Indian Aviation Heroes Inspiring Tales: विमानातील संकट म्हणजे अवघ्या काही सेकंदांत घेतला जाणारा अत्यंत निर्णायक क्षण. वैमानिक किंवा विमानातील कर्मचाऱ्याचा संयम, प्रशिक्षण आणि धैर्य शेकडो प्रवाशांच्या आयुष्याचे भवितव्य त्या काही सेकंदांत ठरवणार असते. भारताच्या विमानवाहतुकीच्या इतिहासात अशा अनेक प्रसंगांची नोंद खचितच आहे. फ्लायदुबई विमानातील कॅप्टन स्मित मच्छार यांच्यापासून ते नीरजा भानोट, कॅप्टन देवी शरण, एअर मार्शल अर्जन सिंह आणि बीजू पटनायक यांच्यापर्यंत अनेकांनी अशा संकटसमयी असामान्य धैर्य दाखवल्याची नोंद, इतिहासात आहे.
कॅप्टन स्मित मच्छार: जखमी अवस्थेतही कॉकपिटचा दरवाजा उघडला
३० सप्टेंबर २०२६ रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 या बोईंग ७३७ मॅक्स-८ विमानात कॉकपिटमध्ये अचानक हिंसक संघर्ष सुरू झाला. विमानाचे कॅप्टन असलेले भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर त्यांच्याच सहवैमानिकाने कथितरीत्या चाकूहल्ला केला. या हल्ल्यात मच्छार गंभीर जखमी झाले. घटनेची चौकशी अद्याप सुरू आहे.
विमानात १७४ जण होते. हल्ल्यादरम्यान विमानाची उंची काही क्षणांत सुमारे १४ हजार फुटांनी कमी झाली. अशा परिस्थितीत विमानाचे नियंत्रण गमावण्याचा धोका निर्माण झाला होता. गंभीर जखमी असूनही मच्छार यांनी कॉकपिटचा आपत्कालीन दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर प्रवासी आणि केबिन क्रू कॉकपिटमध्ये पोहोचले आणि हल्लेखोराला नियंत्रणात आणण्यात आले. विमानातील दोन ऑफ-ड्यूटी फ्लायदुबई वैमानिकांनी नंतर विमानाचे नियंत्रण आपल्याहाती घेतले आणि विमानाला सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षित उतरवले.

या घटनेचे वैशिष्ट्य केवळ मच्छार जखमी झालेले असतानाही त्यांनी केलेल्या प्रतिकारात नाही; तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मदत आत पोहोचण्यासाठी कॉकपिटचा मार्ग खुला करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय यात आहे. विमानाच्या सुरक्षिततेत प्रवासी, केबिन क्रू आणि विमानातील दोन वैमानिकांचाही महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे ही घटना एका व्यक्तीच्या शौर्याबरोबरच संकटाच्या क्षणी सामूहिक प्रतिसादाचेही महत्त्वाचे उदाहरण ठरली.
मच्छार यांचा विमानचालनातील प्रवासही वेगळा आहे. त्यांनी सुरुवातीला टेक्स्टाइल इंजिनीअरिंगचा अभ्यास केला आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर एका विमानवाहतूक विषयक कार्यक्रमातून त्यांना वैमानिक होण्याची प्रेरणा मिळाली. २०११ मध्ये त्यांनी स्पाइसजेटमध्ये प्रवेश केला आणि २०२२ मध्ये फ्लायदुबईमध्ये डायरेक्ट-एंट्री कॅप्टन म्हणून रुजू झाले. त्यांच्या प्रोफाइलनुसार बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांवर त्यांचा सुमारे ९,७५० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे.
नीरजा भानोट: स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांना वाचवणारी फ्लाइट पर्सर
५ सप्टेंबर १९८६ हा दिवस नीरजा भानोट यांच्या शौर्याची साक्ष देणारा ठरला. पॅन अॅमच्या फ्लाइट ७३चे कराची विमानतळावर दहशतवाद्यांनी अपहरण केले. त्या वेळी २२ वर्षीय नीरजा भानोट या वरिष्ठ फ्लाइट पर्सर होत्या. दहशतवाद्यांनी विमान ताब्यात घेतल्यानंतर नीरजा यांनी कॉकपिटमधील तीन वैमानिकांना वेळेत सतर्क केले. वैमानिक विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने विमान जमिनीवरच राहिले आणि अपहरणकर्त्यांना ते हवेत घेऊन जाणे शक्य झाले नाही. तब्बल १७ तास चाललेल्या या संकटात नीरजा यांनी अमेरिकन प्रवाशांची ओळख पटू नये, यासाठी त्यांचे पासपोर्ट लपवून ठेवल. त्यामुळे काही प्रवाशांना लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न फसला.

