Packaged Food Labels Misleading: हाय प्रोटिन, हाय फायबर आणि हाय न्यूट्रिशनच्या नावाखाली बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या प्रॉडक्ट्सच्या लेबलवर काय लिहिले आहे, याकडे आपण सहसा लक्ष देत नाही. मात्र, आकर्षक जाहिरातींना भुलून होणारी ही फसवणूक आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अन्न पदार्थांच्या पाकिटांवरील लेबल्स वाचणे आणि त्यातील घटकांचे सत्य ओळखणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.

पालक खूश, पण…

एका शाळेत पालकांसाठी मार्गदर्शनपर सत्र घेतलं होतं. अमूक एक पावडर दुधात मिक्स करून द्यायची का, प्रोसेस्ड मिल्क प्रॉडक्ट्समुळे मुलांचं काय नुकसान होऊ शकतं, खाऊच्या डब्यासाठी कोणकोणते पर्याय असू शकतात, मुलांना खाऊ देताना काय खबरदारी घ्यावी, याबाबत ऐकताना पालक समाधानी दिसत होते. सत्र उत्तम झाल्याच्या समाधानात मी घरी आले. म्हटलं, मिशन सक्सेसफुल. पण…

अँटी-क्लायमॅक्स का झाला?

दुसऱ्या दिवशी मला शाळेतून एका व्यक्तीचा फोन आला. ती व्यक्ती म्हणाली, तुम्ही हे सत्र घेण्यापूर्वी आमच्याशी बोलायला हवं होतं; आम्ही शाळेत गेले अनेक महिने मुलांना पोषक म्हणून शक्तिवर्धक दूध आग्रहानं मुलांसाठी उपलब्ध करून दिलंय. तुमच्या सत्रानंतर आता पालक आमच्याकडे तक्रार घेऊन आले आहेत. या तक्रारीमागचा सूर असं सांगत होता की, पालकांना आणि शाळा व्यवस्थापनाला ठराविक ब्रॅण्डने हे पटवून दिलं होतं की विशिष्ट दूधच मुलांसाठी उत्तम आहे! म्हणजेच जाहिरातीला भुलून उत्पादन घेतलं गेलं होतं, त्याचाच त्रागा तक्रारदाराकडून व्यक्त होत होता.

Packaged Food Labels Misleading Health Claims Informational | Food Labeling Truth Marathi News | पॅकेज्ड फूड आणि न्यूट्रिशन लेबलची फसवणूक | प्रोटीन बार आणि साखरेचे दुष्परिणाम
पॅकेज्ड फूडवरील दिशाभूल करणारे दावे आणि वास्तव (Image- Gemini)

टिकाऊ, आकर्षक म्हणजेच हेल्दी?

अनेकदा हेल्दी दूध म्हणून त्यात वेगवेगळ्या पदार्थांचं मिश्रण केलं जातं. या मिश्रणामुळे दुधाची चव बदलू नये आणि दूध जास्त वेळासाठी टिकून राहावं यासाठी काही विशेष पदार्थ त्यात मिसळले जातात. हे पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. अशा प्रक्रिया केलेल्या पदार्थांवर काहीही माहिती लिहिलेली नसते, FSSAI चा लोगो नसतो, पदार्थांमध्ये मिसळलेल्या घटकांची माहिती नसते. सगळाच कारभार संशयास्पद असतो.

दुधात पाणी साखरेचं?

उदाहरणच द्यायचं झालं तर, हेल्दी रागी चॉकलेट मिल्क असं लिहून विकलं जाणाऱ्या दुधात ग्रेन माल्ट म्हणून साखरेचं प्रमाण ७५ टक्के इतकं असतं. म्हणजे, दूध म्हणून विकल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साखरेचं पाणी जास्त असतं. वर्षानुवर्षे वेगेवेगळ्या पदार्थांमध्ये पोषणतत्त्व कमी असतानादेखील, त्यावर हेल्दी असं सहज लिहिलं जातं. दावा हेच सत्य मानून आपण ते चवीनं खातो. इथे फसगत आपली होते. अशाने आरोग्यावर दुष्परिणाम होतो.

लेबलवर काय असावं?

मुळात, अन्न, सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या नियमांनुसार प्रत्येक उत्पादनावर लेबल आवश्यक असतं. त्यावर त्यातील प्रत्येक घटक पदार्थांचा उल्लेख असणं आवश्यक आहे. सोबतच पदार्थाची घनता किंवा चव वाढवणारे किंवा आकर्षक रंग आणणारे खाद्यपदार्थ / रसायनं किंवा कोणत्याही आम्लांचा समावेश असेल तर त्यासंबंधीची पूर्ण माहिती त्या पदार्थाच्या लेबलवर लिहिणं बंधनकारक आहे.

