Nana Patekar Life Journey: नाना पाटेकर यांच्या अभिनयाची, त्यांच्या गाजलेल्या संवादांची आणि ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकरांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ सर्वांनाच पडली. परंतु, पडद्यावर दिसणारा नानांचा ‘रागीटपणा’ आणि अभिनय हा कुठल्याही ड्रामा स्कूलमधून आलेला नव्हता, तर तो त्यांनी खऱ्या आयुष्यात भोगलेल्या गरिबी आणि संघर्षातून जन्माला आला होता.
आज नानांच्या चित्रपटांमधील प्रसंग सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतील. ‘आ गे मेरी मौत का तमाशा देखने’पासून ‘साला ये दुःख काहे नहीं खत्म होता बे?’पर्यंत अनेक संवाद पुन्हा ऐकवले जातील. पण नाना पाटेकर यांना समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या आयुष्यात डोकावणे अधिक महत्त्वाचं आहे. …आणि मग लक्षात येतं की, आयुष्यानेच नानांना अभिनय शिकवला असावा!
नानांचा जन्म मुंबईत झालेला असला, तरी त्यांचे बालपण रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा येथे गेले. त्यांचे वडील गजानन पाटेकर मुंबईत कापडाच्या व्यवसायात होते आणि आई निर्मला काटकसरी, शिस्तप्रिय होत्या. लहानपणी आपल्या दोन भावांपेक्षा आपण दिसायला कमी असल्याची भावना नानांच्या मनात होती. या न्यूनगंडातूनच त्यांनी रंगभूमीचा आधार घेतला, असं लोकसत्ताच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं. तिसरीत असतानाच गावातील नाटकांमध्ये ते सहभागी होऊ लागले. मात्र नाटक हा छंद म्हणून सुरू झालेला प्रवास पुढे जगण्याचा आधार होईल, असे त्यांनाही तेव्हा माहीत नव्हते.

वयाच्या तेराव्या वर्षी ‘कमावता माणूस’
नानांच्या आयुष्यातला एक प्रसंग त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात महत्त्वाचा आणि कलाटणी देणारा ठरला. ते नववीत असताना, म्हणजे साधारण तेराव्या वर्षी, त्यांच्या वडिलांचा व्यवसाय बंद झाला. कुटुंब अचानक आर्थिक संकटात सापडले. शाळा दुपारी आणि त्यानंतर काम, अशी त्यांची दिनचर्या सुरू झाली. सिनेमाची पोस्टर्स रंगवण्याचे काम ते करायचे. त्यासाठी त्यांना महिन्याला ३५ रुपये मिळत आणि दिवसातून एक वेळचे जेवणही मिळत असे. त्या वयात इतर मुले खेळत असताना नाना मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होते. नंतर त्यांनी एका मुलाखतीत गरिबीबद्दल सांगताना, ‘गरिबी केवळ पैशांची कमतरता नसते; गरिबी माणसाला सामाजिकदृष्ट्याही एकटं करते’, असा अनुभव व्यक्त केला होता. कदाचित म्हणूनच नंतर त्यांच्या अभिनयात ‘गरिब माणसाचा राग’ रसिकांना खरा वाटला आणि भीडत राहिला. तो राग ते कुठल्या अभिनयशाळेत शिकले नव्हते, तर तो राग ते खऱ्याखुऱ्या आयुष्यात जगले होते.
नानांच्या रागामागे एक वेगळी गोष्ट होती…
नानांचा राग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक चर्चिला गेलेला भाग. पण त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की हा राग हा अनेकदा त्यांच्या न्यूनगंडावरचं आवरण होता. यामुळे त्यांच्या अभिनयाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. ते पडद्यावर संतापायचे तेव्हा तो केवळ संवाद नसायचा. तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी अस्वस्थता, आवाजातील कडवटपणा, अचानक वाढणारी तीव्रता यामागे आयुष्यभर साठलेली असुरक्षितता होती. म्हणूनच नानांच्या संवादांपेक्षा त्यांच्या मौनाचा परिणाम अनेकदा जास्त झाला. त्या असुरक्षिततेबद्दल त्यांनी लोकसत्ताच्या मुलाखतीत सविस्तर सांगितलं होतं.
‘क्रांतिवीर’चा क्लायमॅक्स लिहिलेला नव्हता!
नानांच्या अभिनयाविषयीचा एक विलक्षण किस्सा ‘क्रांतिवीर’च्या क्लायमॅक्सशी संबंधित आहे, चित्रपटाचा गाजलेला क्लायमॅक्स प्रत्यक्ष शूटिंगच्या आधी पूर्णपणे लिहिलेला नव्हता. दिग्दर्शक मेहुल कुमार यांच्या आठवणीनुसार, क्लायमॅक्सच्या आधी नानांना हृदयाशी संबंधित त्रास झाला होता आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांसोबत ते सेटवर आले. क्लायमॅक्स एका दिवसात शूट करण्यात आला.
