Why no sugar for babies first 1000 days? काळ सणासुदीचा असो वा नसो अनेकांना साखरयुक्त गोड पदार्थांवर ताव मारण्याची सवय असते. स्वतःबरोबरच लहानांचंही तोंड गोड करण्याचा आग्रह असतो. परंतु मूल जन्मल्यानंतरचे पहिले हजार दिवस साखरेचं प्रमाण अत्यंत बेताचं असणं आवश्यक असतं. अन्यथा वाढत्या वयात कितीतरी असाध्य रोग माणसाचा पिच्छा पुरवतात, असं केंब्रिज विद्यापीठात झालेल्या संशोधनातून पुढे आलं आहे.

साखरेमागचं कटवट सत्य काय?

ब्रिटनमध्ये १८८३ साली गुलामगिरी अधिकृतरीत्या बंद झाली. पण १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला वसाहतवादी ब्रिटिशांनी भारतातल्या दारिद्र्य आणि दुष्काळाचा गैरफायदा उठवत उत्तरेतल्या त्यातही विशेषतः उ. प्रदेश-बिहारमधल्या भारतीय मजुरांना बोटींमध्ये कोंबून वेस्ट इंडिज आणि मॉरिशस बेटांवर उसाच्या मळ्यात नेलं. ‘अॅग्रीमेंट’ हा शब्दसुद्धा त्या मजुरांना उच्चारता येत नव्हता. ते ‘गिरमिट’ वर अंगठा उठवत आणि बोटीवर चढत. म्हणून या मजुरांना ‘गिरमिटिया’ म्हणत. ही दुसरी गुलामगिरीच होती. अमानुष आणि कठीण परिस्थितीत या गिरमिटिया मजुरांना उसाच्या मळ्यात आणि साखरेच्या कारखान्यात काम करावे लागे. या सगळ्याची कडू आठवण मनात जागी झाली. याला कारण साखरेवरचा एक शोधनिबंध इंग्लंड मधल्या केंब्रिज विद्यापीठानं नुकताच प्रकाशित केला आहे. या शोधनिबंधाचं शीर्षक आहे, ‘अर्लि लाइफ शुगर रिस्ट्रिक्शन अँड लाँग टर्म रिस्क ऑफ कॅन्सरः ए नॅचरल एक्स्परिमेंट स्टडी इन युके’ आणि संशोधनकर्ते आहेत, च्युन झुआन आणि वेई लुंगअँग. पण असं काय आहे, या शोधनिबंधात?

शोध निबंधाची पार्श्वभूमी काय?

दुसरं महायुद्ध संपलं होतं. ब्रिटिश साम्राज्यावरचा कधीही न मावळणारा सूर्य मावळू लागला होता. इकडे भारत स्वतंत्र झाला होता. तिकडे ब्रिटनची आर्थिक परिस्थिती विलक्षण खालावली होती. परिणामी, १९५१ पासून साखरेचं रेशनिंग सुरु झालं होतं. साखर सहजपणे मिळत नाही म्हटल्यावर सामान्य कुटुंबांमध्ये साखरेचा खूपच कमी वापर केला जात होता. १९५३ मध्ये रेशनिंग उठलं. १९५६ पर्यंत परिस्थिती हळहळू सुधारली. हा जो १९५१ ते १९५६ हा काळ होता, तो केंब्रिजमधल्या संशोधकांसाठी महत्त्वाचा होता. कारण याच कालावधीमध्ये जन्मलेल्या ६४ हजार लोकांचा पुढे सत्तर वर्षापर्यंतचा आरोग्य डेटा या संशोधकांनी एकत्र करून त्याचं विश्लेषण केलं आणि त्यातून धक्का देणारं संशोधन जगापुढे आणलं. कशी होती, या संशोधनाची पद्धती आणि काय होते निष्कर्ष ?

पहिले हजार दिवसच का?

संशोधकांनी ६४ हजार लोकांचा डेटा गोळा करून आरोग्याच्या दृष्टीने जन्मापासूनची भरणपोषणाची पहिली तीन वर्षं निरीक्षण योग्य मानली. कारण, बालकाचे पहिले १००० दिवस म्हणजे गर्भधारणेपासून बालकाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा काळ हा बालकाच्या वाढीचा म्हणजेच ‘क्रांतिक स्थिती’चा (क्रिटिकल स्टेज ऑफ ग्रोथ) काळ असतो. या काळात शरीर भराभर वाढत असतं.अवयवांचा विकास होत असतो. चयापचय क्रिया (मेटॅबॉलिझम ) आकार घेत असते. प्रतिकारक व्यवस्था (इम्युन सिस्टिम) परिपक्व होण्याच्या मार्गावर असते. पदार्थाची आवड निवड आणि चव याच काळात तयार होत असते. या क्रांतिक काळातल्या आहाराच्या परिस्थिती-पर्यावरणाचा प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर पडत असतो.

जैविक वय आणि साखरेचा काय संबंध?

