात परतले.

आहुजा यांच्या पत्नी अलका यांच्या आठवणीत पतीचा स्वभाव आजही तितकाच जिवंत आहे. “त्यांना इतरांना मदत करायला आवडायचे,” असे त्या सांगतात. पतीच्या मृत्यूला जवळपास तीन दशके उलटली, तरी स्क्वॉड्रनमधील अधिकारी त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. “ते सारे मला कुटुंबासारखेच आहेत,” असे त्या म्हणतात.

कारगिलच्या डोंगरांत विकसित झालेले नवे युद्धतंत्र

आहुजा यांच्या मृत्यूनंतर स्क्वॉड्रनमध्ये संतापाची भावना होती. शत्रूला प्रत्युत्तर देण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, भावनिक प्रतिक्रियेपलीकडे जाऊन प्रत्यक्ष युद्धासाठी आवश्यक असलेले तांत्रिक बदल करणे अधिक महत्त्वाचे होते. तोपर्यंत १७वी स्क्वॉड्रन प्रामुख्याने लढाऊ विमाने वापरून टेहळणी करणारी तुकडी होती. कमी उंचीवरून वेगाने उड्डाण करून शत्रूच्या ठिकाणांची छायाचित्रे घेणे हे तिचे प्रमुख काम होते. कारगिलमध्ये मात्र उंच पर्वतरांगांवरील लक्ष्यांवर अचूक बॉम्बहल्ले करण्याची आवश्यकता निर्माण झाली. किमान चार किलोमीटर उंचीवरून शस्त्रे लक्ष्यावर सोडण्याचे निर्देश होते. त्या उंचीवरील विरळ हवेमुळे बॉम्ब अपेक्षित लक्ष्यापुढे जाऊन पडण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीसाठी तयार गणिती तक्ते उपलब्ध नव्हते. धनोआ यांनी हवेची घनता आणि बॉम्बच्या पुढे जाण्याच्या अंतराचा अभ्यास करून नवे गणित तयार केल्या. त्यानंतर श्रीनगरजवळील चाचणी क्षेत्रात त्यांची पडताळणी करण्यात आली.

३ जून रोजी धनोआ आणि रेड्डी यांनी तोलोलिंगच्या मागच्या बाजूस असलेले शिखर ५१४० वर बॉम्बहल्ला केला. त्यानंतर लक्ष्यभेद अधिक अचूक होत गेला. लष्कराकडून दररोज मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील मोहिमांमध्ये सुधारणा केल्या जात. लक्ष्यावर बॉम्ब पडला नसेल, तर पुन्हा हल्ला केला जात असे. या प्रयत्नांचे परिणाम उल्लेखनीय होते. एअर मार्शल विनोद पाटणे यांनी नंतर स्क्वॉड्रनच्या सुमारे ८० टक्के बॉम्बनी अचून लक्ष्यभेद केल्याचे सांगितले. मिग-२३ आणि मिग-२७ विमानांच्या तुकड्यांनीही या अचूकतेमागील तंत्र जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली होती. कारगिलच्या प्रतिकूल परिस्थितीत विकसित झालेले हे तंत्र स्क्वॉड्रनच्या व्यावसायिक कौशल्याचे उदाहरण ठरले.

कठोर प्रशिक्षण, मैत्री आणि आठवणी

‘गोल्डन अ‍ॅरोज’ची ओळख केवळ युद्धातील कामगिरीमुळे तयार झालेली नाही. या तुकडीतील वैमानिकांच्या मैत्रीचे, विनोदबुद्धीचे आणि एकमेकांशी असलेल्या जिव्हाळ्याचे किस्सेही तितकेच प्रसिद्ध आहेत.
१९८२ मध्ये वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी या स्क्वॉड्रनमध्ये दाखल झालेले एअर कमोडोर के. ए. मुथन्ना नंतर हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये मुख्य चाचणी वैमानिक झाले. तेजस विमानाच्या पहिल्या चाचणी उड्डाणातही त्यांची भूमिका होती. त्यांच्या मते, स्क्वॉड्रनमधील चार वर्षांचा अनुभव त्यांच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीचा पाया ठरला.

प्रशिक्षणादरम्यान वैमानिकांकून रात्रीच्या वेळी अत्यंत कमी उंचीवरून उड्डाण करण्याचा सराव कसून केला जात असे. सुरुवातीला चंद्रप्रकाशात आणि नंतर पूर्ण अंधारात अशा उड्डाणांचा सराव केला जाई. हे प्रशिक्षण धोकादायक असले, तरी संकटाच्या वेळी निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक होते.
दुसरीकडे, शनिवारच्या संध्याकाळी मेसमध्ये रंगणाऱ्या पार्ट्या, वेषभूषा स्पर्धा आणि सहकाऱ्यांची टोपणनावे यांमुळे वातावरण हलकेफुलके होत असे. मुथन्ना यांना ‘मुथू’ आणि नंतर ‘मट्स’ अशी नावे पडली होती. वैमानिकांच्या नावांवरून तयार झालेली ही टोपणनावे वर्षानुवर्षे टिकून राहिली.

