Kalmegh Plant Benefits: आपण राहतो त्या परिसरात अनेक औषधी वनस्पती आढळतात. काही वनस्पतींची ओळख त्यांच्या विशिष्ट गंधामुळे, तर काहींची चवीमुळे वेगळी ओळख निर्माण झालेली असते. मात्र,या ओळखीवरुन अंगभूत गुणांची पारख होतेच असं नाही. कालमेघ ही अशीच एक वनस्पती. चवीला अत्यंत कडू. कडूचिरायता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीला संस्कृतमध्ये भूनिंब असंही म्हणतात. या कडू भूनिंबाचा शेवटी उपयोग काय, असा प्रश्नही काहींना पडू शकतो. मात्र पारंपरिक औषधपद्धतींमध्ये या वनस्पतीचा वापर दीर्घ काळापासून केला जात असून, या घटकेला आधुनिक वनस्पतिशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्रात तिच्यातल्या जैवसक्रिय घटकांचा अभ्यासही प्राधान्याने केला जात आहे.
बहुदेशीय अस्तित्व
कालमेघाचं शास्त्रीय नाव Andrographis paniculata (Burm.f.) Nees असं आहे. तिच्या तीव्र कडू चवीमुळे इंग्रजीमध्ये तिला ‘King of Bitters’ असंही संबोधलं जातं. ही वनस्पती अकँथेसी- Acanthaceae-म्हणजेच वासक कुळातली सदस्य आहे. तर भारतासह दक्षिण आणि आग्नेय आशियातील अनेक देशांत तिचं अस्तित्व आढळतं.
कालमेघाचं वैशिष्ट्य काय?
कालमेघ ही साधारणपणे ३० ते १०० सेंमी उंच वाढणारी वर्षायू वनस्पती आहे. तिचं खोड हिरवं, चौकोनी आणि शाखायुक्त असतं. पानं साधी, समोरासमोर, लांबट आणि टोकाकडे निमुळती झालेली असतात. फांद्यांच्या टोकाला किंवा पानांच्या बगलेत लहान, पांढरट फुलं येतात. त्यांच्या पाकळ्यांवर जांभळट रंगाच्या रेषा दिसतात. फुलांनंतर शेंगेसारखी फळं तयार होतात. त्यामध्ये असलेल्या बियांपासून या वनस्पतीची नवीन रोपं तयार होतात.
इतका कडूपणा कशापायी?
कालमेघाच्या औषधी गुणवत्तेचा विचार करताना तिच्यातील रासायनिक घटकांचा अभ्यास आवश्यक ठरतो. या पैकी अँड्रोग्रॅफोलाइड- Andrographolide हा एक प्रमुख जैवसक्रिय घटक आहे. तो diterpenoid lactone या रासायनिक गटात मोडणारा आहे. याशिवाय Neoandrographolide, इतर diterpenoid lactones आणि विविध flavonoids हे घटकही या वनस्पतीमध्ये आढळून आले आहेत. मुख्य म्हणजे, कालमेघाच्या अंगभूत कडू चवीसाठी प्रामुख्याने अँड्रोग्रॅफोलाइडसारखे घटक कारणीभूत असतात,हे सिद्ध झालं आहे.
पारंपरिक औषधपद्धतीत महत्त्व काय?
आयुर्वेदामध्ये कालमेघाला तिक्त रसप्रधान वनस्पती मानलं जातं. पारंपरिक आयुर्वेदिक दृष्टिकोनानुसार तिचं वर्णन पित्त-कफशामक, दीपक आणि पाचक गुणधर्म असलेल्या वनस्पतीच्या स्वरूपात केलं जातं. दीपक म्हणजे भूक वाढविण्यास मदत करणारे, तर पाचक म्हणजे पचनक्रियेला सहाय्य करणारे गुणधर्म. ताप,पचनाशी संबंधित तक्रारी आणि यकृताच्या आरोग्याशी निगडित काही विकारांमध्ये कालमेघाचा पारंपरिक औषधपद्धतीनुसार वापर केला जातो.
सूक्ष्मजीवविरोधी घटकांचं काय?
कालमेघाचा वापर विशेषतः ताप आणि सर्दी-खोकल्यासारख्या लक्षणांशी संबंधित पारंपरिक उपचारांमध्ये केला जातो. घसादुखी आणि श्वसनमार्गाच्या काही तक्रारींमध्येही या वनस्पतीपासून तयार केलेल्या औषधी उत्पादनांचा वापर केला जातो. कालमेघातील अँड्रोग्रॅफोलाइड या घटकाच्या संभाव्य दाहशामक आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मांचा प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात आला आहे.
डेंग्यू, मलेरियातही उपयोगी?
