Serial Killer Psychology History: मानवी इतिहासाला व्यापक स्वरुपाची हिंसा,व्यक्ती केंद्री हत्या आणि माणुसकीला आव्हान देणाऱ्या क्रूरतेच्या घटना नव्या नाहीत. सत्ता, संपत्ती, सूड, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक वैर यांसारख्या अनेक कारणांमुळे आजवर एका माणसाने दुसऱ्या माणसाचा जीव घेतला आहे. मात्र, एखादी व्यक्ती वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेक लोकांची हत्या करते, तेव्हा या घटनांकडे केवळ गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून पाहून चालत नाही. अशा गुन्ह्यांमागील मानसिक प्रक्रिया समजून घेणं आवश्यक ठरतं. काही गुन्हेगारांसाठी हत्या हे आर्थिक लाभाचं साधन असतं, काहींसाठी ती वर्चस्व गाजवण्याची अभिव्यक्ती असते, तर काही प्रकरणांत हिंसेतून मिळणारं मानसिक समाधान महत्त्वाचं ठरतं. याच संदर्भाने ‘सीरियल किलर’ अर्थात एका क्रमानं हत्या करत सुटणारा खुनी ही संकल्पना महत्त्वाची ठरते.
सीरियल किलर कोणाला म्हणायचं?
सीरियल किलर म्हणजे वेगवेगळ्या घटनांमध्ये, हत्यांदरम्यान काही कालावधीचे अंतर ठेवून अनेक व्यक्तींची हत्या करणारी व्यक्ती. अशा गुन्ह्यांचं स्वरूप, घटनांमधलं अंतर आणि हत्यांमागचा हेतू यांचा विचार केला जातो. जुन्या व्याख्यांमध्ये तीन किंवा अधिक हत्यांचा निकष वापरला जात असे; आधुनिक व्याख्यांमध्ये दोन किंवा अधिक हत्यांचाही समावेश होतो. युद्धात हजारो लोकांना मारणारा सेनापती, राजकीय प्रतिस्पर्ध्यांची हत्या करणारा राजा आणि वैयक्तिक प्रेरणेतून वारंवार हत्या करणारा गुन्हेगार या सर्वांना एकाच वर्गात ठेवता येत नाही. (FBI, 2008)
चिनी राजपुत्र हाच सीरियल किलर?
सीरियल किलिंग ही केवळ आधुनिक काळाची समस्या नाही, तर प्राचीन इतिहासातही सीरियल किलरचे उल्लेख आढळतात. चीनमधल्या पश्चिम हान राजवंशाचा राजपुत्र लिऊ पेंगली हा त्यांपैकी एक होता. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात जिदोंगचा राजपुत्र असलेल्या पेंगलीवर आपल्या सहकाऱ्यांसह रात्रीच्या वेळी लोकांवर हल्ले करून त्यांची हत्या आणि लूटमार केल्याचे आरोप होते. इतिहासकार सिमा चियान यांच्या Records of the Grand Historian या ग्रंथात आलेल्या वर्णनानुसार पेंगलीवर शंभराहून अधिक हत्यांचे आरोप केले गेले होते. त्याला मृत्युदंड देण्याची मागणी झाली होती; मात्र सम्राटाने त्याचा राजपदाचा दर्जा काढून घेऊन त्याला हद्दपार केलं. या ऐतिहासिक वर्णनामुळे लिऊ पेंगलीचा उल्लेख प्राचीन काळातला सीरियल किलर असा केला जातो.
रोमन साम्राज्यातले किलर कोण?
