ऋग्वेदामध्ये जवळजवळ ३० ऋषिका (स्त्री ऋषी) होत्या, असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनी वैदिक ऋचांची रचना केली होती, असाही छातीठोक दावा केला जातो. परंतु इतिहास एवढा सोपा आणि सोयीस्कर नसतो.
वैदिक स्त्रीचं स्थान कोणतं?
हे तर निर्विवाद की, ऋग्वेदामध्ये लोपामुद्रा, जुहू, श्रद्धा, घोषा, अपाला, विश्ववारा आणि शची या सारख्या स्त्रियांचं अस्तित्व निश्चितच ठळक आहे. त्यात या स्त्रिया बोलतात, देवी बोलतात, पत्नी आपल्या पतीशी खुलेपणाने संवादही साधतात. त्याचबरोबर स्त्रिया इच्छा, राग, मत्सर आणि दुःखही व्यक्त करतात. पण एखाद्या कवितेत स्त्री बोलत आहे, याचा अर्थ ती कविता स्त्रीनेच रचली आहे असा होत नाही.
स्त्रीचा आवाजाची झेप किती?
ऋग्वेदामध्ये अनेक स्त्री-आवाज जतन केले गेले आहेत हे खरंच. परंतु ‘स्त्री-आवाज’ असणं आणि ‘स्त्री-लेखक’ असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यात वैदिक परंपरेला जोडलेल्या पारंपरिक अनुक्रमणीमध्ये (निर्देशांक) पात्रांना, देवींना, संकल्पनांना अगदी प्राण्यांनाही ‘ऋषींचा’ दर्जा दिलेला आहे. हा फरक स्त्री आवाज असणं आणि स्त्री लेखक असणं या मुद्द्याला अधिक गुंतागुंतीचा बनवतो. पण हा गोंधळ नेमका कुठून निर्माण होतो?
अनुक्रमणी हेच गोंधळाचं कारण?
यातला बहुतांश गोंधळ हा वैदिक परंपरेला जोडलेल्या ‘अनुक्रमणी’मुळे (पारंपरिक निर्देशांक) निर्माण झालेला आहे. कारण,अशा अनुक्रमणींची रचना वैदिक मंत्रांच्या निर्मितीनंतर तब्बल एक हजार वर्षांनी म्हणजेच इसवी सन पूर्व १०० च्या सुमारास झालेली आहे, जेणेकरून ब्राह्मणांना सूक्तांचा संदर्भ शोधणं सोपं जावं. यातली सर्वात प्रसिद्ध अनुक्रमणी म्हणजे कात्यायन रचित ‘सर्वानुक्रमणी’. ती प्रत्येक सूक्ताशी संबंधित ऋषी,देवता आणि छंद यांची माहिती देते. सोबतच नंतरच्या काळातल्या वैदिक विद्वानांनी त्या प्राचीन सूक्तांचा अर्थ कसा लावला हेदेखील आपल्याला हे सांगते. मात्र, ऐतिहासिकदृष्ट्या ती सूक्तं नेमकी कोणी रचली, हे ती सांगू शकते असं नाही.
विश्ववारा हे विशेषण की रचनाकार?
उदाहरणाच घ्यायचं तर, ऋग्वेद ५.२८ मधल्या ‘विश्ववारा आत्रेयी’ या ऋषिकेचं उदाहरण पाहा. पारंपरिकदृष्ट्या तिला या सूक्ताची स्त्री ऋषी मानलं जातं. परंतु ‘विश्ववारा’ हा शब्द सूक्तात आला असला, तरी तो एक विशेषण (Adjective) म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यामुळे विश्ववारा हे खरोखरच एखाद्या ऐतिहासिक कवयित्रीचं नाव होतं का, याबद्दल काही आधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी शंका उपस्थित केली आहे. नंतरच्या परंपरेनं सूक्तात आलेल्या एका शब्दाचं रूपांतर त्याच्या तथाकथित रचनाकाराच्या नावात केलं असण्याची शक्यता आहे.
प्रतिकात्मक शब्दांनाच स्त्री ऋषी मानले?
