Veer Guardian 2026 India Japan Air Exercise: जपानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या भूमीवरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ ठरली… राजस्थानातील जोधपूर येथे पार पडलेला ‘वीर गार्डियन-२०२६’ हा भारत-जपान हवाई युद्धसराव अनेक अर्थांनी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा होता. ९ ते २२ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या या सरावात जपानच्या F-2A विमानांसह भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० एमकेआय, राफेल आणि स्वदेशी तेजस या लढाऊ विमानांनी आपला लष्करी प्रभाव सिद्ध केला.
युद्धसरावांमागचा उद्देश
भारत आणि जपानमध्ये आजवर अनेक लष्करी सराव पार पडलेले असले, तरी हवाई दलांमध्ये मात्र महत्त्वाचे सहकार्य आजवर मूर्तरूपास आलेले नव्हते. आता मात्र हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरातील संरक्षणविषयक बदलती स्थिती, सागरी मार्गांची सुरक्षितता आणि चीनच्या वाढत्या लष्करी क्षमतेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक सहकार्य अधिक मजबूत करण्याचा व्यापक संदर्भ या युद्धसरावांमागे होता.
‘वीर गार्डियन’मध्ये नेमके काय झाले?
१४ दिवसांच्या या सरावात दोन्ही हवाई दलांनी विविध प्रगत उड्डाण मोहिमांचा सराव केला. त्यात व्हिज्युअल कॉम्बॅट रेंजमधील (Visual Range Combat) युद्धसराव, अधिक संख्येने लढाऊ विमानांनी उड्डाण करून करावयाच्या एकत्रित मोहिमा (ज्यामध्ये दोन्ही दलांतील समन्वय अधिक महत्त्वाचा असतो), मिशन नियोजन आणि एअर कॉम्बॅट मॅन्युव्हरिंग यांचा या सरावात समावेश होता. या सरावांना प्रत्यक्ष उड्डाणांपलीकडे अनेक अर्थांनी वेगळे महत्त्व असते.

अधिकारी व तज्ज्ञांच्या चर्चा
दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये तज्ज्ञांच्या चर्चा, ऑपरेशनल चर्चा, मिशन प्लॅनिंग कॉन्फरन्स, अभियांत्रिकीविषयक अनुभवांची देवाणघेवाण, देखभाल पद्धती समजून घेणे आणि एरोस्पेस सुरक्षेविषयी माहितीची देवाणघेवाणही केली जाते. प्रत्यक्ष युद्धाच्या परिस्थितीत दोन्ही देशांच्या हवाई दलांना एकत्र काम करावे लागल्यास निर्माण होणाऱ्या तांत्रिक आणि प्रक्रियात्मक अडचणी कमी करण्याचा प्रयत्न या सरावांतून जाणीवपूर्वक केला जातो. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘इंटरऑपरेबिलिटी’
‘इंटरऑपरेबिलिटी’ म्हणजे काय?
दोन्ही देशांच्या लष्कराकडे समान विमाने किंवा समान शस्त्रप्रणाली नसतानाही वेगवेगळ्या लढाऊ विमानांमध्ये बसविलेल्या रडार, कम्युनिकेशन प्रणाली, डेटा-लिंक, शस्त्रप्रणाली आणि ऑपरेशनल पद्धती यांच्यात समन्वय साधून दोन्ही हवाई दलांना एकत्रितपणे प्रभावी कारवाई करता येणे, हा त्याचा गाभा आहे. याचे तीन प्रमुख स्तर असतात
- तांत्रिक इंटरऑपरेबिलिटी- कम्युनिकेशन, माहिती आणि इतर प्रणाली एकमेकांशी यशस्वीरित्या जोडल्या जाणे
- प्रक्रियात्मक इंटरऑपरेबिलिटी- दोन्ही हवाई दलांना एकमेकांच्या कार्यपद्धती, संकेत, संज्ञा, नियोजन आणि नियमांची माहिती असणे आणि त्यानुसार सरावादरम्यानच्या प्रक्रिया पार पाडणे
- मानवी समन्वय- प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी परस्पर विश्वास, अनुभव आणि एकमेकांच्या कार्यपद्धतीची ओळख असणे महत्त्वाचे ठरते. संयुक्त सरावातून त्यासाठी सुयोग्य परिस्थिती व वातावरण
निर्माण होते. - यामुळेच ‘वीर गार्डियन’चा परिणाम केवळ १४ दिवसांच्या उड्डाणांपुरता मर्यादित राहत नाही. अशा सरावांच्या पुनरावृत्तीतून दोन्ही दलांमध्ये दीर्घकालीन साहचर्य निर्माण होते.
