डॉ आनंद जोशी
Lab Brain Organoid science update: मानवी मेंदूची रचना आणि त्याची गुंतागुंत समजण्यासाठी विज्ञानाने आता एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मेंदू संशोधनाकरता तुकड्या तुकड्यानं प्रयोगशाळेत तयार करता येईल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. पण आज जैवअभियांत्रिकीमुळे ते प्रत्यक्षात आलं आहे. मोड्युलर किचनच्या धर्तीवर प्रयोगशाळेत आता मोड्युलर ब्रेनचीसुद्धा जुळणी शक्य झाली आहे. मेंदू विज्ञानाची ही झेप चमत्कारापेक्षा कमी नाही.

मन म्हणजे काय?

कोणाचा विश्वास बसणार नाही पण, मानवी मेंदूची जुळणी प्रयोगशाळेत शक्य आहे. आपण मोड्युलर किचनची जुळणी करतो, अगदी तशाच पद्धतीने संशोधनाकरता मेंदूचं मॉडेल आकारास आणण्यात वैज्ञानिकांना यश आलेलं आहे. याविषयीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनाबद्दल लिहीत असताना २०१५ साली ‘इनसाइ़ड आउट’ या अनिमेशन फिल्मचे स्निपेट्स पाहिल्याचं आठवलं.अकरा वर्षाच्या मुलीची ही कहाणी आहे. आनंद, दु:ख, भीती, राग, तिरस्कार या तिच्या मनातल्या भावना याच या फिल्ममधल्या व्यक्तिरेखा आहेत. जणू तिचं मन या ‘मोड्युल्स’नं तयार झालेलं आहे. मुळात, मन म्हणजे मेंदू हे समीकरण मेंदूविज्ञानाने सिद्ध केलं आहे. हे सगळे सांगण्याचं कारण मेंदू जणू मोड्यूल्सचा तयार झालेला असतो, हे आपल्या ध्यानात यावं हेच आहे.

लॅबमध्ये कशी झाली मिनी अवयवांची निर्मिती?

मोड्युलर किचनच्या जाहिराती आपण पाहातो. ते मोड्यूल्स घरी आणून त्याची जोडणी करून किचन आकारास आणलं जातं. अगदी तसंच काहीसं या संशोधनाचं आहे. त्याचं झालं असं की, तिकडे पश्चिमेत संशोधनासाठी प्राण्यांचा वापर होऊ नये, यासाठी प्राणीमित्रांनी जोरदार आंदोलनं केली. विज्ञानविश्वानं या आंदोलनाची दखल घेत प्रयोग आणि संशोधनासाठी प्राण्यांचा कमीतकमी वापर करायचा असं ठरवलं. आंदोलनाचा हा रेटा सुरु असतानाच एकीकडे ‘स्टेमसेल्स’ अर्थात मूल पेशींचाही शोध लागत होता. जैवविज्ञानाने मूल पेशी वापरून लिव्हर-यकृत, किडनी-मूत्रपिंड वगैरेच्या ‘ऑरगॅनॉइ़ड्स’ म्हणजेच पेशींचे पुंजके लॅबमध्ये तयार करण्यात यश आलं होतं.

Lab Brain Organoid research in science laboratory | Modular Brain Assembly using stem cell technology | लॅबमध्ये तयार केलेला मिनी मेंदू ऑरगॅनॉइड | स्टेम सेल्सपासून बनवलेला मोड्युलर ब्रेन
प्रयोगशाळेत स्टेम सेल्सपासून आकारास येणारा मिनी मेंदू (Image- Gemini)

‘ऑरगॅनॉइड’चा काय आहे शब्देतिहास ?

ग्रीक शब्द ऑरगॅनॉन म्हणजे शारीरिक अवयव, oid ‘ऑइड’ म्हणजे ‘त्या सारखा असणारा’ म्हणून ‘ऑरगॅनॉइड’. १८५० मध्ये हा शब्द जैवविज्ञानात पेशीतले सूक्ष्म घटक या अर्थाने वापरला जात होता. २००० साल उजाडलं. आता स्टेम सेलच्या संशोधनाने वेग घेतला होता. लॅबमध्ये स्टेमसेल्सपासून त्रिमितीय टिश्यू कल्चर आणि मिनी ऑरगन्स तयार करता येऊ लागले होते. यालाच ‘ऑरगॅनॉइड’ हा सुयोग्य शब्द वापरात येऊ लागला. इथे हा शब्देतिहास सांगणंही खूप महत्त्वाचं आहे. कारण, जिथे नवीन ज्ञानाची निर्मिती होते तिथे आणि तेव्हाच त्या भाषेत असे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. मराठीत याला दुसरा शब्द तयार केला, तरीही त्याला हा इतिहास असणार नाही म्हणून ‘ऑरगॅनॉइड’ हाच शब्द वापरणं योग्य आहे.