माजी एअर कमोडोर रमेश गोयल हे हरियाणातील पलवल येथील एका दुकानदाराचे पुत्र. कुटुंबातील पहिले सैनिक शाळेत शिकलेले आणि त्यांच्या गावातून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत पोहोचलेले पहिले विद्यार्थी म्हणून त्यांनी वेगळा प्रवास केला. १९७८ मध्ये स्क्वॉड्रनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी सुमारे साडेचार वर्षांत एक हजार उड्डाण मोहिमा पूर्ण केल्या. १९७१ च्या युद्धात जामनगरजवळ पाकिस्तानी विमान पाडल्याबद्दल वीरचक्र मिळवलेले बी. बी. सोनी यांच्यासारख्या वरिष्ठ वैमानिकांकडून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. प्रत्येक विमान युद्धमोहिमेसाठी सज्ज राहण्याची स्पर्धात्मक वृत्ती या स्क्वॉड्रनमध्ये कायम होती.

या संस्कृतीचा आणखी एक पैलू म्हणजे नेतृत्व. १९६५ च्या युद्धकाळात अमृतसरमध्ये तैनात असलेल्या रडार युनिटचे नेतृत्व स्क्वॉड्रनच्या इतिहासात ‘डांडू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी केले होते; या संदर्भात स्क्वॉड्रनचे माजी कमांडर संजय दांडपाणी यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या आहेत. युद्धकाळात त्यांच्या कुटुंबाला खंदकात आश्रय घ्यावा लागत असे. मात्र, शहरातील लोक त्यांच्या आईला दूध आणि इतर वस्तूंचे पैसे घेण्यास नकार देत. या अनुभवातून त्यांना एक धडा मिळाला होता, हवेत असो वा जमिनीवर, एकमेकांची काळजी घेणे आवश्यक आहे.

युद्धाच्या नोंदींपलीकडे जपलेली परंपरा

१७व्या स्क्वॉड्रनची हस्तलिखित डायरी या परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. युद्धातील घटनांची नोंद लाल शाईत, तर इतर नोंदी निळ्या शाईत केली जाते. यात केवळ युद्धमोहिमा आणि विमानांची कामगिरी नाही, तर वैमानिकांचे वैयक्तिक आयुष्य, मेसमधील कार्यक्रम, आनंदाचे क्षण, पराभव आणि पुनर्भेटी यांचाही समावेश असतो. १९९९ च्या कारगिल युद्धाच्या नोंदीच्या शेवटी अजय आहुजा यांचे छायाचित्र आणि त्यांच्या स्मरणार्थ लिहिलेली भावपूर्ण ओळ आहे… “आणि अशा रीतीने ते निघून गेले; पलीकडे त्यांच्यासाठी सर्व कर्णे वाजू लागले” या ओळींमध्ये एका वैमानिकाच्या मृत्यूची नोंद आहे; पण त्यापेक्षा अधिक म्हणजे त्याला विसरू न देणाऱ्या सहकाऱ्यांची भावना आहे.

राफेलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत

१० सप्टेंबर २०२० रोजी ‘गोल्डन अ‍ॅरोज’ भारतीय हवाई दलाची पहिली राफेल स्क्वॉड्रन झाली. २०१६ मध्ये भारताने राफेल विमानांसाठी करार केला होता. धनोआ यांनीही २०१७ मध्ये फ्रान्समध्ये राफेल विमानमधून उड्डाण केले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये या स्क्वॉड्रनच्या राफेल विमानांनी भारतीय हवाई दलाच्या कारवाईत भाग घेतला. या कामगिरीनंतर स्क्वॉड्रनला दोन वीरचक्र, चार वायुसेना पदके आणि दहा ‘मेंशन्ड इन डिस्पॅचेस’ सन्मान मिळाल्याचे धनोआ यांनी नमूद केले.

२०२४ मध्ये कारगिल विजय दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीतील सुब्रतो पार्क येथे स्क्वॉड्रनचे माजी वैमानिक आणि जमिनीवर काम करणारे कर्मचारीही एकत्र आले. युद्ध संपल्यानंतर पंचवीस वर्षांनी इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येणे असामान्य असले, तरी ‘गोल्डन अ‍ॅरोज’साठी ते स्वाभाविक होते. १ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या ७५व्या वर्धापनदिन सोहळ्यात अलका आहुजा यांचाही सहभाग घेतला. हंटर, मिग-२१ आणि राफेलचे वैमानिक पुन्हा एकत्र आले. आता नसलेल्या सहकाऱ्यांच्या आठवणीही त्यांनी जागवल्या.

१९५१ मध्ये मोजक्या हार्वर्ड विमानांपासून सुरू झालेला हा प्रवास आज अत्याधुनिक राफेलपर्यंत पोहोचला आहे. गोव्यापासून हाशिमारा, कारगिल, बालाकोट आणि सिंदूरपर्यंतच्या मोहिमांनी या स्क्वॉड्रनला भारतीय लष्करी विमानचालनाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. मात्र, या ७५ वर्षांच्या प्रवासातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट केवळ विमानांची प्रगती किंवा युद्धातील यश नाही. तर ती आहे एकमेकांशी जोडलेले राहण्याची वृत्ती. दरवर्षी २७ मे रोजी धनोआ अलका आहुजा यांना फोन करतात. आणि दरवर्षी १ ऑक्टोबरला ‘गोल्डन अ‍ॅरोज’चे सदस्य पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाकडे परतल्याप्रमाणे एकत्र येतात. कारण युद्धात विमानांची पिढी बदलते, शस्त्रे बदलतात, रणनीती बदलते; पण सहकाऱ्यासाठी उभे राहण्याची आणि त्याच्या स्मृती जपण्याची परंपरा टिकून राहते. ‘गोल्डन अ‍ॅरोज’च्या ७५ वर्षांच्या अमृतमहोत्सवी इतिहासाचे खरे सामर्थ्य कदाचित याच नात्यात दडलेले आहे!