मानवी इतिहासात मृत्युदंड देण्यासाठी वापरल्या गेलेल्या विविध पद्धतींचा विचार केला, तर माणसाच्या कल्पकतेचा आणि क्रौर्याचा एक अस्वस्थ करणारा पैलू समोर येतो. सुळावर चढवणे, फासावर लटकवणे, शिरच्छेद करणे आणि जाळून मारणे अशा पद्धतींबरोबरच गुन्हेगारांना यातना देण्यासाठी अनेक प्रकारची साधने वापरल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात. अशाच साधनांपैकी एक म्हणून ‘आयर्न मेडन’ (Iron Maiden) म्हणजेच खिळ्यांची पेटी प्रसिद्ध आहे.
मानवी शरीराच्या आकाराची, लोखंडी आवरण असलेली आणि आतील बाजूस टोकदार खिळे बसवलेली ही पेटी एखाद्या व्यक्तीला आत बंद करून त्याला भयंकर यातना देण्यासाठी वापरली जात असे, असे अनेक लोकप्रिय ऐतिहासिक कथनांमध्ये सांगितले जाते. मात्र, या कथेमागील ऐतिहासिक सत्य तपासले असता वेगळीच बाब समोर येते. हे साधन मध्ययुगात मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. उलट, त्याची भीषण प्रतिमा प्रामुख्याने अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील लिखाणातून आणि प्रदर्शनांमधून लोकप्रिय झाली.
आयर्न मेडनची लोकप्रिय प्रतिमा एखाद्या उंच, बंदिस्त लोखंडी कपाटासारखी आहे. या कपाटाला समोरच्या बाजूने उघडणारे दार असून, आतील बाजूस टोकदार धातूचे खिळे बसवलेले असतात. एखाद्या व्यक्तीला त्यामध्ये उभे करून दार बंद केले, तर हे खिळे शरीरात रुतून गंभीर जखमा होतील आणि अखेरीस मृत्यू होईल, अशी या साधनाची भयावह रचना असल्याचे चित्रण केले जाते. काही चित्रणांमध्ये खिळ्यांची रचना अशा प्रकारे दाखवली जाते की व्यक्तीचा मृत्यू तात्काळ न होता तिला दीर्घकाळ यातना सहन कराव्या लागतं आणि हालहाल होऊन मृत्यू येत असे.
अशा या अतिरंजित वर्णनांमुळे आयर्न मेडन हे मध्ययुगीन युरोपातील सर्वांत क्रूर यातनासाधनांपैकी एक मानले जाऊ लागले.
किल्ल्यांतील अंधाऱ्या तळघरांमध्ये कैद्यांना अशा पेट्यांमध्ये बंद केले जात असे, अशा कथाही लोकप्रिय झाल्या. चित्रपट, भयकथा, ऐतिहासिक कादंबऱ्या आणि विविध संग्रहालयांतील प्रतिकृतींमुळे या साधनाची प्रतिमा अधिकच दृढ झाली. परंतु एखादे साधन भयावह दिसते किंवा त्याच्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत, एवढ्यावरून त्याचा प्रत्यक्ष वापर झाल्याचे सिद्ध होत नाही.
जर्मनीतील न्युरेम्बर्ग शहराशी आयर्न मेडनची सर्वांत प्रसिद्ध कथा जोडली जाते.
अठराव्या शतकातील जर्मन लेखक योहान फिलिप झीबेनकीस याने १७९३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतानुसार, १४ ऑगस्ट १५१५ रोजी बनावट नाणी तयार केल्याचा आरोप असणाऱ्या एका व्यक्तीला या साधनाद्वारे मृत्युदंड देण्यात आला होता, असा दावा केला जातो. कथेनुसार, त्या व्यक्तीला खिळे लावलेल्या लोखंडी पेटीत बंद करून यातना देण्यात आल्या. मात्र, या कथेला आधार देणाऱ्या नोंदींचा इतिहास तपासला असता महत्त्वाची विसंगती लक्षात येते. कथित घटनेनंतर जवळजवळ तीनशे वर्षांनी हा वृत्तांत प्रसिद्ध झाला. त्या काळातील समकालीन न्यायालयीन नोंदी किंवा अन्य स्वतंत्र दस्तऐवजांतून या अशा प्रकारच्या विशिष्ट पद्धतीने देण्यात आलेल्या शिक्षेची खात्री पटत नाही.
एकोणिसाव्या शतकात आयर्न मेडनच्या कथेला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्या काळात युरोपमध्ये मध्ययुगीन किल्ले, अंधारी कारागृहे, गूढ ऐतिहासिक वस्तू आणि क्रूर शिक्षापद्धती यांविषयी लोकांमध्ये मोठे आकर्षण होते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऐतिहासिक वस्तूंची प्रदर्शने भरवली जात असत. अशा वातावरणात आयर्न मेडनसारख्या साधनाला भयावह इतिहासाचे प्रतीक म्हणून सादर करण्यात आले. पुढे त्याच्या प्रतिकृती विविध प्रदर्शनांमध्ये दिसू लागल्या आणि या साधनाच्या अस्तित्वाबद्दलचा समज अधिक दृढ झाला. कालांतराने या पेटीशी संबंधित कथांनी लोकप्रिय संस्कृतीत स्थान मिळवले आणि तिचा मध्ययुगीन क्रौर्याशी असलेला संबंध अधिक गडद होत गेला.
