समुद्राच्या पृष्ठभागावर सर्व काही शांत दिसत असते. बंदरातून जहाजांची ये-जा सुरू असते, किनाऱ्यावर व्यापाराची गजबज असते; पण त्याच पाण्याखाली शत्रूची एखादी पाणबुडी भारतीय किनारपट्टीच्या दिशेने छुप्या पद्धतीने सरकत असेल तर? …तर तिचा माग काढणे हे केवळ आव्हानच नसते, तर देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ती एक महत्त्वाची गरज असते. विशेषतः किनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात अशा पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र क्षमता आवश्यक असते. हीच जबाबदारी पार पाडण्यासाठी भारतीय नौदलाच्या ताफ्यात आता दाखल झाली आहे ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही नवी अद्ययावत युद्धनौका. प्रगत सोनार यंत्रणा, पाणबुडीविरोधी अस्त्रे आणि उथळ पाण्यात चपळाईने हालचाल करण्याची क्षमता असलेल्या या युद्धनौकेमुळे भारताच्या किनारी संरक्षणाला नेमके किती बळ मिळणार?
१२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील नौदल गोदीत या युद्धनौकेचा भारतीय नौदलात समारंभपूर्वक समावेश करण्यात आला. ‘माहे’ वर्गातील ही तिसरी पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका (Anti-Submarine Warfare Shallow Water Craft – ASW-SWC) आहे. किनारपट्टीजवळील सागरी हालचालींवर लक्ष ठेवणे, पाण्याखालील संभाव्य धोक्यांचा माग काढणे आणि गरज पडल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करणे, ही तिच्या निर्मितीमागती प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
गुजरातच्या किनाऱ्याशी जोडलेले नाव
‘आयएनएस मंगरोल’ची निर्मिती कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडने (CSL) केली आहे. ‘माहे’ वर्गातील आठ स्वदेशी युद्धनौकांपैकी ती तिसरी आहे. मुंबईस्थित पश्चिमी नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय वत्सायन यांच्या उपस्थितीत युद्धनौका नौदलात दाखल होण्याचा समारंभ पार पडला. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील मंगरोल या किनारी शहरावरून युद्धनौकेला हे नाव देण्यात आले आहे. मासेमारीचे महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला समृद्ध सागरी परंपरा आहे. यापूर्वीही ‘आयएनएस मंगरोल’ (M85) नावाची युद्धनौका नौदलात होती. समुद्रातील सुरुंगांचा शोध घेणे आणि ते निष्प्रभ करणे यासाठी वापरल्या जाणाऱ्या या ‘माइनस्वीपर’ युद्धनौकेने १९८३ ते २००४ या काळात सेवा बजावली.

नव्या युद्धनौकेच्या बोधचिन्हावर पाच टोकांचे अस्त्र असलेली ‘पंजमुख’ आकृती आहे. नौदलाने समाजमाध्यमांवरील संदेशात तिच्या कार्यपद्धतीची तुलना ‘पाईड किंगफिशर’ पक्ष्याच्या अचूक झेपेशी केली आहे. काळ्या-पांढऱ्या रंगाचा आणि टोकदार चोचीचा हा पक्षी पाण्यावरील हालचालींवर लक्ष ठेवून समुद्रात अचूक सूर मारून भक्ष्याचा वेध घेण्यासाठी ओळखला जातो.
उथळ पाण्यातील युद्धनौकेची वैशिष्ट्ये
किनाऱ्याजवळील समुद्र हा व्यापारी जहाजांचे मार्ग, बंदरे, तेल-वायूविषयक सागरी सुविधा आणि नौदल तळ यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या भागात पाण्याची खोली कमी असल्यामुळे मोठ्या युद्धनौकांच्या तुलनेत आकाराने लहान, चपळ आणि उथळ पाण्यात वेगात काम करू शकणाऱ्या युद्धनौका अधिक उपयुक्त ठरतात. ‘माहे’ वर्गातील युद्धनौकांची रचना याच गरजेनुसार करण्यात आली आहे. त्यांची लांबी ७८ मीटर, कमाल रुंदी ११.३६ मीटर आणि डिस्प्लेसमेंट ८९६ ते १,१०० टन आहे. त्या ताशी सुमारे ४६ किलोमीटर म्हणजेच २५ सागरी मैल इतका कमाल वेग गाठू शकतात. एकदा इंधन भरले की, सुमारे १,८०० सागरी मैल, म्हणजेच ३,३३३ किलोमीटर अंतर पार करण्याची त्यांची क्षमता आहे.
