IAF Fighter Jets Shortage Air Chief AP Singh Warning: भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह अलीकडेच निवृत्त झाले आणि आशुतोष दिक्षित यांनी हवाई दल प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. मात्र निवृत्ती पूर्वी सिंह यांनी अलीकडेच केलेले एक विधान देशाच्या संरक्षण क्षेत्रात सध्या मोठ्या वाद-चर्चेचा विषय ठरले आहे. “भारतीय हवाई दलाची गरज दरवर्षी ३६ ते ४० लढाऊ विमाने मिळवण्याची आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले. हे लक्ष्य केवळ हवाई दलाचा विस्तार करण्यासाठी नाही, तर सध्या घसरत असलेली लढाऊ विमानांची संख्या रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.फिफ्थ जनरेशन J-35 स्टेल्थ विमाने चीनकडून मिळविण्याचा पाकिस्तानचा जोरदार प्रयत्न सुरू आहे, त्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

ए. पी. सिंह यांनी याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणले, युद्धात एखादे विमान एकटे लढत नाही; तर ते संपूर्ण युद्धप्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असते. एकूणच या पार्श्वभूमीवर तीन महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करणे भाग पडते. १) भारताकडे पुरेशी लढाऊ विमाने आहेत का? २) त्यांच्याकडे आधुनिक BVR क्षेपणास्त्रे आणि नेटवर्किंग आहे का? आणि ३) पुढील दशकात फिफ्थ जनरेशन लढाऊ विमानांच्या युद्धासाठी भारत तयार आहे का?

२९ स्क्वॉड्रन विरुद्ध ४२: खरी समस्या किती मोठी?

भारतीय हवाई दलाची अधिकृत मंजूर लढाऊ स्क्वॉड्रन संख्या सुमारे ४२ असून प्रत्यक्ष संख्या आता सुमारे ३० स्क्वॉड्रनवर आली आहे. पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या संरक्षणविषयक विश्लेषणानुसार, डिसेंबर २०२४ मध्येच हवाई दलाकडे ३१ सक्रिय लढाऊ स्क्वॉड्रन होत्या, तर मंजूर संख्या ४२ होती.

IAF Fighter Jets Shortage Air Chief AP Singh | IAF Tejas Mk1A HAL Production Delivery | भारतीय हवाई दल लढाऊ विमानांची टंचाई | एअर चीफ मार्शल एपी सिंह पाकिस्तान J35 इशारा
भारतीय हवाई दलाला लढाऊ विमानांचा तीव्र तुटवडा जाणवतोय (Image- Gemini)

आता MiG-21च्या उर्वरित स्क्वॉड्रनच्या निवृत्तीनंतर ही संख्या आणखी कमी झाली आहे. प्रत्येक लढाऊ स्क्वॉड्रनमध्ये विमानांची संख्या साधारण १८ ते २० असते, तर २९ स्क्वाड्रन संदर्भातील एकूणच गणित केल्यावर लक्षात येते की, प्रत्यक्षात सुमारे २४० ते २७० लढाऊ विमानांची कमतरता आपल्या हवाई दलाला सध्या जाणवते आहे. ही कमतरता एकाच वर्षात भरून काढता येणे शक्यच नाही. म्हणूनच हवाई दल प्रमुख म्हणाले की, ३६ ते ४० लढाऊ विमानांचे लक्ष्य समजून घेणे महत्त्वाचे आहे. ही संख्या म्हणजे, दरवर्षी ४० लढाऊ विमाने मिळाल्याने लगेचच हवाई दल मजबूत होईल असा त्याचा अर्थ नाही. उलट, जुनी लढाऊ विमाने निवृत्त होत असताना नवीन विमाने आणणे, स्क्वॉड्रनची संख्या ३०च्या खाली जाऊ न देणे आणि त्यानंतर हळूहळू ४२.५ स्क्वाड्रनच्या दिशेने मार्गक्रमण करणे, यासाठी हा वेग आवश्यक आहे.