अखेर दहशतवाद्यांनी प्रवाशांवर गोळीबार सुरू केला. नीरजा यांनी आपत्कालीन दरवाजा उघडून प्रवाशांना बाहेर पडण्यास मदत केली. तीन मुलांना गोळ्या लागण्यापासून वाचवताना त्यांनी स्वतःवर गोळी झेलली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आले. अशोकचक्राचा सन्मान लाभलेल्या या सर्वांत तरुण भारतीय आणि पहिल्या महिला होत्या.
कॅप्टन देवी शरण: सात दिवसांच्या अपहरणात संयमाची कसोटी
२४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या IC-814 विमानाचे कॅप्टन होते देवी शरण. भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर विमानाचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी विमान अमृतसर, लाहोर आणि दुबईमार्गे अखेर अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

या संपूर्ण काळात कॅप्टन देवी शरण यांच्यावर विमान सुरक्षित ठेवण्याबरोबरच अपहरणकर्त्यांच्या आदेशांचे पालन करण्याची आणि प्रवाशांचे प्राण वाचवण्याची दुहेरी जबाबदारी होती. विमानाचे इंधन, विविध विमानतळांवरील परवानग्या, बदलते आदेश आणि कॉकपिटमधील सततचा तणाव अशा परिस्थितीत त्यांनी विमानास काहीही होऊ न देता सुरक्षित ठेवले.
IC-814 प्रकरणात वैमानिकाने घेतलेला प्रत्येक निर्णय हा शेकडो प्रवाशांच्या जीवाशी जोडलेला होता. कंदाहारमधील सात दिवसांच्या ओलीस नाट्यानंतर भारत सरकारने तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आणि प्रवासी मुक्त झाले. त्यामुळे देवी शरण यांच्या भूमिकेचे मूल्यमापन केवळ विमान चालनापुरते मर्यादित नाही; तर ते दीर्घकाळ चाललेल्या ओलीसनाट्याच्या प्रसंगी विमानाचे नियंत्रण सांभाळणारे प्रमुख व्यक्ती होते.
एअर मार्शल अर्जन सिंह : १९६५च्या युद्धातील हवाई नेतृत्व
अर्जन सिंह यांचे नाव भारतीय हवाई दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदलेले आहे. १ ऑगस्ट १९६४ रोजी त्यांनी एअर चीफ ऑफ द एअर स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात त्यांच्या नेतृत्वाचा कस लागला.

पाकिस्तानने ऑपरेशन ग्रँड स्लॅमअंतर्गत अखनूरच्या दिशेने आक्रमण केल्यानंतर भारताने हवाई दलाला युद्धात उतरवण्याचा निर्णय घेतला. संरक्षण मंत्रालयाकडून कारवाईसाठी किती वेळ लागेल, असे विचारले असता अर्जन सिंह यांनी “एका तासात” असे उत्तर दिले आणि भारतीय हवाई दलाने त्यानुसार कारवाई सुरू केली.
१९६५च्या युद्धातील नेतृत्वासाठी त्यांना पद्मविभूषण मिळाले. ते भारतीय हवाई दलाचे पहिले एअर चीफ मार्शल झाले. तर २००२ साली भारत सरकारने त्यांना मार्शल ऑफ द एअर फोर्स हा पंचतारांकित दर्जा बहाल केला. भारतीय हवाई दलाच्या इतिहासात हा दर्जा मिळवणारे ते पहिले आणि एकमेव अधिकारी ठरले.
बीजू पटनायक: काश्मीरपासून… इंडोनेशियापर्यंत
बीजू पटनायक हे केवळ राजकारणी नव्हेत; तर ते धाडसी वैमानिकही होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी अत्यंत धोकादायक भागांत हवाई वाहतूक आणि बचाव मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या. बर्मामधून नागरिकांची सुटका, लष्करी रसद पोहोचवणे आणि युद्धग्रस्त भागांमध्ये विमानसेवा करणे यांसारख्या मोहिमांत त्यांनी सहभाग घेतला.
१९४७ मध्ये काश्मीरवर आदिवासी आक्रमण झाल्यानंतर भारतीय सैन्याच्या श्रीनगरमध्ये हवाईमार्गे तातडीच्या हालचाली सुरू झाल्या. श्रीनगर विमानतळावर २७ ऑक्टोबर १९४७ रोजी पहिल्यांदा उतरलेल्या डकोटाचे विंग कमांडर के. एल. भाटिया हे वैमानिक होते. तर बीजू पटनायक हे त्यानंतरच्या मोहिमांमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सैनिकांना काश्मीरमध्ये पोहोचवले.

