Nervous system map research reveals brain and body connection: शरीरभर पसरलेल्या मज्जासंस्थेच्या जाळ्याचा नकाशा समजून घेण्यासाठी उंदरांवर पथदर्शी संशोधन झालं आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ चायना’ इथे झालेलं हे संशोधन ‘Cell’ या जगन्मान्य विज्ञानपत्रिकेत नुकतेच प्रकाशित झालं आहे. मेंदूतलं विशिष्ट न्यूरॉन्सचं जाळं आणि शरीरातल्या विविध अवयवांमध्ये संवाद कसा होतो, संदेशवहन नेमकं कसं होतं, हे समजून घेणं या नकाशामुळे आता शक्य होणार आहे.
मज्जासंस्थेचं नेमकं स्वरुप काय?
मेंदूसंस्थेचे दोन मोठे विभाग असतात.एकः मध्यवर्ती मज्जासंस्था ( सेन्ट्रल नर्व्हस सिस्टिम) आणि दुसरी परिघीय मज्जासंस्था (पेरिफेरल नर्व्हस सिस्टिम). मध्यवर्ती मज्जासंस्थेत कवटीतला मेंदू आणि पाठीच्या कण्यातल्या (स्पायनल कॉर्ड) मज्जारज्जूचा समावेश होतो. तर परिघीय मज्जासंस्थेमध्ये शरीरभर पसरलेल्या नर्व्हज् म्हणजे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत आणि शरीराच्या आतल्या सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचणाऱ्या मज्जातंतूंचा समावेश होतो.
मज्जातंतू शरीरभर पोहोचतात कसे?
आपण जाणतोच की, कवटीत असलेला मेंदू हा एकजिनसी अवयव आहे. त्याचे नकाशे तयार करणं वैज्ञानिकांसाठी त्या मानानं सोपं होतं. म्हणूनच फ्रुट फ्लायपासून सस्तन प्राण्यापर्यंतच्या जिवांच्या मेंदूचे विविध नकाशे आजवर तयार झाले आहेत.मात्र, डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत आणि शरीराच्या आतल्या प्रत्येक भागापर्यंत पसरलेल्या मज्जासंस्थेच्या जाळ्याचा नकाशा तयार केला गेला नव्हता. तो आता तयार झाला आहे. मेंदूपासून तसेच मज्जारज्जूपासून निघालेले मज्जातंतू हृदय, फुप्फुसं, स्नायू, हाडे वगैरे पर्यंत कसं पोचतात, ते या नकाशामुळे समजून येत आहे.
चेतासंस्थेचं कोणी केलं डिसेक्शन?
आंद्रे वेसालिस (१५१४-१५६४) हा युरोपियन वैज्ञानिक या दोन्ही मज्जासंस्थांचा मूळ शरीरवैज्ञानिक मानला जातो.याला एक कारणही आहे. ते म्हणजे, त्याने प्रचलित समजाला धुडकावून बंड पुकारलं होतं. तो म्हणाला होता की, ‘हजार वर्षापूर्वीच्या ज्ञानाबद्दल आदर असला, तरी ते जुनं ज्ञान मी स्वीकारु शकत नाही. ज्ञान हे प्रवाही असतं. त्यामुळे कोणी काहीही म्हणो,मी चेतासंस्थेचं ‘डिसेक्शन’ करणार आहे.’ पुढे जाऊन त्याच्या या धाडसी डिसेक्शनमुळेच मानवी मेंदू बाबतच्या तोवर गूढ ठरलेल्या कितीतरी गोष्टी उघडकीस आल्या. त्याने घालून दिलेला हा धडा मेंदूविज्ञानाने पाळला. म्हणूनच आजसुद्धा चेतासंस्थेचं आधुनिक पद्धतीनं ‘डिसेक्शन’ होत आहे. परिणामी, मेंदूविज्ञान एकेक पाऊल पुढे जात आहे.
संशोधनाला मान्यता मोठी का?