ऋग्वेद १०.१०९ शी संबंधित ‘जुहू ब्रह्मजाया’ यांचं प्रकरण तर याहून अधिक विचित्र आहे. ‘जुहू’ म्हणजे यज्ञाच्या वेळी तुपाची आहुती देण्यासाठी वापरली जाणारी पळी. तर ‘ब्रह्मजाया’ म्हणजे ब्राह्मणाची पत्नी. परंतु, पुढे जाऊन हे शब्द पारंपरिक अनुक्रमणीत एका लेखिकेची ओळख बनले. असाच प्रकार ‘दक्षिणा’ (यज्ञाचे मानधन), ‘श्रद्धा’ (विश्वास किंवा निष्ठा) आणि ‘वाच’ (वाणी/शब्द) यांच्या बाबतीतही दिसतो. हे सर्व स्त्रीलिंगी शब्द आहेत. त्यांचं रूपक म्हणून स्त्री-रूपात मानवीकरणही केलं जाऊ शकतं. म्हणूनच नंतरच्या परंपरेने त्यांना विशिष्ट सूक्तांशी जोडलेल्या ‘स्त्री ऋषी’ मानलं.
देवी आणि पौराणिक पात्र याच कवयित्री?
जेव्हा या स्त्री ऋषींच्या यादीत देवी आणि पौराणिक पात्रांचा समावेश होतो, तेव्हा तर ही समस्या अधिकच नजरेत भरते. आदिती, इंद्राणी, उर्वशी, यमी आणि सूर्या या संवादात वक्त्या म्हणून येतात. पणिंसोबतच्या प्रसिद्ध संवादात इंद्राची दिव्य कुत्री ‘सरमा’ बोलताना दिसते. सर्पराज्ञी (नागराणी) हीसुद्धा पारंपरिक यादीत दिसून येते. जर प्रत्येक स्त्री-वक्त्याला आपण कवयित्री मानू लागलो, तर आपण कवितेतील ‘पात्र’ आणि ती कविता रचणारी ‘व्यक्ती’ यांच्यात आपण गोंधळ करत आहोत असा त्याचा अर्थ होतो.
लेखक ही स्त्रीच असेल कशावरून?
वैदिक काळातल्या स्त्री रचनाकारांच्या संदर्भातला हा गोंधळ समजून घेण्यासाठी आधुनिक काळातल्या एखाद्या नाटकाचा विचार करता येईल. उदाहरणार्थ; शेक्सपियरने ज्युलिएटच्या मुखी इंग्रजी साहित्यातले अत्यंत स्मरणीय उतारे दिले आहेत. पण यामुळे ज्युलिएट ही ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ नाटकाची लेखिका ठरत नाही.म्हणजेच एक पुरुष नाटककार स्त्री-पात्राचा आवाज निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे एक स्त्री-लेखक पुरुष-पात्राचा आवाज निर्माण करू शकते.
शक्तिशाली स्त्री आवाज हा पुरावा कसा?
अर्थात, ऋग्वेदातील ‘संवाद सूक्तां’चा विचार करताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते. ती म्हणजे, ऋग्वेद १.१७९ मध्ये लोपामुद्रा अगस्त्य ऋषींशी बोलताना आपली लैंगिक इच्छा उघडपणे व्यक्त करते. ऋग्वेद १०.१० मध्ये यमी तिचा भाऊ यम याला आपला प्रेमी बनवण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करते. अपाला ही ऋग्वेद ८.९१ मध्ये तिचं शरीर आणि इंद्रासोबतच्या भेटीबद्दल आपल्याला सांगते. घोषा ही अश्विनीकुमारांना उद्देशून रचलेल्या सूक्तांशी जोडलेली आहे.निश्चितच हे सगळे अत्यंत शक्तिशाली वैदिक कालीन स्त्री-आवाज आहेत. पण कवितेतील शक्तिशाली स्त्री-आवाज म्हणजे स्त्री-लेखकत्वाचा पुरावा असू शकत नाही.
पुरुष पुरोहितांचेच वर्चस्व?