नंतर नानांनीही सांगितले की, तो प्रसंग लिहिलेला नव्हता; त्या क्षणी जे मनात आले ते ते बोलत गेले. इतकेच नव्हे, तर त्यांनी नंतर त्या संवादांची एकही ओळ आपल्याला आठवत नसल्याचं त्यांनी लोकसत्ताच्या मुलाखतीच्या वेळेसं सांगितलं होतं. म्हणूनच तो प्रसंग अभिनयापेक्षा जगलेला संताप वाटतो.
मुलाच्या मृत्यूने बदललेले नाना
नानांच्या आयुष्यातील सर्वात खोल जखम त्यांच्या पहिल्या मुलाच्या मृत्यूची. त्यांचा पहिला मुलगा जन्मतःच गंभीर समस्यांनी त्रस्त होता आणि अवघ्या दोन-सव्वादोन वर्षांच्या आसपास त्याचा मृत्यू झाला. या अनुभवाबद्दल बोलताना नानांनी स्वतःच्या वागण्याकडे अत्यंत कठोरपणे पाहिल्याचं सांगितलं होतं. सुरुवातीला ‘लोक काय म्हणतील’ याची काळजी आपल्याला मुलापासून भावनिकदृष्ट्या दूर ठेवत होती, अशी कबुली त्यांनी दिली होती. मुलावर प्रेम करायला सुरुवात केली, तोपर्यंत तो निघून गेला… असेही ते म्हणाले होते. कदाचित यानंतरच नानांच्या अभिनयात मृत्यूचा विषय वेगळ्या पद्धतीने दिसू लागला. पुरस्कार, चित्रपट चालला किंवा नाही, लोकांनी कौतुक केले किंवा नाही या साऱ्यापेक्षा आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव त्यांना अधिक होती, असं ते म्हणाले होते.
६० सिगारेट्सपासून अचानक मुक्ती
नानांचे व्यक्तिमत्त्व विरोधाभासांनी भरलेले होते, एकेकाळी ते दिवसाला तब्बल ६० सिगारेट्स ओढत असत. वयाच्या ५६व्या वर्षी त्यांनी एका क्षणी त्या सोडून दिल्या. हा तपशील त्यांच्या ‘खडूस’ प्रतिमेपेक्षा ‘वेगळा नाना’ दाखवतो. स्वतःशी कठोरपणे वागणारा, एखादी गोष्ट चुकीची वाटली की अचानक पूर्णपणे बदलण्याची क्षमता असलेला…
दीड कोटींची गाडी न घेण्याचा निर्णय
नानांचा आणखी एक कमी चर्चिला गेलेला पैलू म्हणजे शेतकरी कुटुंबांबद्दलची त्यांची बांधिलकी. अलीकडेच लेखक रणबीर पुष्प यांनी सांगितलेला एक किस्सा म्हणूनच महत्त्वाचा. नाना सुमारे दीड कोटी रुपयांची आलिशान गाडी घेण्याच्या विचारात होते. मात्र शेतकरी आत्महत्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी तो पैसा गाडीवर खर्च न करता गरजू कुटुंबांना मदत करण्याकडे वळवला. यात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न नव्हता. उलट, नानांच्या स्वभावाप्रमाणेच त्यात काहीशी अस्वस्थ करणारी साधेपणाची वृत्ती होती. आपल्याकडे असलेला पैसा आपल्यासाठीच का आणि कशासाठी?, असा विचार त्यांनी बोलून दाखवला होता.
२०२६च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मतदान करण्यासाठी नाना पुण्याहून मुंबईला आले. मतदानासाठी त्यांना तीन-चार तासांचा प्रवास करावा लागला. तरी त्यांनी मतदान करणे हे नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगत मतदान केले. कारण नाना केवळ अभिनेता नव्हते. ते प्रसिद्धीच्या चौकटीत मावणारे व्यक्तिमत्त्व नव्हते. त्यांना राग यायचा, ते चिडायचे, त्यांच्याकडून चुका झाल्या, त्यांनी स्वतःच्या चुका मान्य केल्या. त्यांनी गरिबी पाहिली, अपमान सहन केला, मुलाला गमावले, स्वतःच्या कमतरतांशी झगडले… आणि इतके सारे घडूनही अभिनयाचे क्षेत्र समृद्ध केले.
नानांच्या नजरेत अभिनय कमी आणि आयुष्य जास्त असायचे. नाना मुलाखती दरम्यान किंवा बोलताना एक काही सेकंदाचा पॉज घ्यायचे. लोकसत्ताची मुलाखत संपल्यानंतर त्या बाबत विचारले तेव्हा म्हणाले होते. त्या पॉजमध्ये माझं अख्ख आयुष्य असतं, अरे! …आज मात्र नानांनी अनपेक्षित आणि मोठा पॉज घेतला! नानांच्या बाबतीत विचार करताना वाटतं की, आयुष्यानेच त्यांच्यासाठी भूमिका लिहिलेली असावी, त्यांनी ती आपल्या सर्वांसमोर जगून दाखवली! नानांना भावपूर्ण श्रद्धांजली!
