Smit Machhar surname history: ‘फ्लायदुबई’ विमानातील ओमानाच्या सहवैमानिकाचा हल्ला परतवून लावत १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार सध्या जगभरात हिरो ठरले आहेत. त्यांच्या असीम धैर्यासोबतच सध्या त्यांच्या ‘मच्छार’ या आडनावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याविषयी ज्येष्ठ पत्रकार शीला भट यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नगरसेवक आणि भाजपच्या गुजराती सेलचे माजी प्रमुख मंगल भानूशाली हे कॅप्टन मच्छार आणि त्यांच्या कुटुंबाला कित्येक दशकांपासून ओळखतात त्यांनी सांगितले की, “कॅप्टन स्मित मच्छार हे गुजराती ‘ब्रह्मक्षत्रिय’ समाजातील ‘हालारी’ शाखेचे आहेत.
नगर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या एकत्र येण्यातून हा समाज निर्माण झाला, अशी या समाजाची पौराणिक/ पारंपरिक श्रद्धा आहे.”
गुजरातमधील आडनावांचा इतिहास
गुजरातमध्ये हत्ती, घोडा, ढेकूण आणि पोपट अशा वैशिष्ट्यपूर्ण नावांचा आडनाव म्हणून वापर केला जातो. गुजराती संस्कृतीत ‘मच्छार’ हे एक प्रस्थापित आणि जुने आडनाव आहे. नागर ब्राह्मण आणि सिंध व कच्छमधील व्यापारी आणि व्यावसायिक असलेल्या ‘लोहाणा’ समुदायामध्ये हे आडनाव प्रामुख्याने आढळते. ‘मच्छार’ या आडनावाचा नेमका उगम कसा झाला हे स्पष्ट नसले तरी, गुजराती आडनावांच्या एका जुन्या अभ्यासानुसार त्यामागे काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. पिढ्यानपिढ्या शब्दांमध्ये झालेला बदल, मूळ राहण्याच्या ठिकाणावरून पडलेले नाव किंवा एखादे ठेवलेले टोपणनाव पुढे आडनाव होणे, अशा विविध कारणांचा यात समावेश आहे.
विनोदी किंवा उपरोधात्मक टोपणनावांपासून तयार झालेली आडनाव
प्राध्यापिका विनोदिनी नीलकंठ यांनी १९४२ साली लिहिलेल्या ‘गुजराती अटकोनो इतिहास’ (गुजराती आडनावांचा इतिहास) या पुस्तकात विनोदी किंवा उपरोधात्मक टोपणनावांपासून तयार झालेल्या आडनावांवर एक स्वतंत्र भाग लिहिला आहे. व्यक्तीच्या विशिष्ट शारीरिक किंवा मानसिक वैशिष्ट्यांमुळे मिळालेले टोपणनाव कालांतराने संपूर्ण कुटुंबाची ओळख कसे ठरते, याचे स्पष्टीकरण त्यांनी यात दिले आहे.

अशा प्रकारच्या आडनावांवर चर्चा करताना त्यांनी वारंवार एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. प्रथम दर्शनी अगदी सोपे किंवा उघड वाटणारे स्पष्टीकरण नेहमीच सत्य असते असे नाही. म्हणूनच, कोणत्याही लोककथेला थेट इतिहास न मानता त्यांनी अनेक आडनावांच्या उगमाबाबत इतर पर्यायी शक्यताही मांडल्या आहेत.
मच्छिमार समाजाचे प्रतिनिधित्व
विशेष म्हणजे, ‘मच्छार’ हे नाव सीमेपलीकडे पाकिस्तानातही अस्तित्वात आहे. कराचीमध्ये ‘मच्छार कॉलनी’ नावाचा एक मोठा परिसर आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’मधील एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या परिसराचे नाव डासांवरून पडलेले नसून ‘सिंधी’ भाषेतील मच्छिमारांशी संबंधित एका शब्दावरून आले आहे; हे नाव त्या भागातील मोठ्या कोळी/ मच्छिमार समाजाचे प्रतिनिधित्व करते.
त्यामुळे, बहुतांश भारतीयांना एका उपद्रवी कीटकाचे नाव म्हणून माहीत असलेला शब्द एका कुटुंबाचे आडनाव कसे ठरले, याचे उत्तर भाषानिर्मिती, भौगोलिक संदर्भ आणि टोपणनावांच्या रंजक इतिहासात दडले आहे.
‘मच्छार’ म्हणजे केवळ डास नव्हे!
दुबई-तेल अवीव या ‘फ्लायदुबई’ विमानात घडलेल्या असाधारण घटनेनंतर ‘मच्छार’ या आडनावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमध्ये गंभीर जखमी झालेले असतानाही कॅप्टन मच्छार यांनी कॉकपिटच्या दरवाजाचे लॉक उघडण्याचे बटण (रिलीज) यशस्वीरीत्या दाबले. त्यानंतर प्रवाशांनी आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी ओमानाच्या सहवैमानिकाला पकडून त्याच्यावर ताबा मिळवला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मते, हा सहवैमानिक कट्टरपंथी इस्लामिक विचारसरणीने प्रभावित झाला होता. दरम्यान, विमानात प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या फ्लायदुबईच्या इतर दोन वैमानिकांनी हे बोईंग ७३७ विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवण्यास मदत केली. इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फ्लायदुबई FZ1073’ या विमानात एकूण १७४ प्रवासी होते.