पण बीजू पटनायक यांच्या धाडसाची खरी आंतरराष्ट्रीय कहाणी त्याहूनही वेगळी आहे. १९४७ मध्ये इंडोनेशियातील स्वातंत्र्यलढ्याच्या काळात डच सैन्याने इंडोनेशियन नेत्यांवर नियंत्रण आणले होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर बीजू पटनायक यांनी पत्नी ज्ञानवती यांच्या सोबतीने जीवावर उदार होते डकोटा विमानातून मोहीम आखली. त्यांनी डच नियंत्रणाखालील हवाई क्षेत्रात प्रवेश करून इंडोनेशियाचे नेते सुतान स्याहरीर आणि मोहम्मद हट्टा यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
डच सैन्याच्या हवाई नाकेबंदीचा धोका पत्करून ही मोहीम पार पडली. सिंगापूरमार्गे हे नेते भारतात पोहोचले. या साहसामुळे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यास मदत झाली. त्यानंतर इंडोनेशियाने बीजू पटनायक यांना मानद नागरिकत्व आणि ‘भूमिपुत्र’ हा सन्मान दिला.
संकट वेगळे, पण जबाबदारी तिच!
स्मित मच्छार यांच्या आधुनिक बोईंग ७३७ मॅक्सपासून नीरजा भानोट यांच्या पॅन अॅम ७३पर्यंत, देवी शरण यांच्या IC-814पासून राकेश शर्मा यांच्या मिग-२१पर्यंत आणि अर्जन सिंह व बीजू पटनायक यांच्या लष्करी विमानसेवेपर्यंत परिस्थिती वेगवेगळी होती. कुठे कॉकपिटमध्ये हिंसक हल्ला होता, कुठे दहशतवाद्यांचे अपहरण, कुठे युद्धाचे आकाश आणि कुठे शत्रूच्या हवाई क्षेत्रातील धोकादायक मोहीम.
पण या सर्व कथांमध्ये एक समान धागा आहे तो, संकटाच्या क्षणी घाबरून जाण्याऐवजी तत्काळ महत्त्वाचा निर्णय घेण्याचा. विमान चालविण्याचे तंत्र शिकवता येते; आपत्कालीन प्रक्रियाही तोंडपाठ करता येतात; पण शेकडो जीव आपल्या निर्णयावर अवलंबून असताना काही सेकंदांत योग्य कृती करण्यासाठी अनुभव, प्रशिक्षण, मानसिक स्थैर्य आणि कर्तव्याची जाणीव असणे आवश्यक असते. म्हणूनच भारताच्या विमान इतिहासातील या कथा केवळ ‘हवाई शौर्याच्या’ कथा नाहीत तर, ‘आकाशात संकटाच्या क्षणी माणसाची निर्णयक्षमताच त्याला इतिहासात त्याच्यासाठी एक वेगळे स्वतंत्र स्थान निर्माण करते.’, हेच सिद्ध करते.
संदर्भसूची
- Reuters- Captain Smit Machchhar and the Flydubai FZ1073 cockpit attack, 2 October 2026.
- India Today- Smit Machchhar: education, aviation career and FZ1073 incident, 1 October 2026.
- Pan Am Historical Foundation- Remembering Neerja Bhanot on Pan Am Flight 73.
- IC814.com- Historical account of the IC-814 hijacking and Captain Devi Sharan.
- Google Arts & Culture- Rakesh Sharma: 1971 combat missions and 1984 space mission.
- National Defence Academy- Biju Patnaik’s aviation career and World War II missions.
- Rajya Sabha Debates- Biju Patnaik’s 1947 Indonesian rescue mission and Kashmir role.
- Hindustan Times- Biju Patnaik’s Jakarta rescue mission and Dakota aircraft.
- Indian Air Force historical account- 27 October 1947 Srinagar airlift and the first Dakota landing by Wg Cdr K. L. Bhatia.
- Indian Air Force/ Government of India — Tribute to Marshal of Air Force Arjan Singh.
