NCERT Class 9 History Book Controversy: इयत्ता नववीचे ‘अंडरस्टँडिंग सोसायटी- इंडिया अँड बियाँड’ हे समाजशास्त्राचे नवे पाठ्यपुस्तक एनसीईआरटीने (NCERT) प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात मध्ययुगीन इतिहासावरील एका प्रकरणात स्थानिक राजांनी ‘परकीय आक्रमकां’विरुद्ध म्हणजेच दिल्लीचे सुलतान आणि मुघलांविरुद्ध केलेल्या संघर्षावर भर देण्यात आला आहे; तर मुघल आणि राजपुतांमधील सहकार्याचा उल्लेख केवळ ओझरता केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एनसीईआरटी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
काळ तोच, पण भूतकाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला
भूतकाळाकडे पाहाण्याचा बदललेला दृष्टीकोन हा एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे. कित्येक दशके मध्ययुगीन इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये विविध राजसत्तांमधील लढायांची चर्चा होत आली आहे. परंतु त्याचबरोबर मुघल आणि हिंदू राजपुतांमधील परस्पर सहकार्याची उदाहरणेही तपशीलवार मांडली जात होती. शिवाय, मध्ययुगीन काळात भारतीय आणि इस्लामिक संस्कृतींच्या समन्वयातून भारतात एका संमिश्र (गंगा-यमुना) संस्कृतीचा विकास झाला, यावरही भर दिला जात होता. काळ तोच आहे, परंतु भूतकाळाकडे पाहण्याचा आणि त्याचा अन्वयार्थ लावण्याचा दृष्टिकोन मात्र स्पष्टपणे बदलला आहे.
वादग्रस्त भूतकाळ
भारतात इंग्रजांचे राज्य आल्यावर त्यांनी एक आधुनिक ज्ञानशाखा म्हणून भारताच्या इतिहासलेखनाचे काम हाती घेतले. इंग्रजांनी रंगवलेल्या भारतीय भूतकाळाच्या चित्रणावर विपुल संशोधन झाले आहे. वसाहतकालीन इतिहासकारांनी भारताच्या भूतकाळाची ‘हिंदू भारत’, ‘मुस्लिम भारत’ आणि ‘ब्रिटिश भारत’ अशा कालखंडांत विभागणी केली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये विकास पाठक लिखित ‘Marxist to Hindutva: How NCERT history book rows mirror a battle for India’s past’ या लेखात इतिहासकार ज्ञानेंद्र पांडे यांचे मत दिले आहे. ज्ञानेंद्र पांडे म्हणतात की, भारतीय इतिहासाची वेगवेगळ्या कालखंडात विभागणी करताना ब्रिटिश लेखकांनी धर्माला भारतीय इतिहासातील मुख्य प्रेरणास्थान मानले. प्राचीन भारतीय इतिहास हा ‘आधुनिक’ व ‘धर्मनिरपेक्ष’ पाश्चिमात्य जगाच्या अगदी विरुद्ध होता, असे चित्र उभे करण्यात आले. विशेष म्हणजे, ब्रिटिश राज्यकर्ते ख्रिश्चन असूनही आधुनिक भारताला ‘ख्रिश्चन भारत’ म्हटले नाही; त्याद्वारे त्यांनी स्वतःला धर्माच्या पलीकडे जाऊन राज्य करणारे आणि वैचारिकदृष्ट्या ‘आधुनिक’ असलेले राज्यकर्ते दाखवण्याचा प्रयत्न केला.
ब्रिटिशांची उपस्थिती आवश्यक आणि न्याय्य
याउलट, भारतीय मात्र उपजतच धर्मांध किंवा धर्मकेंद्री असल्याचे मानले गेले. यामुळे येथील ‘स्थानिकांना सुसंस्कृत करण्यासाठी’ ब्रिटिशांचे भारतातील आगमन आवश्यक आणि न्याय्य ठरवले गेले.
हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट
हिंदू- मुस्लीम फुटीची अनेक उदाहरणे आहेत. १८१७ साली लिहिलेल्या ‘हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथात जेम्स मिल यांनी भारताची मागास ‘हिंदू भारता’कडून अधिक सुसंस्कृत ‘मुस्लिम भारता’कडे आणि त्यानंतर सर्वाधिक सुसंस्कृत ‘ब्रिटिश भारता’कडे झालेली प्रगती दाखवली. याद्वारे त्यांनी ब्रिटिश राजवटीला न्याय्य ठरवण्याचा आणि हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुस्लिमांना ‘मजबूत’ तर हिंदूंना ‘दुर्बल’ ठरवले आणि भारतातील कोणत्याही प्रकारच्या संमिश्र संस्कृतीचे अस्तित्व नाकारले.
फोडा आणि राज्य करा
१८५७ च्या उठावानंतर, ज्या वेळी हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही ब्रिटिशांविरुद्ध एकत्र बंड पुकारले, त्या वेळी व्ही. ए. स्मिथ यांनी भारताचा इतिहास लिहिताना ‘मुस्लिम राजवट’ रानटी असल्याचे रंगवले. अशा प्रकारचे इतिहासलेखन पुढे ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचे एक प्रमुख हत्यार ठरले.