मच्छार म्हणजे जोश’, ‘उत्साह’ किंवा ‘जिद्द
मुंबईतील पत्रकार आणि लेखक सौरभ शाह यांनी या आडनावाचा आणखी एक अर्थ स्पष्ट केला आहे. “मच्छार या शब्दाचा एक अर्थ ‘जोश’, ‘उत्साह’ किंवा ‘जिद्द/आवेश’ असाही होतो,” असे शाह यांनी ‘एक्स’वर लिहिताना गुजराती भाषेतील भव्य महाकोश ‘भगवद् गोमंडल कोश’च्या खंड ७, पृष्ठ ६८७३ चा संदर्भ दिला. सौरभ शाह यांनी सांगितले की ‘मच्छार’ हे आडनाव सामान्यतः गुजराती नगर ब्राह्मणांमध्ये आढळते. तसेच त्यांनी या समाजात आढळणाऱ्या ‘मांकड’, ‘हत्ती’, ‘घोडा’ आणि ‘मांकोडी’ यांसारख्या इतर आडनावांचे दाखले दिले. ‘एक्स’वर पुढे लिहिताना शाह म्हणाले, “कॅप्टन स्मित मच्छार यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की त्यांचे आडनाव अत्यंत अर्थपूर्ण आहे आणि त्यांनी तो अर्थ आपल्या आचरणात पूर्णपणे उतरवला आहे.”
प्राध्यापिका विनोदिनी नीलकंठ त्यांच्या पुस्तकात गुजराती आडनावांची निर्मिती गावे/ ठिकाणे, व्यवसाय, वैयक्तिक वैशिष्ट्ये आणि टोपणनावांवरून कशी झाली, याचा पद्धतशीरपणे अभ्यास करण्यात आला आहे. Nagar.org या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, नगर समाजातील अनेक आडनावे ही गावे आणि शहरांच्या नावांवरून तयार झाली आहेत. जसे की, घोडा हे आडनाव ‘घोडाद्रा’ या गावावरून, हत्ती हे ‘हथाप’वरून, मांकड किंवा मांकड (ढेकूण) हे ‘मांकडवाडा’वरून, तर मांकोडी हे ‘मांकोडीवाडा’ या गावावरून पडले आहे. हीच पद्धत नगर समाजातील मोठ्या प्रादेशिक ओळखींमध्येही दिसून येते; जसे की वडनगरवरून ‘वडनगरा’, विसनगरवरून ‘विसनगरा’, साथोडवरून ‘साथोद्रा’ आणि चित्तौडवरून ‘चित्रोडा’.
इथे एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे, ते म्हणजे आज एखाद्या प्राणी किंवा कीटकाच्या नावासारखे वाटणारे आडनाव मूलतः ते कुटुंब कुठून आले होते, या भौगोलिक ओळखीवरून सुरू झालेले असू शकते. प्राध्यापिका नीलकंठ यांनी ‘मच्छार’ या आडनावाबाबत कोणताही एकच अंतिम निष्कर्ष न काढता विविध शक्यतांची नोंद केली आहे:
- १. पहिली शक्यता (भाषांतर/अपभ्रंश): या आडनावाचा संबंध गुजराती/ संस्कृत मधील ‘मत्सर’ (मत्सर, हेवा किंवा द्वेष) या शब्दाशी असू शकतो. पिढ्यानपिढ्या उच्चारात झालेल्या बदलामुळे (अपभ्रंश) ‘मत्सर’चा ‘मच्छार’ झाला असावा.
- २. दुसरी शक्यता (भौगोलिक ठिकाण): हे आडनाव अशा एखाद्या ठिकाणाहून आलेल्या कुटुंबाचे असू शकते, जिथे डासांचे प्रमाण खूप जास्त होते.
- ३. तिसरी शक्यता (गुजराती विनोदबुद्धी व टोपणनाव): नीलकंठ यांनी गुजराती संस्कृतीतील खास विनोदबुद्धीचा उल्लेख केला आहे. व्यक्तीचे शरीर, तिचे वर्तन, सवयी किंवा परिस्थितीवरून मारल्या जाणाऱ्या टोपणनावातून (उपनाम) आडनावांची (अटक) निर्मिती झाली. एखाद्या व्यक्तीला मारलेला टोणा किंवा दिलेले नाव त्याच्या पुढच्या पिढ्यांनाही चिकटून राहिले आणि शेवटी तेच कुटुंबाचे कायमचे आडनाव झाले.
- परंतु, नीलकंठ यांनी प्रत्येक स्पष्टीकरणाला सिद्ध झालेला इतिहास किंवा व्युत्पत्ती मानण्याबाबत इशारा दिला आहे. अनेक आडनावांच्या बाबतीत त्यांनी विविध पर्यायी शक्यता मांडल्या आहेत किंवा त्यांचा मूळ उगम निश्चितपणे सांगता येत नाही, हे स्पष्टपणे मान्य केले आहे. त्यामुळे, ‘मच्छार’ या आडनावाचा एक अर्थ डास असा होत असला, तरी त्यावरून त्या समाजाचा या कीटकाशी थेट काही संबंध होताच, हे सिद्ध होत नाही.
शेवटी, ज्या आडनावाचा मूळ उगम आजवर अस्पष्ट राहिला होता, त्या एका गुजराती आडनावाला कॅप्टन स्मित मच्छार यांच्या असीम शौर्याने आणि पराक्रमाने प्रादेशिक सीमांच्या पलीकडे पोहोचवून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘मच्छार’ या शब्दाचा एक शाब्दिक अर्थ जरी ‘डास’ असा होत असला, तरी कॅप्टन स्मित मच्छार यांनी आता आपल्या आडनावाला साहसाची आणि धैर्याची एक नवी ओळख मिळवून दिली आहे.
