Animals in space history Laika: ३ नोव्हेंबर १९५७ रोजी सोव्हिएत युनियनच्या स्पुटनिक-२ या उपग्रहाने अवकाशात झेप घेतली आणि इतिहास रचला गेला. या उपग्रहात होती ‘लायका’ नावाची एक भटकती कुत्री, जी पृथ्वीच्या कक्षेत पोहोचणारा पहिली सजीव प्राणी ठरली. मात्र, या ऐतिहासिक प्रवासाला परतीचा मार्ग नव्हता. मानवाच्या अंतराळ प्रवासाचा मार्ग सुकर करण्यासाठी लायकासह अनेक प्राण्यांनी अवकाश संशोधनात दिलेले योगदान आणि सोसलेल्या वेदनांची ही रोमहर्षक व भावूक कहाणी.

सोव्हिएत युनियनच्या बायकोनूर अंतराळ केंद्रातून ३ नोव्हेंबर १९५७ रोजी स्पुटनिक-२ या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा हा जगातील दुसरा कृत्रिम उपग्रह होता. मात्र, या मोहिमेमुळे स्पुटनिक-२ इतिहासात नोंदवला गेला तो एका वेगळ्याच कारणासाठी. या उपग्रहात पृथ्वीभोवती फिरण्यासाठी निघाली होती एक कुत्री, तिचे नाव होते लायका. ती पृथ्वीच्या कक्षेत पोहोचणारी पहिलीच सजीव प्राणी ठरली. मात्र, तिच्या या ऐतिहासिक प्रवासाला परतीचा मार्ग नव्हता… तिच्या मृत्यूची शक्यता माहीत असूनही तिला अवकाशात पाठवण्यात आले होते! लायकाची कहाणी ही केवळ एका कुत्रीच्या अवकाशप्रवासाची कहाणी नाही. तर माणसाने अवकाशात झेप घेण्यापूर्वी प्राण्यांच्या शरीरावर केलेल्या असंख्य प्रयोगांची, वैज्ञानिक महत्त्वाकांक्षेची आणि त्या प्रयोगांमागील नैतिक प्रश्नांचीही कहाणी आहे!

मानवाने अवकाशात जाण्यापूर्वी तिथे सजीव प्राणी जगू शकतात का, याचा अभ्यास सुरू झाला होता. अवकाशातील प्रचंड वेग, गुरुत्वाकर्षणाचा अभाव, किरणोत्सर्ग, तापमानातील बदल आणि प्रक्षेपणावेळी शरीरावर पडणारा प्रचंड दाब यांचा सजीवांवर काय परिणाम होतो, हे शास्त्रज्ञांना जाणून घ्यायचे होते. या प्रयोगांची सुरुवात १९४७ मध्ये झाली. अमेरिकेने जर्मन व्ही-२ रॉकेटच्या साहाय्याने फळमाशांना अवकाशाच्या सीमेपर्यंत पाठवले. पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील किरणोत्सर्गाचा सजीवांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास हा या प्रयोगामागील प्रमुख उद्देश होता. प्रयोगानंतर या माशांना पृथ्वीवर परत आणण्यात आले. त्यांच्यावर किरणोत्सर्गाचे गंभीर परिणाम झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे अवकाशातील परिस्थितीचा सजीवांवर होणारा परिणाम समजून घेण्याच्या संशोधनाला महत्त्वाचे वळण मिळाले.

First dog in space Laika Sputnik 2 mission | Animals sent into space history USSR USA | अंतराळात जाणारी पहिली कुत्री लायका स्पुटनिक २ | अवकाशात पाठवण्यात आलेले प्राणी इतिहास
लायकाचे मूळ छायाचित्र (Image- Wikipedia)

त्यानंतर अमेरिकेने माकडांवर प्रयोग सुरू केले. १९४८ मध्ये अल्बर्ट-१ नावाच्या रीसस माकडाला व्ही-२ रॉकेटमधून अवकाशात पाठवण्यात आले. मात्र, हा प्रयोग यशस्वी झाला नाही. १९४९ मध्ये अल्बर्ट-२ या माकडाने सुमारे ८३ मैल उंची गाठली; परंतु पृथ्वीवर परतताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतरही अनेक प्राण्यांना रॉकेटमधून पाठवण्यात आले. काही प्रयोग यशस्वी झाले, तर काहींमध्ये प्राण्यांचा मृत्यू झाला.