मग ३६-४० विमाने आणणार कुठून?

नेमके हेच भारताच्या संरक्षण उत्पादनासंदर्भातील सर्वात मोठे आव्हान आहे. कारण ऑर्डर नोंदवलेली असणे आणि उत्पादन होऊन प्रत्यक्षात वेळेवर लढाऊ विमान दलाला मिळणे यात मोठा फरक आहे. तेजस Mk1A हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये संरक्षण मंत्रालयाने HALसोबत ९७ LCA Mk1A विमानांसाठी ₹६२,३७० कोटींहून अधिक किमतीचा करार केला. या ९७ विमानांमध्ये ६८ लढाऊ आणि २९ ट्विन-सीटर विमाने आहेत. त्यांची डिलिव्हरी २०२७-२८ पासून सुरू होऊन सहा वर्षांत करार पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी HALची तेजस निर्मिती क्षमता आता प्रतिवर्षी २४ लढाऊ विमानांपर्यंत नेण्यात आली आहे. नाशिकमधील तिसरी उत्पादन लाइन कार्यान्वित झाल्यानंतर ही क्षमता वाढली आहे. पण हवाई दल प्रमुख म्हणताहेत, त्यानुसार गरज ३६-४०ची आहे, त्यामुळे २४ हा आकडा पुरेसा नाही.

यामुळेच MRFA म्हणजेच मल्टिरोल फायटर एअरक्राफ्टचा प्रस्ताव महत्त्वाचा ठरतो. प्रस्तावित ११४ राफेल विमानांचा करार आणि त्याचसोबत अतिरिक्त Su-30MKIची खरेदीचा नियोजित प्रस्ताव हे दोन्ही प्रस्ताव पुढे सरकले तरच हवाई दलप्रमुखांनी मांडलेले ३०-३५ किंवा ३५-४० लढाऊ विमाने दरवर्षी दलामध्ये दाखल करून घेण्याचे गणित जमू शकते. अर्थात हे सगळे करारांच्या वेळापत्रकावर अवलंबून आहे. आणि प्रत्यक्ष अनुभवानुसार अनेकदा नानाविध कारणांनी विमाने प्रत्यक्ष मिळण्यास विलंबच होतो.

‘तंत्रज्ञान विलंबाने मिळणे, म्हणजे तंत्रज्ञान नाकारण्यासारखेच’

हवाई दलप्रमुखांनी उल्लेख केलेला महत्त्वाचा मुद्दा हा संख्येपेक्षाही वेळेच्या बाबतीत अधिक आहे. लढाऊ विमानाचे डिझाइन, चाचण्या, उत्पादन, इंजिन, रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली, विमानात शस्त्रास्त्रे बसवणे आणि पायलट प्रशिक्षण ही संपूर्ण साखळी तयार होण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो. म्हणून आज घेतलेला निर्णय हा उद्याच्या युद्धासाठी नसतो; तर तो अनेकदा दहा-पंधरा वर्षांनंतरच्या युद्धासाठी असतो.

तेजस Mk1Aच्या बाबतीतही इंजिन पुरवठ्याशी संबंधित अडचणींमुळे उत्पादन आणि डिलिव्हरीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. २०२५मध्ये GEसोबत ९७ Mk1A यासाठी ११३ F404 इंजिन आणि संबंधित पॅकेजच्या पुरवठ्याचा करार करण्यात आला होता, त्यांची डिलिव्हरी २०२७ ते २०३२ दरम्यान होणार आहे. यातून एक मोठा धडा आपल्याला मिळतो आहे, तो म्हणजे लढाऊ विमाननिर्मितीचा प्रकल्प म्हणजे केवळ विमाननिर्मिती नसते तर; तो इंजिन, सेन्सर, इलेक्ट्रॉनिक्स, शस्त्रे आणि पुरवठा-साखळीचा राष्ट्रीय औद्योगिक प्रकल्पच असतो. एरवी न्यायव्यवस्थेच्या बाबतीत असे म्हटले झाले की, न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणेच होय. तद्वतच, तंत्रज्ञानाला विलंब म्हणजे तंत्रज्ञान नाकारणेच ठरते.

