Rameshwar Nath Kao RAW Founder: १९७१ च्या नोव्हेंबर महिन्यात भारताच्या गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानचा एक अत्यंत गुप्त कट उघडकीस आणला. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल याह्या खान यांच्या थेट फोन कॉलवर पाळत ठेवून भारताने युद्धाची संपूर्ण पूर्वतयारी केली. या सर्व ऐतिहासिक घडामोडींच्या केंद्रस्थानी होते भारताच्या ‘रॉ’ (R&AW) या गुप्तचर संस्थेने पहिले प्रमुख-रामेश्वर नाथ काव!
१९७१ साली नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतासाठी विदेशात गुप्तवार्ता संकलन करणाऱ्या संस्थेला एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. पाकिस्तानच्या सत्ताव्यवस्थेत के. शंकरन नायर यांचा एक गुप्त सूत्रधार होता. त्याच्याकडून पाकिस्तान पश्चिम आघाडीवरील भारतीय हवाई तळांवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाली. नायर यांनी हा इशारा संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर भारतीय हवाई दलाला सतर्क करण्यात आले. अखेर ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानने भारतीय हवाई तळांवर हल्ले केले; मात्र तोपर्यंत भारताला सज्ज होण्यासाठी वेळ मिळाला होता.
तेव्हा रॉ फक्त तीन वर्षांचीच होती
त्यानंतर अवघ्या तेरा दिवसांनंतर पाकिस्तानी लष्कराने ढाक्यात शरणागती पत्करली आणि बांगलादेश या नव्या स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाला. पाकिस्तानच्या हल्ल्याची महत्त्वाची माहिती आधीच मिळवणाऱ्या या गुप्तचर संस्थेची धुरा त्या वेळी रामेश्वर नाथ काव यांच्या हाती होती. ते विदेशात गुप्तवार्ता संकलन करणाऱ्या ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’चे पहिले प्रमुख होते. विशेष म्हणजे, १९७१ चे युद्ध झाले तेव्हा ‘रॉ’ची स्थापना होऊन अवघी तीनच वर्षे झाली होती.
‘रॉ’ची स्थापना
१९६८ साली ‘रॉ’ची स्थापना झाली. या संस्थेची उभारणी करण्यात रामेश्वर नाथ काव यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. यापूर्वी ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (IB) अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतासाठी विदेशात गुप्तवार्ता संकलन करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. रामेश्वर नाथ काव यांनी केवळ एका नव्या गुप्तचर संस्थेची स्थापना केली नाही, तर अल्पावधीत तिला सक्षम यंत्रणेचे स्वरूप दिले.
सुयोग्य अधिकाऱ्यांची निवड
योग्य अधिकाऱ्यांची निवड, त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि कौशल्ये देणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात प्रभावीपणे काम करू शकेल अशी कार्यपद्धती विकसित करणे, यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच ‘रॉ’ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेतील एक महत्त्वाची गुप्तचर यंत्रणा म्हणून पुढे आली.
दोन प्रमुख उद्दिष्टे
‘रॉ’चे माजी अतिरिक्त सचिव बी. रामन यांनी आपल्या ‘Kaoboys of R&AW’ या पुस्तकात संस्थेच्या सुरुवातीच्या काळाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘रॉ’ची स्थापना झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांतच रामेश्वर नाथ काव यांनी अधिकाऱ्यांसमोर दोन प्रमुख उद्दिष्टे ठेवली होती. पहिले म्हणजे पाकिस्तान आणि चीनविषयी गुप्त माहिती गोळा करण्याची भारताची क्षमता अधिक मजबूत करणे आणि दुसरे म्हणजे पूर्व पाकिस्तानमध्ये गुप्त कारवाया करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे. “गुप्त कारवाया प्रभावीपणे करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी दोन-सव्वादोन वर्षांचा काळ अत्यंत कमी होता. तरीही ‘रॉ’ने ते करून दाखवले,” असे रामन यांनी पुस्तकात म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष जनरल याह्या खान यांच्या संपर्क यंत्रणेत खोलवर शिरकाव
रामन यांनी आणखी एका महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख केला आहे. काव यांच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल याह्या खान यांच्या संपर्क यंत्रणेत इतका खोलवर शिरकाव केला होता की, त्यांच्या दूरध्वनी संभाषणांची माहिती भारतापर्यंत पोहोचत होती. रामन यांच्या म्हणण्यानुसार, युद्धाच्या काळात जवळपास दररोज याह्या खान आणि पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या दूरध्वनी संभाषणांतील महत्त्वाचा मजकूर इंदिरा गांधी आणि युद्धाशी संबंधित निर्णय घेणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत होता.