अवकाशप्रवासासाठी कुत्र्यांची निवड का झाली?

अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्ध सुरू असताना अवकाश संशोधन ही प्रतिष्ठेची आणि सामरिक स्पर्धेची बाब ठरली होती. मानवी अंतराळप्रवासाची तयारी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चढाओढ सुरू होती. सोव्हिएत शास्त्रज्ञांनी सुरुवातीला उंदीर, ससे आणि इतर लहान प्राण्यांवर प्रयोग केले. त्यानंतर त्यांनी कुत्र्यांची निवड केली. माकडांच्या तुलनेत कुत्री अधिक शांत राहतात आणि बंदिस्त जागेत त्यांना प्रशिक्षण देणे तुलनेने सोपे जाते, असे शास्त्रज्ञांचे मत होते. तसेच मादी कुत्र्यांची निवड करण्यात आली. त्यामागे अंतराळयानातील मर्यादित जागेत शारीरिक गरजांसाठी व्यवस्था करणे सोपे जाणे हे कारण होते.

१९५१ मध्ये सोव्हिएत युनियनने डेझिक आणि सिगान या दोन कुत्र्यांना रॉकेटमधून अवकाशाच्या सीमेपर्यंत पाठवले. या दोघींना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यात आले. अवकाशप्रवास करून जिवंत परतलेल्या पहिल्या कुत्र्यांमध्ये त्यांची नोंद झाली. त्यानंतरही अनेक कुत्र्यांवर प्रयोग सुरू राहिले. या प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंतराळयानातील दाब, तापमान, ऑक्सिजन आणि शरीराच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणा विकसित करण्यात आल्या.

लायका : परतीचा मार्ग नसलेला प्रवास

लायका ही मॉस्कोच्या रस्त्यांवर भटकणारी एक लहान आकाराची कुत्री होती. तिचे मूळ नाव कुड्र्याव्हका म्हणजेच कुरळे केस असलेली, असे होते. नंतर तिला लायका हे नाव देण्यात आले. अवकाशात पाठवण्यापूर्वी तिला काही आठवडे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. बंदिस्त जागेत राहणे, कमी अन्नावर तग धरणे, प्रक्षेपणावेळी निर्माण होणारा आवाज आणि कंपन सहन करणे, अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण तिला देण्यात आले.

४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत युनियनने स्पुटनिक-१ हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवला होता. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात स्पुटनिक-२ मोहिमेची तयारी करण्यात आली. त्यामुळे लायकाच्या मोहिमेसाठी शास्त्रज्ञांकडे फारसा वेळ नव्हता. अंतराळयानात तिच्यासाठी ऑक्सिजन पुरवठा, अन्न, तापमान नियंत्रण आणि वैद्यकीय निरीक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. तिच्या हृदयाचे ठोके, श्वसनाचा वेग आणि रक्तदाब मोजण्यासाठी उपकरणे बसवण्यात आली होती.

First dog in space Laika Sputnik 2 mission | Animals sent into space history USSR USA | अंतराळात जाणारी पहिली कुत्री लायका स्पुटनिक २ | अवकाशात पाठवण्यात आलेले प्राणी इतिहास
(Image- wikipedia)