पाकिस्तानकडे J-35?

पाकिस्तानला चीनकडून J-35 स्टेल्थ फायटर मिळण्याची चर्चा काही नवीन नाही. जून २०२५मध्ये पाकिस्तान सरकारने चीनला सुमारे ४० J-35 लढाऊ विमानांच्या खरेदीची ऑफर दिल्याचे जाहीर केले होते. त्याच प्रस्तावामध्ये KJ-500 AEW&C आणि HQ-19 हवाई संरक्षण प्रणालीचाही उल्लेख होता. मात्र अद्याप प्रत्यक्ष डिलिव्हरी झाल्याचे वृत्त आलेले नाही. तरीही हवाई दलप्रमुखांनी व्यक्त केलेली चिंता ही समजण्यासारखी बाब आहे. कारण J-35चे महत्त्व फक्त त्याच्या स्टेल्थ क्षमतेत नाही. स्टेल्थ फायटरला AEW&C विमान, जमिनीवरील रडार, डेटा-लिंक, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे नेटवर्क मिळाले, तर ती उत्तम इंटीग्रेटेड एअर कॉम्बॅट सिस्टीम ठरू शकते. त्यामुळे हवाई दलप्रमुख म्हणाले की, त्याच्याकडे केवळ एक कॉम्बॅट प्लॅटफॉर्म म्हणून पाहू नका, तर एक कॉम्बॅट सिस्टीम म्हणून पाहा.

ऑपरेशन सिंदूरनंतर BVR क्षमता इतकी महत्त्वाची का?

अलीकडच्या संघर्षांनी हवाई युद्धाचे स्वरूप बदलले आहे. शत्रूचे विमान प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसण्यापूर्वी त्याच्यावर क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता म्हणजेच बियाँड व्हिज्युअल रेंज (BVR) आता अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्या संदर्भात भारताने ASTRA प्रणालीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. ASTRA Mk1 ही स्वदेशी बनावटीची BVR म्हणजेच हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे आणि तिची प्रभावी मारकक्षमता सुमारे ११० किमीपर्यंत आहे. ASTRA Mk2 या प्रगत प्रणालीची क्षमता सुमारे २०० किमीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. ASTRA Mk3साठी सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानावर सध्या संशोधन सुरू असून तिची संभाव्य क्षमता ३५० किमीपेक्षा अधिक असू शकते, असे संरक्षण क्षेत्रातील अहवालांमध्ये नमूद आहे.

परदेशातून अधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही हवाई दलप्रमुखांनी सांगितले आहे. R-37M आणि Meteor सारख्या क्षेपणास्त्रांचा यामध्ये विचार होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे केवळ नवीन लढावू विमाने घेणे पुरेसे नाही; तर शत्रूच्या विमानांचा वेगात शोध घेणे, ओळखणे, लक्ष्य करणे आणि लांब अंतरावरून ती नष्ट करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे, हेच यातून स्पष्ट होते.

AMCAला विलंब झाला तर?

अॅ़व्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) हे भारताचे नियोजित स्वदेशी बनावटीचे आणि फिफ्थ जनरेशनचे स्टेल्थ फायटर असणार आहे. पण संशोधन आणि विकास प्रक्रियेतून पुढे जात पूर्णपणे विकसित होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन ते सेवेत येणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असणार आहे. दरम्यान, J-20सारखे फिफ्थ जनरेशन लढाऊ विमान चीनकडे आधीपासूनच आहे.