कसा तयार होतो मिनी मेंदू ?

सोप्या भाषेत ही प्रक्रिया सांगायची तर प्रथम व्यक्तीच्या ‘मूल पेशी’ म्हणजेच स्टेम सेल्स घेतल्या जातात. या स्टेमसेल्स येतात कोठून? डोनर्स आपलं रक्त, बोनमॅरो देतात यातून या मूलपेशी मिळतात. अशा स्टेमसेल्स लॅबमध्ये विशिष्ट रसायनात आणि विशिष्ट ग्रोथ फॅक्टर्स देऊन वाढवल्या म्हणजे त्या पासून ‘न्युरॉन्स’-‘मेंदू पेशी’ तयार होतात. अर्थात, त्या तयार व्हायला कितीतरी आठवडे लागतात. हे अत्यंत खर्चिक आणि कौशल्याचं जैवतंत्रज्ञान आहे. सेल कल्चर प्रमाणे हे फक्त पेशींचे पुंजके नसतात. तर या न्युरॉन्स मेंदूतल्या नैसर्गिक रचनेप्रमाणे वाढतात आणि मेंदूत्या रचनेप्रमाणे त्रिमितीय रचना पेट्री डिश मध्ये तयार करतात.

मेंदुला पोषणद्रव्यांचा पुरवठा

हे न्युरॉन्स एकमेकांशी जोडण्या करतात. त्यामुळे ही केवळ रचना नसते, तर तयार झालेले न्युरॉन्स विद्युतरासायनिक संदेश वहनाचं (इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स ) कामही करतात. म्हणजेच माणसाच्या मेंदूत जशा विद्युत लहरी तयार होतात, तशा या मेंदूच्या ऑरगॅनॉइडमध्ये ही तयार होतात. म्हणूनही हा ‘मिनी मेंदू’ असतो. अर्थातच हे संशोधन सुरु असताना त्या मिनी मेंदूला पोषणद्रव्यं पुरवावी लागतात. तरच त्या मेंदूची योग्य रीतने वाढ होऊ शकते.

मेंदू ‘असेम्बल’ कसा करतात ?

मेंदूत निरनिराळी केंद्रं असतात. म्हणजे बुद्धीचं केंद्र, स्मृतीचं केंद्र, दृष्टी केंद्रे, वाचा केंद्रे इत्यादी. मेंदूत ही केंद्रं नैसर्गिकरीत्या एकमेकांना जोडलेली असतात. मात्र जुळणी करण्यासाठी प्रयोगशाळेत अशा प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र ऑरगॅनॉइड तयार केला जातो. मग हे ऑरगॅनॉइड्स पेट्री डिशमध्ये ‘असेम्बल’ करतात. ही ‘न्युरॉनल कनेक्शन्स’ कशी होतात हे संशोधक सूक्ष्मदर्शकाखाली तपासत राहतात. या एकत्र केलेल्या ऑरगॅनॉइड्सना अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड विद्यापीठातले मेंदू वैज्ञानिक सर्जी पास्का यांनी ‘असेम्ब्लॉइड’ हा सार्थ शब्द गुंफला आहे. या जोडण्यांमुळे आणि त्यातल्या नॉनस्टॉप संदेशवहानामुळे मेंदू ही एक ‘गतिमान परिसंस्था’ (डायनॅमिक इकोसिस्टिम) तयार होते. गतिमान याचा अर्थ, मेंदू हा वेळेनुसार आणि गरजेनुसार सतत बदलत असतो. या बदलातच मेंदूच्या गतीचं इंगित दडलेलं असतं.

एका मेंदूत पाच व्यक्तींच्या न्युरॉन्स?

चिमेरा हा शब्द ग्रीक पुराणकथेतून आला आहे. या पुराणकथेनुसार एक प्राणी जो सिंह, बकरी, साप, यांच्या मिश्रणातून तयार झाला होता, त्याला म्हटलं गेलं, चिमेरा. जैवविज्ञानात या शब्दाचा अर्थ दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या पेशींचं मिश्रण असा असतो. या प्रयोगात वेगळ्या प्रकारच्या जनुकीय पेशी एकत्र आणल्या जातात. ते समीकरण असं असतंः Chimera + Organoid = चिमेरॉइड्स. मेंदूच्या चिमेरॉइडमध्ये पाच डोनर्सकडून स्टेमसेल्स घेऊन त्या पासून न्युरॉन्स तयार करून वाढवले जातात. म्हणजेच, मिनी मेंदूत पाच व्यक्तींच्या न्युरॉन्स वाढत असतात.