३ नोव्हेंबर १९५७ रोजी स्पुटनिक-२ अवकाशात झेपावले. प्रक्षेपणाच्या वेळी लायकाच्या हृदयाचे ठोके जवळपास तिप्पट झाले होते. मात्र, अवकाशात पोहोचल्यानंतर तिच्या शरीराची काही मोजमापे पुन्हा नियमित होऊ लागली. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारी ती पहिली सजीव प्राणी ठरली. मात्र, या मोहिमेतील सर्वांत वेदनादायक बाब म्हणजे लायकाला पृथ्वीवर परत आणण्याची कोणतीही योजना नव्हती. अंतराळयानाची रचना तिला सुरक्षितपणे परत आणता येईल अशी केलेलीच नव्हती. मोहिमेच्या सुरुवातीला सोव्हिएत अधिकाऱ्यांनी ती काही दिवस जिवंत राहिल्याचे संकेत दिले होते. प्रत्यक्षात मात्र अंतराळयानातील तापमान नियंत्रण यंत्रणेत बिघाड झाल्याने केबिनचे तापमान वाढले आणि प्रचंड उष्णतेमुळे प्रक्षेपणानंतर काही तासांतच लायकाचा मृत्यू झाला.

लायकाच्या मृत्यूविषयीची खरी माहिती अनेक दशकांनंतर समोर आली. २००२ मध्ये उपलब्ध झालेल्या वैज्ञानिक नोंदींमधून तिचा मृत्यू उष्णतेमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तिचे अंतराळयान मात्र पृथ्वीभोवती फिरत राहिले आणि १४ एप्रिल १९५८ रोजी वातावरणात प्रवेश करताना जळून नष्ट झाले. लायकाच्या मृत्यूने जगभरात प्राण्यांवर होणाऱ्या वैज्ञानिक प्रयोगांविषयी नैतिक प्रश्न उपस्थित केले. तिच्या मोहिमेतील एका शास्त्रज्ञानेही अनेक वर्षांनंतर तिच्या मृत्यूबद्दल खंत व्यक्त केली होती.

बेल्का आणि स्ट्रेल्का : अवकाशात जाऊन सुखरूप परतलेल्या कुत्री

लायकाच्या मृत्यूनंतर सोव्हिएत शास्त्रज्ञांनी प्राण्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याच्या तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित केले. १९ ऑगस्ट १९६० रोजी बेल्का आणि स्ट्रेल्का या दोन कुत्र्यांना स्पुटनिक-५ या अंतराळयानातून अवकाशात पाठवण्यात आले. या मोहिमेत त्यांच्यासोबत एक ससा, ४० उंदीर, दोन घुशी, फळमाशा आणि वनस्पतींचे नमुनेही होते. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून हे सर्व प्राणी सुरक्षितपणे परत आले. अवकाशात जाऊन पृथ्वीवर सुखरूप परतलेल्या पहिल्या प्राण्यांमध्ये या दोन कुत्र्यांचा समावेश झाला.

या मोहिमेला विशेष महत्त्व होते. कारण मानवी अंतराळप्रवासासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा आणि जीवनरक्षक प्रणाली प्रत्यक्ष तपासण्यात आल्या होत्या. स्ट्रेल्काने पुढे सहा पिल्लांना जन्म दिला. त्यातील पुषिंका नावाचे एक पिल्लू अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या कन्या कॅरोलिन यांना भेट देण्यात आले. शीतयुद्धाच्या काळातही या घटनेने अमेरिका आणि सोव्हिएत युनियन संबंधांमध्ये एक वेगळा मानवी स्पर्श देण्याचा प्रयत्न केला.

माकड, चिंपांझी आणि मांजरही गेले अवकाशात!

अमेरिकेने मानवी अंतराळप्रवासाच्या तयारीसाठी माकडांवर आणि चिंपांझींवर अनेक प्रयोग केले. १९५९ मध्ये एबल आणि बेकर या दोन माकडांना अवकाशात पाठवण्यात आले. त्यांनी सुमारे १६ मिनिटांच्या प्रवासात गुरुत्वाकर्षणविरहित स्थितीचा अनुभव घेतला आणि सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. एबलचा काही दिवसांनी शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला; मात्र बेकर १९८४ पर्यंत आयुष्य जगला. १९६१ मध्ये हॅम नावाच्या चिंपांझीला अमेरिकेने अवकाशात पाठवले. त्याचा उद्देश मानवी अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यापूर्वी अंतराळयानातील नियंत्रण यंत्रणा तपासणे हा होता. हॅमने अवकाशातील प्रवासादरम्यान दिलेल्या संकेतांनुसार बटणे दाबण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्याने हे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि पृथ्वीवर सुरक्षित परतला. त्याच्या प्रयोगामुळे मानवी अंतराळप्रवासासाठी महत्त्वाची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली.