काही अभ्यासांमध्ये असं आढळून आलं आहे की कालमेघमध्ये असलेल्या विशिष्ट औषधी घटकांमुळे सर्दी तसेच डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या तापाच्या गंभीर आजारांमध्ये ती परिणामकारक ठरू शकते. तथापि,अजून या आजारांवरील उपचार म्हणून ही वनस्पती प्रभावी असल्याचं सिद्ध करणारे पुरेसे दर्जेदार मानवी पुरावे उपलब्ध नाहीत. डेंग्यू हा विषाणूमुळे,तर मलेरिया हा Plasmodium या परजीवीमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे या दोन्ही आजारांचं निदान आणि उपचार हे वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच होणं आवश्यक आहे.
रोगप्रतिकारक शक्तिवर्धक?
कालमेघ या वनस्पतीमधल्या घटकांचा रोगप्रतिकारक यंत्रणेवर होणारा संभाव्य परिणाम हा संशोधनाचा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. प्रयोगशाळीय आणि प्रायोगिक अभ्यासांमध्ये रोगप्रतिकारक प्रतिसादाशी संबंधित काही जैविक क्रियांचं परीक्षण करण्यात आलं आहे. अँड्रोग्रॅफोलाइडच्या दाहशामक आणि इतर संभाव्य औषधीय गुणधर्मांचाही अभ्यास केला जात आहे. मात्र,या निष्कर्षांवरून कालमेघाचं सेवन केल्यानं मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती निश्चितपणे वाढते, असा निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी अधिक दर्जेदार मानवी संशोधनाची आवश्यकता आहे.
संशोधनाची दिशा कोणती?
कालमेघाच्या औषधी गुणधर्मांविषयी Hossain आणि सहकाऱ्यांनी २०१४ मध्ये The Scientific World Journal या नियतकालिकात एक आढावा लेख प्रसिद्ध केला. या लेखामध्ये वनस्पतीचे पारंपरिक उपयोग, रासायनिक घटक आणि औषधीय गुणधर्म यांची चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर Hossain आणि सहकाऱ्यांनी २०२१ मध्ये Life या नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या संशोधन आढावा लेखात कालमेघाचे रासायनिक संघटन, सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म, मानवी अभ्यास आणि सुरक्षितता यांविषयी उपलब्ध माहितीचं मूल्यमापन केलं. या संशोधनांमुळे कालमेघाच्या संभाव्य औषधी उपयोगांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, प्रयोगशाळेत किंवा प्राण्यांवर दिसणारे परिणाम मानवी शरीरात तितक्याच प्रमाणात दिसतील, याची खात्री नसते, हेही आपण लक्षात ठेवलेलं बरं.
यकृत संरक्षक गुणधर्म किती?
यकृताच्या आरोग्याशी संबंधित पारंपरिक वापरामुळेही कालमेघाचा अभ्यास केला जात आहे. काही प्रायोगिक संशोधनांमध्ये तिच्यातील घटकांच्या संभाव्य यकृतसंरक्षक गुणधर्मांचं परीक्षण करण्यात आलं आहे. तथापि,यकृत विकारांवरचे उपचार म्हणून कालमेघाची परिणामकारकता आणि सुरक्षितता सिद्ध करण्यासाठी अधिक दर्जेदार मानवी संशोधन आवश्यक आहे. कावीळ, हिपॅटायटिस किंवा यकृताच्या इतर गंभीर विकारांमध्ये केवळ या वनस्पतीवर अवलंबून राहणं धोकादायक ठरु शकतं.
औषधी सेवनाबाबत खबरादारी का घ्यावी?
अर्थातच निसर्गात आढळणाऱ्या औषधी वनस्पती प्रत्येकासाठी सुरक्षित असतात, असा समज करून घेणंही योग्य नाही. यासंदर्भाने कालमेघाचं उदाहरण द्यायचं झालं तर, या वनस्पतीपासून तयार होणाऱ्या औषधाच्या सेवनामुळे काही व्यक्तींना पोटाशी संबंधित अपाय किंवा अॅलर्जी होऊ शकते. याशिवाय इतर औषधांबरोबर होणाऱ्या संभाव्य परस्परक्रियांचाही विचार करावा लागतो. विशेषतः गर्भवती महिला,स्तनपान देणाऱ्या महिला,दीर्घकालीन आजारांसाठी नियमित औषधं घेणाऱ्या व्यक्ती आणि शस्त्रक्रियेला सामोरं जाणाऱ्या रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय कालमेघाचा औषधी वापर करू नये. काढा, अर्क किंवा पूरक औषधांच्या स्वरुपात सेवन करण्याआधी पात्र वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण जशा व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. तसे प्रकृती तितके भिन्न-भिन्न धोकादायक परिणामही संभवू शकतात.