लष्कराच्या यशाची पायाभरणी काव यांच्याकडून
‘रॉ’च्या नावावर नंतर अनेक महत्त्वपूर्ण कामगिऱ्यांची नोंद झाली; मात्र या संस्थेची पायाभरणी करणारे रामेश्वर नाथ काव स्वतः कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले. काव यांच्याबरोबर काम केलेले ‘रॉ’चे माजी अधिकारी व्ही. बालचंद्रन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना याबाबत एक महत्त्वाची आठवण सांगितली. ते म्हणतात, “बांगलादेश युद्धाचा उल्लेख झाला की, तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ आणि बीएसएफचे प्रमुख रुस्तमजी यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. मात्र त्यांच्या यशासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी काव यांनी करून ठेवली होती. काव यांना स्वतःविषयी चर्चा झालेली आवडत नसे. गुप्तचराचे काम शांतपणे आणि कोणताही गाजावाजा न करता केले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती,” असे बालचंद्रन सांगतात.
बालपणीच्या दुःखांनी घडवलेला स्वभाव
काव यांचा हा अबोल आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारा स्वभाव केवळ त्यांच्या व्यवसायामुळे घडला नव्हता. तर त्याची पाळेमुळे त्यांच्या दुःखद आणि काहीशा अपमानास्पद अनुभवांनी भरलेल्या बालपणातही होती. काव अवघे पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या वेळी त्यांच्या आईचे वय केवळ २५ वर्षे होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. वाराणसीमध्ये जन्मलेल्या काव यांचे पुढील शालेय शिक्षण बडोद्यात झाले; मात्र तिथले दिवस त्यांच्यासाठी फारसे सुखद नव्हते. वर्गातील मुले त्यांच्या ‘Kao’ या आडनावाचा उच्चार मुद्दाम ‘Cow’ असा करत आणि त्यांची चेष्टा उडवत. शरीराने स्थूल असल्यामुळे ‘ब्राऊन बफेलो’ आणि ‘सॅक ऑफ पोटॅटोज’ अशा अपमानास्पद शेलक्यांनीही त्यांना हिणवले जात असे.

कोशात गुरफटणे आणि अस्वस्थता
नितीन ए. गोखले यांनी लिहिलेल्या R.N. Kao: Gentleman Spymaster या चरित्रात काव यांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा आणि ध्वनिमुद्रित आठवणींचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार, वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षीच लोक आपल्याकडे पाहत आहेत, आपले निरीक्षण करत आहेत, याची काव यांना कमालीची जाणीव होऊ लागली होती. ही अस्वस्थता इतकी वाढली होती की, बरोबर नोकर असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी जेवणेही त्यांना अवघड वाटत असे. विशेष म्हणजे, अनेक दशके उलटल्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी जेवताना जाणवणारी ही अस्वस्थता पूर्णपणे गेली नव्हती, असे काव यांनी स्वतः लिहून ठेवले आहे. त्या बालपणीच्या अनुभवांमुळे आपण स्वतःच्या कोशात अधिकाधिक गुरफटत गेलो आणि आयुष्याकडे अंतर्मुखपणे पाहण्याच्या आपल्या स्वभावाची पायाभरणी त्याच काळात झाली, असे त्यांनी नमूद केले होते. पुढे आयुष्यभर इतरांच्या हालचालींचे निरीक्षण करताना स्वतः मात्र कोणाच्याही नजरेत न येण्याची कला आत्मसात करणाऱ्या भारताच्या या गुप्तचर अधिकाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाची पाळेमुळे अशा बालपणीच्या अनुभवांमध्येही दडलेली होती.
आगळे-वेगळे छंद
मात्र काव यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी एक वेगळी बाजू होती. नितीन ए. गोखले यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांना प्राचीन भारतीय इतिहास, मंदिर स्थापत्य आणि शिल्पकलेमध्ये विशेष रस होता. ते योगाभ्यास करत आणि माती, लाकूड तसेच दगडापासून विविध वस्तू तयार करण्याचाही त्यांना छंद होता. लखनऊ विद्यापीठात त्यांनी इंग्रजी साहित्य, इतिहास आणि पर्शियन भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. पूर्ण केले. फुले आणि प्राण्यांविषयीही त्यांना विशेष प्रेम होते. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ते आपल्या अभिरुचीसाठी ओळखले जात.