रोमन साम्राज्यातही राजकीय सत्तासंघर्ष, विषप्रयोग आणि संशयास्पद मृत्यूंच्या अनेक कथा आढळतात. सम्राट ऑगस्टसची पत्नी लिव्हिया ड्रुसिला हिच्यावर ऑगस्टससह राजघराण्यातील काही व्यक्तींवर विषप्रयोग केल्याचे आरोप झाले. मात्र, हे आरोप प्राचीन लेखकांच्या वृत्तांतांवर आधारित असून त्यांना निर्विवाद ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. रोमन प्रजासत्ताकाच्या अखेरच्या काळातल्या स्टॅटियस अल्बियस ऑपियानिकस याच्यावर आर्थिक लाभासाठी स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तींसह अनेकांना विष देऊन मारल्याचे आरोप झाले होते. प्राचीन रोमन न्यायालयीन वाङ्मयात त्याच्या प्रकरणाचा उल्लेख आढळतो.रोमन सम्राट क्लॉडियसची पत्नी व्हॅलेरिया मेस्सालिना हिचं नावही राजकीय कटकारस्थानांशी जोडलं गेलं. तिच्या प्रभावामुळे काही राजकीय विरोधकांना मृत्युदंड देण्यात आल्याचं प्राचीन लेखकांनी नमूद केलं आहे.
नीरोच्या काळात मालिका विषप्रयोगांची?
रोमन साम्राज्यातली लोकुस्टा ही विष तयार करण्यात निपुण असल्याचं वर्णन प्राचीन लेखकांनी केलं आहे. सम्राट नीरोच्या काळात तिला राजघराण्यातील व्यक्तींना विष देऊन मारण्यासाठी वापरल्याचे उल्लेख आढळतात. सम्राट क्लॉडियस आणि ब्रिटानिकस यांच्या मृत्यूंशीही तिचं नाव जोडलं जातं.
कोण ही श्रीलंकेची विषराणी?
श्रीलंकेच्या प्राचीन इतिहासात अनुराधापूरची राणी अनुला हिचा उल्लेख विषप्रयोगाशी संबंधित कथांमध्ये आढळतो. तिने आपल्या पतींसह अनेक पुरुषांना विष देऊन मारल्याचे पारंपरिक वृत्तांत सांगतात. सीरियल किलर मंडळींचा दृश्य स्वरुपात हिंसा दिसत नसलेला विषप्रयोग हा तितकाच क्रूर गुन्हे प्रकार म्हणायचा.
सगळेच किलर सारखे असतात?
याच संदर्भाने आधुनिक काळाचा विचार करायचा तर अमेरिकेतल्या टेड बंडी, जेफ्री डामर आणि जॉन वेन गेसी यांनी केलेल्या हत्यांमुळे गुन्हेगारी मानसशास्त्राकडे जगाचं खऱ्या अर्थाने लक्ष वेधलं गेलं. तिकडे ब्रिटनमधल्या हॅरोल्ड शिपमन याने वैद्यकीय व्यवसायाचा गैरवापर करुन अनेक रुग्णांची हत्या केली. रशियातल्या आंद्रेई चिकातिलो आणि कोलंबियातल्या लुईस गारावितो आदींची क्रमिक खुनांची प्रकरणंही चर्चेत आली. या गुन्हेगारांचा हेतू, त्यांनी केलेली पीडितांची निवड आणि गुन्हे करण्याच्या त्यांच्या पद्धतींमध्ये या मध्ये निश्चितच फरक होता. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाचं स्वतंत्र मानसशास्त्रीय विश्लेषण आवश्यक आहे.
सीरियल किलरच्या मनात दडलं असतं काय?
“कलाकाराला समजून घेण्यासाठी त्याच्या कलाकृतीकडे पाहावं लागतं; त्याचप्रमाणे गुन्हेगाराला समजून घेण्यासाठी त्याने केलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करावा लागतो, असं ‘एफबीआय’चे माजी क्रिमिनल प्रोफाइलर जॉन डग्लस सांगतात. सीरियल किलरच्या वर्तनामागे एकच मानसिक विकार किंवा एकच कारण असतं, असं विज्ञानही सांगत नाही. काही व्यक्तींमध्ये सहानुभूतीचा अभाव, इतरांवर वर्चस्व गाजवण्याची इच्छा, फसवणूक करण्याची प्रवृत्ती किंवा स्वतःच्या कृतींबद्दल पश्चात्तापाचा अभाव दिसू शकतो. काही प्रकरणांत लैंगिक प्रेरणा आणि हिंसा धोकादायकरीत्या एकमेकांशी जोडलेल्या असतात, तर काही गुन्ह्यांमध्ये आर्थिक लाभ,सूड किंवा वैयक्तिक हेतू महत्त्वाचे असतात.