आजच्या घटकेला व्यापार-उद्योगाच्या मार्गाने चीनच्या पाऊलखुणा सर्व जगभर उमटत आहेत. त्यामागे सर्वात मोठा वाटा, चीनमध्ये होत असलेल्या शोध-संशोधनाचा आणि समाजात रुजलेल्या वैज्ञानिक वृत्तीचा आहे. याच चीनमधल्या हेफेई इथल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ चायना’ मध्ये मज्जासंस्थेच्या जाळ्याच्या नकाशासाठी बहुमूल्य असं संशोधन झालं आहे. चीनमधलं हे नामांकित विद्यापीठ आहे. महत्त्वाचं म्हणजे, जगातल्या पहिल्या १०० सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये मानाचं स्थान मिळवून आहे. ज्या Cell नावाच्या शोधपत्रिकेत या संशोधनास प्रसिद्धी मिळाली आहे, ते जैवविज्ञानातील सर्वोच्च जर्नल आहे, त्यात शोधनिबंध प्रकाशित होणं ही वैज्ञानिकांसाठी उच्च स्तराची वैज्ञानिक ‘अचिव्हमेंट’ मानली जाते.
संशोधन कोणावर झालं ?
हे संशोधन कोणावर झालं आहे, तर ते उंदरांवर झालं आहे. अर्थातच मानवी शरीरालाही ते लागू आहे. कारण उंदीर हा सस्तन प्राणी आहे आणि माणसासारखाच त्याला पाठीचा कणा आहे. उंदराच्या मज्जासंस्थेचा ‘बॉडी प्लॅन’ आणि मानवाचा ‘बॉडी प्लॅन’ समान आहे. उंदीर हा मानवासारखाच पृष्ठवंशीय प्राणी आहे. माणसाचं शरीर कसं डाव्या आणि उजव्या अशा दोन समान भागांत विभागलेलं असतं, तसंच उंदराचंही असतं. हा केवळ कल्पनेचा खेळ नाही. तर इव्होल्युशनरी बायॉलॉजीने हे सिद्ध केलं आहे. चीनच्या विद्यापीठात झालेल्या या संशोधनामुळे पेरिफेरल नर्व्हज् बाबतच्या ज्ञानात मोठी भर पडणार आहे.

संशोधनाचा नेमका प्रदेश कोणता?
तसं पाहता, मेंदू संस्थेचं चित्रण बहुविध असतं.त्यात खूप मोठं म्हणजे, मेंदूच्या भागांच्या पातळीवरचं चित्रण आणि खूप सूक्ष्म म्हणजे, मेंदूपेशींच्या स्तरावरचं चित्रण किंवा नकाशा असतो. शरीरभर पसरलेल्या मज्जातंतूंचं चित्रण म्हणजे मज्जासंस्थेच्या जोडणीचं मध्यस्तरीय चित्रण किंवा नकाशा आहे. एरवी, मेंदूतल्या विशिष्ट न्यूरॉन्सचं जाळं आणि शरीरातले विविध अवयव यांच्यात संवाद कसा होतो,संदेश वहन कसं होतं हा एक नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. याच संदर्भाने माहिती मिळणं आता सुलभ होणार आहे. स्थूल-स्तर (मॅक्रोस्कोपिक लेव्हल) आणि सूक्ष्म-स्तर (मायक्रोस्कोपिक लेव्हल) या दोघांच्या मधला मध्यस्तर (इंटरमिजिएट) असतो. तिथे काय घडतं, हे समजून घेणं नकाशाच्या सदंर्भाने झालेल्या संशोधनामुळे आता शक्य होणार आहे.
संशोधन का मोलाचं?
या मध्य स्तराच्या अंतरंगात पोचणं पूर्वी जवळ जवळ अशक्य होतं, ते या संशोधनामुळे शक्य होत आहे. या संशोधना करता प्रक्रिया केलेले म्हणजेच ‘इम्युनो लेबल्ड’ उंदीर वापरले जातात. यासाठी फ्लुरोसंट अँटि बॉडिज उंदराच्या रक्तात इंजेक्शनच्या सहाय्याने सोडल्या जातात. विशिष्ट रसायनं वापरून शरीर पारदर्शक केलं जातं. मृत उंदराच्या मज्जातंतूंचं सूक्ष्मदर्शीय स्कॅनिंग तब्बल ४० तास चालतं.अशा तऱ्हेनं सगळ्या शरीरभरच्या मज्जातंतूंचा त्रिमिती- थ्रीडी नकाशा तयार होतो. या करता अनेक प्रकारचा डेटा गोळा करावा लागतो. प्रत्यक्षात ही संशोधन प्रक्रिया दीर्घ काळ चालली. ती पूर्ण होण्यासाठी दहा वर्षा पेक्षा जास्त काळ लागला.