भारताची संमिश्र संस्कृती दर्शवणारा एक नवा प्रवाह
स्वातंत्र्यलढ्याबरोबरच इतिहासलेखनाचा, हिंदू आणि इस्लामिक प्रभावांच्या मिलाफातून भारताची संमिश्र संस्कृती दर्शवणारा एक नवा प्रवाह निर्माण झाला. हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांचे वैरी न दाखवता, एकाच राष्ट्रीय प्रवासातील सहप्रवासी म्हणून पाहणे हा यामागील मुख्य उद्देश होता. १९३६ मध्ये ‘इन्फ्लुएन्स ऑफ इस्लाम ऑन इंडियन कल्चर’ हा ग्रंथ लिहिणारे इतिहासकार ताराचंद या वैचारिक बदलाशी जवळून जोडले गेले होते.
स्वातंत्र्यसैनिकांनीही या मांडणीत भर घातली
केवळ इतिहासकारांनीच नव्हे, तर स्वातंत्र्यसैनिकांनीही या मांडणीत भर घातली. जवाहरलाल नेहरूंचा ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ याचे उत्तम उदाहरण आहे. बाहेरून आलेल्या लोकांमुळे संघर्ष निर्माण झालेला असला, तरी त्यातून नेहमीच एक समन्वय घडून आला आणि सर्जनशील घडामोडींना चालना मिळाली, असे या ग्रंथात दर्शवण्यात आले. नेहरूंनी अकबराची प्रशंसा केली; मात्र अनेक स्थानिक राजांना नाराज करणाऱ्या आणि ‘काळाची चक्रे उलटी फिरवणाऱ्या’ धोरणांमुळे त्यांनी औरंगजेबावर टीका केली. नंतरच्या काळात ‘धर्मनिरपेक्ष’ इतिहासलेखनाने औरंगजेबाचे व्यक्तिमत्त्व अत्यंत गुंतागुंतीचे दाखवून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
पूर्वग्रह असलाच, तर तो धार्मिक होता, राजकीय नव्हे…
नेहरूंप्रमाणेच काँग्रेस आणि हिंदू महासभा या दोन्ही संघटनांचे नेते असलेल्या लाला लजपत राय यांनी भारतात मुस्लिम आणि ब्रिटिशांच्या येण्यातील फरक ठळकपणे मांडला. आपल्या ‘यंग इंडिया’ या ग्रंथात लाला लजपत राय यांनी म्हटले आहे की, “१३ व्या शतकापासून १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत ज्या मुस्लिमांनी भारतात राजकीय सार्वभौमत्व गाजवले, ते जन्माने भारतीय होते, विवाहाने भारतीय होते आणि मृत्यूनेही भारतीयच होते. ते भारतात जन्मले, त्यांनी इथेच विवाह केला, ते इथेच मरण पावले आणि त्यांना याच मातीत दफन करण्यात आले. त्यांनी भारतातून गोळा केलेल्या महसुलाचा प्रत्येक पैसा भारतातच खर्च झाला. हिंदूंबद्दल त्यांचा काही पूर्वग्रह असलाच, तर तो धार्मिक होता, राजकीय नव्हे…”
मार्क्सवादी वळण
१९५० च्या दशकात भारतात मार्क्सवादी इतिहासलेखनाची सुरुवात झाली आणि दामोदर धर्मानंद कोसंबी हे आघाडीच्या मार्क्सवादी इतिहासकारांपैकी एक ठरले. या काळात ‘धर्मनिरपेक्ष इतिहासलेखनाला’ एक वेगळे वळण मिळाले. मध्ययुगीन काळाकडे राष्ट्रवादी इतिहासकारांनी सांस्कृतिक दृष्टीने पाहिले असले, तरी कोसंबी यांनी प्राचीन भारताकडे चिकित्सक नजरेने पाहिले आणि कठोर ‘बुद्धिवादी’ निकषांच्या आधारे हिंदूंच्या अनेक परंपरागत समजुती व श्रद्धांचे खंडन केले.
मिथ अँड रिॲलिटी
१९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मिथ अँड रिॲलिटी’ या पुस्तकात कोसंबी यांनी अशा अनेक समजुतींचा ऊहापोह करत त्या इतिहास नसून केवळ दंतकथा (मिथक) असल्याचे स्पष्ट केले. या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा उद्देश ‘भारतीय तत्त्वज्ञानाच्या सुंदर कमळाचे’ कौतुक करणे हा नसून, ज्या “लोकमानसातील अंधश्रद्धेच्या दलदलीतून” ते उगवले आहे, त्या दलदलीचे परीक्षण करणे हा आहे. येथे नेहरूंशी त्यांचा स्पष्ट मतभेद दिसून आला; कारण नेहरू दंतकथांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असत. दंतकथा काही अंशी सत्य आणि काही अंशी कल्पनाविलास असून त्या माणसाला दैनंदिन जीवनातील रटाळपणातून बाहेर काढतात आणि आपले पूर्वज थोर होते याची जाणीव करून देतात, असे नेहरूंचे मत होते.