माणसाचं कॅलेंडरनुसार वय म्हणजे, ‘क्रोनॉलोजिकल एज’ आणि दुसरं ‘बायॉलॉजिकल एज’. कधी तरी असं घडतं की, दोन सत्तर वय असलेली माणसं एकत्र पाहिली तर आपण एकाला म्हणतो, ‘तुम्ही सत्तर वर्षांचे वाटत नाही’ पण दुसरा माणूस आपल्याला सत्तरीचा वाटतो. असं का, तर हा फरक जैविक वयाचा असतो. दोन व्यक्ती सत्तर वर्षाच्या असल्या तरी त्यांच्या ‘पेशी’ तसंच त्यांची इम्युन सिस्टिम यांच्यातले वृद्धत्व प्रक्रियेचे (एजिंग प्रोसेस) स्तर वेगवेगळे असतात. हे पाहता, बाळाच्या पहिल्या हजार दिवसांत साखर खाण्याचं प्रमाण कमी असेल किंवा जास्त असेल तर त्याचा चांगला वाईट -परिणाम जैविक वयावर होतो का याचा एक शोध या प्रयोगात घेतला गेला.

साखर कमी,आयुष्य मोठं?

या प्रयोगानुसार १९५१ ते १९५६ या काळात ज्यांच्या सुरुवातीच्या आहारात साखरेचं प्रमाण कमी होतं, त्यांची जैविक वय वाढण्याची गती सुरुवातीच्या आहारात साखरेचं प्रमाण वाढलं होतं त्यांच्यापेक्षा २.२ वर्षांनी कमी होती. म्हणजे कलेंडरनुसारच्या वयापेक्षा त्यांचं जैविक वय २.२ वर्षांनी लहान होतं किंवा असंही म्हणता येतं की, आहारात साखरेचं प्रमाण कमी असणारे २.२ वर्षांनी तरुण होते. १९५१ मध्ये जन्मलेल्या माणसांना त्यांच्या पहिल्या एक हजार दिवसात साखरेचं रेशनिंग अत्यंत कठोरपणे झाल्यामुळे आहारात साखर खूपच कमी मिळाली होती. १९५३ नंतर जन्मलेल्या माणसात साखरेवरचं रेशनिंग उठल्यामुळे आहारातलं साखरेचं प्रमाण वाढू लागलं होतं. त्याचेच हे परिणाम होते.

जैविक वय मोजतात कसं?

जैविक वय मोजण्याचे काही मार्ग आहेत. त्यातला एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे, टेलोमेरची लांबी मोजणं. माणसाच्या प्रत्येक गुणसूत्राच्या दोन्ही टोकांवर डीएनए आणि प्रथिनं यांची बनलेली संरक्षक टोपी असते. जशी शरीरातील प्रत्येक पेशी म्हातारी होऊ लागते, त्यानुसार टेलोमेरची लांबीसुद्धा कमी होऊ लागते. म्हणजेच वाढत्या वयाबरोबर टेलोमेर आखूड होत जाते. परंतु, पहिल्या एक हजार दिवसांतले जास्त दिवस आहारातलं साखरेचं प्रमाण कमी राहिलं, त्यांच्या टेलोमेरची लांबी वय वाढूनसुद्धा फार कमी झाली नाही. याचा दुसरा अर्थ, जीवनाच्या सुरुवातीच्या एक हजार दिवसांत जर आहारात साखर कमी असेल तर ‘पेशींच्या’ वृध्दत्व प्रक्रियेची गतीदेखील ‘स्लो’ होते, असा आहे.

इम्युन सिस्टिमवरही साखरेचा हल्ला?

केंब्रिज विद्यापीठात झालेल्या या संशोधनात जसं साखर कमी-अधिक प्रमाणात खाण्याचा माणसाच्या जैविक वयावर परिणाम घडून येतो, असं दिसून आलंय, तसंच सुरुवातीच्या एक हजार दिवसांत जर आहारात साखरेचं प्रमाण कमी असेल तर त्याचा चांगला परिणाम पुढील आयुष्यात माणसाच्या इम्युन सिस्टिमवर होतो, असंही आढळलं आहे. अगदी नेमकेपणाने सांगायचं तर साखर कमी खाल्ल्याने माणसांच्या रक्तातलं ‘ग्रांझायिम-बी’ या प्रथिनाचं प्रमाण कमी झाल्याचं सिद्ध झालं आहे. याचा अर्थ, ज्यांच्या रक्तातलं या प्रथिनाचं प्रमाण कमी झालं होतं,त्यांच्या इम्युन सिस्टिमला ‘ओव्हर वर्क’सुद्धा करावं लागलेलं नाही. इथे मुद्दा असा आहे की, जेव्हा प्रतिक्षम व्यवस्थेला जास्त काम करावं लागतं, तेव्हा या प्रथिनाचं रक्तातलं प्रमाण वाढतं आणि इम्युन सिस्टिम गडबडते.

शरीर व्याधी आणि मनोविकृतीलाही साखर जबाबदार?