जपानसाठी भारत का महत्त्वाचा?
भारत आणि जपान या दोन्ही देशांसाठी हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराच्या क्षेत्रातील सागरी मार्गांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. भारतासाठी हिंदी महासागर हा व्यापारी आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे, तर जपानसाठी इंधन आणि व्यापाराची मोठी वाहतूक याच सागरी टापूवर अवलंबून आहे. यामुळेच भारत-जपान संरक्षण सहकार्य केवळ द्विपक्षीय सीमांपुरते मर्यादित नाही. हवाई क्षेत्रातील ‘वीर गार्डियन’, भूदलांचे ‘धर्म गार्डियन’ आणि नौदलाचा जिमेक्स (JIMEX) हे त्याचे तीन प्रमुख आयाम आहेत. याशिवाय भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये क्वाड अंतर्गतही सुरक्षा सहकार्याच्या कृती-कारवाया पार पडतात.
चीनविषयी चिंता आणि सरावाचे सामरिक महत्त्व
जपानच्या २०२२च्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात चीनच्या लष्करी आणि धोरणात्मक हालचालींबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. जपानच्या संरक्षणविषयक कागदपत्रांमध्ये चीनच्या लष्करी क्षमतेच्या वेगवान विस्ताराचा उल्लेख सातत्याने केला जातो, हे महत्त्वाचे. त्यामुळे भारत आणि जपानचा वाढता संरक्षण संवाद हा चीनविरोधातील औपचारिक लष्करी आघाडीपेक्षाही प्रादेशिक स्थैर्य, सागरी मार्गांची सुरक्षा आणि ‘Free and Open Indo-Pacific’ या दोन्ही देशांच्या भूमिकेच्या संदर्भातील त्याचे सामरिक महत्त्व याच्याशी अधिक संबंधित आहे.
२००८पासून सहकार्याचा प्रवास
२००८मध्ये भारत-जपान या दोन्ही देशांनी Joint Declaration on Security Cooperation या करारावर स्वाक्षरी केली. त्यातून सुरक्षा क्षेत्रातील नियमित सहकार्याला संस्थात्मक आधार मिळाला. त्यानंतर २०१९मध्ये परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांचा ‘२+२’ संवाद सुरू झाला. २०२०मध्ये दोन्ही देशांनी Acquisition and Cross-Servicing Agreement (ACSA) वर स्वाक्षरी केली आणि २०२१मध्ये तो करार लागू झाला. या करारामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांना परस्परांना काही वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्यासाठी संस्थात्मक चौकट उपलब्ध झाली. याचा अर्थ इंधन, इतर पुरवठा आणि इतर लॉजिस्टिक सहकार्याची प्रक्रिया अधिक सुलभतेने दोन्ही दलांमध्ये पार पडू शकते.