कोसंबी यांनी सुरू केलेला हा प्रवाह मार्क्सवादी आणि त्यांच्याशी विचारसरणी जुळणाऱ्या इतिहासकारांमध्ये सातत्याने पुढे चालू राहिला. प्राचीन भारतातील गोमांस भक्षणावर इतिहासकार डी. एन. झा यांनी ‘द मिथ ऑफ द होली काऊ’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहून हिंदूंच्या तत्कालीन श्रद्धा एका मिथकावर आधारलेल्या असल्याचे सुचवले.
पूर्वग्रहदूषित आक्षेप
त्यानंतर अनेकांनी असा युक्तिवाद केला की, अशी कठोर चिकित्सक नजर भारतातील मूलभूत इस्लामिक धारणांवर मात्र टाकलेली नाही. त्यामुळे या इतिहासलेखनावर ‘पूर्वग्रहदूषित’ असल्याचा आक्षेप घेतला गेला. याउलट मध्ययुगीन भारताबाबत असा युक्तिवाद करण्यात आला की, उलेमांनी प्रजेवर इस्लाम लादण्यासाठी राजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला असला, तरी अनेक मुस्लिम राजांनी धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक किंवा व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला.
१९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर इंदिरा गांधींचे सरकार लोकसभेत बहुमतापासून सुमारे ४५ जागांनी मागे पडले. या टप्प्यावर त्यांचे डाव्या विचारसरणीकडे झुकणे साहजिकच होते; ‘गरिबी हटाओ’ची घोषणा, बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानांचे तनखे रद्द करणे ही त्याचीच उदाहरणे होती. यामुळे सरकार स्थापनेसाठी त्यांना सीपीआय (भाकप) आणि काही अपक्षांचा पाठिंबा मिळाला. ‘इंडिया आफ्टर गांधी’ या ग्रंथात इतिहासकार रामचंद्र गुहा लिहितात, “श्रीमती गांधींचे डाव्या विचारसरणीकडे वळणे हा स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा उत्तम मार्ग वाटल्याने भाकप आनंदाने सरकारमध्ये सहभागी झाला.”
त्या काळात डावी विचारसरणी केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवरही एक प्रमुख बौद्धिक शक्ती होती. अलीगढचे इतिहासकार आणि कम्युनिस्ट विचारवंत प्रा. सैय्यद नुरुल हसन हे १९७१ ते १९७७ दरम्यान केंद्रीय शिक्षण, समाजकल्याण आणि सांस्कृतिक मंत्री होते. त्यामुळे एनसीईआरटीची अनेक पाठ्यपुस्तके डाव्या विचारसरणीच्या विद्वानांकडून लिहिली गेली. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या ‘जेएनयू’चा (JNU) कलही प्राध्यापकांच्या नियुक्त्यांमुळे मुख्यत्वे डाव्या विचारसरणीकडेच राहिला.
भाजपचा उदय
अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेवर आल्यानंतर एनसीईआरटीची जुनी इतिहासाची पाठ्यपुस्तके बदलण्यात आली. आर. एस. शर्मा, सतीश चंद्र, बिपिन चंद्र आणि अर्जुन देव या विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या जागी मक्खन लाल, मीनाक्षी जैन आणि हरी ओम यांसारख्या अभ्यासकांनी लिहिलेली पुस्तके आणली गेली. अनेक ‘धर्मनिरपेक्ष’ इतिहासकारांच्या टीकेस पात्र ठरलेली ही पुस्तके, २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) सरकार सत्तेवर असताना पुन्हा बदलण्यात आली. या नव्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीमध्ये जेएनयूचे इतिहासकार नीलाद्री भट्टाचार्य हे एनसीईआरटीचे मुख्य सल्लागार होते.
सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने याच पाठ्यपुस्तकांमधून काही भाग वगळले आहेत. शिवाय काही बदलही करण्यात आले आहेत. या सरकारने सर्वसाधारणपणे ‘धर्मनिरपेक्ष’ इतिहासकारांना आणि विशेषतः मार्क्सवादी इतिहासकारांना आपले वैचारिक विरोधक मानले आहे. हिंदुत्ववादी इतिहासलेखन भारताला मूलभूतपणे हिंदू राष्ट्र मानते आणि मध्ययुगीन काळातील ‘मुस्लिम आक्रमणांवर’ लक्ष केंद्रित करते. पुरातत्त्वशास्त्रज्ञ बी. बी. लाल हे हिंदुत्ववादी विचारसरणीकडे कल असलेले सुप्रसिद्ध अभ्यासक असले, तरी हिंदुत्ववादी विचारधारेतून जागतिक स्तरावर व्यावसायिक प्रतिष्ठा लाभलेला इतिहासकार त्यानंतर अद्याप पुढे आलेला नाही.