मापातलं पाप

आपलं प्रॉडक्ट खपवण्यासाठी अनेक कंपन्या सर्रास चलाखी करत असतात. तसं करताना लेबलच्या संबंधानं असलेल्या बंधनकारक नियमांतून पळवाटा शोधतात. दिशाभूल करणारे दावे लिहून उत्पादन हमखास विकतात. उदाहरणार्थ- एखादी कंपनी ‘दूध की शक्ती बढाओ’ असं म्हणत दुधात १ ते ४ टक्के तृणधान्ये किंवा कडधान्यांचं प्रमाण दाखवून प्रत्यक्षात मात्र, अत्यल्प दूध असणारं द्रव्य विकत असतात. ग्राहकांना या चलाखीचा पत्ताच लागत नाही.

फिटनेससाठी स्पेशल पाणी?

आता फिटनेस ही एक बुमिंग इंडस्ट्री झालेली आहे. एकीकडे जिमगोअर्सची संख्या वाढताना दिसतेय. दुसरीकडे, फिटनेस क्षेत्रातल्या अनेक जणांचा सहज मिळणाऱ्या पोषक पदार्थांकडे असलेला कल पाहता बाजारात वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सनी मोहात पाडणारी उत्पादनं बाजारात आणली आहेत. ‘प्रोटीन रिच’ चॉकलेट्स, केक, ब्रेड, बिस्किट एवढंच नव्हे तर फिटनेससाठी स्पेशल पाणीदेखील बाजारात उपलब्ध आहे. म्हणजे, काय तर वाहत्या गंगेत हात धुणं सुरु आहे.

हिसाब-किताब सेम

खरंतर या सगळ्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये असणारे घटकपदार्थ ग्राहक म्हणून सजगपणे तपासणं आणि निवड करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रोटीन रिच’ असा दावा करताना एखाद्या पदार्थामध्ये ५ ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रोटिनयुक्त घटक असू शकतात, मात्र सोबतच कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ यांचं प्रमाण देखील तितकंच असू शकतं. म्हणजेच हिसाब-किताब सेम.

पचनाच्या विकारांना आमंत्रण

उदाहरण द्यायचं झालं तर अनेक स्नॅक बार्स आणि चॉकलेट्समध्ये ज्याला शुगर अल्कोहोल असं म्हटलं जातं, असा मल्टिटॉल (INS 965) हा घटक वापरला जातो. जिम केल्यानंतर अनेकांचा कल असे आकर्षक स्नॅक बार्स किंवा चॉकलेट्स खाण्याकडे असतो. मात्र सातत्याने हे खाल्ल्याने पचनाचे विकार उद्भवू शकतात, हे आपल्या गावीही नसतं.

या गोडाला काही सीमा?

‘ऑपरेशन दिशाभूल’ हे अनेक कंपन्यांचं मिशन असू शकतं. अशा कंपन्या ट्रान्स फॅट्स नाहीत, असा दावा करून बहुतांश उप्त्पादनांमध्ये पामतेलाचा वापर करत असतात. जाहिरात करताना मारे आनंदाचं प्रतीक, आजीच्या प्रेमाचं प्रतीक ऊर्जेचा स्रोत अशा काहीकाही थापा मारतात, पण विकल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या गोड चॉकलेट्स आणि बिस्किटांमध्ये साखर, लिक्विड ग्लुकोज (ज्यामुळे चॉकलेट्सचा मऊपणा आणि चिकटपणा टिकून राहतो) असे शरीराला घातक ठरणारे पदार्थ प्रामुख्याने आढळून येत असतात.

मल्टिग्रेन की नो ग्रेन?

एखादी जाहिरात उत्तम आणि दिलखेचक असू शकते. मात्र त्यात दाखवलेला खाद्यपदार्थ तितका पोषक असेलच असा काही नियम नसतो. आपल्याकडे पोषक पीठ म्हणून मल्टिग्रेन पीठ विकलं जातं. त्यातलं गव्हाचं प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त आणि बाकी घटकपदार्थ केवळ एक-दोन टक्के असला फसवणुकीचा कारभार असतो. मल्टिग्रेन बिस्किटमध्ये पोषक बिस्किट असं म्हणताना ४० टक्क्यांहून जास्त रिफाइन व्हिट फ्लोअर म्हणजे मैदाच असतो. दावा केलेलं कोणतंही धान्य आढळून येत नाही. आपण मात्र, खातोय हेल्दी, बनतोय हेल्दी या भ्रमात राहतो. इथेच ग्राहक म्हणून सजगता अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यात भारतात अजूनही पदार्थांसाठी कलर कोड वापरात नसल्यामुळे तर लेबल्सबद्दल जागरूकता आवश्यक ठरते.