अँटिसोशल लोक हत्या करत सुटतात?
‘अँटिसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ म्हणजे समाजविरोधी व्यक्तिमत्त्व विकारामध्ये इतरांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणं, फसवणूक, आक्रमकता आणि कृतींबद्दल पश्चात्तापाचा अभाव अशी वैशिष्ट्यं दिसू शकतात. मात्र, हा विकार असलेली प्रत्येक व्यक्ती हिंसक गुन्हेगार असतेच असे नाही. ‘सायकोपॅथी’ ही संकल्पनाही या विकाराशी पूर्णपणे समान नाही. एखादी व्यक्ती निर्दयी किंवा असामान्य वाटते म्हणून तिला मानसिक विकार जडला आहे, असं निदान करता येत नाही.
सायकोपॅथ हे क्रमिक खुनी होतात?
ब्रायना फॉक्स आणि मॅट डेलिसी यांनी २०१९ मध्ये Aggression and Violent Behavior या नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या मेटा-विश्लेषणात सायकोपॅथीची वैशिष्ट्यं आणि हत्येच्या गुन्ह्यांमधल्या संबंधाचा अभ्यास केला. या संशोधनात २२ अभ्यासांतील २,६०३ हत्या करणाऱ्या व्यक्तींच्या माहितीचा समावेश होता. काही सायकोपॅथिक वैशिष्ट्यांचा हत्येशी सांख्यिकीय संबंध आढळला. मात्र, प्रत्येक सीरियल किलर सायकोपॅथ असतो किंवा सायकोपॅथिक वैशिष्ट्यं असलेली प्रत्येक व्यक्ती हत्या करते, असा निष्कर्ष यातून काढता येत नाही. (Fox & DeLisi, 2019)
व्यक्ती क्रमिक खुनी का बनतो?
बालपणीचा छळ, कौटुंबिक हिंसा, दुर्लक्षिलेपण आणि असुरक्षित वातावरण यांचा काही व्यक्तींच्या पुढील वर्तनाशी संबंध असू शकतो. किटली आणि सहकाऱ्यांनी २०२० मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनात सीरियल किलर्सच्या जीवनातला वर्तनक्रम आणि बालपणीच्या प्रतिकूल अनुभवांचा अभ्यास केला. मात्र, बालपणीचा छळ हा पुढील हत्यांचं थेट कारण असल्याचं या संशोधनातून सिद्ध होत नाही. अशा अनुभवांतून गेलेली बहुसंख्य मुलं मोठेपणी हिंसक गुन्हेगार बनलेली आढळून येत नाही. (Keatley et al., 2020)
आर्थिक लाभाचा हेतू भाग पाडतो?
भारतातल्या क्रमिक हत्यांच्या इतिहासात मुंबईतील रामन राघव प्रकरणानं १९६० च्या दशकात देशाचं लक्ष वेधलं होतं. तसंच पुण्यात घडलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडाला आणि त्यावर आधारित खून खटल्यास विशेष महत्त्व आहे. १९७६ ते १९७७ या काळात राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनावर हरुण शाह या चार तरुणांनी तब्बल दहा जणांची हत्या केली होती. खंडणी, लूटमार आणि आर्थिक लाभाशी संबंधित हेतू या घटनांमध्ये महत्त्वाचे होते.
क्रमिक खुनाच्या घटना काय सांगतात?
२००५-०६ या कालावधीत घडलेल्या निठारी हत्याकांडानेही भारताला हादरवून सोडलं होतं. या घटनांनी गुन्हेगारांच्या वर्तनाबरोबरच पीडितांची असुरक्षितता, बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष आणि तपासातील त्रुटी यांचं महत्त्व अधोरेखित केलं. अशा प्रकरणांत प्रत्येक आरोपीची भूमिका आणि न्यायालयीन निष्कर्ष स्वतंत्रपणे विचारात घेणंही आवश्यक असतं.
सीरियल किलर ठरवणं का अवघड?