एकाच औषधाचा, पाच व्यक्तींच्या न्युरॉन्सवर वेगवेगळा परिणाम

पाचही प्रकारच्या न्युरॉन्सची जनुकीय रचना निराळी असते. एकाच औषधाचा परिणाम पाच व्यक्तींच्या न्युरॉन्स वर कसा वेगवेगळा होतो हेसुद्धा एकाच वेळी दिसून येतं. विषाणू आणि जीवाणू यांच्या होणाऱ्या इन्फेक्शनचा प्रभाव व्यक्तीनुसार कसा बदलतो हे सुद्धा या संशोधनात समजतं. या तंत्रज्ञानाचा शोध अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाल्या डॉ. पाउला अर्लोटा आणि त्यांच्या टीमने लावला. या अफलातून शोधाचा उपयोग आता औषधी परिणामांच्या संशोधनाकरता होतो आहे.

संशोधनाचा उपयोग काय ?

मेंदू विज्ञानातलं हे संशोधन म्हणजे निश्चितपणे पुढे पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. गर्भात मेंदूची वाढ आणि विकास कसा होतो याची ही झलक आहे. विविध केंद्रात न्युरॉन्स कसे वाढतात, त्यांची कनेक्शन्स कशी होतात याची भन्नाट कोरियोग्राफी या विषयातले संशोधक ‘रिअल टाइम’ मध्ये पाहातात. एरवी, मेंदू पेशीतल्या परस्पर क्रिया आणि संवाद यातून आपला सुंदर मेंदू तयार होत असतो. आपण न्युक्लियर रिअॅक्टरचे नाव ऐकलेलं असतं. त्याच प्रमाणे बायो रिअॅक्टर हे जैवतंत्रज्ञानातलं एक यंत्र आहे, याचा न्युक्लियर रेडिएशनशी काही संबंध नसतो. या जैवयंत्रात प्रथिनांच्या जेलीचं जाळं असतं त्यात स्टेमसेल्स गिरक्या घेत असतात. त्यातून मेंदूसारखं त्रिमितीय ऑरगॅनॉइड तयार होतं.

९ आठवड्यांच्या गर्भाचे गुणविशेष

मुळात,मेंदू हा स्वयंसंघटित होणारा अवयव आहे त्यामुळे हे शक्य होतं. या यंत्रात तयार होणाऱ्या मिनी मेंदूला ९ आठवड्याच्या मानवी गर्भातल्या मेंदूचे गुणविशेष असतात. त्यामुळे या कालखंडात मेंदूची वाढ कशी होते, त्यावेळी कोणती विकृती निर्माण होऊ शकते, हे पाहाण्याची महत्त्वाची खिडकी आता संशोधकांना खुली झाली आहे.

मेंदू व्याधींच्या शोधाचा मार्ग कोणता ?

इमर्जन्ट प्रॉपरटीज म्हणजेच लहान लहान घटक एकत्र आल्यामुळे उमलणारे गुणधर्म, ही मेंदूविज्ञानातली खूप महत्त्वाची संकल्पना आहे. तसं पाहिलं तर एका न्युरॉनला स्मृती नसते, पण जेव्हा काही न्युरॉन्स विशिष्ट प्रकारे एकत्र येतात, तेव्हा त्या केंद्राला स्मृती हा गुणधर्म प्राप्त होतो. म्हणजे अनेक न्युरॉन्समध्ये घडून येणाऱ्या अत्यंत गुंतागुंतीच्या परस्पर क्रियांमुळे हा गुणधर्म उमलतो. या परस्पर क्रिया म्हणजे न्युरॉन्सनी रासायनिक आणि विद्युत संदेशातून साधलेला संवाद असतो. हे उमलते गुणधर्म तयार होताना काय त्रुटी निर्माण होऊ शकतात, याचा शोध घेताना मेंदूच्या इतरही अनेक व्याधींवर प्रकाश पडणार आहे. संशोधकांनी प्रयोगशाळेत निर्माण केलेलं मेंदूचं ऑरगॅनॉइड हे एक जैविक उपकरण आहे. त्यामुळे माणसाच्या जिवंत मेंदू बाबतच्या नवनवीन आकलनाची क्षितिजं रुंदावणार आहेत.