नेहरूंबरोबर विविध देशांच्या दौऱ्यांवर
१९४० साली काव भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. स्वातंत्र्यानंतर ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (IB) रुजू झाले. आयबीचे तत्कालीन प्रमुख बी. एन. मलिक यांच्या नेतृत्वाखाली काम करताना काव यांच्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नेहरूंबरोबर विविध देशांच्या दौऱ्यांवर गेल्यामुळे काव यांचा परदेशी गुप्तचर संस्थांच्या प्रमुखांशी संपर्क आला. त्यातून इतर देशांतील गुप्तचर संस्था नेमक्या कशा पद्धतीने काम करतात, हे जवळून समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली.
१९६२ च्या भारत-चीन युद्धातून धडा
१९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारताच्या गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या. त्यानंतर ‘एव्हिएशन रिसर्च सेंटर’ (ARC) स्थापन करण्यात आले आणि १९६३ ते १९६६ या काळात काव यांनी त्याचे नेतृत्व केले. अमेरिकेच्या मदतीने एआरसीने हवाई मार्गाने गुप्त माहिती गोळा करण्याची क्षमता विकसित केली. भारताच्या उत्तरेकडील सीमेवरील दुर्गम आणि आव्हानात्मक भूप्रदेशात कारवाया करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’च्या (SFF) स्थापनेतही काव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
‘रॉ’ची सुरुवात कशी झाली?
१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे प्रमुख सल्लागार पी. एन. हक्सर यांनी स्वतंत्र परदेशी गुप्तचर संस्था उभारण्याची जबाबदारी रामेश्वर नाथ काव यांच्यावर सोपवली. इंटेलिजन्स ब्युरोच्या (IB) प्रामुख्याने पोलीस-केंद्री कार्यपद्धतीपेक्षा ही नवी संस्था वेगळी असावी, अशी कल्पना होती. परदेशात कोणाचेही लक्ष वेधून न घेता काम करू शकतील आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञता असलेले अधिकारी या संस्थेला आवश्यक होते.
मॅग्नम ओपस
या कामात काव यांनी के. शंकरन नायर यांना आपल्या बरोबर घेतले. पाकिस्तान तसेच व्यापक इस्लामी जगताची सखोल जाण असलेले नायर हे अनुभवी गुप्तचर अधिकारी होते. नव्या संस्थेची रचना निश्चित करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. नितीन ए. गोखले यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, काव यांनी तयार केलेल्या या संस्थात्मक रचनेचे वर्णन नायर यांनी त्यांचे ‘मॅग्नम ओपस’ म्हणजेच आयुष्यातील सर्वोत्तम काम असे केले होते. पुढे कॅबिनेट सचिवालयाने या नव्या संस्थेला ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ (R&AW) हे नाव दिले.
अधिकाऱ्याची निवड करण्यापूर्वी बारकाईने पारख
योग्य व्यक्तीची पारख करून तिला योग्य जबाबदारी देण्याची काव यांची हातोटी ‘रॉ’च्या उभारणीत महत्त्वाची ठरली. काव यांनीच ‘रॉ’मध्ये भरती केलेले आणि पुढे संस्थेचे प्रमुख झालेले विक्रम सूद यांच्या आठवणींचा उल्लेख गोखले यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. त्यानुसार, एखाद्या अधिकाऱ्याची निवड करण्यापूर्वी काव त्याची बारकाईने पारख करत. अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अहवालांमध्ये अचूकता असावी, याबाबत ते अत्यंत आग्रही होते. एखादा अहवाल त्यांच्या अपेक्षेनुसार नसेल तर त्यावर ते केवळ ‘off’ एवढाच शेरा मारून तो परत पाठवत. कामाच्या बाबतीत ते कठोर आणि शिस्तप्रिय होते; बैठकीत आरडाओरडा करून किंवा राग व्यक्त करून दबाव निर्माण करण्याची त्यांची पद्धत नव्हती.
१९७१ च्या युद्धात कसोटी
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ‘रॉ’च्या गुप्त माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे आणि गुप्त कारवाया राबवणे या तिन्ही क्षमतांची मोठी कसोटी लागली. ‘रॉ’ने बंगाली राजकीय नेते आणि प्रतिकार गटांशी संपर्क प्रस्थापित केला आणि युद्धासाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार करण्यात मदत केली. भारतीय लष्कराने थेट युद्धात प्रवेश करण्यापूर्वी बंगाली प्रतिकार चळवळीतील विविध घटकांमध्ये समन्वय साधणे आणि पाकिस्तानी सैन्यावर सातत्याने दबाव निर्माण करणाऱ्या कारवायांना मदत करणे, हीदेखील संस्थेची महत्त्वाची भूमिका होती.
