डॉ आनंद जोशी
Susumu Tonegawa Nobel Prize Immune System: मानवी शरीर जेव्हा कोणत्याही संकटात किंवा आजारपणात सापडते, तेव्हा शरीरातील नैसर्गिक ‘डिफेन्स सिस्टिम’ (रोगप्रतिकारशक्ती) आपोआप अॅक्टिव्हेट होते. आपल्या अवतीभवती फिरणाऱ्या लाखो जीवाणू आणि विषाणूंविरुद्ध लढा देऊन शरीर स्वतःचे रक्षण नेमके कसे करते? यामागील गूढ उकलून जनुकशास्त्राचा पाया बदलणाऱ्या जपानी वैज्ञानिक डॉ. सुसुमु टोनेगावा यांच्या क्रांतिकारी शोधाची आणि नोबेल प्रवासाची ही विशेष माहिती.
जगाला कशाची खबरबात नव्हती?
माणसाच्या अवतीभवती लाखो जीवाणू (बॅक्टेरिया) आणि विषाणू (व्हायरसेस) घोंगावत असतात, ते शरीरात शिरतात. अशा प्रसंगी शरीरात पुरेशा संख्येनं अँटिबॉडीजच्या (मराठीमध्ये प्रतिपिंडं) रुपातले सुरक्षा रक्षक तैनात असले की, शरीर बाहेरच्या जीवाणू-विषाणूंचा सहज नायनाट करतं. जेव्हा ही सिस्टिम ढेपाळते, माणूस आजारी पडतो, गळपटतो. पण असं घडू नये म्हणून माणसाच्या शरीरातल्या रोगप्रतिकारक यंत्रणेत (इम्यून सिस्टीममध्ये) नैसर्गिकरीत्या सतत अँटिबॉडीज तयार होत असतात. पण अगदी अलीकडेपर्यंत कोणाला ठाऊक होतं?
अवघ्या ४६ व्या वर्षी नोबेल सन्मान
आजारी किंवा रोगानं पछाडलेलं शरीर ऑटोमॅटिकली बरं होत नसतं. त्यामागे काहीएक नैसर्गिक कार्यकारणभाव असतो. त्याचाच शोध डॉ. सुसुमु टोनेगावा (सप्टेंबर १९३९- जुलै२०२६) या जपानी वैज्ञानिकानं लावला. या अद्भूत शोधामुळे प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या झाल्या. माणसाचं आयुष्यमान वाढवणाऱ्या वैद्यकीय पद्धती अस्तित्वात आल्या. याच शोधासाठी डॉ. टोनेगावा यांना त्याच्या वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी १९८७ चा वैद्यक विज्ञानातला नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. वैद्यक विज्ञानातला हा शोध इतका मोलाचा नि महत्त्वाचा होता की, नोबेल पुरस्कार समितीनं कोणाशीही शेअर न करता फक्त टोनेगावा यांना एकट्याला सन्मानित केलं. वैद्यक विज्ञानात नोबेल मिळवणारे ते पहिले जपानी संशोधक ठरले.

कोणी प्रेरित केलं ?
क्योटो विद्यापीठात केमिस्ट्री शिकत असताना टोनेगावा यांना मॉलेक्युलर बायॉलॉजीमध्ये रस निर्माण झाला. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी प्रो. वटनाबे यांच्या व्हायरस रिसर्च लॅबमध्ये कामास सुरुवात केली. प्रो. वटनाबे म्हणाले, “तुला जर मोलेक्युलर बायॉलॉजित संशोधन करायचं असेल तर कॅलिफोर्निया विद्यापीठात जा”. गुरुजनांचा हा सल्ला पाळत सुसुमो टोनेगावा यांनी १९६८ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठामधून रेण्वीय जैवविज्ञानात डॉक्टरेट मिळवली. पुढे सॅन दिएगो इथल्या सुप्रसिद्ध साक इन्स्टिट्यूट इथं पोस्ट डॉक्टरल संशोधन सुरु केलं. व्हिसा संपला. काही बिघडलं नाही. स्वित्झर्लंडच्या बाझल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी इथं दाखल झाले. तिथं भेटले, इम्युनॉलॉजिस्ट चार्ल्स स्टेनबर्ग (१९३२- १९९९). ते म्हणाले, “मानवी शरीरात जनुकांची संख्या मर्यादित असते, तरीही जनुक जंतूविरोधी अनंत अँटिबॉडीज कशा निर्माण करतं? सान्तातून अनंताची निर्मिती कशी होते?” शोधून काढ.
रोगप्रतिकारशक्ती येते कशी ?
माणसाच्या रक्तात पांढऱ्या पेशी असतात. रोगाला तोंड देण्याचं काम मुख्यतः त्यांचं. या पांढऱ्या पेशींमधल्या बी लिम्फोसाइट्स अँटिबॉडीज तयार करतात. अँटिबॉडीज प्रोटिन्सच्या बनलेल्या असतात. तर प्रोटिन्स तयार करण्याचं काम जीन्स-जनुक करतात. जनुक ‘डीएनए’चे बनलेले असतात. बी लिम्फोसाइट्स काय करतात, तर स्वत:च्या डीएनएची म्हणजेच जनुकांची रिअॅरेंजमेंट (पुनर्संयोजन) करतात. त्यांना कापतात आणि विविध प्रकारे जोडतात वगैरे. याला वैज्ञानिक भाषेत, रीकॉम्बिनेशन-पुनर्संयोजन म्हणतात. याच जुळवाजुळवीतून शरीरात अनेक प्रोटिन्स म्हणजे अँटिबॉडीज तयार होतात.
