IPO Multibagger Returns and Share Market: शेअर बाजारात सध्या आयपीओची (IPO) लाट आली आहे. प्रत्येक नवीन आयपीओ बाजारात आला की त्यात पैसे गुंतवून पहिल्याच दिवशी तुफान नफा (Listing Gain) कमावण्याची किंवा तो शेअर ‘मल्टीबॅगर’ होण्याची अपेक्षा नवोदित गुंतवणूकदार बाळगून असतात. परंतु, बाजारात येणारा प्रत्येक आयपीओ खरोखरच मल्टीबॅगर ठरतो का? इतिहासातील यशस्वी आणि अपयशी आयपीओचा अभ्यास केला तर उत्तर नक्कीच ‘नाही’ असे येते.
गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरणाऱ्या पर्यायात जुना जाणता म्हणजे पब्लिक इश्यूमध्ये पैसे गुंतवणे. आता पन्नाशी उलटलेल्या आणि आपल्या उमेदीच्या काळात शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केलेल्या जवळपास सगळ्याच गुंतवणूकदारांनी पब्लिक इश्यूचे महत्व अधोरेखित केले आहे. भविष्यकालीन वेध घेऊन आपले पैसे एका चांगल्या कंपनीच्या पब्लिक इश्यू मध्ये गुंतवून आरामात तो शेअर वाढताना बघणे हे त्यांच्या नशिबी आले. पण गेल्या पाच वर्षाचा भारतातील शेअर मार्केटचा अभ्यास केल्यास परिस्थिती कुठेतरी बदलताना दिसते. नवोदित गुंतवणूकदारांना पब्लिक इश्यूतील खाचा खोचा माहीत नसतानाही ‘युफोरिया’ म्हणून प्रत्येक इश्यू मध्ये पैसे गुंतवायचे आणि लिस्टिंगच्या दिवशी त्यातून बाहेर पडायचे म्हणजेच शेअर्स विकायचे अशी मानसिकता हळूहळू बळावू लागली आहे.
त्यामुळेच की काय पब्लिक इश्यूतील महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यायला हवेत. पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजेच ज्या कंपनीचे शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांना बाजारात विकत घेण्यासाठी उपलब्ध आहेत अशी होय. जेव्हा कंपनी ‘पब्लिक होते’ तेव्हा आपल्या कॅपिटलपैकी काही हिस्सा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खुला करते, यालाच खुली भाग विक्री / पब्लिक इश्यू असे म्हणतात. उदाहरण एका कंपनीचं कॅपिटल शंभर कोटी आहे कंपनीला २०% हिस्सा विक्री करायचा आहे, याचाच अर्थ ते शेअर्स पब्लिक इश्यूमध्ये विकत घेता येतात व त्यानंतर कंपनीच्या मालकीपैकी ८० टक्के मालकी प्रमोटर्सची (जे व्यवसाय सुरू करतात ते) आणि उरलेली २०% गुंतवणूकदारांची असा त्याचा अर्थ होतो.

ऑफर फॉर सेल आणि फ्रेश इश्यू
सामान्यपणे जेव्हा एखादी कंपनी सुरू होते, तेव्हा त्यात वेगवेगळे गुंतवणूकदार आपला पैसा गुंतवत असतात. कंपनी जेव्हा खुल्या बाजारात येते तेव्हा गुंतवणूकदारांना जे शेअर्स मिळतात ते कोणत्यातरी आधीच्या गुंतवणूकदाराने आपला हिस्सा विकल्यामुळे मिळत असतील तर त्याला ‘ऑफर फोर सेल’ असे म्हणतात. उदाहरण अलीकडेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा पब्लिक इश्यू आला. त्यामध्ये जेव्हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुरू झाले त्यावेळी ज्या कंपन्यांनी त्यात पैसे गुंतवले होते त्यांनी आपले शेअर्स खुल्या बाजारात विकले. म्हणजेच जेव्हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या पब्लिक इश्यू मध्ये लोकांनी पैसे गुंतवले तेव्हा तो गुंतवणूकदारांना कंपनीच्या जुन्या गुंतवणूकदारांना एक्झिट करण्याचा मार्ग होता.
याउलट कंपनीला व्यवसाय मोठा करण्यासाठी जेव्हा अधिक भांडवल लागते तेव्हा कंपनी फ्रेश इश्यू करते म्हणजेच कंपनीचे कॅपिटल शंभर कोटी आहे. आणखी ३० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून उभे करायचे म्हणजे नवीन कॅपिटल १३० कोटी होईल. गेल्या दहा वर्षात गाजलेल्या आणि वाजलेल्या दोन्ही प्रकारच्या आयपीओचा विचार करायचा झाल्यास त्यात बऱ्याच अंशी ‘ऑफर फॉर सेल’ हाच पर्याय होता !
म्हणजेच काही वर्षांपूर्वी अत्यंत कमी किमतीला कंपनीचे विकत घेतलेले शेअर्स आयपीओच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रीमियमवर विकायची संधीच त्यांना मिळते !
आयपीओचा उद्देश काय ?
गुंतवणूकदारांना कंपनीचे नाव आकर्षक वाटत असले तरीही त्यांनी जो इश्यू बाजारात आणला आहे त्यामागे हेतू काय आहे हे कळणे महत्त्वाचे आहे.