चौकटीबाहेरचे काम
व्ही. बालचंद्रन म्हणतात की, काव यांनी नेहमीच्या प्रशासकीय चौकटीबाहेर जाऊन विशिष्ट कौशल्ये असलेल्या व्यक्तींनाही ‘रॉ’शी जोडले होते. त्यात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश होता. त्यांच्या पथकाने ३ डिसेंबर १९७१ रोजी भारतावर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत पाकिस्तान असल्याची माहिती आधीच मिळवली होती. बालचंद्रन यांच्या मते, काव यांचे योगदान मोठे होते; मात्र त्याचे वैशिष्ट्य हेच होते की ते सामान्य लोकांच्या नजरेस पडत नव्हते.
बांगलादेशनंतर सिक्कीम
बांगलादेशच्या निर्मितीनंतरही ‘रॉ’च्या वाट्याला काही महत्त्वाच्या कामगिरीही आल्या. १९७५ मध्ये सिक्कीम भारतात विलीन होण्यापूर्वी घडलेल्या घडामोडींमध्ये ‘रॉ’ने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र गुप्तचर यंत्रणेच्या क्षमतेला मर्यादा असतात, हे दाखवणाऱ्या काही घटनाही याच काळात घडल्या. १९७५ साली ऑगस्ट महिन्यात बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांची ढाक्यात हत्या करण्यात आली. या घटनेनंतर एवढ्या मोठ्या कटाची पूर्वकल्पना ‘रॉ’ला का आली नाही, असा प्रश्न विचारला गेला.
मात्र बालचंद्रन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “ ‘रॉ’ या घडामोडींबाबत पूर्णपणे अनभिज्ञ नव्हती. १९७५ मध्ये काव आपली ओळख गुप्त ठेवून बांगलादेशात गेले होते. त्यांनी मुजीबुर रहमान यांना त्यांच्याविरोधात कट शिजत असल्याची माहिती दिली होती. मात्र मुजीबुर यांनी हा इशारा फारसा गांभीर्याने घेतला नाही.” मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर एका बैठकीत एका पोलीस अधिकाऱ्याने ‘रॉ’ नेमके काय करत होती, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर काव यांनी केवळ, “मी एवढेच सांगू शकतो की, या घटनेने आम्हाला आश्चर्य वाटले नाही,” असे उत्तर दिल्याची आठवण बालचंद्रन सांगतात. विशेष म्हणजे, आपण स्वतः बांगलादेशात जाऊन मुजीबुर रहमान यांना संभाव्य कटाची पूर्वसूचना दिली होती, याचा उल्लेख करून श्रेय घेण्याचा प्रयत्नही काव यांनी केला नाही.
आणीबाणीच्या काळात ‘रॉ’वरही संशय
रामेश्वर नाथ काव ‘रॉ’चे प्रमुख असतानाच देशात आणीबाणी लागू झाली. या काळात विरोधकांनी ‘रॉ’वर सरकारच्या हातातील बाहुले म्हणून काम केल्याचा आरोप केला होता. मात्र काव यांच्यासोबत काम केलेले माजी ‘रॉ’ अधिकारी व्ही. बालचंद्रन यांना हा आरोप मान्य नाही. “आणीबाणीच्या काळात आपल्याला ‘रॉ’च्या लोकांनी अटक केली होती, असा आरोप जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा केला होता. मात्र ते खरे नव्हते. लोकांना अटक करण्याचे काम इंटेलिजन्स ब्युरो (IB) करत होती, ‘रॉ’ नव्हे. उलट काव यांनी ‘रॉ’ला सत्ताकेंद्रातील राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.
आर्थिक पाठबळ कमी झाले
संजय गांधी यांचेही काव यांच्याबद्दल फारसे चांगले मत नव्हते. त्या काळातील परिस्थितीमुळे काव खूप अस्वस्थ होते,” असे बालचंद्रन यांनी सांगितले. नंतर जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर परिस्थिती आणखी बदलली. नव्या सरकारच्या मनात ‘रॉ’विषयी संशयाचे वातावरण होते. संस्थेचे आर्थिक पाठबळ आणि अधिकार कमी करण्यासही सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर काव यांनी १९७७ मध्ये मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली.