कशाला तयार करायचा नकाशा?
शरीरभर पसरलेल्या मज्जातंतूंचा कशाला तयार करायचा नकाशा, असा प्रश्न कोणाला पडू शकतो. आज आपण एखादी दिशा वा एखादा पत्ता अचूकपणे कळावा यासाठी जीपीएस (Global Positioning System) तंत्र अगदी सहजपणे वापरतो. पण ते तयार झालं कसं? तर ही एक प्रणाली आहे. जी उपग्रहावरून येणाऱ्या संदेशावरुन फक्त अक्षांश रेखांशाचा उपयोग करून नेमकं स्थान सांगत असते. त्यासाठी शहराचा नकाशा महत्त्वाचा असतो. हा शहराचा नकाशा जीपीएसला संदर्भ देतो. जीपीएसने निर्माण केलेले गुणक शहराच्या कागदी नकाशावर मांडले गेले म्हणजे रस्ते,गल्ल्या,इमारती दिसू लागतात. शरीरभर पसरलेल्या नर्व्हज््चा हा प्राथमिक नकाशा म्हणजे, जणू कागदावरच्या नकाशासारखा आहे. पुढील संशोधना करता याची अतिशय गरज आहे. हा नकाशा जितका बिनचूक तितकं पुढचं संशोधन फलदायी,असा हा विचार आहे. म्हणजेच कागदावरचा नकाशा बिनचूक असेल तर जीपीएस तंत्र अधिक प्रभावी आणि अचूक ठरणार ,असा हा मामला असतो.
संशोधनाचे उपयोग काय?
एखाद्या अपघातात किंवा आजारात माणसाच्या शरीरातले नर्व्हज्् म्हणजेच मज्जातंतु तुटतात. ते तुटल्यास जोडायचे कसे, नर्व्हज््चं काम मंदावल्यास ते पूर्ववत करण्यासाठी कोणते उपचार योजायचे, यावर या संशोधनाने लखलखीत प्रकाश पडणार आहे. थोडक्यात, तुटलेल्या नर्व्हज्् जोडण्यासाठी सर्जन मंडळींना या मॅपमुळे योग्य ते मार्गदर्शन होऊ शकतं. दीर्घकालिक न्यूरोपॅथिक वेदनांमुळे कित्येक रुग्णांना त्रास होत असतो. वेदनेची संवेदना मेंदूपर्यंत घेऊन जाणारे कोणते नर्व्हज्् आहेत, हे शोधणं या नकाशामुळे शक्य होणार आहे.
वेगस नर्व्ह ही काय भानगड?
आपल्या शरीरात वेगस नर्व्ह नावाची यंत्रणा असते. म्हणजे अनेक सूक्ष्म चेतातंतूची ही एक केबल आहे. या वेगस नर्व्हमधूनच हृदयापासून ते मोठ्या आतड्यापर्यंत सगळ्या अवयवांना चेतातंतू पुरवले जातात. मेंदू या सगळ्या अवयवांचे नियंत्रण ‘वेगस नर्व्ह’ मार्फत करतो. ‘वेगस’चा अर्थ वॉन्डरिंग म्हणजे भटकणारा नर्व्ह असा आहे. मेंदूपासून निघणारा हा सगळ्यात लांबलचक नर्व्ह आहे. हा छातीत हृदय आणि फुप्फुसं तर पोटात जठरापासून मोठ्या आतड्यापर्यंत पोचतो. म्हणून त्याच्या भटकंतीचा लागलेला शोध महत्त्वाचा ठरत आहे. वेगस नर्व्हचे अवयवांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग शोधल्यामुळे अनेक विकारांवर नवे उपचार उपलब्ध होणार आहेत. विकासात्मक जैवविज्ञान,तौलनिक शरीरविज्ञान आणि जैववैद्यकीय विज्ञान संशोधना करता या नकाशाचा होणारा उपयोग विज्ञानाच्या प्रगतीत अतिशय मोलाची भूमिका बजावणार, असा संशोधकांना विश्वास आहे.