या संदर्भात विचार करता, त्या काळाची सामाजिक पार्श्वभूमी समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ऋग्वेद हा धार्मिक विधी करणाऱ्या तज्ज्ञांच्या घराण्यांमधून उदयाला आला. तुम्ही बघा, संपूर्ण वैदिक मंडले ही गृहत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भारद्वाज आणि वशिष्ठ यांसारख्या ऋषींच्या कुळांशी जोडलेली आहेत.म्हणजेच काव्य, यज्ञ आणि स्मृती यांचा परस्परांशी घट्ट संबंध होता. त्यात सूक्तं अत्यंत अचूकतेनं लक्षात ठेवावी लागत आणि पुढील पिढ्यांकडे सुपूर्द करावी लागत. या संदर्भातले ऐतिहासिक पुरावे हे स्पष्टपणे दाखवतात की हा विशेष व्यवसाय प्रामुख्याने पुरुष पुरोहितांच्या परंपरांपुरताच मर्यादित होता.
मग स्त्रीने ऋचा रचली की नाही?
याचा अर्थ असा अजिबात नाही, की एकाही स्त्रीनं कधीही वैदिक ऋचा रचलीच नाही. तसा निष्कर्ष काढणंही अतिरेकी ठरेल. कारण, पुरावा नसणं हा अशक्यतेचा पुरावा असू शकत नाही आश्चर्याची गोष्ट ही आहे की, ऋग्वेद तीन हजार वर्षांपेक्षा जास्त जुना आहे आणि आधुनिक अर्थाने त्याच्या कवींबद्दलची कोणतीही चरित्रात्मक माहिती आज आपल्याकडे उपलब्ध नाही.
स्त्रियांनी वैदिक काव्यातलं स्थान शून्य?
तरीही, ऋग्वेद १०.१५९ मधील ‘शची पौलोमी’सारखी काही अत्यंत मनोरंजक उदाहरणंही आहेत. या सूक्तात प्रथमपुरुषी स्त्री-वक्ता आपल्या सवतींवर मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करते. परंतु इथेही, एका ऐतिहासिक स्त्रीने या ऋचेची रचना केली होती, की एखाद्या पुरुष पुरोहित-कवीनं आपल्या रचनेतून स्त्रीचा आवाज निर्माण केला होता, हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे, “ऋग्वेदात २० किंवा ३० कवयित्री होत्या” असा निष्कर्ष काढणं योग्य नाही; ती स्पष्टपणे अतिशयोक्ती आहे. तसंच, “स्त्रियांनी कोणतीही वैदिक काव्यं रचलीच नाहीत” असं म्हणणंही टोकाचं आहे.
दोन्ही दृष्टिकोन टोकाचे?
आधुनिक वाचकांना अनेकदा प्राचीन ग्रंथांचा संदर्भ देऊन त्यांच्या आजच्या जगण्यात रुजलेल्या मूल्यांचं समर्थन करावंसं वाटतं. त्यात परंपरावाद्यांना आधुनिक जगाच्या कित्येक हजार वर्षं आधी भारतामध्ये लैंगिक समानता होती हे दाखवण्याची खुमखुमी असते, त्यासाठी ते वैदिक काळाचा वापर करतात. तर दुसरीकडे, स्वतःस प्रगतीशील म्हणवणाऱ्या समीक्षकांना याच्या अगदी उलट –पूर्णपणे पुरुषप्रधान आणि शोषक भूतकाळ दाखवायचा असतो. हे दोन्ही दृष्टिकोन प्राचीन काव्याला आधुनिक वादात ओढण्याचा प्रयत्न करतात.
विश्वासार्ह सार काय?
या पार्श्वभूमीवर आपण जे ठामपणे सांगू शकतो ते याहून अधिक रंजक, अधिक ज्ञानवर्धक आहे. ते म्हणजे, ऋग्वेद अनेक स्त्री-आवाज जतन करतो, परंतु ‘स्त्री-आवाज’ आणि ‘स्त्री-लेखकत्व’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्त्री ऋषींची पारंपरिक ओळख ही मुख्यत्वे नंतरच्या वर्गीकरण पद्धतींमधून आलेली आहे. यातली काही वर्गीकरणं स्पष्टपणे पात्रं, देवी, अमूर्त संकल्पना आणि प्राण्यांनाही ‘ऋषी’ मानणारी आहे. त्यामुळे अतिशयोक्तीला ज्ञान समजणं योग्य नाही आणि ज्ञान हे अतिशयोक्त असू शकत नाही.