का बदलला डीएनएबद्दलचा समज?
या प्रक्रियेत फक्त एक हजार जनुक सामील असतात. पण ही जनुकं विविध प्रकारच्या लाखो अँटिबॉडीज निर्माण करण्याची क्षमता राखतात. निसर्गानं निर्माण केलेली ही एक संरक्षण यंत्रणा असते. पण टोनेगावा यांनी दाखवून दिलं की विशिष्ट रोगप्रतिकारक पेशींमध्येच डीएनएचे रिअॅरेंजमेंट होते. इतकंच नव्हे, तर टोनेगावा यांनी अँटिबॉडी विविधतेचा म्हणजे वेगवेगळ्या अँटिबॉडीज कशा तयार होतात, याचा जनुकीय विज्ञानाचा सिद्धांत मांडला, आणि तो प्रयोगाने सिद्धही केला. यातून घडलं असं की, पेशीतील डीएनए पूर्णपणे स्थिर नसतो, असं सिद्ध झालं आणि त्याचमुळे जनुकविज्ञानातला डीएनएबद्दलचा समज मुळातून बदलला.
सिद्धतेच्या पातळीवर काय घडलं?
टोनेगावा यांनी प्रयोगावरचे शोधनिबंध जगन्मान्य ‘पीअर रिव्ह्यूड’ जर्नल्समध्ये प्रकाशित केले. अर्थात, एवढ्यावर थांबेल ते विज्ञान कसलं ? त्यामुळे पुढे घडलं असं की, याच विषयात संशोधन करण्याऱ्या जगभरच्या वैज्ञानिकांनी असेच प्रयोग सुसुमू यांची पद्धत वापरून करून बघितले, तेव्हा त्यांनासुद्धा हेच ‘रिझल्ट्स’ मिळाले. याला ‘रिप्रोड्यूसिबिलिटी ऑफ एक्सपेरीमेंट्स’ म्हटलं जातं. म्हणजे काय, तर इतर कोणत्याही वैज्ञानिकाने त्याच पद्धती आणि साधनांचा वापर करून तो प्रयोग पुन्हा केल्यास त्यालाही तेच उत्तर, तेच रिझल्ट्स मिळाले पाहिजेत, असा हा विज्ञानाचा दंडक. तसं झालं म्हणजे विज्ञानातल्या यशाचं वर्तुळ पूर्ण होतं. सुसुमू टोनेगावा यांनी ते पूर्ण केलं.
पाया भक्कम झाला म्हणजे काय घडलं?
एक पथदर्शी प्रयोग सिद्ध करून टोनेगावा यांनी इम्युनालॉजी या शाखेचा पाया आणखी भक्कम केला. या पायांवरच उपचारांची पुढची इमारत उभी राहिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कर्करोगावर उपयुक्त ठरणारी ‘इम्युनोथेरपी’ ही उपचार पद्धती या संशोधनामुळे शक्य झाली. इतकंच कशाला, अँटिबॉडीज प्रयोगशाळेत तयार करता येऊ लागल्या. जैविक अभियांत्रिकीचं एक नवं दालन खुलं झालं. लशी तयार करण्याच्या नवनव्या वाट दिसू लागल्या. किडनी, हॉर्ट, लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये सर्वात मोठा धोका दुसऱ्याच्या अवयवांच्या ‘रिजेक्शन’चा असतो. तो धोका कमी करणारी औषधं तयार करण्यास चालना मिळाली.
नोबेल नंतर काय ?
महत्त्वाचं म्हणजे, नोबेल मिळालं आता आपण मोकळे झालो, असं टोनेगावा यांच्याबाबतीत घडलं नाही. हाडाच्या संशोधकाच्या बाबतीत घडतंही नाही, तसं. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या एमआयटी या सुप्रसिद्ध संस्थेत कॅन्सर रिसर्च विभागात संशोधन सुरु केलं. पुढे मेंदू विज्ञानात संशोधनात स्वतःला गुंतवून ‘लर्निंग आणि मेमरी’ यावर त्यांनी संशोधन सुरु केलं. त्यासाठी ‘Picowar Institute’ स्थापली. इथे ‘ऑप्टोजनेटिक्स’ हे तंत्र वापरून केलेलं ‘मेमरी’ वरचं त्यांचं संशोधन दिशादर्शक ठरलं.
टेक होम मेसेज काय ?
डॉ. सुसुमु टोनेगावा यांनी इम्युनॉलॉजी या ‘मुलभूत विज्ञानात’ असं संशोधन केलं, ज्यातून ‘अप्लाइड सायन्स’ म्हणजेच उपयोजित विज्ञान निर्माण झालं. मूलभूत विज्ञानातलं संशोधन हे नेहमीच कालांतरानं फलदायी ठरतं. डॉ. टोनेगावा ११ जुलै २०२६ रोजी पुढच्या पिढीसाठी ‘संशोधनाचं मौल्यवान ‘धन’ मागे ठेवून काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