आयर्न मेडनची कल्पना पूर्णपणे आधुनिक काळातच जन्माला आली, असे म्हणणेही अतिसुलभीकरण ठरेल. प्राचीन काळातील काही लिखित वृत्तांतांमध्ये टोकदार धातूंचा वापर करून यातना देणाऱ्या यंत्रांसारख्या रचनांचे वर्णन आढळते. त्यांपैकी एक उल्लेख प्राचीन ग्रीसमधील स्पार्टाचा शासक नाबिस याच्याशी संबंधित आहे. ग्रीक इतिहासकार पॉलीबियसने नाबिसच्या क्रौर्याविषयी लिहिताना ‘अपेगा’ (Apega) नावाच्या यांत्रिक आकृतीचा उल्लेख केला आहे. ही आकृती नाबिसच्या पत्नीच्या रूपावरून तयार केली होती, असे कथन आहे. तिच्या बाह्यरूपाखाली धातूचे टोकदार भाग असल्याचे वर्णन आढळते. नाबिसला पैसे देण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींना या आकृतीच्या मिठीत ओढून घेऊन त्यांच्यावर दबाव आणला जात असे, अशी कथा सांगितली जाते. परंतु या यंत्राचे प्रत्यक्ष अस्तित्व सिद्ध करणारा पुरातत्त्वीय पुरावा उपलब्ध नाही. अपेगा आणि आयर्न मेडन या दोन्हींच्या कथांमध्ये टोकदार धातूंच्या साहाय्याने वेदना देण्याची कल्पना दिसत असली, तरी ही दोन्ही साधने एकच होती किंवा त्यांचा वापर एकाच पद्धतीने केला जात असे, असे म्हणता येत नाही.
आयर्न मेडनच्या कथेबाबत संशय असला, तरी मध्ययुगीन युरोपमध्ये शिक्षा आणि यातना दिल्या जात नव्हत्या, असा त्याचा अर्थ नाही. त्या काळातील न्यायव्यवस्था आजच्या मानवी हक्कांच्या निकषांपेक्षा खूप वेगळी होती. गुन्ह्याचे स्वरूप, सामाजिक स्थान, राजकीय निष्ठा आणि धार्मिक आरोप यांनुसार शिक्षा ठरत असत. काही ठिकाणी सार्वजनिक शिरच्छेद, फाशी, चाबकाचे फटके, कैद आणि इतर कठोर शिक्षा दिल्या जात असत. चौकशीच्या काही पद्धतींमध्ये कैद्यांना शारीरिक वेदना देण्याचाही वापर केला जात असे.
राजसत्तेला विरोध करणारे, देशद्रोहाचा आरोप असलेले किंवा गंभीर गुन्ह्यांत दोषी ठरलेले लोक सार्वजनिक शिक्षेचे लक्ष्य बनत असत. अशा शिक्षांचा उद्देश केवळ गुन्हेगाराला शिक्षा देणे नव्हता, तर इतर लोकांमध्ये भीती निर्माण करणे आणि सत्तेचा अधिकार दाखवणे हाही होता. सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या शिक्षांमुळे राजसत्तेची ताकद लोकांसमोर प्रदर्शित होत असे. त्यामुळे शिक्षा ही केवळ न्यायदानाची प्रक्रिया न राहता सामाजिक नियंत्रणाचे आणि राजकीय सत्तेचे साधनही बनत असे.
मात्र, या प्रत्यक्ष नोंद असलेल्या शिक्षापद्धतींच्या इतिहासात आयर्न मेडनसारख्या खिळ्यांच्या पेटीचा व्यापक आणि नियमित वापर झाल्याचे ठोस पुरावे मिळत नाहीत. म्हणूनच इतिहासकार मध्ययुगातील वास्तविक क्रौर्य आणि नंतरच्या काळात लोकप्रिय झालेल्या भयावह आख्यायिका यांच्यात फरक करण्यावर भर देतात. खिळ्यांच्या पेटीविषयीच्या कथांमध्येही भय निर्माण करण्याचा घटक महत्त्वाचा आहे. अशा साधनाचे वर्णन ऐकल्यावर कोणाच्याही मनात दहशत निर्माण होऊ शकते. मात्र, एखाद्या साधनाची भयावह प्रतिमा आणि त्याच्या प्रत्यक्ष वापराचे ऐतेहासिक पुरावे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
आयर्न मेडनच्या बाबतीत सर्वांत महत्त्वाचा निष्कर्ष असा की, खिळ्यांनी भरलेल्या बंदिस्त पेटीत माणसाला ठेवून यातनामयी मृत्युदंड देण्याची प्रसिद्ध कथा मध्ययुगीन युरोपच्या इतिहासातील निर्विवाद सत्य नाही. या साधनाविषयीच्या कथा अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकात लोकप्रिय झाल्या. त्यानंतर प्रदर्शनांमधील मांडण्यात आलेले त्याची प्रतिकृती, चित्रे आणि लोकप्रिय लिखाण यामुळे त्याला मध्ययुगीन क्रौर्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्याचा व्यापक वापर सिद्ध करणारे समकालीन पुरावे उपलब्ध नाहीत.