१९६३ मध्ये फ्रान्सने फेलिसेट या मांजरीला अवकाशात पाठवले. अवकाशात गेलेली आणि सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणलेली ती पहिली मांजर ठरली. तिच्या मेंदूतील विद्युत हालचाली आणि मज्जासंस्थेवर अवकाशप्रवासाचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला.

चंद्राभोवती फिरलेली कासवे आणि २१ दिवसांचा अवकाशप्रवास

प्राण्यांच्या अवकाशप्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा १९६६ मध्ये आला. सोव्हिएत युनियनने व्हेटेरोक आणि उगोल्योक या दोन कुत्र्यांना कॉसमॉस-११० या अंतराळयानातून अवकाशात पाठवले. त्यांनी तब्बल २१ दिवस अवकाशात घालवले. दीर्घकाळ अवकाशात राहिल्याने शरीरावर होणारे परिणाम, किरणोत्सर्ग आणि शारीरिक बदल यांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरली.

१९६८ मध्ये सोव्हिएत युनियनने झॉन्ड-५ ही मोहीम चंद्राच्या दिशेने पाठवली. या मोहिमेत दोन कासवे, फळमाशा, अळ्या, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश होता. या कासवांनी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतण्यापर्यंतचा प्रवास केला. चंद्राभोवती प्रवास करणारे ते पहिले सजीव प्राणी ठरले. या प्रयोगातून पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील दीर्घ प्रवासाचा सजीवांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला.

प्राण्यांच्या प्रयोगांतून मानवाचा अवकाशप्रवास

१२ एप्रिल १९६१ रोजी युरी गागारिनने व्होस्टोक-१ या अंतराळयानातून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून इतिहास घडवला. अवकाशात जाणारा पहिला मानव म्हणून त्याची नोंद झाली. त्याच्या या प्रवासामागे अनेक वर्षांचे संशोधन आणि प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांतून मिळालेली माहिती होती. आज अवकाश संशोधन अधिक प्रगत झाले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उंदीर, फळमाशा आणि इतर लहान जीवांवर प्रयोग केले जातात. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा स्नायू, हाडे, रोगप्रतिकारक शक्ती, पेशी आणि जनुकीय प्रक्रियांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला जातो. भविष्यात मंगळासारख्या दूरच्या ग्रहांवर मानवाला दीर्घकाळ वास्तव्य करायचे असल्यास या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.

मात्र, या सगळ्या संशोधनाच्या इतिहासात लायकाची आठवण कायम राहील. विज्ञानाच्या प्रगतीसाठी तिने दिलेले योगदान नाकारता येणार नाही. पण तिच्या मृत्यूने एक मूलभूत प्रश्नही उपस्थित केला : मानवी प्रगतीच्या नावाखाली इतर सजीवांच्या आयुष्याची किंमत कोण ठरवणार? अवकाश संशोधनाच्या इतिहासात लायका ही पहिली अंतराळवीर कुत्री म्हणून ओळखली जाते. पण तिची कहाणी आपल्याला विज्ञानाच्या यशाबरोबरच त्या यशामागील मानवी जबाबदारीचीही आठवण करून देते!

संदर्भसूची

  • १) NASA – A Brief History of Animals in Space
  • २) NASA – 60 Years Ago: The First Animal in Orbit, 1947-57
  • ३) Smithsonian Magazine – Laika Declassified, , The Sad Story of Laika, the Space Dog, 2002
  • ४) American Physical Society – Physics History: February 1947
    American Physical Society: Fruit Flies in Space
  • ५) NASA – Exploring the Unknown, Volume VI