विमानांपासून… युद्धतंत्रज्ञानापर्यंत
भारत-जपान संरक्षण संबंधातील पुढचे पाऊल संरक्षण- तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य हे आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे UNICORN — Unified Complex Radio Antenna. ही युद्धनौकांवर वापरली जाणारी एकात्मिक कम्युनिकेशन अँटेना प्रणाली आहे. विविध अँटेनांना एकत्रित करून त्यांना एकाच संरचनेत बसवल्यामुळे युद्धनौकांची रडार सिग्नेचर कमी करण्यास मदत होते. त्यामुळे युद्धनौका शत्रुच्या रडार यंत्रणेला यशस्वी चकवा देऊ शकतात. जपानच्या नौदलातील Mogami-वर्गातील फ्रिगेट्समध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारत आणि जपानने २०२४मध्ये UNICORNच्या सह-विकासासाठी अंमलबजावणीविषयक सामंजस्य करार केला. भारतात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या माध्यमातून त्याच्या निर्मितीचा मार्ग खुला झाला आहे. भारत-जपान संरक्षण उपकरणांच्या सह-विकास आणि सह-निर्मितीतील हे पहिले पाऊल ठरेल. २०२६च्या भारत-जपान चर्चांमध्ये UNICORN प्रकल्पाला लवकरात लवकर पुढे नेण्यावर पुन्हा भर देण्यात आला आहे. जपानने संरक्षण उपकरणांच्या हस्तांतरणासंबंधीच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे भविष्यात अशा सहकार्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
F-2Aमुळे काय बदलते?
‘वीर गार्डियन-२०२६’चे वैशिष्ट्य म्हणजे F-2A लढाऊ विमानांचा प्रथमच सहभाग. F-2 हे जपान आणि अमेरिकेच्या तांत्रिक सहकार्याने विकसित झालेले लढाऊ विमान आहे. भारतात ते प्रत्यक्षात येणे आणि युद्धसरावात सहभागी होणे म्हणजे दोन हवाई दलांना त्यांच्या वेगवेगळ्या विमानप्रणाली, कम्युनिकेशन पद्धती आणि ऑपरेशनल प्रक्रियांमध्ये प्रत्यक्ष समन्वय साधण्यास उत्तम सरावाची संधी मिळणे होय. या सरावात भारतीय हवाई दलाकडून तेजस, सुखोई-३० एमकेआय आणि राफेल या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लढाऊ विमानांचा सहभाग होता. त्यामुळे विविध विमानप्रणालींसह संयुक्त मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी हा सरावाचा महत्त्वाचा भाग ठरला. सरावादरम्यान JASDFचे प्रमुख जनरल ताकिहिरो मोरिता यांनी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्यासह स्वदेशी तेजसमधून उड्डाण केले. हा तसा प्रतीकात्मक क्षण होता, त्यातून दोन्ही हवाई दलांमधील वाढत्या व्यावसायिक संवादाचे दर्शन त्यातून घडले.
पुढचे पाऊल काय?
भारत-जपान संरक्षण संबंध आता केवळ संयुक्त कवायती आणि युद्धसराव यापलीकडे गेले आहेत. नियमित हवाई, नौदल आणि लष्करी सराव; २+२ संवाद; ACSAसारखे लॉजिस्टिक करार; UNICORNसारखे तंत्रज्ञान सहकार्य आणि संरक्षण उपकरणांच्या हस्तांतरणाविषयी वाढता संवाद या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे दोन्ही देशांच्या संरक्षण भागीदारीचे संस्थात्मक स्वरूप अधिक मजबूत होणे होय. जुलै २०२६च्या भारत-जपान शिखर परिषदेतही संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य पुढे नेण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. त्याच वर्षीच्या संरक्षण धोरण संवादात ‘Free, Open and Rules-Based Indo-Pacific’साठी सहकार्य मजबूत करण्याया निर्धार दोन्ही देशांनी पुन्हा एकदा केला. म्हणूनच जोधपूरहून उड्डाण केलेले जपानी F-2A हे लढाऊ विमान म्हणजे हवाई दलांमधील प्रत्यक्ष समन्वयापासून संरक्षण तंत्रज्ञानाच्या सह-विकासापर्यंत आणि लॉजिस्टिक सहकार्यापासून हिंदी-प्रशांत महासागरातील व्यापक सुरक्षा संवादापर्यंतचे ‘वीर गार्डियन-२०२६’ हे महत्त्वाचे एक दृश्य प्रतीक ठरले.