आज डीएनए विश्लेषण, सीसीटीव्ही चित्रण, डिजिटल पुरावे आणि न्यायवैद्यक तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचा तपास अधिक शास्त्रीय पद्धतीने करता येतो. वेगवेगळ्या घटनांतील पुरावे एकत्रित तपासल्यामुळे एका व्यक्तीचा अनेक गुन्ह्यांशी संबंध शोधणं शक्य होतं. मात्र, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी पुरावे योग्य पद्धतीनं जतन करणं, त्यांची पडताळणी करणं आणि तपासातील पूर्वग्रह टाळणं आवश्यक आहे.
मानसिक रोगी सीरियल किलर होतात?
गुन्हेगाराची मानसिकता समजून घेण्यासाठी केवळ त्याने काय केलं हे पाहणं पुरेसं नसतं;तर त्याने ते कसं केलं, पीडितांची निवड कशी केली आणि घटनास्थळी कोणते पुरावे मागे ठेवले, यांचाही अभ्यास करावा लागतो. सीरियल किलिंग रोखण्यासाठी एकच उपाय किंवा भविष्यातील गुन्हेगार ओळखणारी सर्वमान्य चाचणी उपलब्ध नाही. कौटुंबिक हिंसा रोखणं, बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं, तक्रारी गांभीर्याने घेणं आणि गरजेनुसार मानसिक आरोग्यविषयक मदत उपलब्ध करुन देणं महत्त्वाचं आहे. याच बरोबर मानसिक आजार असलेल्या बहुसंख्य व्यक्ती हिंसक नसतात. त्यामुळे मानसिक आजार आणि क्रमिक हत्यांची सरसकट सांगड घालणंही चुकीचं ठरतं.
मानवी क्रौर्याचा इतिहास काय सुचवतो?
मानवी इतिहासातले प्राचीन राजघराण्यांत झालेले विषप्रयोग, घडलेली राजकीय हत्याकांडं, संघटित गुन्हेगारी आणि आधुनिक सीरियल किलर्स यांच्या उदाहरणांतून हत्या करण्यामागील हेतू नेहमीच एकसारखे नसतात, हे पुरेसं स्पष्ट होतं. त्या अर्थाने, सीरियल किलरचा अभ्यास हा केवळ मानवी क्रौर्याचा इतिहास जाणून घेण्याइतपत मर्यादित नाही, तर गुन्हेगारी वर्तनामागील कारणांचा शास्त्रीय शोध घेणं, पीडितांच्या सुरक्षिततेचं महत्त्व समजून घेणं आणि भविष्यात अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी समाजाने कोणती पावले उचलली पाहिजेत, या सारासार विचार करणं असं व्यापक परिमाण या अभ्यासाला आहे. शेवटी, क्रौर्याचा चेहरा नेहमीच विद्रूप नसतो; कधी कधी तो समाजात आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या सामान्य माणसाचाही असू शकतो…
संदर्भसूची
१. Federal Bureau of Investigation (2008). Serial Murder: Multi-Disciplinary Perspectives for Investigators.
२. Fox, B. & DeLisi, M. (2019). “Psychopathic Killers: A Meta-Analytic Review of the Psychopathy-Homicide Nexus.” Aggression and Violent Behavior, 44, 67–79.
३. Keatley, D. A. et al. (2020). “A Behaviour Sequence Analysis of Serial Killers’ Lives: From Childhood Abuse to Methods of Murder.” Journal of Interpersonal Violence.
४. Lloyd, T. (2007). “Liminal ‘Criminals’: Re-thinking Historiographies of, and through, the ‘Thuggee’ Phenomenon.” History Compass, 5(2), 362–374.
५. Macfie, A. L. (2008). “Thuggee: An Orientalist Construction?” Rethinking History, 12(3), 383–397.
६. Sima Qian. Records of the Grand Historian
७. Calhoon, C. G. (1994). Livia the Poisoner: Genesis of an Historical Myth. Doctoral dissertation, University of California, Irvine.
८. “Poisons, Poisoners, and Poisoning in Ancient Rome.” Toxicology in Antiquity, 2nd edition, 2019.