या युद्धनौकांमध्ये डिझेल इंजिन आणि वॉटरजेट प्रोपल्शन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या प्रणालीत पाणी खेचून ते वेगाने मागच्या दिशेने सोडले जाते आणि त्यातून जहाजाला पुढे जाण्यासाठी मोठा वेग मिळतो. त्यामुळे मर्यादित जागेत दिशा बदलणे आणि चपळपणे हालचाल करणे सोपे होते. भारतीय नौदलातील डिझेल-वॉटरजेट प्रोपल्शन प्रणाली वापरणाऱ्यांमध्ये या वर्गातील युद्धनौका सर्वात मोठ्या आहेत. पाणबुडीविरोधी कारवायांमध्ये जहाजाच्या स्वतःच्या यंत्रणांमधून निर्माण होणारा आवाजही महत्त्वाचा असतो. तो कमी ठेवता आल्यास पाण्याखालील ध्वनींचे विश्लेषण आणि संभाव्य लक्ष्याचा माग काढणे अधिक परिणामकारक ठरू शकते. या वर्गाच्या रचनेत अशा बाबींचा विचार करण्यात आला आहे.
सोनारमुळे पाण्याखाली अचूक लक्ष्यवेध
या युद्धनौकेतील सर्वात महत्त्वाच्या यंत्रणांपैकी एक म्हणजे सोनार. ध्वनिलहरींच्या साहाय्याने पाण्याखालील वस्तूंचा शोध घेणे आणि त्यांचा मागोवा घेणे हे सोनारचे प्रमुख काम आहे. समुद्रातील ध्वनींचे स्वरूप आणि त्यांचे परावर्तन यांचे विश्लेषण करून संभाव्य पाणबुडीची उपस्थिती नेमकी ओळखण्यास मदत मिळते. उथळ पाण्यात सागरतळाची रचना आणि ध्वनिलहरींचे परावर्तन यांमुळे पाणबुडीचा शोध घेणे गुंतागुंतीचे ठरू शकते. त्यामुळे प्रगत सोनार यंत्रणांबरोबरच प्रशिक्षित कर्मचारी आणि इतर सेन्सर्सकडून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषणही महत्त्वाचे असते.
युद्धनौकेवरील रडारचा वापर पृष्ठभागावरील जहाजे आणि हवाई हालचालींचा माग घेण्यासाठी केला जातो, तर सोनार पाण्याखालील स्थिती समजून घेण्यास मदत करते. या दोन्ही यंत्रणांकडून मिळणारी माहिती, संवाद व्यवस्था आणि एकात्मिक नियंत्रण प्रणाली यांच्या आधारे नौदलाचे कर्मचारी पुढील कारवाईचे नियोजन करू शकतात. संभाव्य लक्ष्याचा शोध घेण्याबरोबरच त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी या युद्धनौकांमध्ये टॉर्पेडो अर्थात पाणतीर आणि बहुउद्देशीय पाणबुडीविरोधी रॉकेट यांचा समावेश आहे. पाणतीर हे पाण्यातून प्रवास करून पाणबुडीसारख्या लक्ष्यावर प्रहार करणारे महत्त्वाचे अस्त्र आहे. मात्र, प्रत्यक्ष कारवाईसाठी लक्ष्याचे नेमके स्थान, अंतर आणि उपलब्ध माहितीचे अचूक मूल्यमापन आवश्यक असते.
पाणबुडीविरोधी मोहिमांव्यतिरिक्त या युद्धनौका पाण्याखाली टेहळणी, शोध व बचावकार्य (Search and Rescue), कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा (Low Intensity Maritime Operations) आणि समुद्रात सुरुंग पेरण्याच्या कामांसाठीही वापरता येतील. त्यांची निर्मिती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ‘डेट नॉर्स्के व्हेरिटास’ (DNV) या संस्थेच्या वर्गीकरण मानकांनुसार करण्यात आली आहे.