- ·कंपनीवरच्या कर्जाची परतफेड करणे
- ·भविष्यकालीन धोरणात्मक गुंतवणूक
- ·जुन्या गुंतवणूकदारांना एक्झिट देणे
यापैकी नेमके कोणते उद्दिष्ट आहे हे आपण वाचले पाहिजे. तुमच्याकडून जमा केलेल्या पैशाचा वापर कंपनीच्या डोक्यावरची जुनी कर्ज फेडण्यासाठी होत असेल तर ती कंपनी खरोखरच तोलामोलाची आहे का याचा विचार करावा लागेल.
आयपीओतील जोखमी कुठल्या?
किंमत रास्त आहे का ?
पब्लिक इश्यू मध्ये जो प्राईस बँड दिला जातो त्याचा नीट अभ्यास झाला पाहिजे. समजा एखाद्या कंपनीचा शेअर ज्याची फेस व्हॅल्यू / दर्शनी मूल्य दहा रुपये आहे तो बाराशे रुपयांना विकला जातो. याचाच अर्थ कंपनी त्यावर दणदणीत प्रीमियम आकारात आहे एवढे त्या कंपनीचे बळकट स्थान आहे का, याचा विचार करायला पाहिजे.
मागील तीन वर्षातील नफा
ज्यावर्षी कंपनीला बाजारात आपला इश्यू आणायचा असतो त्याच्या एक-दोन वर्ष आधीपासून कंपनीचे चित्र गोंडस दिसेल याची पूर्ण सोय मॅनेजमेंट कडून केली जाते. नफ्याचे आकडे सतत वाढते दिसले पाहिजेत अशा पद्धतीने बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केले जातात. अशावेळी यात काही अविश्वसनीय किंवा काळेबेरे तर वाटत नाही ना, हे वाचले पाहिजे.
लॉक इन नंतरची स्थिती
जेव्हा कंपनीचा इश्यू बाजारात येतो त्यावेळी प्रमोटर / संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बडे गुंतवणूकदार यांना लॉक इन कालावधी असतो. म्हणजेच शेअर बाजारात कंपनीची नोंदणी झाल्यावर कमीत कमी एवढे दिवस शेअर्स विकता येणार नाहीत अशी अट असते. समजा ती अट १८० दिवसाची असेल तर त्यानंतर अचानकपणे हे गुंतवणूकदार आपले शेअर्स खुल्या बाजारात विकायला सुरुवात करतात व अशावेळी गुंतवणूकदारांना अंदाज येत नाही की इतके दिवस छान चाललेल्या कंपनीचे हे असे काय होत आहे ?
बिझनेस मॉडेल समजून घेऊया
- कोणत्याही कंपनीचा लेखाजोखा जसा महत्त्वाचा तसाच कंपनीचा अभ्यासही महत्त्वाचा.
- ·आपण ज्या कंपनीच्या इश्यू मध्ये पैसे गुंतवतो आहोत त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल काय आहे ?
- ·कंपनीला नेमका व्यवसाय कुठून मिळतो ?
- ·त्यामध्ये धोके / जोखीम कुठली आहे ?
- ·मागील दोन वर्षांपासून कंपनीला होत असलेला फायदा कृत्रिमरित्या फुगवलेला तर नाही ना ?
- ·कंपनीला व्यवसाय करून नफा होतोय का जुन्या मालमत्ता विकून नफा होतोय ?
- ·जागतिक व्यापाराच्या तेजी-मंदीच्या चक्रात नेमकी कंपनी कुठे आहे ?
कंपनीला कोणती जोखीम संभवू शकते याचा अंदाज घ्यायला हवा.
रेड हेरिंग प्रोस्पेक्टस RHP
या डॉक्युमेंटमध्ये कंपनीच्या जोखीम आणि व्यवसायासंबंधी सविस्तरपणे माहिती दिलेली असते ती वाचल्याशिवाय नावावर भुलून गुंतवणूक करणे टाळावे.
लिस्टिंग गेन हमखास मिळतो का ?
समजा एखाद्या कंपनीचा पब्लिक इश्यू १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत खुला आहे व त्यानंतर ४ डिसेंबरला तो बाजारात येणार आहे म्हणजेच त्याचे लिस्टिंग होणार आहे. लिस्टिंगच्या दिवशी मिळालेले शेअर्स खरेदी केलेल्या भावापेक्षा सड्या भावात विकून कमी वेळात पैसे कमावूया असा विचार प्रत्येक वेळी यशस्वी ठरतोच असे नाही. कंपनीचे नाव ,कंपनी ज्या उद्योगपती घराण्याची आहे त्याच्या नावावरून, कंपनीने केलेल्या जाहिरातबाजी वरून बऱ्याच वेळा पब्लिक इश्यूला जोरदार प्रतिसाद मिळतो. मात्र पहिल्या दिवशी मिळणारे फायदे मिळत नाहीत. म्हणजेच ती कंपनी वाईट असते असेही नाही काही. सुरुवातीला काहीसा सुचवलेला शेअर हळूहळू वाढायला लागून नंतर मल्टीबॅगर सुद्धा होतो.
- कंपनीचे बिझनेस मॉडेल बिनतोड असेल पण शेअर बाजारात एकूणच घसरलेल्या स्थितीत आहेत घसरणीच्या आणि म्हणून शेअर पब्लिक इश्यू बाजारात आल्यानंतर पडतो आहे अशावेळी कॉन्ट्रा कॉल म्हणून त्यात गुंतवणूक करता येते.
- गाजलेले आणि वाजलेले काही पब्लिक इश्यू
- Bectors Food Specialities
- One 97 Communications (Paytm)
- Happiest Minds Technologies
- SBI Cards and Payment Services
- JSW Infrastructure
- Mazagon Dock Shipbuilders
- Tata Technologies