निवृत्तीनंतरही काव यांचा प्रभाव कायम
मात्र निवृत्तीनंतरही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवरील काव यांचा प्रभाव संपला नाही. त्याच वर्षी ‘रॉ’चे प्रमुख एन. एफ. सनटूक यांनी एका अत्यंत संवेदनशील विषयावर काव यांची मदत घेतली. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (Nuclear Non-Proliferation Treaty-NPT) स्वाक्षरी करू नये, असा सल्ला तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना देण्यासाठी अणुऊर्जा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष होमी सेठना यांचे मन वळवायचे होते. बालचंद्रन यांच्या म्हणण्यानुसार, हा निरोप सेठना यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी काव यांनी त्यांच्यावर सोपवली होती.
काव यांच्या धोरणात्मक विचारांचे वेगळेपण
काव यांच्या धोरणात्मक विचारांची आणखी एक झलक १९८१ मध्ये पाहायला मिळाली. त्या काळात पाकिस्तान गुप्तपणे अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम राबवत असल्याचे इतर देशांना पटवून देण्यासाठी भारत प्रयत्न करत होता. मात्र पारंपरिक राजनैतिक मार्ग आणि गुप्तचर यंत्रणांकडून केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अशा परिस्थितीत काव यांनी या समस्येकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला.
आंतरराष्ट्रीय माध्यमांचा वापर
पाकिस्तानच्या कथित ‘इस्लामिक बॉम्ब’विषयी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘बीबीसी’ Panorama कार्यक्रमांतर्गत संयुक्तपणे तपास करत असल्याची माहिती काव यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘रॉ’चे तत्कालीन प्रमुख एन. एफ. सनटूक यांना एक वेगळी कल्पना सुचवली. पॅरिसमधील एका ज्येष्ठ पत्रकाराशी संपर्क साधून ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या संबंधित पत्रकारांशी भेट घडवून आणण्याची जबाबदारी बालचंद्रन यांच्यावर सोपवावी, असा त्यांचा सल्ला होता. हा त्या काळासाठी काहीसा वेगळा प्रयोग होता. सरकारी किंवा राजनैतिक मार्गाने थेट माहिती देण्याऐवजी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांपर्यंत संबंधित माहिती पोहोचवायची आणि त्यातून हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणायचा, अशी त्यामागची कल्पना होती.
काव पुन्हा सरकारमध्ये
दरम्यान, काव पुन्हा एकदा सरकारी सेवेत परतले. बालचंद्रन यांनी सांगितले की, इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या ए. सी. एन. नांबियार यांनी काव यांना पुन्हा सरकारी सेवेत घेण्याची शिफारस केली होती. त्यानंतर १९८१ मध्ये काव यांची कॅबिनेट सचिवालयात वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. बालचंद्रन यांच्या मते, आज ज्याला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची (NSA) भूमिका म्हटले जाते, जवळपास तशाच स्वरूपाची जबाबदारी काव त्या काळात पार पाडत होते. विशेष म्हणजे, त्यासाठी त्यांच्याकडे अवघ्या दोन-तीन व्यक्तींचे छोटेसे कार्यालय होते.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पद सोडले
काव यांच्या कारकिर्दीची ही दुसरी इनिंग मात्र अचानक संपुष्टात आली. १९८४ साली ऑक्टोबर महिन्यात भारत-चीन संबंधांमध्ये संवादाची नवी शक्यता तपासण्यासाठी काव बीजिंगमध्ये होते. याच काळात ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर चिनी अधिकाऱ्यांनी काव यांना हाँगकाँगपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली आणि तेथून ते भारतात परतले. इंदिरा गांधी यांच्या अंत्यसंस्कारानंतर काव यांनी राजीव गांधी यांची भेट घेतली आणि आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली. यानंतर काव यांनी पुन्हा कोणतेही अधिकृत सरकारी पद स्वीकारले नाही.
लो- प्रोफाइल व्यक्तिमत्व
सार्वजनिक जीवनापासूनही ते पूर्णपणे दूर राहिले. त्यांची छायाचित्रेही फारशी पाहायला मिळत नसत आणि आपल्या कामगिरीचे श्रेय त्यांनी सार्वजनिकपणे कधी घेतले नाही. बालचंद्रन यांना मात्र यात काहीच आश्चर्य वाटत नाही. कारण त्यांच्या आठवणीतील रामेश्वर नाथ काव हे कायमच प्रसिद्धीपासून दूर राहणारे आणि अत्यंत लो-प्रोफाइल व्यक्तिमत्त्व होते. आज जागतिक पातळीवर ‘रॉ’च्या कार्याविषयी आदर बाळगला जातो, त्याची पायाभरणी काव यांनी केलेली आहे.