पाकिस्ताननेही J-35कडे वाटचाल केली तर भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील दोन्ही दिशांना स्टेल्थ तंत्रज्ञानाचे खूप मोठे आव्हान असेल. म्हणूनच AMCAला विलंब झाल्यास फिफ्थ जनरेशन लढाऊ विमानांच्या पर्यायाचा वेगळा विचार भारताला करावा लागू शकतो, असे संकेतही हवाई दलप्रमुखांनी दिले. रशियाने Su-57ची ऑफर दिल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले; मात्र त्याबाबत कोणताही औपचारिक निर्णय अद्याप झालेला नाही.

खरी गरज फक्त ४० लढाऊ विमानांची नाही…

भारताला दरवर्षी ३६-४० लढाऊ विमाने हवीत, असे विधान हवाई दलप्रमुखांनी केले खरे पण ही गरज केवळ विमानांची संख्या वाढवण्यापुरती नाही. तर याचा विचार चार पातळ्यांवर करावा लागतो.

  • पहिली पातळी: संख्यात्मक क्षमता.
    २९ स्क्वॉड्रनवरून पुन्हा ४२ च्या दिशेने जाणे.
  • दुसरी पातळी: तांत्रिक क्षमता.
    तेजस Mk1A, Mk2, राफेल, Su-30MKI आणि पुढे AMCA असे विविध प्रगत प्लॅटफॉर्म्स आणि प्रणाली.
  • तिसरी पातळी: शस्त्रक्षमता.
    ASTRA Mk1, Mk2, Mk3 तसेच लांब पल्ल्याची विदेशी क्षेपणास्त्रे.
  • चौथी पातळी: नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर.
    रडार, AEW&C, डेटा-लिंक, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, ड्रोन आणि मानवरहित प्रणाली यांचे एकत्रित नेटवर्क.

म्हणूनच आजची हवाई शक्ती ही फक्त आपल्याकडे किती फायटर जेटस् आहेत, अशी संख्यात्मक पद्धतीने मोजता येणार नाही.

भारतासमोरची अडचण

भारतासमोर सर्वात महत्त्वाची अडचण अशी म्हणजे, एकीकडे सध्या स्क्वॉड्रनची संख्या घटते आहे, तर दुसरीकडे पुढील पिढीची विमाने अद्याप केवळ विकासाच्या टप्प्यात आहेत. या दोन टप्प्यांमधील अंतर भरून काढणे हीच सर्वात मोठी गरज आहे. २०२५मध्ये भारताने ९७ तेजस Mk1Aचा करार करून उत्पादनाला मोठा आधार दिला आहे; HALची वार्षिक क्षमता २४ विमानांपर्यंत नेण्यात आली आहे. पण हवाई दलाला अपेक्षित असलेला ३६-४०चा वार्षिक वेग गाठण्यासाठी उत्पादनक्षमता, इंजिन उपलब्धता, MRFA करार, Su-30 प्रकल्प आणि पुढील काळातील Mk2/AMCA प्रकल्प हे सर्व एकाच वेळी वेगात रेटावे लागतील. हवाई दलप्रमुखांनी व्यक्त केलेली चिंता ही फक्त पाकिस्तानच्या J-35पुरती मर्यादित नाही. तर पूर्ण क्षमतेच्या दिशेने जाण्याचा आपला असलेला अतिशय कमी वेग ही अतिशय महत्त्वाची चिंतेची बाब आहे.

संदर्भसूची

  • The Indian Express, IAF needs 36-40 jets annually; Pakistan’s fifth-gen jet plan worrying: Air Chief, 4 October 2026
  • Press Information Bureau (PIB), Ministry of Defence, MoD signs Rs. 62,370 crore contract with HAL for procurement of 97 LCA Mk1A aircraft for IAF, 25 SEPT 2025.
  • Press Information Bureau (PIB), Ministry of Defence, 3rd LCA Mk1A Production Line & 2nd HTT-40 Production Line, 17 OCT. 2025.
  • PRS Legislative Research, Demand for Grants 2026-27 Analysis: Defence- December 2024.