जन्मानंतरच्या एक हजार दिवसांत ‘शुगर एक्सपोजर’ म्हणजे साखरेचं सेवन कमी असेल तर ५० वर्षानंतरही त्या-त्या माणसांच्या आहारावर हा परिणाम टिकून राहतो. ही माणसं आपोआपच आहारात कमी साखर घेतात. याशिवाय गोडाची चव विकसित न झाल्यामुळे त्यांचा आहार विविध प्रकारचा आणि आरोग्यपूर्ण असतो, त्यामुळे त्यांच्यात टाइप-२ डायाबिटिस आणि अतिरक्तदाब विकाराचं प्रमाण कमी आढळतं. म्हणजे काय तर, शरीराच्या वाढीच्या क्रांतिक काळातल्या साखरेच्या सेवानातल्या थोड्याशा फरकाचे दूरगामी परिणाम अर्ध शतकानंतरही माणसात दिसून येतात.

मनोविकृतीला धग मिळते?

अर्थात, एवढ्यापुरतंच हे संशोधन मर्यादित नाही, तर या डेटाचं आणखी विश्लेषण सुरु आहे. कारण, साखरेच्या कमी सेवनामुळे अनेकांमध्ये डिमेंशिया, अल्झायमर सारख्या इतर मनोविकृती यांचं प्रमाणही कमी असण्याचे संकेत संशोधकांना मिळाले आहेत. थोडक्यात काय,तर जन्मानंतरच्या पहिल्या तीन वर्षांत ज्यांच्या तोंडात साखर कमी पडेल, तो असाध्य रोगांपासूनही दूर राहील.

साखर आणि कर्करोगाचं काय नातं?

साखर आणि आरोग्याच्या संबंधावर संशोधन करणाऱ्या या संशोधकांनी कर्करोगाच्या केसेस ट्रॅक करण्यासाठी ‘UK Biobank’ च्या मोठ्या डेटाबेसचा उपयोग केला. या बायोबँकेचं वैशिष्ट्य म्हणजे, यात भाग घेणार्‍यांच्या आरोग्य विषयक पैलूंचा अनेक दशकं मागोवा घेऊन त्याचा व्यवस्थित रेकॉर्ड ठेवला जातो. त्यातली एक लक्षवेधी बाब म्हणजे, कोणाला कर्करोग झाला आणि केव्हा झाला यांच्याही इथे व्यवस्थित नोंदी घेतलेल्या आहेत.

कोणत्या प्रकारचे कर्करोग टळतात?

१९५१-१९५६ या काळातल्या ६४ हजार सँपल साइजमधल्या काहींनी सत्तरी पार केली आहे, काही वयाच्या सत्तरीत प्रवेश करत आहेत. ज्यांना पहिल्या एक हजार दिवसांत साखरेच्या रेशनिंगमुळे आहारात मोठा काळ कमी प्रमाणात साखर उपलब्ध झाली, त्यांच्यामध्ये स्तन, प्रोस्टेट ग्रंथी, यकृत, गुदाशय आणि फुप्फुस या पाच अवयवांच्या कर्करोगाचं प्रमाण कमी आहे असं आढळलं. त्यातही विशेषतः कमी साखरेच्या आहारामुळे यकृताच्या कर्करोगाचं प्रमाण सुमारे ६९ टक्क्यांनी, तर स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण ३६ टक्क्यांनी कमी होतं, असं दिसलं.

शोधनिबंधांचं महत्त्व काय?

ब्रिटनमध्ये १९५१ ते १९५६ या कालावधीत १९५३ पर्यंत साखरचं रेशनिंग केलं गेलं. नंतर ते संपलं. या प्रक्रियेत घडलं असं की, आहारात साखरेचं प्रमाण कमी असणारे आणि तुलनेनं साखरेचं प्रमाण जास्त असणारे असे आपोआपच दोन समूह तयार झाले. असा प्रयोग ठरवून लोकशाही व्यवस्थेत कदाचित करता येणार नाही. किंवा ठरवून संशोधन ‘डिझाइन’देखील करता येणार नाही. म्हणूनच हा साखरेचा नैसर्गिक-आपोआप घडलेला प्रयोग असं या शोधनिबंधात म्हटलं आहे आणि हेच याचं महत्त्वही आहे.

संशोधनाचा सांगावा काय?

जन्मानंतरच्या पहिल्या एक हजार दिवसांच्या आहारातला थोडासा बदल माणसाच्या सबंध जीवनावर खोलवर परिणाम करतो. हा या संशोधनाचा मुख्य सांगावा आहेच, पण रेशनिंग ऑफिससारख्या सामान्य सरकारी कार्यालयात प्रामाणिक नोंदी जतन करून ठेवल्या, तर तो वैज्ञानिक संशोधन करणाऱ्यांसाठी माहितीचा खजिना असतो. संशोधना करता हा खजिना खुला केल्यानंतर त्यातून मोलाचा डेटा तयार होतो. त्याच्या योग्य विश्लेषणानंतर काढलेले दूरगामी निष्कर्ष अवघ्या मानवजातीला दिशादर्शक ठरू शकतात आणि ‘तुझ्या तोंडात साखर पडो’ ही कौतुकाची भावना प्रतिकात्मक रुपातच राहणं योग्य आहे, असेही काही मोलाचे संदेश या संशोधनातून मिळाले आहेत.