जुन्या युद्धनौकांची जागा घेणार
भारतीय नौदलाकडे यापूर्वी किनारपट्टीवरील गस्त आणि पाणबुडीविरोधी कारवायांसाठी ‘अभय’ वर्गातील चार कॉर्व्हेट युद्धनौका होत्या. सोव्हिएत काळातील ‘पाऊक-द्वितीय’ वर्गावर आधारित या युद्धनौका आकाराने लहान आणि वेगवान होत्या. मात्र, अनेक दशकांच्या सेवेनंतर या वर्गातील युद्धनौका २०१७ ते ऑक्टोबर २०२५ या काळात निवृत्त झाल्या. जुन्या युद्धनौकांची जागा घेण्यासाठी आणि किनारी संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) डिसेंबर २०१३ मध्ये पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील १६ युद्धनौकांच्या खरेदीला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा खर्च १३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड आणि कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) यांना प्रत्येकी आठ युद्धनौका बांधण्याचे काम देण्यात आले.
जीआरएसईकडून ‘अर्नाळा’ वर्गातील अर्नाळा, अंद्रोथ, अंजदीप, अमिनी, अभय, अग्रय, अजय आणि अक्षय या आठ युद्धनौका बांधण्यात येत आहेत. कोचीन शिपयार्डकडून ‘माहे’ वर्गातील माहे, मालवण, मंगरोल, मालपे, मुल्की, मगदला, मनपाड आणि मच्छलीपट्टणम या युद्धनौकांची निर्मिती सुरू आहे. संपूर्ण ताफा पुढील दोन ते तीन वर्षांत नौदलात दाखल होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पातील ८० टक्क्यांहून अधिक सामग्री स्वदेशी असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे युद्धनौकांच्या निर्मितीबरोबरच नौदलासाठी आवश्यक यंत्रणा विकसित करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करणे या क्षेत्रांतील देशांतर्गत क्षमतेलाही चालना मिळत आहे.
सागरी सुरक्षेत महत्त्वाची भर
भारताची किनारपट्टी सुमारे ११ हजार किलोमीटर लांब असून देशात १२ प्रमुख बंदरे, १८४ लहान बंदरे आणि १,१९७ बेटे आहेत. एवढ्या विस्तीर्ण सागरी क्षेत्रात बंदरे, व्यापारी जहाजांचे मार्ग, ऊर्जा प्रकल्प आणि नौदल तळ यांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. ‘माहे’ वर्गातील युद्धनौका किनाऱ्याजवळील पाणबुडीविरोधी मोहिमांसाठी महत्त्वाची क्षमता ठरतील. विशेषतः गुप्तपणे हालचाल करणाऱ्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा माग घेण्यासाठी त्यांची चपळता आणि सोनार यंत्रणा उपयुक्त ठरू शकेल. किनारी रडार, पाण्याखालील सेन्सर्स आणि सागरी गस्ती विमानांबरोबर समन्वय साधल्यास संभाव्य धोक्याची माहिती अधिक व्यापक स्वरूपात मिळवता येईल.
या युद्धनौकांमुळे मोठ्या युद्धनौकांवरील किनारी संरक्षणाच्या कामाचा ताणही कमी होऊ शकतो. परिणामी, मोठ्या युद्धनौकांना खोल समुद्रातील मोहिमा आणि दीर्घ पल्ल्याच्या सागरी सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. ‘आयएनएस मंगरोल’चा नौदलातील समावेश हा भारताच्या सागरी संरक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी केवळ समुद्राच्या पृष्ठभागावरील हालचालींवर लक्ष ठेवणे पुरेसे नसून, पाण्याखाली दडलेल्या संभाव्य धोक्यांचाही माग घेणे आवश्यक आहे. स्वदेशी युद्धनौका, प्रगत सेन्सर्स आणि विविध संरक्षण यंत्रणांमधील समन्वय यांच्या आधारे भारतीय नौदलाला या आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यास मदत होईल.
